शिवचरित्रमाला भाग ४०
तापी नदीच्या तीरावर.
शिवाजी महाराजांचे हे दळवादळ सुरतेच्या रोखाने नजिक येऊ लागल्यावर जनतेत घबराट उडाली. खेड्यापाड्यांतील लोक सैरावैरा पळू लागले. ही त्यांची केविलवाणी घबराट पाहून महाराजांना वाईटच वाटले. त्यांनी आपल्या सैनिकांच्या मार्फत या पळणाऱ्या जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी या तीन अक्षरांची दहशत उत्तरेकडे केवढी पसरली होती , त्याचे हे प्रत्यंतर होते. ‘ मी शिवाजीच आहे. आम्ही मराठे आहोत. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आम्ही अजिबात धक्का लावणार नाही ‘ अशा आशयाचे धीराचे आश्वासन सैनिक देत होते. त्यामुळे घबराट थोडीबहुत कमी झाली.
या मराठी मोहिमेच्या वार्ता सुभेदार इनायतखानला समजत होत्या. पण तो इतका गाफील होता की , त्याचा ‘ शिवाजी सुरतेवर येत आहे या बातम्यांवर विश्वासच बसेना.
दुधन्यापाशी म्हणजे सुरतेच्या अगदी सीमेवर महाराज येऊन पोहोचले. त्यांनी आपला अधिकृत वकील (बहुदा वल्लभदास) खानाकडे पाठविला आणि ‘ मला एक कोटी रुपये खंडणी द्या. मी शहरात येतही नाही. येथूनच परत जाईन. तुमच्या शाहिस्तेखानानं गेली तीन वर्षे आमच्या मुलुखाची भयंकर लूट आणि नासाडी केली. बेअब्रुही केली. त्या नुकसानीच्या भरपाईखातर मला तुम्ही ही खंडणी द्या. ही खंडणी तुम्ही एकटेही देऊ शकाल. ( म्हणजे इतका पैसा तुमच्या एकट्यापाशी आहे. खाल्लेला!) पण मी सोबत धनिकांची यादी देत आहे. त्या सर्वांकडून तुम्हीच रक्कम गोळा करा. ‘ या आशयाचा सविस्तर मजकूर महाराजांनी सुभेदाराला विदित केला. पण सुभेदाराने हेटाळणी करून हे आवाहन फेटाळून लावले.
मग मात्र महाराज चिडले. गाफील खान चिडला नाही. त्याने विनोदी पद्धतीनेच या भयंकर ज्वालामुखीशी व्यवहार केला. अन् सुरतेसकट तो या मराठी लाव्हारसात एक हजार मोगल सैन्यानिशी बुडाला. सुरतेच्या रक्षणांस म्हणजेच युद्धास त्याने उभे राहावयास हवे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज प्रमुख अधिकाऱ्याने म्हणजेच जॉर्ज ऑक्झींडेन याने स्वत: सुभेदाराला भेटून या गंभीर संकटाची पुरेपूर जाणीव करून दिली. पण तरीही तो बेपर्वाच. उलट त्याने जॉर्जलाच म्हटले की , ‘ तुम्ही अंग्रेज लोक फार मोठे विचारी आणि बहाद्दूर समजले जाता. अन् तुम्हीच या शिवाजीच्या नावाने भुरटेगिरी करणाऱ्या लोकांना इतके घाबरता ?’
या उत्तराने जॉर्ज अधिकच गंभीर बनला. त्याला मुख्यत: आपल्या इंग्रज वखारींची चिंता होती. हा शिवाजी जर आपल्या वखारीवर चालून आला तर ? राजापूरच्या इंग्रज व्यापारी वखारींची याच शिवाजीने (मार्च १६६० ) कशी धूळधाण उडविली ते त्याला माहित होते.
जॉर्ज ऑक्झींडेन आपल्या वखारीत परतला. त्याच्यापाशी काळे अन् गोरे नोकरलोक होते फक्त दोनशे. त्याने एक विलक्षण गोष्ट केली.या दोनशे लोकांच्या खांद्यावर बंदुका दिल्या. यात मजूर , कारकून आणि सैनिक होते. ते आता सर्वचजण सैनिक बनविले गेले. अन् जॉर्जने या दोनशे लोकांसह बँड वाजवित निशाणे घेऊन सुरत शहरात रूटमार्च काढला. जॉर्ज स्वत: त्यात होता. हे संचलन सुभेदाराने स्वत: आपल्या हवेलीतून पाहिले. सुभेदाराला ही केवळ थट्टा चेष्टा वाटली तो हसला.
हा पहिला दिवस. (दि. ६ जाने. १६६४ ) सुरतेबाहेर एक बाग होता. कालाबाग. त्यातील एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी महाराज एका खुर्ची सारख्या बनविलेल्या उंचट आसनावर बसले. एवढ्यात एक गंमत घडली. सुरतेत धर्मप्रचाराचे काम करणारा , कॅप्युसिन ख्रिश्चन मिशनचा मिशनरी रे अॅम्ब्रॉस हा महाराजांस भेटावयास बुऱ्हाणपूर दरवाज्याबाहेरच्या कालाबागेत आला. परवानगी घेऊन तो समोर आला. त्याने महाराजांस नम्रतेने विनंती केली की , ‘ मी ख्रिश्चन मिशनरी आहे. आमचे एक चर्च , मठ आणि रोगग्रस्तांवर उपचार करण्याकरिता हॉस्पिटल आहे. आपले आणि औरंगजेब बादशाहांचे काही राजकीय भांडण आहे. आमचा त्यात काहीच संबंध नाही. तरी मी आपणांस विनंती करतो की , आपण निदान माझ्या गोरगरीब रोगग्रस्तांचा रक्तपात करू नये. ‘
या आशयाच्या त्याच्या बोलण्यावर महाराज त्याला म्हणाले , ‘ कुणी सांगितलं तुम्हाला की , मी तुमचा रक्तपात करणार आहे म्हणून! तुम्ही लोक गरिबांकरिता फार चांगले काम करता , हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही आधीपासूनच घेतली आहे. तुम्ही निर्धास्त असा.
‘ रे. अॅम्ब्रॉस परत गेला खरोखरच मराठ्यांची एक तुकडी ख्रिश्चनांच्या या कार्यस्थळाभोवती रक्षक म्हणून उभी होती.
मराठी सैनिकांनी खंडण्या गोळा करण्यास शहरात सुरुवात केली. गडगंज श्रीमंतांकडूनच फक्त खंडणी गोळा केली जात होती. त्यातही टक्केवारी होती। खंडणी घेतल्यावर , त्या त्या धनिकाला रसीद दिली जात होती.
सुभेदार इनायतखान आता मात्र घाबरून सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार सैन्यानिशी लपून बसला. त्याने सुरतेेचे धड रक्षणही केले नाही वा खंडणी देऊन शहर वाचविलेही नाही. बेजबाबदार.
सुरत शहराच्या बाहेर पण नजिकच एका एकलकोंड्या मोठ्या घरात एक गुजराथी विधवाबाई राहत होती. तिचा पती धनिक होता. या बाईच्या घराला चुकूनमाकूनही कोणाचा त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी मराठी रक्षक रात्री पहाऱ्यावर पाठविले होते.
खंडण्या गोळा केल्या जात होत्या. पण जे त्या देण्याचे नाकारीत होते , त्यांच्या घरात शिरून मराठे सक्तीने धन गोळा करीत होते. ठिकठिकाणी मराठ्यांनी पकडलेले बादशाही अधिकारी आणि नोकरचाकर कैद करून कालाबागेत महाराजांपुढे हजर केले जात होते. कुठेही प्रतिकार असा होतच नव्हता. सर्व युरोपीय वखारवाल्यांनी आपले ‘ देणे ‘ मुकाट्याने देऊन टाकले होते. पण मग रूटमार्च काढणाऱ्या इंग्रजांचे काय ? जॉर्जने आपल्या वखारीच्या तटांवर तोफा आणि सैनिक सज्ज ठेवले होते. त्यांचे युनियन जॅक वखारीवर फडकत होते. स्वत: जॉर्ज सुसज्ज होता. फक्त दोनशे लोक! हजार लोकांच्या निशी इनायतखान किल्ल्यात लपून बसला होता. दरवाजे बंद होते. किल्ल्याचे आणि विवेकाचेही.
… क्रमश.