झुंज : भाग २४ (अंतिम)

झुंज : भाग २४ (अंतिम)

 

आपल्या समोर किल्लेदाराला पाहताच छत्रपतींच्या चेहऱ्यावर नापसंतीची एक पुसट रेषा उमटली. किल्लेदारालाही या गोष्टीची चांगलीच कल्पना होती.

“बोला किल्लेदार… याच साठी का आम्ही तुमची रामशेजवर नियुक्ती केली?” काहीशा नापसंतीने महाराजांनी विचारले.

“माफी असावी म्हाराज… पन किल्ल्यावरील रसद संपत आली व्हती. किल्ल्यावरील लोकंबी हवालदिल झाले. आन रयतेचा इचार करून मला ह्यो निर्नय घ्यावा लागला. तरी पन तुमाला यात आमी कसूर केली असे वाटत असेल तर तुमी द्याल ती शिक्षा मला काबुल हाये…” आपल्या हातातील पन्नास हजारांची थैली महाराजांच्या शेजारी उभ्या असलेल्या कारकुनाकडे सोपवत किल्लेदार हात बांधून उभा राहिला. महाराजांनी त्याच्या चेहऱ्याकडे एकदा रोखून पाहिले आणि किल्लेदार खरे बोलतो आहे याची त्यांना मनोमन खात्री पटली.

“ठीक आहे… झाले ते झाले… काही वेळेस माघार घेणेही गरजेचे असते. लवकरच तुम्हाला नवीन मोहिमेवर पाठवले जाईल. तो पर्यंत विश्राम करा…” इतके बोलून राजांनी किल्लेदाराबरोबरचे संभाषण संपवले.

इकडे बादशहा मात्र खूपच खुश होता. त्याच्या मार्गातील सगळ्यात मोठा काटा, हंबीरराव एकाएकी नाहीसा झाला होता. नाशिक आणि बागलाण प्रांतातील बराचसा प्रदेश मुगल राजवटीत सामील झाला होता. विजापूर आणि गोवळकोंडा मुगली अमलाखाली आले होते. आणि त्यातच अनेक वर्ष झुंजून देखील हार न जाणारा रामशेज त्याच्या ताब्यात आल्यामुळे ही आपल्यावर अल्लाची मेहेर असल्याची भावना बादशहामध्ये रुजली. रामशेज आपल्या ताब्यात येणे म्हणजे अल्लाची रेहमत म्हणून या गडाचे नांव रहीमगड असे बदलण्यात आले. या किल्ल्यावरून बादशहाला नाशिक, बागलाण, अहमदनगर, ठाणे आणि औरंगाबाद या सगळ्याच प्रांतावर लक्ष ठेवणे सोपे जाणार होते. तसेच हा किल्ला दिसायला जरी लहान असला तरी किती चिवट झुंज देऊ शकतो याचा त्याला चांगलाच अनुभव आला होता. त्यामुळेच या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले.

एक महिन्यापेक्षाही कमी कालावधीत रामशेजचा कायापालट झाला. पडझड झालेल्या भागांची नव्याने बांधणी केली गेली. गडावर दारुगोळा मुबलकप्रमाणात उपलब्ध करून दिला गेला. जवळपास २० एक लहान मोठ्या तोफा गडावर तैनात करण्यात आल्या आणि बादशाही अमलास सुरुवात झाली.

या प्रत्येक गोष्टीची माहिती संभाजी महाराजांचे हेर त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते.

आणि एक दिवस छत्रपतींनी किल्लेदारास बोलावणे पाठवले. दोनच दिवसात किल्लेदार छत्रपतींसमोर हजर झाला.

“या किल्लेदार… आज तुम्हाला मोहिमेवर निघायचे आहे.” महाराजांनी सुरुवात केली.

“आज्ञा म्हाराज… मोठ्या मनाने तुमी आमच्या चुका पदरात घेतल्यात. आता स्वराज्याच्या कार्यात कोनतीबी कसूर व्हायाची नाई…” किल्लेदाराचा हात तलवारीकडे गेला.

“तुम्हाला रामशेज ताब्यात घ्यायचा आहे… पण आता रामशेज पूर्वीपेक्षा बलाढ्य बनला आहे हेही लक्षात असू द्या…” महाराजांनी फर्मावले आणि किल्लेदाराचा चेहरा खुलला. आपल्यावर लागलेला फितुरीचा डाग धुवून काढण्याची नामी संधी किल्लेदाराकडे चालून आली.

“काळजी नसावी म्हाराज… ह्यो मराठा काय चीज हाये त्येच बादशहाला दाखिवतो…” असे म्हणून त्याने महाराजांचा निरोप घेतला.

बरोबर अगदी मोजकेच ३०० स्वार घेऊन किल्लेदार रामशेजच्या दिशेने निघाला. काहीही झाले तरी ही संधी सोडायची नाही अशी त्याने जणू प्रतिज्ञाच केली होती.
रहीमगडावरील बादशहाचा किल्लेदार अगदीच बेसावध होता. एकतर जो किल्ला फितुरीने आपल्याकडे आला त्यावर इतक्या लवकर आक्रमण होईल हे त्याला स्वप्नात देखील वाटत नव्हते. समजा तसे झाले तरी जवळपास एक हजाराची शिबंदी बादशहाने गडावर ठेवली होती. लहान मोठ्या अशा २० तोफा आणि मुबलक दारुगोळा याच्या जोरावर या किल्ल्याकडे पाहण्याचे कुणाचे धाडस होणार नाही असेच तो समजून होता.

रात्रीच्या किर्र अंधारात मराठा सैन्याची तुकडी गडाचा डोंगर चढत होती. स्वतः किल्लेदार सर्वात पुढे राहून या तुकडीचे नेतृत्व करत होता. तटबंदीखाली येताच किल्लेदाराने सगळ्यांना सूचना द्यायला सुरुवात केली. अगदी मोजक्या शब्दात सगळ्या सूचना दिल्या गेल्या आणि गडावर दोर फेकले गेले. ते व्यवस्थित अडकले आहेत याची खात्री केली गेली आणि काही जण तटबंदी चढू लागले.
तटबंदीजवळ पोहोचताच सगळ्यात आधी प्रत्येकाने कोणता आवाज तर होत नाही याचा कानोसा घेतला. नंतर हळूच एकेक डोके तटबंदी पलीकडे पाहू लागले. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. पहाऱ्यावरील सैनिक काही जण अर्धवट पेंगत होते. कित्येक जण तर तलवार बाजूला ठेवून चक्क झोपले होते. गडावर मशालींचा अगदी मंद उजेड दिसत होता. सैनिकाने हळूच इशाऱ्याचा आवाज केला आणि उरलेल्या तुकडीने भराभर दोराने वर चढायला सुरुवात केली.

संपूर्ण तुकडी गडाच्या तटबंदीवर पोहोचली तरीही मुगल सैन्याला त्याचा सुगावा लागला नाही. सगळे जसे वर आले तसा हर हर महादेवचा गजर आसमंतात घुमला. आपल्या समोर इतके मराठा सैन्य पाहून खडबडून जागे झालेले मुगल सैनिक पुरते भांबावले. त्यातील काहींनी आपल्या तलवारी उचलल्या पण त्या म्यानातून बाहेर काढण्याचीही संधी त्यांना मिळाली नाही. एकेका वारासरशी एकेक शीर धडावेगळे होऊ लागले. डोळे चोळत उठलेल्या सैनिकांना समोरचे दृश्य पाहून थंडीतही घाम फुटला.

“भागो… भागो… दगा… या अल्ला… मराठा आया…” या आणि अशा अनेक वेगवेगळ्या आरोळ्या आणि त्याच बरोबरील किंकाळ्यांनी आसमंत दणाणून गेला. मुगल किल्लेदार या सगळ्या प्रकाराने जागा झाला. हातात शमशेर घेऊन तोही मराठा सैन्याच्या समोर आला. तो पर्यंत गडावरील जवळपास दोनशे मुगल सैनिक गारद झाले होते. कित्येकांनी तर मराठ्यांना खरेच भूत वश आहेत असा समज करून घेतला होता. उरलेल्या मुगल सैन्याने हा हल्ला परतवून लावण्याचा नेटाने प्रयत्न केला पण मराठ्यांच्या जोरापुढे त्यांचे काहीही चालेना. आणि त्यातच अघटीत घडले. किल्लेदाराचा एक भयंकर वार अंगावर झाल्याने मुगल किल्लेदार धारातीर्थी पडला आणि मुगल सैन्याचा प्रतिकार संपला. या लढाईत जवळपास १०० एक मराठे सैनिकही वीरगतीला प्राप्त झाले पण तो पर्यंत किल्लेदाराने गडाचा ताबा घेतला.

सूर्य उगवल्याबरोबर गडावर शिवरायांच्या स्वराज्याची भगवी पताका फडकू लागली. एक दूत संभाजी महाराजांकडे ही शुभवार्ता देण्यास रवाना झाला.

औरंगजेब बादशहाला जेव्हा हे वर्तमान समजले त्यावेळेस त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. जो किल्ला कोणतीही साधने नसताना पन्नास हजाराची फौज पाठवूनही त्याला ५ वर्षे घेता आला नाही तोच किल्ला मराठ्यांच्या अवघ्या ३०० शिलेदारांच्या तुकडीने फक्त एका रात्रीत पराक्रमाची शर्थ करत परत जिंकून घेतला. बातमी ऐकल्या बरोबर त्याच्या संतापाचा पारा चढला. पण चिडून काहीही होण्यासारखे नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव स्पष्ट दिसून येऊ लागले.

“या परवरदिगार… ये मरहट्टे कीस मिट्टीसे बने है?” तोंडातल्या तोंडात शब्द पुटपुटत बादशहा खाली बसला.

आणि रामशेज मात्र पुढील १३० वर्षांसाठी सुरक्षित झाला होता.

समाप्त

ही कादंबरी मला शिवप्रेमी ग्रुप कडून प्राप्त झाली. मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

मित्रानो, गेले २४ दिवस आपण आतुरतेने वाट पहात असलेली ही मालिका आज संपली. आपण महाराजांच्या एका किल्लेदारावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

झुंज : भाग २३

झुंज : भाग २३

 

बराच वेळ गेल्यावरही किल्लेदार काही बोलत नाही हे पाहून अब्दुल करीमच्या मनातील चलबिचल वाढू लागली. नेकनामखानामार्फत बादशाहने त्यालाही खिलत, पाचशेची मनसब तसेच दहा हजार नगद स्वरुपात देण्याची तयारी दाखवली होती. आणि हे साध्य होणार होते ते किल्लेदाराच्या एका निर्णयावर.

“आप और अच्छी तरह सोच लिजिए…” अब्दुल करीमचे शब्द किल्लेदाराच्या कानावर पडले आणि किल्लेदार भानावर आला.

“ठरलं…” किल्लेदार उद्गारला.

“बहोत खूब… लेकीन?” अब्दुल करीम गोंधळला.

“तुमी म्हनताय त्ये बरोबर हाये. खानाला आमचा निरोप द्या… त्यांना सांगा… गड त्यांच्या ताब्यात द्यायला आमची तयारी हाये… पर त्ये… आमच्या लोकास्नी तुमी तुमच्या रायतेवानी वागवाया पायजेल…” किल्लेदाराने किल्ला ताब्यात देण्याची तयारी दाखवली आणि अब्दुल करीमच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.

“माशा अल्लाह… बहोत सही फैसला किया है आपने… आपका संदेसा खांसाबतक पहुंच जायेगा…” असे म्हणत अब्दुल करीम उठला. त्याला ही गोष्ट लवकरात लवकर खानाच्या कानावर घालायची होती. त्याच्या डोळ्यापुढे आता पाचशेची मंसब आणि दहा हजार नगद तेवढी दिसत होती.

दोनच दिवसात किल्लेदाराने गडाच्या किल्ल्या नेकनामखानाच्या हवाली केल्या. खाननेही तत्काळ पन्नास हजार नगद देऊन बादशहाकडून आलेली खिलत किल्लेदाराच्या स्वाधीन केली आणि किल्ल्यावर अनेक वर्षांनी मुगलांचा चांदसितारा फडकला.

या काळात संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. आणि त्यामुळेच बादशहा खूपच संतापला होता. तेवढ्यात नेकनामखानाचा जासूद आला.

“बोलो…” अगदी रुक्ष स्वरात बादशहा पुटपुटला.

“हुजूर… बहोत अच्छी खबर है…”

“बहोत अच्छी खबर? क्या रामसेज पे अपना चांदसितारा फडका?”

“जी हुजूर…” जासुदाने होकार दिला आणि बादशहाचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना.

“तुम सच बोल रहे हो?” बादशहाने त्याच्या संशयी वृत्तीने परत विचारले.

“जी हुजूर… नेकनामखानने किलेपर फतेह हासील कर ली…” जासुदाने सांगितले…

“और बताव…” खुशीत येऊन बादशहाने विचारले.

“हुजूर… हमे जंग की जरुरत ही नही पडी… ये काम पेठ के जमिदार अब्दुल करीमने किया… उसने रामशेजके किलेदार को पाचहजार की मनसब और पचास हजार नगद का लालच दिया. उसी के साथ बादशहा की उनपर इनायत होगी ये भी कहां… और फिर खून की एक बुंद गिरेबिना रामशेज अपने कब्जे मे आ गया…” त्याने उत्साहात सांगितले आणि बादशहाचा चेहरा पडला. आपल्या वडिलांनी जसा हा किल्ला लढून जिंकला तसाच तो आपणही जिंकावा हीच त्याची इच्छा होती आणि या एका गोष्टीमुळे जरी गड त्याच्या ताब्यात आला होता तरी तो फितुरीमुळे. पराक्रमामुळे नाही.

“पता नही ये मरहट्टे कीस मिट्टीसे बने है? एक आदमी जितना इमानदार है, दुसरा आदमी उतनाही बेईमान…” बादशहा तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

“तुम जाव…” त्याने फर्मान सोडले आणि जासूद माघारी वळला.

आज संभाजी महाराजांचे चित्त खूपच विचलित होते. एकाच वेळेस चार पाच मोहिमांवर त्यांना लक्ष ठेवावे लागत होते. कुठे मराठी सैन्य कमी पडू लागले तर त्यांच्यासाठी ज्यादा कुमक पाठवणे, कुठे रसद पाठवणे तर कुठे स्वतः हातात तलवार घेऊन मराठा शिलेदारांच्या मदतीला जाणे. एक क्षणही त्यांना निवांतपणा तो काय मिळत नव्हता. त्यांच्या मनात गोव्यातील मोहिमेबद्दल विचार चालू होते आणि हुजऱ्या काहीसा धावतच आत आला. आल्या आल्या त्याने राजांना मुजरा केला.

“काय खबर आहे?” छत्रपतींनी विचारले.

“म्हाराज, घात झाला… सरनौबत हंबीरराव कामास आले…” त्याने बातमी दिली आणि छत्रपतींच्या पायातील त्राणच गेल्यासारखे त्यांना झाले.

“काय?” महाराजांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.

“जी म्हाराज… त्यांनी पराक्रमाची शर्थ केली पन त्यास्नी गोळा लागला अन…” जासूद बोलायचे थांबला.

“जगदंब…” काहीशा हताश वाणीने छत्रपती उद्गारले. या धक्क्यातून ते स्वतःला सावरतात न सावरतात तोच नाशिकहून खबऱ्या नवीन खबर घेऊन आला. पाच वर्षे अगदी शौर्याने लढलेला रामशेज फितुरीने मोगलांच्या हाती गेला होता. छत्रपतींचे रक्त तापले पण घटना घडून गेली होती.

रामशेज मुगलांच्या हाती जाऊन १५ दिवस झाले असतील तोच रामशेजचा किल्लेदार पन्नास हजाराची थैली घेऊन राजांपुढे हजर झाला.

क्रमशः

झुंज : भाग २२

झुंज : भाग २२

 

औरंगजेब बादशहा आपल्या आपल्या शामियान्यात बसला होता. शेजारीच तीन मौलवी कुराण आणि हदीसच्या प्रती घेऊन त्यात तोंड खुपसून बसले होते. बहुतेक कोणत्या तरी मोठ्या विषयावर बादशहाने त्यांचे मत मागितले होते आणि त्यावर धर्मशास्त्र काय सांगते याच गोष्टीची ते पडताळणी करत होते. तेवढ्यात हुजऱ्या आंत आला. त्याने बादशहाला कुर्निसात केला आणि नाशिकहून जासूद आल्याची वर्दी दिली. नाशिकचे नांव ऐकताच बादशहाने लगबगीने त्याला आत पाठवण्यास सांगितले.

“बोलो… क्या संदेसा लाए हो?” त्याने विचारले. जासुदाने कुर्निसात करून आपल्या जवळील इखलासखानाचा संदेश बादशहाच्या सुपूर्द केला. बादशहाने तो स्वतःच वाचायला सुरुवात केली. बादशहा संदेश वाचत असताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेच भाव दिसून येत नव्हते. संदेश वाचून झाल्यावर बराच वेळ बादशहा विचार करत होता.

“कौन है बाहर?” बादशहाने एकाएकी आवाज दिला आणि हुजऱ्या आत आला.

“जल्द से जल्द मुल्हेर के सरदार को यहां बुलानेका इंतजाम करो…” बादशाहने हुकुम सोडला.

पाचव्या दिवशी मुल्हेर किल्ल्याचा किल्लेदार सरदार नेकनामखान बादशहापुढे हजर झाला.

“नेकनामखान… तुम बडी चतुराईसे साल्हेरके किलेदारको पातशाहीकी खिदमतमे लाए थे… वहां जंग होती तो हमारा भी बहोत नुकसान होता. तुम्हारी सुझबुझसे हम बहोत खुश है… अब यही काम तुम्हे रामशेजके लिए करना है… अगर तुम ये काम करते हो तो तुमको पांचहजारी मनसबसे नवजा जायेगा और तुम्हे नगद १५००० दिये जाएंगे…” बादशहाने त्याला आमिष दिले.

“आपकी मेहेर है जहांपना… आपका फर्मान हमारे लिए खुदा का फर्मान है… थोडेही दिनोमे रामशेज आपका किला केहेलायेगा…” बादशहाला कुर्निसात करत नेकनामखान माघारी वळला.

मुल्हेर किल्ल्यावरील एका प्रशस्त दालनात तीन जण मसलत करीत बसले होते. एक होता मुल्हेर किल्लेदार नेकनामखान, दुसरा होता इखलासखान आणि तिसरा व्यक्ती होता पेठचा जमीनदार अब्दुल करीम. कसेही करून रामशेजवर चांदसितारा फडकवायचा ह्याच एका विषयावर त्यांचे खलबत चालू होते. बराच वेळ त्यांची मसलत चालू होती. शेवटी त्यांच्यात एकमत झाले आणि काहीशा प्रसन्न चेहऱ्याने अब्दुल करीम तिथून बाहेर पडला.

मुल्हेरवरून परतल्यावर इखलास खानाने आपला वेढा बराचसा ढिल्ला सोडला. वेढ्याच्या नावावर फक्त घटका दोन घटकांनी गडाच्या फेऱ्या चालू झाल्या.
आज रामशेज गडाच्या मुख्य दरवाजावर एक दूत उभा होता. त्याने दरवाजा ठोठावला. त्याची पूर्ण तपासणी करून त्याला आता घेण्यात आले. नवीन किल्लेदार आपल्या माणसांबरोबर सल्लामसलत करत बसला होता. इतक्यात हुजऱ्या आत आला.

“काये?” किल्लेदाराने विचारले.

“किल्लेदार… जमीनदार अब्दुल करीमचा मानुस आला हाये…” हुजऱ्याने सांगितले. अब्दुल करीम हा या परिसरातील एक नामवंत जमीनदार आहे हे किल्लेदार चांगले जाणून होता. पण त्याचे आपल्याकडे काय काम असावे? किल्लेदार विचारात पडला.

“आत पाठव…” किल्लेदाराने फर्मान सोडले. काही वेळातच जासूद आत आला. त्याने किल्लेदाराला मुजरा करून आपल्या जवळील खलिता किल्लेदाराच्या स्वाधीन केला. किल्लेदाराने तो स्वतःच्या ताब्यात घेऊन वाचायला सुरुवात केली. खलित्यात जमीनदाराने किल्लेदाराशी भेट घेण्याचा मानस बोलून दाखवला होता. काहीसा विचार करून आणि योग्य ती काळजी घेऊन किल्लेदाराने त्याची भेट घेण्याचे ठरवले. कोणत्याही शस्त्राविना फक्त एका व्यक्तीसह जमीनदाराने भेटीस किल्ल्यावर यावे असा त्याने निरोप पाठवला.

दिवस ठरला. वेळ ठरली आणि ठरल्या वेळेला जमीनदार अब्दुल करीम आपल्या एका माणसाला बरोबर घेऊन किल्लेदाराच्या भेटीला आला.

“बोला जमीनदार… आज इकडं कुठं?” किल्लेदाराने विचारले.

“हुजूर… हम तो सुकून पसंद आदमी है… सियासतसे हमारा क्या लेना देना?” जमीनदाराच्या बोलण्यावरूनच त्याच्या स्वभावाचा अंदाज येऊ लागला.

“नाई म्हंजी… तुमी आसंच येनार नाई हे ठावं हाये आम्हाला…” यावेळेस किल्लेदाराचा स्वर अगदी रुक्ष होता.

“गुस्ताखी माफ हुजूर… पर हम आपके लिए मुल्हेरका किलेदार नेकनामखान का संदेश लाए है…” जमीनदार एकेक शब्द अगदी तोलून मापून बोलत होता.

“मुल्हेरचा किल्ला तर मुगल बादशहाने घेतलाय ना?” किल्लेदार सावध झाला.

“जी हुजूर…”

“मंग त्याचं माज्याकडं काय काम?”

“हुजूर… आप तो जानते है… साल्हेर मुल्हेरपर मुगलोन्का अधिकार हो गया है, त्र्यंबक और अहिवंत को भी उनकी फौजोने घेरा है. यहां भी इखलास खान डेरा जमाये बैठा है. इस किलेपर ना तोपे है ना लोग. पहेले रुपाजी और मानाजी के साथ त्रंबकका किलेदार भी मदत करता था. अब वो भी नही है. रुपाजी सातारामे है, मानाजीको आपके संभाजी महाराजने कैद कर लिया… अब अगर मुगल फौजोने घेरा कडक किया तो यहां के लोग भूखे मरेंगे… और ये बात आप भी जानते हों…” प्रत्येक वाक्यावर जोर देत अब्दुल करीम बोलत होता. त्याची प्रत्येक गोष्ट खरी होती.

“मंग? काय म्हनतोय नेकनाम खान?” किल्लेदाराचा आवाज खाली आला.

“हुजूरने आपके लिए संदेसा भेजा है, अगर आप किला हमारे हवाले करते हो तो आपको पचास हजार नगद दिये जाएंगे. इसीके साथ आपको बादशहाकी तरफ से तीन हजार की मंसब और खिलत दी जायेगी.” अब्दुल करीमने एकेक आमिष दाखवायला सुरुवात केली.

“ये भी सोच लिजिए… संबाजी आपको कोई वतन नही देगा… लेकीन बादशहा सलामत की मेहेर हुई तो आप वतनदार भी बन सकते हो…” हे वाक्य अब्दुल करीमने उच्चारले आणि किल्लेदाराने वर पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर रागाची एक रेष दिसली पण अगदीच काही क्षण. त्याने लगेचच स्वतःला सावरले. आता मात्र त्याच्या डोक्यात जबरदस्त विचारचक्र सुरु झाले. कारण शेवटी निर्णय त्यालाच घ्यायचा होता. एकीकडे स्वराज्याशी बेईमानी करून स्वतःचा स्वार्थ साधायचा किंवा स्वराज्याशी इमानदारी करून येणाऱ्या संकटांना सामोरे जायचे. बरे संकटे देखील अशी की त्यात प्रत्येकाची गाठ मृत्यूशी. किल्लेदार विचार करत होता आणि जमीनदार अब्दुल करीम अगदी बारकाईने त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता.

क्रमशः

झुंज : भाग २१

झुंज : भाग २१

 

दोन दिवसांनी किल्लेदार रामशेजवर पोहोचला. आल्या बरोबर त्याने आपल्या पत्नीला छत्रपतींच्या भेटीचा वृत्तांत कथन केला. तसेच लगेचच नवीन किल्लेदाराच्या ताब्यात गड देऊन सरनौबत हंबीरराव मोहित्यांच्या मदतीला जाण्याचे छत्रपतींचे फर्मानही सांगितले. आपल्या पतीला मिळालेला हा बहुमान पाहून त्याची पत्नीचे उर अभिमानाने भरून आले. ही बातमी काही क्षणातच संपूर्ण गडावर पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी संभाजी महाराजांनी केलेल्या किल्लेदाराच्या बहुमानाचाच विषय होता. खरे तर दर चार सहा वर्षांनी किल्लेदार बदलत होता. कित्येक वेळेस तर एक किल्लेदार एका ठिकाणी फक्त काही महिनेच अधिकारी म्हणून काम बघत असे. त्यामुळे गडावरील लोक आणि किल्लेदार यांच्यात सहसा तितका जिव्हाळा दिसून येत नसे. पण इथे मात्र चित्र पूर्णतः बदलले होते. किल्लेदारावर प्रत्येक जण जीव ओवाळून टाकत होता. त्याने तसा सगळ्यांनाच लळा लावला होता. एकीकडे किल्लेदारावर छत्रपतींनी टाकलेल्या विश्वासाचा अभिमान आणि दुसरीकडे यामुळेच होणारी त्यांची ताटातूट. आणि हेच कारण होते की प्रत्येक जण एकच विषय बोलत होता.

किल्लेदार आल्याच्या तिसऱ्याच दिवशी नवीन किल्लेदार गडावर हजर झाला. हा नवीन किल्लेदार जुन्या किल्लेदारापेक्षा वयाने काहीसा लहान होता. नवीन दमाचा. सहा फुट उंच, सावळा रंग, रुंद बांधा आणि सरदार म्हणून शोभू शकेल असा तरणाबांड गडी.

जुन्या किल्लेदाराने त्याचे खुल्या दिलाने स्वागत केले. परत एकदा सभा बोलवली गेली.

“गड्यांनो… आपलं राजं म्हंजी देवाचाच अवतार… त्यांच्याच आज्ञेनं आपन ह्यो गड बादशाला मिळू दिला नाई. शेवटी त्योबी त्रासला आन येढा सुटला. पन त्याचा काय भरोसा नाय. त्यो अवरंगाबादला तळ ठोकून हाये. त्याचा कोनचा बी सरदार कदीबी परत हमला करू शकतो. म्हनून आपन सावध ऱ्हायला पायजे. धाकल्या म्हाराजांनी मला इजापूरच्या मोहिमेवर जायला सांगितलं हाये. माह्या जागी ह्ये नवीन किल्लेदार आता गडाचं राखन करनार हायेत. तवा जी मदत तुमी मला केली तीच मदत यांना बी करायची हाये. आपन समदे स्वराज्याची रयत. याचपायी आपन जीव द्यायला बी तयार असलं पायजेल. पुना आपली भेट हुईल, ना हुईल… पन जवर बादशा हितं हाय तवर आपली झुंज संपलेली नाई… ह्ये समद्यांनी ध्यानात ठिवा आन आमचा रामराम घ्या…” इतके बोलून किल्लेदार उठून उभा राहिला. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

“हर हर महादेव…” असंख्य घोषणांनी वातावरण दुमदुमले.

दुसऱ्याच दिवशी किल्लेदाराने गडावरील आपला गाशा गुंधाळला. गडाच्या चाव्या नवीन किल्लेदाराच्या स्वाधीन केल्या. बरोबर काही निवडक स्वार आणि आपला कुटुंबकबिला घेऊन किल्लेदार रामशेजचा गड उतरू लागला.

रामशेजच्या किल्लेदाराने गड सोडून जवळपास ४/५ महिने झाले होते.

औरंगजेब बादशहाचा दरबार भरला होता. प्रत्येक ठिकाणचे हेर येऊन बादशहाला बातम्या देत होते. आज बादशहा जरा खुश होता आणि त्याचे कारण म्हणजे कोकणातील अनेक मोहिमेत त्याच्या फौजांनी चांगली कामगिरी केली होती. आणि एवढ्यात एक हेर त्याच्या पुढ्यात आला. बादशाहाला त्याने लवून कुर्निसात केला.

“क्या खबर है?” बादशहाने विचारले.

“हुजूर… त्रंबकगडके किलेदारको संबाने वापस बुलाया है…” त्याने खबर दिली आणि त्रंबकचे नांव ऐकताच बादशहाला रामशेजची आठवण झाली. मध्यंतरीच्या काळात त्याला या गडाचा पूर्णतः विसर पडला होता. तसे त्याला तिथे नवीन किल्लेदार आल्याचे समजले होते पण कुतुबशाहीचा पूर्ण बिमोड करण्यासाठी त्याने या बातमीकडे जरासे दुर्लक्ष केले होते. त्याचे डोळे आनंदाने चमकले. ज्याने रामशेज झुंजवला तोही बदलला होता आणि त्याला मदत करणारा त्र्यंबकचा किल्लेदार देखील बदलला म्हटल्यावर त्याच्या मनात परत एकदा रामशेजची जखम ताजी झाली.

“इखलास खान…” त्याने इखलास खानाला आवाज दिला.

“जी जहांपना…”

“तुम दस हजार फौज लेकर रामशेज जाव… जो भी हो… जैसे भी हो… रामशेजपे अपना चांदसितारा फडकाना…”

“ऐसा ही होगा जहांपना…” तलवारीच्या मुठीवर हात ठेवत खान उद्गारला.

“ये बात तो शहाबुद्दीन खान, फतेहखान और कासम खान भी बोला था… पर हुवा क्या? सबको खाली हाथ लौटना पडा… इसलिये अब मुझे सिर्फ फतेह चाहिये…” बादशहा काहीसा उखडला. कारण हेच वाक्य तो चौथ्यांदा या छोट्याशा किल्ल्याबद्दल ऐकत होता. शहाजहानने आपली कारकीर्द हाच किल्ला जिंकून सुरु केली होती आणि तोच किल्ला औरंगजेबाला घेता येत नव्हता.

दहा हजारांची फौज घेऊन इखलासखानाने रामशेजच्या तळाशी आपले ठाण मांडले. खरे तर रामशेज साठी ही गोष्ट नवीन राहिलेली नव्हती. त्यामुळे आलेल्या नवीन किल्लेदाराने तेच धोरण स्वीकारले जे पहिल्या किल्लेदाराने स्वीकारले होते. अनेक दिवस झाले पण इखलासखानाला यश मिळत नव्हते. अजून काही दिवसांनी आपली देखील बादशहाकडून खरडपट्टी काढली जाणार या एकाच गोष्टीची त्याला चिंता वाटत होती. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला. किल्लेदार तर बदलला आहे. मग पुन्हा पहिल्या पासून सुरुवात केली तर? काय हरकत आहे? कोणताही विलंब न करता त्याने त्या योजनेचे पहिले पाऊल टाकले.

क्रमशः

झुंज : भाग २०

झुंज : भाग २०

 

संभाजी महाराज आपल्या तंबूत पुढच्या मोहिमेबद्दल विचार करत होते आणि तेवढ्यात हुजऱ्या आत आला. त्याने छत्रपतींना लवून मुजरा केला.

“महाराज… जासूद आलाय…” त्याने सांगितले.

“आत पाठव त्याला…” छत्रपतींनी हुकुम सोडला. जासुदाने आत येताच महाराजांना मुजरा केला.

“काय खबर?”

“महाराज… आपल्याच मानसांनं घात केला. सरदार नागोजी मानेनं फितुरी केली. त्यांच्या संग आजूक काई मराठे सरदारबी बदशाला फितूर झाले…” त्याने एका दमात खबर सांगितली.

“काय? स्वराज्याशी फितुरी? स्वधर्माशी बेईमानी? शिवशंभू…” छत्रपतींच्या चेहऱ्यावर क्रोध दिसू लागला.

“जी म्हाराज…” जासुदानं खाली मानेनेच होकार दिला.

“अजून काय खबर?” स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवत छत्रपतींनी विचारले.

“सरनौबत हंबीरराव आन सरदार संतांजी विजापूरकडं रवाना झाले. पन मिरज आन बेळगाववर मुगलांचा चांदसितारा फडकला.” त्यांने सांगितले आणि महाराज काहीसे विचारात पडले.

“ठीक आहे…” छत्रपतींनी जासूदाला निरोप दिला. सध्या त्यांना मिळणाऱ्या बातम्या बऱ्याचशा अशाच पद्धतीच्या होत्या. एक चांगली बातमी मिळाली की त्याबरोबर दोन वाईट बातम्या त्यांच्या कानावर पडत होत्या. एक तर त्यांना एक दिवसही व्यवस्थित आराम मिळत नव्हता. आणि त्यात या गोष्टींची भर. त्यांचे विचारचक्र जोराने फिरत होते आणि तेवढ्यात पुन्हा हुजऱ्या आत आला.

“रामशेजवरनं जासूद आलाय…” त्याने वर्दी दिली. रामशेजचं नांव ऐकलं आणि छत्रपतींचे मन काहीसे बेचैन झाले. गेल्या साडेतीन वर्षांपासून तेथला किल्लेदार अगदी तुटपुंज्या साधनानीशी बादशहाच्या हजारोंच्या मुगल सैन्याशी झुंजत होता. इतर कुणी किल्लेदार असता तर आतापर्यंत किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला असता पण या पठ्ठ्याने अजूनही हिंमत सोडलेली नव्हती. आता मिळणारी बातमी चांगली की वाईट याचा मात्र त्यांना अंदाज लागेना.

“आत पाठव…” त्यांनी आपले मन काहीसे कठोर करून हुकुम केला.

“म्हाराजांचा विजय असो…” आलेल्या जासुदाने महाराजांना लवून मुजरा केला.

“काय खबर?”

“आनंदाची खबर हाये म्हाराज… मुगल सैन्याचा रामशेजचा येढा उठला…” त्याने अगदी आनंदाने सांगितले…

“आई भवानीमातेची कृपा…” म्हणत छत्रपतींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.

“किल्लेदाराला आम्ही बोलावल्याचे सांगा…” असे म्हणत त्यांनी जासूदाला निरोप दिला.

जवळपास ५ दिवसांनी रामशेजचा किल्लेदार संभाजी महाराजांच्या छावणीत आला.

“या किल्लेदार… तुम्ही पराक्रमाची शर्थ केलीत… आम्ही खुश आहोत. आई भवानीचा आशीर्वाद आणि मोठ्या महाराजांचा मान तुम्ही राखलात. तुमची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे…” छत्रपतींनी किल्लेदाराच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.

“म्या भरून पावलो… आमच्यासाठी राजं देवाचा अवतार… त्योच आमच्यासाठी देव. आज देवाचा आशीर्वाद मिळाला आम्हास्नी… पन या समद्यात गडावरील हरेक मानसानं शिकस्त क्येली…” किल्लेदार म्हणाला आणि महाराजांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तसेही हल्ली असे आनंदाचे क्षण त्यांच्यासाठी दुर्मिळच झाले होते. काही दिवसांपूर्वीच काही महत्वाचे सरदार मुगलांना स्वतःच्या स्वार्थापायी मिळत असताना असे काही किल्लेदार मात्र स्वराज्याशी इमान राखून होते हीच गोष्ट राजांसाठी खूप अभिमानाची होती.

“किल्लेदार… तुमच्या या पराक्रमावर आम्ही बेहद खुश आहोत… आमच्याकडून तुम्हाला नजराणा तर मिळेलच पण तुमच्यावर आनखी मोठी जबाबदारी टाकण्याचा आमचा मानस आहे…” छत्रपतींनी सांगितले.

“आज्ञा म्हाराज… माज्यासाठी ह्योच मोठा नजराना हाये… हुकुम करा… मोहिमेवर रुजू होन्यास येका क्षनाचीबी देरी व्हायची नाई…” तलवारीच्या मुठीवर आपला हात ठेवत किल्लेदार उत्तरला.

“आम्हाला हीच अपेक्षा होती… १० दिवसांनी विजापूरकडे जायचे आहे… नागोजी माने फितूर झाले. आता तुम्हाला सरनौबत हंबीररावांना मदत करायची आहे…” छत्रपतींनी सांगितले आणि किल्लेदाराचा चेहरा उजळला. सरनौबत हंबीररांव मोहिते हे साक्षात छत्रपतींचे सासरे. पराक्रमाच्या बाबतीत ते कितीतरी वरच्या बाजूला. त्यांच्या बरोबर असलेले सरदार देखील त्यांच्या तोडीचे. आणि त्यांच्या बरोबर आपल्याला युद्धावर जाता येणार यातच किल्लेदाराला स्वतःचा अभिमान वाटला.

“तुमच्या जागी आता रामशेजवर नवीन किल्लेदाराची आम्ही निवड करत आहोत. त्याच्या ताब्यात गडाच्या किल्ल्या द्या आणि तुम्ही तिकडूनच मोहिमेवर रुजू व्हा…” छत्रपतींनी किल्लेदाराला आज्ञा केली आणि त्यांचा निरोप घेऊन किल्लेदार रामशेजच्या वाटेला लागला.

क्रमशः

झुंज : भाग १९

झुंज : भाग १९

 

दोघेही सरदार जसे रामशेज जवळ पोहोचले त्यांना किल्ल्याच्या चहुबाजूला मुगल सैन्य दिसत होते. काहीशा दुरूनच त्यांनी कुठे वेढा कमजोर पडला आहे हा याची पाहणी केली. पण यावेळेस त्यांना वेढ्यात कुठेही थोडीही ढिलाई दिसली नाही. त्यातून मुगल फौज संख्येने इतकी जास्त होती की त्यांच्याशी समोरासमोर लढाई करणे म्हणजे स्वतःहून आत्महत्या करण्यासारखे होते. अर्थात एरवी त्यांनी याही गोष्टीला मागेपुढे पाहिले नसते पण राजांचा हुकुम होता. त्यांच्या हातात वाट पाहण्याखेरीज काहीच नव्हते. तरीही एक दोन वेळेस सरदार रुपाजींनी आपल्या काही निवडक स्वरांना घेऊन वेढा तोडण्याचा प्रयत्न केलाच. पण त्यात त्यांना यश येऊ शकले नाही.

गडावरील रसद मात्र दिवसेंदिवस संपत होती. जास्तीत जास्त १५ दिवस पुरेल इतकेच धान्य गडावर होते. किल्लेदाराच्या चेहऱ्यावर उमटणारी चिंता त्याच्या बायकोला दिसत होती पण ती तरी काय करणार?

तीन दिवस असेच गेले आणि किल्लेदाराने परत एकदा सभा बोलावली.

“गड्यांनो… तीन वर्स झालं… आपन किल्ला झुंजवला. बादशानं सरदार बदलले पन आपन हार मानली नाई. पर आता ह्यो सरदार येगळाच हाये. निस्ता येढा दिवून बसून ऱ्हायला. आपन त्याच्यासंग टक्कर घ्यायची तर आपन फक्त ५०० आन त्ये २५०००. आपन खाली उतरलो तर हकनाक मरनार. नाय गेलो तर उपासमारी. तुमाला काय वाटतं? आपन काय कराया पायजेल?” त्याने सगळ्यांपुढे प्रश्न टाकला.

“किल्लेदार… ज्ये काय व्हयाचं त्ये हु दे… पर आपन माघार घ्यायची नाई.” एक तरुण पुढे येत उत्तरला.

“हा किल्लेदार…” इतरांनी देखील त्याच्या सुरात सूर मिसळला. तात्या मात्र यावेळेस गप्पच होता. किल्लेदाराने त्याच्याकडे पाहिले.

“तात्या… काय झालं?” किल्लेदाराने प्रश्न केला.

“मनात येक इचार आला…” तात्या अनवधानानं बोलून गेला.

“कसला?” किल्लेदाराने विचारले.

“आपन येक काम करू शकतो… आपल्याकडं १५ दिसांची रसद हाये. पन आपण एकाच वक्ताला जेवन घ्येतलं तर ती रसद आपल्याला २५ दिस पूरंल.” त्याने आपला विचार बोलून दाखवला.

“तात्या… दोन दिस एका वक्ताला खानं येगळं. पन आपलं समदं पोटावर चालतं. बरं आपन निभाऊन निऊ पन आपल्या संग बायकापोरं बी हायेत…” किल्लेदार उत्तरला. आणि तात्या शांत बसला. शेवटी एकभुक्त राहणे एक दोन दिवस ठीक पण त्यानंतर माणसातील शक्ती क्षीण होत जाते हे किल्लेदार चांगलेच जाणून होता. शेवटी काही गोष्टी ह्या दैवाधीन बनतात. ही गोष्टही आता त्याच बाजूला झुकत चालली होती. किल्ल्यावरील कित्येक स्त्रियांनी तर देवाधर्माचे नाव घेऊन उपास करायला सुरुवात केली. किल्लेदाराला देखील हे समजत होते पण त्याचा नाईलाज होता.

जवळपास १० दिवस झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील तेज दिवसेंदिवस कमी होत होते. चेहरे कोमेजले होते. देवाचा धावा करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरी कोणतीच गोष्ट उरली नव्हती.

खानालाही गडावरील हालचाली मंद झालेल्या जाणवल्या आणि तो मनातून सुखावला. त्याचा उत्साह वाढला. त्याने वेढा अजूनच कडक केला. जी गोष्ट या पूर्वीच्या सरदारांना जमली नाही ती गोष्ट आपण कमीतकमी लोकं गमावून मिळवणार आहोत याची त्याला जणू खात्रीच पटली. अजून काही दिवस आणि गड काहीही न करता आपल्या ताब्यात येणार ही गोष्टच त्याला खूप सुखदायक वाटत होती.

गडावरील लोकं वेगवेगळ्या देवाचा धावा करत होते आणि त्यांची हाक देवाने ऐकली. उन्हाचा कडाका कमी होऊन पावसाळ्याला सुरुवात झाली. तसेही नाशिक भागातील पाऊस तो. एकदा सुरु झाल्यावर कित्येक वेळेस तर तीन तीन दिवस उघडत नाही. जसा पाऊस सुरु झाला तसे रुपाजी आणि मानोजी यांचे चेहरे खुलले. याच पावसाचा आधार घेऊन आपण आपली कामगिरी फत्ते करावी याची त्यांनी मनात खुणगाठ बांधली.

तीन दिवस सलग पाऊस चालू असल्यामुळे मुगल सेनेची पुरती त्रेधातिरपिट उडाली. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले. दोन तीन वर्षांपासून सारखे युद्ध चालू असल्यामुळे आणि त्यात अनेकांनी आपले प्राण गमावल्यामुळे कित्येक मृतदेह तसेच पडले होते. पावसामुळे ते सडले आणि त्याची दुर्गंधी पूर्ण परिसरात पसरली. तो वास इतका त्रीव्र होता की कित्येकांना तिथे श्वास घेणे दुरापास्त होऊ लागले. कित्येक जण त्यामुळे होणाऱ्या रोगाला बळी पडले. याचा परिणाम असा झाला की दोन दिवस खानाला वेढ्यामध्ये ढील द्यावी लागली. जंगलाकडील भागातील लोकं दोन दिवसांसाठी तिथून बाजूला झाले आणि मराठा सैन्याला जागा मिळाली.

तो दुर्गंधीयुक्त परिसर तुडवत प्रत्येकाने गडाची वाट धरली. सगळ्यात पुढे दोन्ही मराठे सरदार होते. पाऊस काहीसा उघडला म्हणून किल्लेदार पाहणीला निघाला होता. त्याला दोन्ही सरदार गडाच्या दिशेने येताना दिसले. खानाने नवीन डाव टाकला असा समज करून त्याने आपल्या साथीदारांना बोलावले. भुकेने अर्धमेल्या झालेल्या लोकांमध्ये युद्धाचे नांव ऐकताच चैतन्य फुलले. तटाभोवती मोठमोठे दगड ठेवले गेले आणि आता फक्त किल्लेदाराची आज्ञा होण्याची ते वाट पाहू लागले.

दोन्ही सरदार अजून काहीसे जवळ आले आणि किल्लेदाराने त्यांना ओळखले. त्यांच्या बरोबर संभाजी महाराजांचे निशाण होते. सैन्य तुकडीच्या मागे किल्ल्यासाठी रसद असलेल्या गाड्या होत्या. आपल्याला मदत आली आहे हे किल्लेदाराने ओळखले. पण खात्री करून घेणेही तितकेच गरजेचे होते.
दोन्ही सरदार किल्ल्याच्या दरवाज्यात येताच किल्ल्याच्या दरवाज्याची झडप उघडली गेली.

“कोन हाये?” दाराच्या झडपेमधून डोकावलेल्या माणसाने प्रश्न केला.

“म्या सरदार रुपाजी भोसले आन ह्ये सरदार मानोजी मोरे… राजांनी रसद पाठविली हाये…” रुपाजींनी उत्तर दिले. झडपेतून बाहेर आलेले डोके बाजूला झाले. काही वेळ गेला आणि परत ती व्यक्ती दिसू लागली.

“खून दावा आदी…” त्याने फर्मान सोडले. एरवी एवढे मोठे सरदार दारात उभे आहेत म्हटल्यावर त्याने धावत जाऊन दरवाजे उघडले असते. पण यावेळेस परिस्थिती आणीबाणीची होती. कुणावरही पटकन विश्वास ठेवणे धोक्याचे होते.

“ही पहा…” मनोजींनी खुणेची मुद्रा बाहेर काढली. त्याकडे त्याने एकदा निरखून पाहिले आणि मग तत्काळ दरवाजा उघडला गेला. स्वतः किल्लेदाराने दोन्ही सरदारांचे स्वागत केले. रुपाजींनी किल्लेदाराला महाराजांचा निरोप कळवला. किल्लेदाराच्या अंगावर मुठभर मांस चढले.

कामगिरी फत्ते करून दोन्ही सरदार परत फिरले. जेव्हा पाऊस उघडला तेंव्हा खानाने परत वेढा कडक केला. पण त्याला गडावरील हालचाली वाढल्याचे जाणवले. महाराजांचा जयघोष ऐकू येऊ लागला. आता मात्र खान कोड्यात पडला. अगदी क्षीण झालेल्या मराठ्यांमध्ये एकदम इतका जोष आलेला पाहून त्याचे डोके ठणकले. आणि त्याला दोन दिवस वेढा उठविल्याची आठवण झाली. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. शेवटी त्याने बादशहाला पत्र पाठवून सगळी परिस्थिती सांगून वेढा उठविण्याची परवानगी मागितली. अगदी नाईलाजाने बादशाहने ती परवानगी दिली आणि जवळपास साडेतीन वर्षांनी रामशेजचा वेढा उठला.

क्रमशः

झुंज : भाग १८

झुंज : भाग १८

 

जरी खानाने वरवर दाखवले नाही तरी ही घटना त्याच्यावर खूपच नकारात्मक परिणाम करून गेली. त्यानंतरही त्याने काही दिवस वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण त्याला माघार घेणेही कमीपणाचे वाटत होते आणि त्यामुळेच आपले सैन्य हकनाक बळी पडत आहे हे माहित असूनही त्याला गड घेण्यासाठी प्रयत्न करत रहावे लागत होते. बरे कोणतीही शक्कल लढवली तरी त्याचा परिणाम फक्त एकच होता. आणि तो म्हणजे त्याची हार.

आजही खान आपल्या शामियान्यात नेहमीसारख्या फेऱ्या घालत होता, तेवढ्यात हुजऱ्या आत आला. त्याने खानाला कुर्निसात केला आणि बादशहाकडून जासूद आल्याची वर्दी दिली. क्षणाचाही विलंब न लावता खानाने त्याला आत बोलावले. बादशहाने कोणता हुकुम पाठवला असणार हे खानाने आधीच ओळखले. जासुदाने बादशहाचा खलिता खानाच्या स्वाधीन केला. जी गोष्ट घडू नये असे खानाला वाटत होते तीच गोष्ट त्याच्या नशिबी आली. बादशहाने त्याला रामशेजच्या स्वारीची सूत्रे कासम खानाच्या सुपूर्द करायला सांगितली आणि त्याची तळकोकण प्रांतात परस्पर रवानगीही केली होती. पण जो पर्यंत कासम खान मोहिमेची सूत्रे हातात घेत नाही तो पर्यंत मात्र फतेहखानाला तिथेच थांबण्याचा आदेशही देण्यात आला होता.

शहंशहाचा खलिता मिळाल्यापासून जवळपास ५ दिवसांनी कासम खान बरोबर १० हजाराची फौज घेऊन हजर झाला. ही फौज पूर्णतः नवीन दमाची होती. जवळपास १५ हजाराची फौज तिथेच ठेवून उरलेली फौज घेऊन फतेहखान तळकोकणाकडे रवाना झाला.

पुढील काही दिवस कासमखानाने देखील गड घेण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण सगळे विफल झाले. शेवटी त्याने गडाला वेढा देऊन वाट पाहण्याचे ठरवले.

गडावरील रसदही संपत आली होती. कासमखानाने गडावरील हमला पूर्णतः बंद केला आणि त्यामुळेच हळूहळू किल्ल्यावरील लोकांची बेचैनी वाढत होती. पण त्यांच्या हातात यावर उपाय करण्यासारखे काहीही नव्हते.

रायगडावर संभाजी महाराज चिंताग्रस्त वाटत होते. त्रंबक गडावरून रामशेज बद्दलची माहिती आठवडा / १५ दिवसांच्या अंतराने त्यांना मिळतच होती पण अगदी इच्छा असूनही त्यांना रामशेजच्या मदतीला जाणे शक्य होत नव्हते. स्वतः बादशहा औरंगजेब औरंगाबादला तळ ठोकून होता. जंजीऱ्याचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीस, औरंगजेब बादशहाने स्वतःकडे फितूर केलेले मराठे सरदार आणि पोर्तुगीजांनी फितूर केलेला मराठा सरदार सावंत यांच्याशी महाराजांच्या चकमकी उडत होत्या. आणि त्यामुळेच त्यांना रामशेजकडे लक्ष देणे जमत नव्हते. जवळपास तीन वर्षांपासून रामशेज एकटा झुंजत होता. आणि अजूनही त्याने हार मानली नव्हती. असा किल्ला मुगलांच्या हाती जाऊ द्यायला महाराजही तयार नव्हते. शेवटी त्यांनी मनाचा निश्चय केला आणि रामशेजच्या मदतीला कुमक पाठवायचे निश्चित केले. गडाला वेढा घालून बसलेल्या मुगल फौजेचे संख्याबळ जवळपास २५००० होते. तेवढे सैन्य पाठवणे महाराजांना शक्य नव्हते. शेवटी त्यांनी रुपाजी भोसले आणि मानोजी मोरे या दोन सरदारांना रायगडावर बोलावले.

दोन दिवसातच दोघेही सरदार महाराजांपुढे हजर झाले.

“आज्ञा महाराज…” महाराजांना मुजरा करून रुपाजी उभे राहिले.

“रुपाजी, मानोजी… बसा…” महाराजांनी त्यांना बसायला सांगितले. दोघेही स्थानापन्न होताच महाराजांनी सुरुवात केली.

“तुम्ही तर जानताच सध्या स्वराज्यासाठी आपणा सर्वांनाच जीवाचे रान करावे लागत आहे. एकही दिवस उसंत नाही. आणि याचाच फायदा मुगल बादशाह उचलतो आहे. त्याने नाशिकप्रांतात धुमाकूळ माजवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रामशेजचा किल्लेदार एकटा मुगल फौजेशी झुंज देतोय. तसे त्याला त्र्यंबक गडाचा किल्लेदार आणि अहिवंत किल्ल्याचा किल्लेदार यांनी रसद पुरवली पण ती कितीशी असणार? औरंगजेबाने या दरम्यान तीन सरदार बदलले आहेत. रामशेजचा किल्लेदार स्वतः शूर आहेच पण आपल्या रयतेचे काय? रसद संपली तर स्वतःच्या प्राणांचे बलिदान किंवा मुगलांचा अमल यापैकी एक गोष्ट त्यांच्या वाट्याला येईल. आणि असे झाले तर आम्हाला राजा म्हणवून घेण्यास काय अभिमान वाटणार? हे राज्य रयतेचे आहे. इथे आपण रयतेसाठी लढा देत आहोत. त्यामुळे तुम्ही दोघांनी तत्काळ रसद घेऊन रामशेजच्या मदतीला जा. पण एक लक्षात ठेवा… कोणताही आततायी निर्णय घेऊ नका. यावेळेस आपल्याला लढाई करायची नाही तर किल्लेदाराला रसद पुरवायची आहे.” महाराजांनी नेमकी गोष्ट दोघांना सांगितली.

“आपल्या मनाप्रमानंच हुईल महाराज… काळजी नसावी…” मानोजींनी त्यांना आश्वस्थ केले.

“आणि किल्लेदाराला आमचा निरोपही कळवा… तुमच्या सारखे मर्द मराठे स्वराज्याचे रक्षक असल्यामुळेच आम्ही निश्चिंत आहोत…”

“जी महाराज…” महाराजांना मुजरा करून दोघांनीही राजांच्या निरोप घेतला.
दोघेही सरदार बरोबर फक्त पाचशे घोडेस्वार घेऊन निघाले. खरे तर रुपाजी मनातून काहीसे हिरमुसले होते. महाराजांनी स्पष्ट शब्दात त्यांना शक्यतो लढाई न करण्यासाठी बजावले होते. एकावेळेस पाच पन्नास माणसांना अंगावर घेण्याची धमक असलेला शूर गडी खानाच्या सैन्यासमोर जाऊनही फक्त लपून बसून वाट पाहणार ही गोष्ट त्यांना काहीशी खटकत होती. पण स्वराज्यासाठी प्रसंगानुरूप वागण्याची कलाही दोघांनी चांगलीच साधली होती आणि याच गोष्टीमुळे महाराजांनी त्यांची निवड केली होती.

मराठा तुकडी जशी नाशिक प्रांतात शिरली तशी त्यांनी सगळ्यात पहिली भेट पट्टा किल्ल्याला दिली. तेथील किल्लेदाराकडून संपूर्ण रसद स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यांनी रामशेजकडे प्रयाण केले.

क्रमशः

झुंज : भाग १७

झुंज : भाग १७

 

“तुम किला फतेह कर सकते हो?” खानाने प्रश्न केला.

“जी हुजूर… पर…” मांत्रिकाच्या चेहऱ्यावर धन कमाविण्याची हाव खानाला स्पष्ट दिसली. त्याचे माथे ठणकले. पण याच्यावर काही धन खर्च करून फौजेचे मनोबल वाढणार असेल तर तो सौदा देखील खानासाठी फायद्याचा ठरणार होता. म्हणूनच तो गप्प राहिला.

“पर??? आगे बोलो…” काहीशा चढ्या आवाजात खानाने फर्मावले.

“हुजूर… वहां एक नही बहोत सारे भूत है… उन सबको वशमे करना पडेगा… उसका खर्च थोडा जादा होगा…” मांत्रिकाने सांगितले. त्याच्या चेहऱ्यावरील कुटिल भाव स्पष्ट जाणवत होते.

“आगे बोलो…”

“हुजूर… इसके लिए मुझे एक सोनेका नाग बनवाना पडेगा… फिर उसकी पूजा होगी, तो वो सिद्ध हो जायेगा. उसके बाद वो अपनी हर इच्छा पुरी करेगा. तो एक क्या सौ भूतोंपर भारी पडता है…”

“ठीक है… इसके लिए कितना खर्च होगा?” खानाने विचारले.

“उसके लिए सौ तोला सोना चाहिये…” काहीसे अडखळत मांत्रिकाने सांगितले.

“ठीक है… सबकुछ मिल जाएगा…”

“हुजूर… दो दिन बाद पुनव है… उसी दिन हम उस नाग की मदत से किला जीत लेंगे…” खानाला खुश करण्यासाठी मांत्रिक म्हणाला आणि त्यांची भेट संपली.
दोन दिवसांनी १०० तोळे सोन्याचा नाग हातात घेऊन मांत्रिक खानापुढे हजर झाला. खानाच्या शामियान्याच्या बाहेर त्याने पूजा मांडली. त्या पूजेच्या मधोमध त्याने सोन्याचा नाग ठेवला आणि तोंडाने असंबद्ध शब्दोच्चार चालू झाले. जवळपास सर्वच सैन्य अधिकारी त्याची पूजा पाहण्यास हजर झाले होते. स्वतः खान देखील मांत्रिकाचा खेळ पहात होता. जवळपास घटकाभर त्याचा हा खेळ चालला. त्यानंतर त्याने तो नाग स्वतःच्या हातात घेतला आणि गडावर आक्रमण करण्यासाठी खानाची परवानगी मागितली.

काही वेळातच खानाचे सैन्य पुन्हा तयार झाले. यावेळेस सैन्याच्या सगळ्यात पुढे डोक्यावर नाग घेऊन मांत्रिक चालत होता. त्याच्या मागोमाग काही अधिकारी आणि त्यांच्या मागे जवळपास तीन ते चार हजार पायदळ. सर्वांनी गड चढायला सुरुवात केली.

हे सगळेच किल्लेदार त्याच्या साथीदारांसह तटबंदीवरून पहात होता. आज कुणीतरी काळे कपडे घातलेला माणूस त्या सगळ्या सैन्याचे नेतृत्व करत होता. त्याच्या डोक्यावर काहीतरी चमकत होते पण ते नक्की काय आहे हे मात्र त्याला नीटसे समजले नाही. ते जसे अर्धा डोंगर चढून वर आले तेंव्हा किल्लेदाराच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्याला खानाच्या या कृत्याचे हसू आले.

“कामून हासून ऱ्हायले किल्लेदार?” तात्याने विचारले.

“ह्यो खान तर लैच येडा हाये तात्या…” किल्लेदार हसून म्हणाला.

“येडा? आन त्यो कसा?” तात्या गोंधळला.

“तात्या… आपन ऐकत नाई म्हनून त्यानं मांत्रिकाला बोलीवला… आता त्यो मांत्रिक काय करनार हाय?”

“पन किल्लेदार… त्याच्या मागं फौज बी हाय की…”

“असू दे ना… आपल्याकडं दगड धोंडे काय कमी हायेत का?” किल्लेदार हसला आणि तात्यालाही हसू आले.

“तात्या… आपल्या समद्या पोरास्नी बोलव… आन त्येंना सांग बरुबर तुमची गलोरीबी घिवून या…”

“जी किल्लेदार…” खरे तर किल्लेदार पोरांना का बोलावतो आहे हेच मुळी तात्याच्या ध्यानात आले नाही. पण किल्लेदाराने बोलावले म्हटल्यावर नाही तरी कसे म्हणणार?

काही वेळात पोरं गलोरी घेऊन किल्लेदारासमोर हजर झाले.

“कारं पोरांनो… आज युध करनार का?” त्याने विचारले आणि पोरांना आनंद झाला.

“व्हय किल्लेदार…” सगळ्यांनी एक सुरात उत्तर दिले.

“आज म्या तुमची नेमबाजी पहानार हाये… तुमी दावणार ना?”

“व्हय…”

“मंग आता गडाच्या खाली पघा… त्यो काळा डगला घातलेला मानुस हाय नव्हं, त्याच्यावर समद्यांनी गलोरी तानायची.” गड चढत असलेल्या मांत्रिकाकडे बोट दाखवत किल्लेदाराने सांगितले. मांत्रिकाकडे पाहिल्यावर पोरे थोडीशी गडबडली.

“त्येच्यावर?” त्यांच्या स्वरात गोंधळ उडालेला पूर्णतः दिसून येत होता.

“व्हय…”

“पर किल्लेदार…”

“का? काय झालं?” किल्लेदाराने विचारले.

“माजी आय म्हनते, सादूच्या आन मांत्रिकाच्या नादी लागायचं नाय…” त्यांच्यातील एक जण उत्तरला.

“कामून?”

“आवं… त्ये लोकं आपल्यावर खाक फुकून पाखरू बनिवता, उंदीर बनिवता. कदी कदी त दगुड बी बनतो मानसाचा…” त्याने सांगितले आणि किल्लेदाराला हसू आले.

“आरं… असं काय बी नस्तं. आन त्यानं अशी खाक फुकली त आपला देव हाय ना… ह्यो रामाचा गड हाये. रामाचं नाव घेतलं की भूतं बी पळत्यात. ह्यो तर मानुस हाये…” किल्लेदाराने सांगितले आणि पोरं विचारात पडली.

“काय बरुबर ना?”

“जी किल्लेदार…” पोरांनी एकसुरात उत्तर दिले.

“मंग घ्या रामाचं नांव आन ताना गलोरी त्या बाबावर…” किल्लेदाराने सांगितले आणि मुलांच्या गलोरी ताणल्या गेल्या.

मधूनच वर पहात अगदी सावधपणे डोक्यावर नाग घेऊन मांत्रिक गड चढत होता. त्यालाही तटावर माणसे दिसत होती. मनातून तो पूर्णतः घाबरला होता. कुठून आपण सोन्याच्या मोहाला बळी पडलो आणि या ठिकाणी आलो असेच त्याचे मन त्याला सांगत होते. पण आता वेळ निघून गेली होती. मागे मुगल सैन्य असल्यामुळे परत फिरणे त्याला शक्यच नव्हते. त्याचा हाच विचार चालू होता आणि एक छोटासा दगड त्याच्या कपाळावर लागला. त्याच्या तोंडून आवाज निघतो न निघतो तोच एका पाठोपाठ एक दगड त्याच्या अंगावर आपटू लागले. त्याच्या हातून सोन्याचा नाग केंव्हाच दूर जाऊन पडला. तो खाली कोसळला तरीही दगडांचा मारा संपला नव्हता. त्या छोट्या दगडांनी त्याला कित्येक जखमा केल्या होत्या. त्याच्या आरोळ्यांनी आसमंत दणाणून गेले. आजपर्यंत त्याने सांगितले म्हणून कित्येकांना दगडाने ठेचून मारले गेले होते. त्या सगळ्याचे फळ त्याला या रूपाने मिळत होते. काही वेळातच त्याचा आवाज बंद झाला आणि गडावरून परत एकदा मोठे दगड गडगडत येण्यास सुरुवात झाली. खानाच्या सैन्यात हाहाकार माजला. यावेळेस जो मोठे दगड वाचवत होता त्याला गलोरीचा प्रसाद मिळत होता. दोन ते तीन घटकातच जवळपास हजारएक लोकं कामास आले आणि मागे असलेले सैनिक पुढच्या तुकडीची ही गत पाहून मागच्या मागे पळून गेले.

खानाच्या हा डाव देखील नेहमीप्रमाणे त्याच्यावरच उलटला.

क्रमशः

झुंज : भाग १६

झुंज : भाग १६

 

आपला सर्वात खास पराक्रमी योद्धा, सैय्यदशाला आलेला असा मृत्यू फतेहखानाच्या जिव्हारी लागला. खरे तर सैय्यदशाला मरण्याआधी तलवार काढण्याचीही संधी मिळाली नाही हेच मुळी त्याच्या पचनी पडत नव्हते. मुगल तुकडीच्या मागावर गेलेले तीनही शिपाई त्याच्या समोर मान खाली घालून उभे होते. त्याने परत त्यांना विचारले.

“क्या सब मारे गये?”

“जी हुजूर…” खाली मानेनेच तिघांमधील एक जण म्हणाला.

“सैय्यदशा के बारे में बताव…”

“हुजूर… जब हम वहां पहुचे, तो सैय्यदशा का जिसम पडा हुवा था. उनकी समशेर भी मियानमे ही थी. पर उनके जिसमपर सिर नही था…” काहीसे बिचकत त्याने सांगितले.

“अगर सिर नही था तो वो सैय्यदशा था या कोई और ये तुमको कैसे मालूम?” काहीसे संतापाने खानाने विचारले.

“हुजूर… उनके कपडोंसे…” त्याने उत्तर दिले आणि खान विचारमग्न झाला. सैय्यदशाने बरोबर घेतलेला प्रत्येक जण कसलेला योद्धा होता आणि युद्ध न करताच त्यांच्यावर ही वेळ आली होती.

मुगल सैन्यात जेव्हा ही बातमी समजली तेंव्हा त्यांच्यात हळूहळू कुजबुज सुरु झाली. प्रत्येक जण या घटनेला वेगवेगळे रंग देऊ लागला. त्यातच अनेक अफवाही निमार्ण झाल्या. कुणी म्हणत की गडावरील किल्लेदार जादुगार आहे. कुणी म्हणे त्याने भूत प्रसन्न करून घेतले आहे. मुगल सैन्यातील जे लोकं हिंदू होते त्यांनी याचा संबंध एकदम रामाशी जोडला होता. त्यांच्या मते स्वतः रामराया गडाचे राखण करतो आहे. याचा परिणाम असा झाला की मुगल सैन्यातील अनेक अधिकारी मोहिमेवर जाण्यास टाळाटाळ करू लागले. अनेक जण हे आपण माणसाशी लढू शकतो, भूतांशी नाही हे खाजगीत बोलू लागले.
रोज कोणती ना कोणती नवीन वावडी खानाच्या कानावर येऊ लागली. हे सगळे थांबवणे खूप गरजेचे झाले. एकदा का सैन्याने माघार घेतली तर एकटा खान काहीही करू शकणार नव्हता. शेवटी याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायचे खानाने ठरवले.

परत एकदा सभा भरली. यावेळेस खानाने फक्त सगळ्यांचे ऐकून घ्यायचे ठरवले.

“हुजूर… गुस्ताखी माफ…” एका अधिकाऱ्याने काहीसे बिचकत सुरुवात केली.

“हां… बोलो… क्या बोलना है…”

“हुजूर… सब केहेते है…” इतके बोलून तो थांबला…

“हां… बोलो…”

“हुजूर… वो किलेदार है ना, उसने भूत को प्रसन्न किया है…” एका दमात त्याने वाक्य बोलून टाकले.

“क्या बकते हो?” खान संतापला.

“हुजूर… मै नही, बाकी सब बोलते है…” अधिकारी पुरता गडबडला.

“गधे है सब… भूत, जिन्न ऐसा कुछ नही होता… सब वहम है… इतना भी तुम्हे पता नही?” खान भडकला.

“गुस्ताखी माफ हुजूर… पर…” अधिकारी बोलायचे थांबला.

“पर क्या?”

“हुजूर… आप ही सोचो… हमने क्या क्या नही किया… पर हर बार हमारा ही नुकसान हुवा… सरदार शहाबुद्दीनखान ने इतना बडा दमदमा बनाया था… दोन दिन मे खाक हो गया… हम शामतक किलेकी दिवार तोडते है, सुबह वो वैसी की वैसी दिखाई देती है. हमारे तीनसौ लोग रात के अंधेरेमे वहां गये और उनको लडना भी नसीब नही हुवा. वो किलेदार तो रात के अंधेरेमे भी साफ साफ देखता है और हमपे हमला भी करता है. हमारे सात हजार सिपाही मरते है और उनका एक भी आदमी नही मरता… सबको पता है किलेपर एक भी तोप नही है पर तोप के गोले हमपर गिरते है. और उसकी आवाज भी नही आती. क्या ये कोई आम आदमी कर सकता है?”

अधिकाऱ्याचे बोल ऐकून खानही विचारात पडला. आतापर्यंतच्या सगळ्या घटना पाहिल्या तर त्या अविश्वसनीयच होत्या. कडव्या राजपुतांचे बंड मोडून काढणारा शहाबुद्दीन खान दोन वर्ष प्रयत्न करूनही यशस्वी झाला नव्हता. स्वतः फतेहखान देखील काही महिन्यांपासून किल्ला मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण परिणाम शून्यच.

“ठीक है… अब?” खानाचा स्वर मवाळ बनला.

“हुजूर… नासिकमे ऐसे बहोत मांत्रिक है… अगर उनकी मदत ली तो?” अधिकाऱ्याचा स्वर बदलला.

“लेकीन मुझे अबभी लगता है… भूत या जिन्न नही होते…” यावेळेस बोललेले खानाचे वाक्य अगदीच गुळमुळीत होते.

“हुजूर… इतना किया है तो ये भी करके देखते है…” दुसरा अधिकारी काहीसा शूर बनला.

“ये भी ठीक है… बुलाव फिर…” खानाने परवानगी दिली आणि सभा संपली.
दोन दिवस खान आणि तोफखाना दोन्ही शांतच होते. नेहमीप्रमाणे त्याचा शामियान्यात फेऱ्या घालण्याचा उद्योग चालू होता आणि तेवढ्यात हुजऱ्या आत आला. खानाला लवून कुर्निसात करत त्याने सैन्य अधिकारी भेटायला आल्याची वर्दी दिली.

“अंदर भेजो…” हुजऱ्याकडे लक्षही न देता खानाने हुकुम सोडला. काही वेळातच जवळपास तीन सैन्य अधिकारी आणि एक मांत्रिक खानापुढे हजर होते.

खानाने मांत्रिकाकडे निरखून पाहिले. काळी कफनी, गळ्यात कवड्यांच्या आणि पोवळ्यांच्या माळा, कपाळी काळे गंध आणि हातात मोरपिसांचा झाडू घेतलेला मांत्रिक उभा होता. मध्येच त्याचे डोळे फिरवणे, तोंडाने समजणार नाही असे काहीतरी बडबडणे आणि मधूनच हातवारे करणे चालू होते. त्याचा तो अवतार पाहूनच खानाचा पारा चढला. असे लोकं फक्त पैसे उकळतात इतकेच त्याला माहित होते. पण त्याने महत्प्रयासाने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट त्याला स्वतःला जरी पटणारी नव्हती तरीही मुगल सैन्याच्या भीतीवर काही प्रमाणात मलमपट्टी ठरणार होती. आणि तोच विचार करून त्याने मांत्रिकाला बोलावले होते.

क्रमशः

झुंज : भाग १५

झुंज : भाग १५

 

आज खान काहीसा शांत होता. खरे तर त्यांचे शांत राहणे ही नव्या वादळाची चाहूल होती. एकीकडे त्याचे शामियान्यात फेऱ्या घालणे चालू होते तर दुसरीकडे त्याचा दाढी कुरवाळण्याचा चाळाही चालूच होता. त्याला इथे येऊन देखील बरेच दिवस झाले होते. या काळात त्यानेही अनेकदा गडावर चढाई करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस त्याला माघारच घ्यावी लागली. हा गड ताब्यात घेणे त्याला आधी जितके सोपे वाटले होते तितकेच ते किती आवघड आहे हेही त्याला मनोमन पटले. पण हार मानणे हे त्याच्या स्वभावात नव्हते. जी नामुष्की शहाबुद्दीन खानावर आली ती आपल्यावर येऊ नये हेच त्याला वाटत होते. तसे झाले तर त्याने मारलेल्या मोठमोठ्या बढाया चारचौघांत उघड्या पडणार होत्या. त्यातून बादशहाची मर्जी खफा होणार हे वेगळेच. विचार करता करता त्याला एक कल्पना सुचली आणि त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला. त्याने त्या आवेशातच आवाज दिला.

“कौन है बाहर…”

“जी हुजूर…” लवून कुर्निसात करत एक पहारेकरी आत आला.

“जाव… सैय्यदशा को बुलाके लाव…” त्याने फर्मान सोडले.

“जी हुजूर…” म्हणत पहारेकरी आला तसा बाहेर पडला. काही वेळातच सैय्यदशा त्याच्या समोर हजर होता.

“सैय्यदशा… कल जैसे ही सुरज ढलने लगे… तुम छोटी तोपोसे किलेपर आगेसे हमला करोगे…” त्याने सैय्यदशाला हुकुम सोडला.

“गुस्ताखी माफ हुजूर… पर… छोटी तोपे?” सैय्यदशा गोंधळला.

“हां… छोटी तोपे…”

“हुजूर… बडी तोपोके गोले भी कभी कभी किलेतक जाते नही, फिर छोटी तोपे?” त्याने अडखळत विचारले.

“वो इसलिये के हमे हमला आगेसे नही, पिछेसे करना है…” गालातल्या गालात हसत खान म्हणाला आणि सैय्यदशाच्या डोक्यात प्रकाश पडला.

संध्याकाळ झाली तसा खानाचा तोफखाना सक्रीय झाला. तोफा धडधडू लागल्या. तोफांचे गोळे किल्ल्याच्या दिशेने पडू लागले. पण एकही गोळा किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हता. किल्ल्यावरील सर्वजण मुगल सैन्याचा हा उद्योग पहात होते. किल्लेदार स्वतः तटावर उभा राहून मुगल सैन्यावर नजर ठेऊन होता. बराच वेळ झाला पण या एका गोष्टीशिवाय इतर कोणतीही हालचाल दिसत नव्हती. हळूहळू अंधार वाढत होता. अमावस्या असल्याने आकाशात आज चंद्रही नव्हता. सगळीकडे मिट्ट काळोख. उजेड फक्त खानाच्या छावणीत आणि तोफ डागल्यावर जो धमाका होत होता त्याचाच. आता मात्र किल्लेदाराच्या मनात संशय उत्पन्न झाला. आज अचानक मुगल सैन्याला काय झाले असावे? लहान तोफांचा गोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत नाही हे माहिती असूनही चढाईसाठी लहान तोफांचा वापर? यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने धावत जाऊन आपला घोडा गाठला. इतरांना मात्र किल्लेदाराच्या मनात काय चालू आहे हेच समजेना. एका उडीतच त्याने घोड्यावर मांड ठोकली. घोड्याने जणू आपल्या धन्याचे मन वाचले होते. काडीचाही विलंब न करता त्याने रपेट चालू केली. काही क्षणातच तो किल्ल्याच्या मागील तटबंदीवर पोहोचला.

अंधार वाढला तसा सैय्यदशाने जवळपास तीनशे शिपाई गोळा केले. प्रत्येक जण हा अगदी तयार गडी. एकाच वेळेस चार जणही अंगावर घेऊ शकेल असा. सैय्यदशाने सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि त्यांची पावले गडाच्या मागील दिशेस वळली. रात्री एरवी मशाली किंवा टेंभे हाती घेवून निघणारे सर्वजण आज चक्क अंधारात डोळेफोड करत निघाले होते. सैय्यदशा या सगळ्यांचे नेतृत्व करत होता. मुगल सैन्याच्या या तुकडीने गड चढायला सुरुवात केली. प्रत्येकाचे पाऊल अंधारात देखील अगदी सावधगिरीने पडत होते. कुणाच्याही तोंडून साधा चकार शब्दही ऐकू येत नव्हता. काही ठिकाणी काही जण ठेचकाळत होते पण तरीही त्यांच्या तोंडून अवाक्षरही बाहेर पडत नव्हते. सैय्यदशाचा तसा हुकूमच होता. तसे अर्धा डोंगर पार करणे त्यांच्यासाठी काही विशेष नव्हते. खरा धोका होता तो त्यानंतर. कारण आतापर्यंत गडावरील लोकांनी जो पर्यंत अर्धा डोंगर चढून होत नाही तो पर्यंत कोणताही प्रतिहल्ला केला नव्हता. एकतर नाशिकची थंडी. त्यातून रात्रीच्या वेळेस वाहणारे गार वारे आणि तशातच मुगल सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता गड ताब्यात घ्यायचाच या ध्येयाने झपाटले होते. यातील कित्येक जणांच्या मनात प्रत्येक वेळेस माघार घ्यावी लागल्याच्या अपमानाची सलही होतीच. कधी नव्हे तो त्यांनी पूर्ण डोंगरमाथा सर केला होता. तोही रात्रीच्या अंधारात. गडावरून मात्र कोणतीही हालचाल दिसत नव्हती. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. आवाज फक्त रातकिड्यांचा.

किल्लेदार जसा गडाच्या मागील बाजूस आला तेव्हा त्याला तेथील सर्वच जण अगदी सावध असलेले दिसले.

“काय रे… काई हालचाल दिसून ऱ्हायली का?” त्याने आल्या आल्या प्रश्न केला.

“व्हय जी, आता तुमाकडं निगालो व्हतो…” कुनीतरी दबा धरून येऊ ऱ्हायले.

“अस्सं? यीवू द्या… त्यांना बी पानी पाजू आपन…” किल्लेदाराच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.

मुगल तुकडी पूर्णपणे गडाच्या बुरूजाजवळ जमा झाल्याची खात्री करून सैय्यदशाने तटबंदीवर दोर टाकण्याचे फर्मान सोडले. अर्थात दिलेला हुकुम अगदी हळू आवाजात होता. अंगावर दोराचे गुंढाळे घेतलेले १०/१२ जण पुढे आले. त्यांनी दोराला गाठ बांधायला सुरुवात केली. अगदी थोड्याच वेळात हे काम पूर्ण झाल्यावर दोराच्या एका टोकाला लोखंडी कड्या बांधण्यात आल्या आणि दोर तटबंदीवर फेकले गेले. त्यानंतर त्याला हिसका देऊन ते व्यवस्थित खाचेत आडकले आहेत याची खात्री करून, एकेकाने दोराच्या साह्याने बुरुजाच्या बाजूने तटबंदी चढायला सुरुवात केली.

किल्लेदारासह तेथील पहारेकरी दबा धरून बसलेलेच होते. तसे मशालींचा मिणमिणता उजेड त्यांना तटबंदीच्या आतल्या बाजूला काय हालचाल चालू आहे हे दिसण्यासाठी पुरेसा होता. मुगल सैन्याने फेकलेल्या दोरावर पडत असलेला ताण त्यांना स्पष्ट दिसू लागला. याचाच अर्थ दोरावरून गनिमांनी चढायला सुरुवात केली होती. अगदी हळूच त्यांनी आपल्या तलवारी म्यानातून बाहेर काढल्या. मशालीच्या मंद प्रकाशात त्या तलवारी अगदीच तळपत होत्या. अगदी दबक्या आवाजात एकेक जण दोराजवळ भिंतीच्या आडोशाने उभे राहिले. प्रत्येक जण आता पूर्णतः सज्ज झाला होता. अगदी काही क्षणच गेले असतील आणि प्रत्येक दोर लावलेल्या ठिकाणी मुगल सैनिकांची डोकी दिसू लागली. ते सर्वजण गडावरील परिस्थितीचा अंदाज घेत होते तेवढ्यात मराठयांच्या सगळ्या तलवारी हवेत फिरल्या. तोंडातून कोणताही आवाज न करता एकेक शीर धडावेगळे झाले. इतके होते न होते तोच काही जण कुऱ्हाडी घेऊन पुढे झाले. एकेका वारात एकेक दोर तुटला आणि त्याला लटकलेले मुगल सैनिक खाली उभ्या असलेल्या सैनिकांच्या अंगावर कोसळले.

“या अल्ला… काफिर आया… भागो…” असा एकच गलका पिकला. पण कुणालाही जिवंत जाऊ देण्याच्या मनस्थितीत किल्लेदार नव्हता. त्याचा आवाज आसमंतात फिरला…

“गड्यांनो… येकबी गनीम जित्ता जाऊ द्यायाचा नाई… टाका धोंडे समद्यांवर…” किल्लेदाराचा हुकुम होण्याचा अवकाश आणि वरून मोठमोठे दगड खाली उभ्या असलेल्या सैन्यावर पडू लागले. एकच ओरडा चालू झाला. वरून हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंबूराजे अशा असंख्य घोषणांनी आसमान दणाणले. मुगल सैन्याने पळून जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण रात्रीच्या अंधारात त्यांना ते शक्य झाले नाही. कित्येक जण फक्त तोल गेल्यामुळे दरीत कोसळले. कित्येकांनी स्वतःला वाचविण्यासाठी आपल्या समोर असलेल्या आपल्यास शिपायास धक्का देऊन दरीत पाडले. मराठ्यांच्या या हल्ल्यात स्वतः सैय्यदशा देखील स्वतःचे प्राण वाचवू शकला नाही. आलेली पूर्ण तीनशे जणांची तुकडी अगदी थोडक्या अवधीत स्वतःचे प्राण गमावून बसली. काही वेळ खालून काही आवाज येत नाही हे पाहून किल्लेदाराने दगडांचा मारा बंद करण्यास सांगितले आणि परत एकदा गडावर जयघोष चालू झाला.

गडावरून येणारे आवाज कुणाचे आहेत हे तोफखान्याच्या आवाजात फतेहखानाला नीटसे समजले नाहीत. तो मात्र सैय्यदशाने गड काबीज केलाच असणार अशाच भ्रमात राहिला. पण बराच वेळ होऊनही जेव्हा गडावरून खुणेची मशाल दिसली नाही तेंव्हा मात्र त्यांने दोन तीन शिपायांना सैय्यदशाच्या तुकडीची हाकहवाल घेण्यासाठी पाठवले. शिपाई जेव्हा तिथे पोहोचले तेंव्हा पूर्वेकडे तांबडे फुटू लागले होते. हळूहळू दिवसाचा प्रकाश वाढत गेला आणि त्यांना त्यांच्याच माणसाची प्रेते दिसू लागली. बरेच जण फक्त अंगावरील पोशाखावरून हे मुगल सैनिक आहेत हे समजत नव्हते. जवळपास ८/१० धडांवर शिरेच नव्हती. ती दूर कुठेतरी जाऊन पडली होती. स्वतः सैय्यदशाचे शिरही गायब होते. त्याच्या पोशाखावरून त्याची ओळख पटली. आपण मराठ्यांच्या नजरेस पडलो तर आपल्याला देखील परत जाणे शक्य होणार नाही हा विचार करून तिघेही मुगल सैनिक आल्या पावली परत फिरले. गडावरून किल्लेदारासह त्याचे शिपाई त्या तिघांवर लक्ष ठेवून होते. किल्लेदाराचा हुकुम झाला असता तर तेही परत गेले नसते पण किल्लेदाराने मुद्दाम त्यांना जिवंत सोडले होते. जेणेकरून ही गोष्ट मुगलसैन्यात पसरली जाईल आणि मुगल सैन्याचे धैर्य आणखीन खचेल.

गडावरून येणारे आवाज कुणाचे आहेत हे तोफखान्याच्या आवाजात फतेहखानाला नीटसे समजले नाहीत. तो मात्र सैय्यदशाने गड काबीज केलाच असणार अशाच भ्रमात राहिला. पण बराच वेळ होऊनही जेव्हा गडावरून खुणेची मशाल दिसली नाही तेंव्हा मात्र त्यांने दोन तीन शिपायांना सैय्यदशाच्या तुकडीची हाकहवाल घेण्यासाठी पाठवले. शिपाई जेव्हा तिथे पोहोचले तेंव्हा पूर्वेकडे तांबडे फुटू लागले होते. हळूहळू दिवसाचा प्रकाश वाढत गेला आणि त्यांना त्यांच्याच माणसाची प्रेते दिसू लागली. बरेच जण फक्त अंगावरील पोशाखावरून हे मुगल सैनिक आहेत हे समजत नव्हते. जवळपास ८/१० धडांवर शिरेच नव्हती. ती दूर कुठेतरी जाऊन पडली होती. स्वतः सैय्यदशाचे शिरही गायब होते. त्याच्या पोशाखावरून त्याची ओळख पटली. आपण मराठ्यांच्या नजरेस पडलो तर आपल्याला देखील परत जाणे शक्य होणार नाही हा विचार करून तिघेही मुगल सैनिक आल्या पावली परत फिरले. गडावरून किल्लेदारासह त्याचे शिपाई त्या तिघांवर लक्ष ठेवून होते. किल्लेदाराचा हुकुम झाला असता तर तेही परत गेले नसते पण किल्लेदाराने मुद्दाम त्यांना जिवंत सोडले होते. जेणेकरून ही गोष्ट मुगलसैन्यात पसरली जाईल आणि मुगल सैन्याचे धैर्य आणखीन खचेल.

क्रमशः