शिवचरित्रमाला भाग ४५
काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.
शहाजीराजे भोसले हे २३ जानेवारी १६६४ रोजी कर्नाटकात होदिगेरी या ठिकाणी घोड्यावरून पडून मृत्यू पावले। राजगडावर मातु:श्री जिजाबाईसाहेब सती जाण्यास सिद्ध झाल्या. पण मोठ्या मुश्कीलीने शिवाजीराजांनी आपल्या आईस सती जाण्यापासून माघारा फिरविले. या दिवसापासून शिवाजीमहाराज आठ महिने सतत आईच्या सहवासात राहिले. स्वत:चे आणि आईचेही दु:ख निवविण्याचा हा महाराजांचा प्रयत्न होता. ते आईला कुलदेवतेच्याच ठिकाणी मानीत असत.
शहाजीराजांची समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे त्याचवेळी व्यंकोजीराजांनी बांधली. हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. त्यांनीच राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली. शहाजीराजांच्या समाधीवर ‘श्री शाजीराजन समाधि ‘ असा लेख कोरलेला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर महाराजांनीही राजगडावर विपुल दानधर्म केला। आईवडिलांच्या बाबतीत महाराजांचं मन अतिशय नम्र होतं. नितांत श्रद्धावंत होतं. पूवीर् एकदा (इ. १६४९ मे-जून) शहाजीराजांच्याच पत्रामुळे कोंढाणा उर्फ सिंहगड हा मोलाचा किल्ला आदिलशाहस देऊन टाकण्याची वेळ महाराजांवर आली. स्वराज्यातला तळहाताएवढाही प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाण्याची वा देण्याची वेळ आली तर महाराजांना अतोनात वेदना होत असत. इथं तर सिंहगडसारखा किल्ला वडिलांच्या चुकीमुळे , बेसावधपणामुळे बादशाहला द्यावा लागतोय याच्या वेदना आणि तेवढाच वडिलांच्यावरती राग महाराजांच्या मनात उफाळून आला. आणि ते शहाजीराजांच्याबद्दल रागावून कडू बोलले. पण क्षणातच त्यांनी स्वत:ला सावरलं आणि जरी वडील चुकले असले , तरी वडिलांच्याबद्दल असे कडू बोलणे योग्य नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर यांच्यापाशी आपले व्याकूळ दु:ख आणि पश्चाताप व्यक्तही केला. यावरून आणि इतरही काही चारित्र्याची जडणघडण कशी झाली याची आपल्याला कल्पना येते.
या वर्षीचा ( इ। १६६४ ) पावसाळा संपत आला आणि ऑक्टोबरच्या प्रारंभीच्या महाराजांना विजापुरकडची खबर मिळाली की , खवासखान या सरदारास बेळगांवमार्गे कोकणात कुडाळ भाग शिवाजीराजांकडून जिंकून शाही अमलाखाली आणण्याकरिता मोठ्या सैन्यानिशी कूच करण्याचा हुकुम झाला आहे. खानाबरोबर मुधोळहून बाजी घोरपडे यांनाही जाण्याचा हुकुम सुटला आहे.
हे बाजी घोरपडे बादशाहचे निष्ठावंत सेवक। आणि म्हणूनच स्वराज्याचे शत्रू बनले होते. त्यांनीच पूर्वी शहाजीराजांना बेड्या घालून कैद केले होते. या सर्व गोष्टींचा राग जिजाऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या मनात सतत धुमसत होता. वडिलांचे चिरंजिवांस तर सांगणे होते की , ‘ बाजी घोरपडे यांचे वेढे घ्यावेत ‘ वेढे म्हणजे सूड.
आईवडिलांची ही इच्छा आणि स्वराज्यातीलच एक कठोर कर्तव्य म्हणून महाराजांनी याचवेळी (ऑक्टोबर १६६४ ) राजगडावरून तडफेने कूच केले। बाजी मुधोळहून खवासखानास सामील होण्याच्या आतच त्यांनी मुधोळवरच धडक मारली. या अचानक छाप्यात बाजी घोरपडे महाराजांचे हातून ठार झाले. वर्षाच्या आतच महाराजांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. हा मुधोळवरील महाराजांचा छापा लष्करी दृष्टीनेही अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. हाही एक प्रबंधाचा विषय आहे. या छाप्याने विजापूर हादरले. कारण मुधोळ ते विजापूर हे अंतर फार कमी आहे. याचा दुसरा अर्थ असा होता की , शहाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराजांनी थेट विजापुरच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. महाराजांच्या या सगळ्या लष्करी वेगांचा अभ्यास केला , तर असा गतीमान सेनापती भारतात तर सापडत नाहीच , पण युरोपिय इतिहासातही कोणी दिसत नाही. थोडा फार बाजीराव पेशवा आणि नेपोलियनच महाराजांच्या पावलावर चालणारे म्हणता येऊ शकतील.
मुधोळवरच्या छाप्यानंतर महाराजांनी थेट कुडाळ-सावंतवाडीवर दौड घेतली आणि तेथे येऊन बसलेल्या खवासखानावर त्यांनी हल्ला चढविला. खानाचा पूर्ण पराभव झाला. राजगड ते विजापूर ते मुधोळ ते कुडाळ ही अंतरे नकाशात पाहिली की आणि कमीतकमी वेळात महाराजांनी मारलेली यशस्वी दौड पाहिली की माझे वरील विधान वाचकांच्या लक्षात येईल.
या कुडाळ स्वारीत एकच गोष्ट महाराजांना जाणवली असेल की , खवासखानाच्या फौजेत व्यंकोजीराजे भोसले हे आपले भाऊ आपल्याविरुद्ध लढावयास उभे आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भाऊ एकमेकांच्या विरुद्ध शत्रू म्हणून उभे राहावेत हे आमच्या वाट्याला वाढून ठेवलेले कायमचेच दुदैर्व आहे. खवासखान आणि व्यंकोजीराजे पराभूत झाले ; अन् सुखरूप विजापुरास सुखरूप पोहोचले.
… क्रमश.