शिवचरित्रमाला भाग ४६
स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत
कुडाळची मोहिम फत्ते करून महाराज ससैन्य मालवणास आले. हा सागरी किनारा. मालवणातून महाराजांचे लक्ष समुदावर फिरत होते. ते बेट त्यांना समोरच दिसत होते. बेटाचे नाव कुरटे बेट. महाराजांनी आपल्या कोकणी शिलेदारांसह हे बेट , होडीतून जाऊन पाहिले. त्यांना फार आवडले. ते म्हणाले , ‘ इथं सागरी किल्ला बांधावा ‘.
खरं म्हणजे सुरतेहून आणलेली संपत्ती सागरी सरहद्द बळकट करण्यासाठी महाराज कुठेतरी पण योजनापूर्वक खर्च करण्याचा विचार करीत होतेचे। या कुरटे बेटावर जर पाणकोट बांधला तर दक्षिणेकडील गोवेकर फिरंग्यांच्या आणि इतर शत्रूंच्या तोंडावर आपलाही एक जबरदस्त जंजिरा उभा राहील हा विचार त्यामागे होता आणि महाराजांनी तो बोलूनही दाखवला , ‘ येथे जलदुर्ग बांधावा ऐसा मानस आहे ‘ यानिमित्ताने यावेळी एक चित्तरकथाच घडली. या नव्या पाणकिल्ल्याचे भूमीपूजन करावे , त्याकरिता आधी सुमुहूर्त पाहावा अन् लगेच संकल्प सोडून मग कामास सुरुवात करावी असा विचार त्यांचे मनी आला. त्यांनी बरोबरच्या कारभाऱ्यांस पूर्वतयारीची आज्ञा दिली. महाराजांचे बरोबर त्यांचे राज गुरुजी होतेच. अडचण काहीच नव्हती. पण महाराज म्हणाले , ‘ येथे आपले गुरुजी नकोत ‘ मग ? जे मालवणातील स्थानिक धार्मिक कार्य करणारे नेहमीचे गुरुजी असतील त्यांनाच बोलवावे. कारभाऱ्यांना कदाचित यावेळी संभ्रमही पडला असेल. आपले गुरुजी आहेत ना ? मग स्थानिक कशांस ?
पण यातच या राजाचे मन व्यक्त होणार होते. स्थानिक माणसांकडून अशी कार्य करवून घेतली की , स्थानिक माणसांची मने स्वराज्याच्या कामात अधिकच रुजतात , एकरुप होतात. त्यांची नाती अतूट होतात. मालवणातील स्थानिक गुरुजी होते , कोणी एक जानभट अभ्यंकर वयोवृद्ध स्वभावाने खास मालवणी. जरा तिखट.
महाराजांनी जानभटांस आणावयास कारकुनांबरोबर पालखी पाठवली. भटजी घरीच होते. पालखी आली. कारकून म्हणाले , ‘ कुरट्या बेटावर महाराज राजश्री जलदुर्ग बांधीताती , तरी प्रथम पूजनांस मुहूर्त पाहणे आहे. संकल्प सोडणे आहे. म्हणून राजेश्री आपणास बोलविताती. पालखी आणली आहे. चलावे. ‘
पण भटजी साफ नकार देऊन म्हणाले , ‘ आमचे येणे होत नाही ‘ नवलच. एवढा शिवाजीराजा राजकाजासाठी बोलावतोय , पालखी पाठवतोय अन् हे भटजी येत नाहीत. काय कारण ? जानभट कारणही सांगेनात. पालखी परत गेली. महाराजांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी पालखीसह पुन्हा कारकुनांना जानभटजींकडे निमंत्रण पाठविले. पुन्हा तेच. गुरुजींनी नकार दिला. पालखी परतली. महाराजांनी कारकुनांना पुन्हा पाठविलं अन् म्हटलं की , ‘ भटजींस घेऊन येणे. न आलियास उचलून घेऊन येणे. ‘
अन् तसंच करावं लागलं। कारकुनांनी नम्र जबरदस्ती करून गुरुजींना पालखीतून महाराजांकडे आणलं. महाराजांनी त्यांचे न येण्याचे कारण पुसलं , तेव्हा तो गरीब ब्राह्माण म्हणाला , ‘ महाराज , येथे धर्मराज्य आले. आनंदच आहे. पण येथे तुम्ही जलदुर्ग बांधू पाहता. आम्हांस संकल्प मुहूर्त सांगावयास बोलविता. पण आम्हांस भय वाटते. कारण की , पलिकडे (वेंगुर्ला भागात) आदिलशाही ठाणी अजून आहेत. ( त्यापलिकडे गोवेकर फिरंगी आहेत.) ते उद्या येथे चालून आल्यास प्रथम आम्हांसच धरतील म्हणून भय वाटते. ‘ महाराजांच्या अगदी मनांतले विचार समिंदरातल्या देवमाशासारखे उसळून आले. स्थानिक सरहद्दीवरील अवघ्या प्रजेस असा पूर्ण विश्वास वाटला पाहिजे की , आमच्या राज्याची ही सरहद्द आमच्या राजाने अगदी पक्की बंदोबस्तात जागती ठेविली आहे. तो आपली पुरेपूर खबरदारी घेणारच आहे , हा विश्वास अवघ्यांच्या मनांत ठाम होणे गरजेचे आहे.
म्हणूनच तर महाराजांनी या धामिर्क कार्यासाठी स्थानिक वेदमूर्ती ना बोलविले। महाराजांनी आपला विचारही बोलून दाखविला की , ‘ चिंता करू नका. येथे असे समर्थ लष्करी ठाणे घालतो की , आमचे सार्मथ्य पाहून सरहद्दी पलिकडचे जे शत्रू असतील , ते दहशत खाऊन उठोन निघूनच जातील. ‘
सरहद्दीच्या रक्षणाबद्दलचा महाराजांचा हा विचार किती मोलाचा होता! आमच्याच देशात आमचेच नागरिक निर्वासित व्हावेत हे बरे नव्हे. आमच्या सरहद्दी चिरेबंदीच असल्या पाहिजेत. आमच्या सरहद्दीवरची बायकामाणसेच काय , पोरेबाळेच काय पण गाईवासरेही निर्धास्त असली पाहिजेत. आमचे राज्यकर्ते आमच्या पाठिशी अहोरात्र जागे उभे आहेत हा विश्वास ठामपणे सर्वांच्या मनांत असला पाहिजे , हा विचार केवढा मोलाचा आहे. महाराजांच्या मनांत तोच होता.
मग श्रीगणेश पूजन झाले. मुहूर्त ठरला. चिरा बसला. बेटावर बांधकामास सुरुवात झाली. सुरतेतील खंडणी स्वराज्याच्या नव्या आरमारी तळासाठी खर्ची पडू लागली.
शाही फौजेचा पूर्ण पराभव झाला होता , तरीही विजापूरच्या आदिलशाहाने व्यंकोजीराजे भोसले यांना दोन गावे इनाम दिली , स्वराज्याविरुद्ध अन् भावाविरुद्ध इमानदारीने लढल्याबद्दलचे हे इनाम.
… क्रमश.