शिवचरित्रमाला भाग ७३

शिवचरित्रमाला भाग ७३

======================

सुसंस्कृत राजाचे दर्शन

======================

महाराजांचं मन केवळ राजकारणावरच केंदित नव्हतं. इतरही अनेक विषयांत ते लक्ष घालीत होते. त्यांना स्वत:ला संस्कृत आणि फार्सी या भाषा येत होत्या , असे म्हणण्यास ठाम पुरावा नाही. पण त्यांना या भाषांचं महत्त्व नक्कीच वाटत होतं. फार्सी , इंग्रजी , फिरंगी इत्यादी परकीय भाषांची राजकारणाकरिता जाणती माणसं जवळ ठेवणं. गरजेचंच होतं. त्याप्रमाणे मुल्ला हैदर उर्फ काझी हैदर , सोनो विश्वनाथ डबीर , रघुनाथपंत कोरडे , त्र्यंबकपंत डबीर इत्यादी फार्सी जाणकार महाराजांच्या पदरी होते. त्यातील बहुतेक सर्वांनीच राजकीय कामगिऱ्या उत्तमरितीने पार पाडलेल्या आहेत. या सर्व वकीलांचा परराज्यांशी सतत संबंध येत होता. पण कोणी लाच खाल्ली आहे वा स्वराज्यदोह केलाय असं उदाहरण नाही. फक्त एकच मनुष्य जरा वेगळा निघाला. तो म्हणजे वरील मुल्ला हैदर. हा फारसनवीस वकील अत्यंत बुद्धिमान आणि महा कारस्थानी व चतुर होता. पण तो पुढे औरंगजेबास जाऊन मिळाला.

 

संस्कृत भाषेवर जसे महाराजांचे प्रेम दिसून येेते तसेच आपल्या बोली मराठीवरही दिसून येते. शाहीर , पौराणिक कथानके आणि तात्त्विक शास्त्रीय गंथलेखन करणारे पंडित कवी महाराजांच्या आदरास पात्र होते. कवींद्र परमानंद , जयराम पिंड्ये , धुंडीराज व्यास , रघुनाथपंत अमात्य , बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर , केशव पंडित पुरोहित , संकर्षण सकळकळे , कवीराज भूषण , गागाभट्ट आदीकरून अनेक भाषाप्रभू महाराजांच्या वलयांत होते. त्यात प्रत्यक्ष युवराज संभाजीराजे यांचीही गणना होती. युवराज शंभूराजे उत्तम संस्कृततज्ज्ञ लेखक होते. वरील यादीतील प्रत्येकाने एक वा अनेक गंथ लिहीले आहेत. युवराजांनीही दोन संस्कृत पुस्तके लिहीली आहेत. संभाजीराजांना शिक्षण देण्यासाठी उमाजी पंडित या नावाचा शिक्षक नियुक्त करण्यात आलेला होता. संभाजीराजे यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले एक प्रदीर्घ दानपत्र सापडले आहे. हे दानपत्र म्हणजे शंभूराजांचे थोडक्यात आत्मचरित्रच आहे. जयपूरच्या रामसिंह कछुवाहला त्यांनी लिहिलेली संस्कृत पत्रे उपलब्ध आहेत. स्वत: शिवाजी महाराजांनी लिहिलेली म्हणजेच चिटणीसांनी लिहून घेतलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्यातूनही महाराजांचे भाषाप्रभुत्त्व आणि तर्कशुद्ध विचारसरणी दिसून येते. लोकसाहित्याकडेही त्यांचे प्रेमाने लक्ष होते. अज्ञानदास शाहीरांनी अफझलखान वधावरचा लिहिलेला पोवाडा आज उपलब्ध आहे. या अज्ञानदासाला महाराजांनी गौरवपूर्वक एक शेर सोन्याचा तोडा आणि एक जातीवंत घोडा बक्षीस दिल्याची नोंद आहे.

 

महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये आहे. त्यांनी जिंकलेल्या आणि नव्याने बांधलेल्या अनेक किल्ल्यांना संस्कृत नावे दिली. उदाहरणार्थ प्रतापगिरी उर्फ प्रतापगड , चाकण उर्फ संग्रामदुर्ग , सिंधुदुर्ग , सुवर्णदुर्ग , शिवापट्टण आणि अशी अनेक. पदनामकोश म्हणजेच राज्यव्यवहारकोश. आपल्या भाषेचे आणि आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचे महत्त्व महाराजांनी पुरेपूर ओळखले होते. संज्ञा बदलल्या की संवेदनाही बदलतात हे त्यांनी अचूक ओळखले होते. सागरध्यक्ष , राजमंडळ , अष्टप्रधान , शस्त्रागार इत्यादी राज्यव्यवहारात येणाऱ्या निरनिराळ्या अधिकाऱ्यांची , वस्तूंची आणि वास्तूची नावे संस्कृतप्रचुर ठेवलेली राज्यव्यवहार कोशात आढळतात. त्यांचे शिलालेखही संस्कृतमध्ये आहेत. रायगडावर विवेकसभा नावाची एक वास्तू होती. जाणकार शास्त्रज्ञांचा परामर्श घेण्यासाठी आणि चर्चा चिकित्सा करण्यासाठी ही विवेकासभा होती.

 

स्वराज्यात सर्वच धर्मांचा आणि कलाकारांचा आदर ठेवला जात होता. महाराजांचे सर्वात महत्त्वाचे धर्मकार्य म्हणजे स्वराज्याला बाधक ठरणाऱ्या भाबड्या रूढी त्यांनी बाजूला सारल्या. उदाहरणार्थ समुदपर्यटन. स्वराज्यकाळात आमची व्यापारी गलबते मस्कतपर्यंत जात होती. पश्चिम समुदावर मराठी आरमाराचा दरारा आणि वर्चस्व होते.

 

या सर्व उपलब्ध पुराव्यातून एकच गोष्ट निदर्शनास येते की , स्वराज्यातील प्रजा सुखी आणि निर्धास्त असली पाहिजे. येथे कोणावरही अन्याय होता कामा नये. गुणीजनांचा सन्मान राखला पाहिजे. स्वराज्य सुसंस्कृत असले पाहिजे. राज्यकर्ता सुसंस्कृत असला की , हे आपोआपच घडत जाते. या बाबतीत परदेशी समकालीन इतिहासकारांनी आणि प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या हकीकती वाचनीय आहेत.

 

… क्रमश.