शिवचरित्रमाला भाग ९३
======================
गडाचा कडा? नव्हे, यमराजाची पाठच!
======================
हिरा दचकली. अन् रिकामा हंडा घेऊन गडा
च्या महादरवाजाकडे पळत सुटली. गडाच्या माथ्यापासुन महादरवाजा जवळ होता का काय ? साडेसातशे पायऱ्यांइतकं अंतर. साठसाठ हात उंचीच्या दोन प्रचंड बुरुजांच्यामध्ये तो महादरवाजा उभा होता. दरवाजा करकचून बंद झालेला होता. मोठेमोठे तुळवटासारखे अडसर आणि मनगटासारख्या कड्या कोयंड्यांनं घातलेली ती मधमाशांच्या पोळ्यासारखी दोन कुलुपं आणि दोन्ही बाजूच्या देवड्यांवर वावरणारे धिप्पाड पहारेकरी. हिरा घाबरली. ती कोवळी पोर. तिला उमगेचना. काय करावं ते ती कळवळून त्यांना म्हणाले , ‘ कवाड उघडा हो. मला घरी जायचंय , उघडा ना! ‘
‘ न्हाय पोरी , आता दरवाजं बंद झालं , उंद्या सकाळला दिस उगवला की तोफ व्हईल अन् दरवाजं उघडंल. मंग जावा. ‘
हिरा रडूच लागली. तो देवडीवरचा गडी म्हणाला , ‘ आं! अग पोरी , रडतीयास कशापायी ? काय जंगलात पडलीस व्हय ? अगं , राजाच्या रायगडावर हायस तू , आजची रात गडावर ऱ्हावा. ‘
हिरा कळवळून म्हणत होती. पदराचा शेव पसरून विनवीत होती , ‘ मला जाऊ द्या. म्या पुन्हा न्हाई येनार. ‘
‘ आत्ता ? काय रावणराखीसाच्या लंकेत अडकलीयास का काय तू ? अग , सीतामाय , का रडतीयास ? हतं कायदा लई कडक हाय. राजाचा परधान जरी आत्ता आला , तरी कवाड खुलणार न्हायी. अगदी महाराजांनी जातीनं हुकूम दिला , तर गडाचं गडकरी जातीनं यिऊन ह्या कड्याकुलपं काढतील. न्हाईतर न्हाई. रडू नगंस , ऱ्हावा. ‘
व्याकुळलेली हिरा मुसमुसत होती. तिला तिचं पाळण्यातलं लेकरू डोळ्यापुढं दिसत होतं. ते रडत असंल , भुकेनं कळवळंल. शेजारापाजाराला कोन हाय ? कुनाच्या ध्यानी येनार ? कशी म्या अवदसा माझ्याच लेकराची बैरीन झाले ? आता काय करू!
‘ व्हय , व्हय पोरी. अवघाड झालं. आता घरी जाशील सकाळाला तवा सासुसासरं काय करतील तुझं ? तुझा दादला ?’
‘ नाय वो! घरी कुनीबी नाय. माझं तान्हं लेकरू झोपवून म्या आलो. आता जागं होऊन रडत असंल एवढी मोठी रात. त्या लेकराचं काय हुईल ?’
‘ आरा , आरा , आरा. अगं सांगायचं न्हाई व्हय ? थांब गडी पाठीवतो किल्लेदाराकडं. किल्लेदार जातीनं यील. अन् तुला त्यो म्हाराजाची खासखास परवानगी घिऊन कवाड खोलील. राजा न्हाई म्हणार न्हाई. राजाचं काळीज लई मोठं हाय. दहा हंडं दूध मावल त्यात. थांब. ‘
आणि दरवाजावरचा एक गडी किल्लेदाराच्या सदरेकडं धावला. पेटलेल्या देवडीवरच्या मशालीच्या उजेडात ढाली तलवारी भिंतीला टांगलेल्या दिसत होत्या. पहारेकरी जरा तिकडं कुठं वळला , तो समजुतीच हिराला काहीबाही सांगत होता. खिनभरानं असंच बोलत त्यानं वळून पाहिलं. तर-तर हिरा त्याला दिसलीच नाही. तो चार पावलं हिकडं तिकडं निरखू पाहू लागला. ‘ आत्ता ? ही पोरगी आत्ता व्हती. गेली कुठं ? आं ?’ त्यानं तिथल्या पहारेकऱ्यांना म्हटलं सगळीच जण दरवाजाच्या आसपास मशाल घेऊन बघू लागले. ‘ पोरी , पोरी ‘ करून हाकारू लागले. पोरगी नाहीशी झाली. गेली तरी कुठं ? गवसेचना.
एवढ्यात किल्लेदार झपाझपा आले. पहारेकऱ्यांनी त्यांना समदा परकार सांगितला. लेकुरवाळी पोर , गडात अडकली. रडत व्हती. आत्ता व्हती. कुठं गेली ? पाहिलं पाहिलं. पण गवसचना! काय चेटूक झालं ? किल्लेदार निब्बर काळजाचा गडी. पण लेकुरवाळ्या पोरीची ही गत ऐकून लोण्यावाणी इरघळला.
हिरा तळमळत तळमळत सैरावैरा अंधारात , हंडा हाती घेऊन धावत होती. आपण काही केल्या आता दरवाजातून सुटणार नाही असं तिला वाटलं. म्हणून ती गडाच्या त्या भयंकर कड्यावरून खाली उतरून जाता येईल का , म्हणून फटीसापटी शोधत सैर धावत होती.
आणि तिनं गडाच्या पश्चिमेच्या टोकावर धाव घेतली. मधूनअधून माणसांची चाहूल येत होती. पहारेकरी कुठं कुठं उभे राहिलेले भुताच्या सावलीसारखे तिला दिसत होते. ती लपतछपत त्या टोकाच्या कड्यावर आली. तिनं हंडा खाली ठेवला. विहिरीत डोकावून बघावं , तसं तिन खाली पाहिलं. खोल खोल. भयाण. भीषण. कभिन्न अंधार. तिनं साडी सावरली. पदर खोचला आणि गडावरून म्हणजे त्या भीषण कड्यावरून खाली उतरण्याकरीता चाचपडत चाचपडत आधार शोधला. ती उतरू लागली. काळाच्या काळोख्या घशात ती जणू उतरू पाहात होती. तिला काहीही दिसत नव्हतं. काहीही ऐकू येत नव्हतं. तिला दिसत होतं , फक्त पाळण्यातलं आपलं बाळ अणि ऐकू येत होता भुकेल्या अन् रडवेल्या बाळाच्या ओठांचा नाजूक आवाज. वाऱ्याच्या झुळकीनं रानपाखरं चिल्लाटत होती. रातकिड्यांनी सूर धरला होता. त्या भयाण कड्यावरून कणाकणानं अन् क्षणाक्षणानं ती उतरतच होती. कितीतरी वेळ. वेळेचं भान व्हतं कुनाला ?
हिरा उतरत नव्हती. आईचं वात्सल्य उतरत होतं. आईचं काळीज उतरत होतं. ती उतरतच होती. कुठंतरी अटकून साडी फाटतीय की अचानक टोकदार काट्यांवर हात पडून काटा शिरतोय , कशाचंच तिला भान नव्हतं. अनवाणी हिरा आता दीनवाणी नव्हती. तिच्या हातापायांच्या बोटात वाघिणीचं बळ आलं होतं. किती येळ गेला ? ठावं कुनाला! अडखळत , कुठं ठेचाळत ती उतरतच होती. सांदीसापटीच्या काट्याकुट्यानं अंधारात तिला ओरबाडून काढलं होतं. तिच्या साडीच्या पार चिरफाळ्या झाल्या होत्या.
आणि हिरा तळाशी पोहोचली. अन् झाडाझुडपांतून सुसाट हरिणीसारखी रायगडवाडीतल्या आपल्या घराकडं धावत सुटली.
गडावर गडकऱ्याच्या काळजात कालवा झाला. एक तरणीताठी पोर आपल्या गडावर अशी सीतेच्या संकटात सापडावी ? त्यातून ती हरवलीय. किल्लेदारानं दहा गडी मशाली घेऊन सगळीकडं शोधायला पाठविले. कुठं शोधायचं ?
हा समदा करिना महाराजांना समजला. महाराज बेचैन झाले. चौफेर शोध सुरू झाला. कळेना की ही गवळ्याची पोर कुठं कड्यावरून कोसळली का काय ?
पुनवेचा चंद माथ्यावर आला. पोरीचा शोध लागेना.
अन् तेवढ्यात वळखलं. हा हंडा तिचाच. ती कुठंच ? नाही. नक्कीच इथून कोसळली. किल्लेदार महाराज अन् महादरवाज्यावरचे अवघे गडी कळवळले. नक्कीच पोरगी कोसळून मेली.
तिचा रिकामा हंडा घेऊन गडावरचे दोन स्वार रायगडवाडीत रामपारी आले. बघतात तो ती पोरगी , हिरा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन पाजत होती. रायगडासकट स्वराज्यातले अवघे गडकोट , अवघं कोकण अन् अवघी मावळं तिच्या मांडीवर जोगवली होती.
खरंच. आईच्या त्या वात्सल्यापुढे अन् मराठी लक्षुमीच्या त्या सहज साहसापुढे गगन ठेंगणं झालं होतं. गगनाहुनी उंच उंच झेप घेणाऱ्या मराठी महत्त्वाकांक्षाच जणू तिच्या मांडीवर दूध पीत होत्या.
… क्रमश.