शिवचरित्रमाला भाग ११८
======================
इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .
======================
महाराजांना विद्वान पंडितांच्याबद्दल , कुशल कारागिरांच्याबद्दल आणि प्रतिभावंत कलाकारांच्याबद्दल नितांत प्रेम होते. त्यांचे सर्व आयुष्य राजकारणाच्या आणि रणांगणाच्या धकाधकीत गेले. जर त्यांना स्वास्थ्य लाभले असते , तर त्यांनीही कोणार्कासारखी अतिसुंदर आणि भव्य मंदिरे आणि प्राचीन राजांप्रमाणे नद्यांना सुंदर घाट बांधले असते. स्वराज्यापाशी तुडुंब पैसा नव्हता. राजापाशी शांत आणि निर्विघ्नपणे वेळ नव्हता. पण हा मराठी राजा रसिक होता.
प्रतापगडावरचे श्रीभवानी मंदिर , गोव्यातील श्रीसप्तकोटीश्वर मंदिर , पुण्याचे श्रीकसबा गणपती मंदिर , पाषाणचे श्री सोमेश्वर मंदिर (अन् लगूनच असलेला राम नदीवरील घाट) महाराजांनी बांधलेले आपण आजही पाहतो आहोत. ऊत्तरेतल्या राजांप्रमाणे आणि मोगल बादशाहांप्रमाणे महाल आणि प्रासाद महाराजांना बांधता आले नसते काय ? पण त्यांचे दोन्हीही हात ढाली तलवारीत गुंतलेले होते. त्यामुळे झाले ते एवढेच झाले. बराच पैसा खर्च करून सुंदर बांधलेले एक भव्य गोपुर मात्र आंध्रप्रदेशात श्रीशैलम येथे आजही उभे आहे. ते शैलमचे मंदिरास उत्तरेच्या बाजूस असलेले गोपुर महाराजांनी बांधले.
तिथे एक गंमत आहे. हे गोपुर बांधताना ते स्वत: एकही दिवस हजर राहू शकले नाहीत. वास्तुकलाकारांच्या हाती परवालीने पैसा ओतून या गोपुराचे काम करवून घेतले गेले. हे झालेले काम त्यांना स्वत:ला कधीही पाहता आले नाही. पण काम करणाऱ्या कुशल वास्तुकलाकारांनी बांधकाम अप्रतिम केलेले आहे. आपण या गोपुराच्या दारात उभे राहिलो , तर आपल्या डाव्या हातांस म्हणजेच पूर्वेकडे असलेल्या भव्य देवडीत (देवडी म्हणजे देवाचिये द्वारी , क्षणभरी उभे राहण्याकरता किंवा बसण्याकरिता असलेली सुंदर जागा) आपण पाहिले , तर त्या सायसंगीने दगडी भिंतीवर शिवाजीमहाराजांची मूर्ती कोरलेली आपणांस दिसेल. महाराज श्री शैलेश्वरास नम्रतापूर्वक भक्तिभावाने नमस्कार करीत आहेत. असे त्या शिल्पात दाखवले आहे. हे शिल्प तेथे काम करणाऱ्या , त्यावेळच्या कलाकार शिल्पकारांनी कोरलेले आहे.
महाराजांनी अनेक जुने किल्ले दुरुस्त केले आणि अगदी नव्याने किल्लेही बांधले. ते सर्वच किल्ले बलदंड आहेत. त्यातील राजगड किल्ला तर अतिशय देखणा आहे. इतर राजे लोकांनी प्रचंड अन् सुंदर महाल बांधले. जैसलमेर , जयपूर , जोधपूर , बुंदी , भरतपूर , दतिया , बिकानेर इत्यादी ठिकाणचे महाल स्वर्गीय सौंदर्याने नटलेले आहेत हे अगदी खरे. पण स्वातंत्र्याने मात्र त्यातला एकही महाल वा किल्ला कधीच सजला नाही. ती सार्वभौम स्वातंत्र्याची सजवणूक महाराजांनी किल्ले बांधून आणि लढवून सह्याद्रीच्या खडकाळ प्रदेशात मयसभाच उभी केली.
महाराजांनी शेतकऱ्यांसाठी बंधारे आणि विहिरी बांधल्या. शिवापूर आणि पाचाड (रायगड) येथे फळबागा सजवल्या. पण एवढेच. याहून अधिक काही करता आले नाही. जे दगडाधोंड्यात करता आले नाही , ते त्यांनी विद्वान प्रतिभावंतांकडून लेखणीने कागदावर करवून घेतले. राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. अमात्यवथीर् रघुनाथनामा , करो ति राज व्यवहाराकाशम् सारी मराठी भाषा ही फार्सी आणि अरबी भाषेने अल्लाउद्दीन खलजीपासून ते औरंगजेबापर्यंत गराडली गेली होती. राज्य व्यवहारातील बहुतेक शब्द हे फार्सी वा अरबीच होते. आपल्याच राज्यात आपलीच भाषा असली पाहिजे असा महाराजांचा मनोमन निर्णय होता. ‘स्व’ या शब्दाचे महत्त्व आम्हाला कधी कळलेच नाही.
आजही आम्हाला ते कितपत कळले नाही. आजही आम्हाला ते कितपत कळले आहे ? परक्यांच्या भाषेत आम्ही आमच्या आवडीच्या माणसांवर प्रेम करतो. आमच्या भाषेत ते प्रेम आम्हांस जमतच नाही. आम्ही नकळत किंवा कळूनही अरब बनतो, इराणी बनतो. भाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. अहो आमचा बायकोवरही हक्क नाही. कारण ‘बायको‘ ( पत्नी) हा शब्द मराठी नाही. तो तुर्कि शब्द आहे. राज्य व्यवहारातील सर्व नामे क्रियापदे , विशेषणे आणि गौरवाची गाणी आमच्याच भाषेत असले पाहिजेत. महाराजांनी पहिला प्रयत्न राज्यव्यवहार कोश तयार करून केला. प्राईम मिनिस्टरला ला पंतप्रधान म्हणायचे. कारकुनाला लेखक वा लेखनाधिकारी म्हणायचे. समुदावरच्या अॅडमिरल ला सरखेल आपल्या भाषेत सागराध्यक्ष म्हणायचे. अन् अशी शेकडो उदाहरणे या कोशात आहेत. एकदा संज्ञा बदलली की संवेदनाही बदलतात. त्यातूनच अस्मिता फुलतात. अन् मग त्या अस्मितांसाठी माणूस अभिमानाने प्राण द्यावयासही तयार होतो.
महाराजांनी अज्ञानदाससारख्या मराठी शाहिरांकडून आपल्या शूरवीरांचे पोवाडे तयार करवून घेतले. अन् गाणाऱ्या शाहिरांच्या हातात सोन्याचे तोडे घातले. खगोलशास्त्रावरती आणि कालगणनेवरती महाराजांनी बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर यांजकडून संस्कृतमध्ये करणकौस्तुभ नावाचा निखळ शास्त्रीय ग्रंथ लिहवून घेतला. अशा सुमारे सतरा अठरा गंथांचा आत्तापर्यंत शोध लागला आहे. अधिकही असतील.
महाराजांनी ही सरस्वतीची आराधना आपल्या आयुष्यात केली.
… क्रमश.