झुंज भाग १०

झुंज भाग १०

जवळपास दोन दिवस दमदमा जळत होता. हळूहळू त्याची आग विझत होती तसाच खानाचा चढलेला पाराही ओसरत होता. त्याच्या मनातील संतापाची जागा असूयेने घेतली. बादशहाने केलेला त्याचा अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. त्याने घेतलेल्या संपूर्ण मेहनतीवर बादशहाच्या एका खलित्याने पाणी फिरवले. आता जो कुणी नवीन सरदार त्याची जागा घेणार होता त्याला परत पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागणार होती. आणि हीच गोष्ट त्याच्या मनातील राग शांत करण्यास कारणीभूत ठरली.

नवीन येणाऱ्या सरदाराची वाटही न पाहता खानाने परतण्याची तयारी सुरु केली. या कालावधीत किल्ल्याचा वेढा काहीसा ढिल्ला पडला. खानाने आपले पूर्ण लक्ष काढून घेतले होते.

किल्ल्यावरून सैन्यात धावपळ दिसत होती पण त्यात कुठेही चैतन्याचा लवलेशही नव्हता. ही गोष्ट किल्लेदारासाठी काहीशी आश्चर्यकारक आणि काहीसी न उमजणारी होती. तो सैन्याच्या हालचालींकडे निरखून पाहू लागला आणि त्याच्या मनात एक विचार चमकला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने सभा बोलावली.

“गड्यांनो… दोन दिसापासून खानाच्या सैन्यात लगबग दिसून ऱ्हायली. त्याचा मनसुबा तुमी समद्यांनी हानून पाडला. या दोन दिसांमधी त्याच्याकून कायबी उत्तर आलं नाई. त्याच्या तोपाबी थंडच हुत्या. पन आपल्याला बेसावध राहून चालायचं नाई. कारन अजूक त्यानं गडाचा वेढा उठीवला नाई. तवा दोन जनांनी रातच्याला जाऊन सैन्याची बातमी घिवून यायची हाये. काम लई जोखमीचं हाय… सैन्याच्या हाती गावले त जीत्ते परत यायचे नाईत. तुमच्या पैकी कोन ह्ये काम अंगावर घ्यायला तयार हायेत त्यांनी पुढं या…” किल्लेदार बोलायचे थांबला तसा जवळपास सगळीच माणसे पुढे सरकली. आपल्या लोकांच्या या कृतीचा किल्लेदाराला अभिमान वाटला.

“आरं समदेच गेलेतर मंग हितं कोन ऱ्हाईल?” किल्लेदार हसत म्हणाला आणि मग त्याने दोघांची निवड केली. दोघेही अगदीच किरकोळ शरीरयष्टीचे होते.

रात्रीच्या अंधारात दोन सावल्या गडावरून खाली उतरत होत्या. प्रत्येकाने अंगावर घोंगडी पांघरली होती. त्यामुळे रात्रीच्या कुट्ट अंधारात दोघेही हरवले होते. दोघांचेही डोळे जरी अंधाराला सरावले होते तरी त्यांना सावधगिरी बाळगावी लागत होती. एक चुकीचे पाऊल आणि समोर मृत्यू हे अधोरेखित होते. तसे दोघांपैकी कुणीही मृत्यूला घाबरणारा नव्हता पण त्यांचा मृत्यू हा किल्लेदारासाठी नुकसानदायक ठरणार होता. आणि याच एका कारणाने दोघेही अगदी काळजीपूर्वक हालचाल करत होते. एरवी एकदीड तासात पूर्ण गड उतरणारे ते शूर शिपाई आज मात्र प्रत्येक पाऊल आधी कानोसा घेऊन टाकत होते.

काही वेळातच त्यांना खानाच्या वेढ्यातील एक छावणी दिसू लागली. छावणीत एकूण सहा तंबू उभारण्यात आले होते. त्यातील फक्त एक तंबू काहीसा लहान आणि बाकी जरासे मोठे होते. लहान तंबूसमोर दोनजण पहारा देत होते. म्हणजेच तो एखाद्या अधिकाऱ्याचा असणार यात शंका नव्हती. मोठ्या तंबूसमोर मात्र एकेक जण दिसून येत होता. बहुतेक ते सैनिकांना आराम करण्यासाठी उभारण्यात आले होते. इतर पहारा देखील दिसत होता पण त्यांच्यात कोणतीही सावधगिरी दिसून येत नव्हती. तसेही यावेळेस गडावरील दोघांनाही देण्यात आलेले काम हे फक्त बातमी मिळविण्याचे होते. त्यामुळे पहारेकऱ्यांचा जिथपर्यंत आवाज येईल त्यापेक्षा पुढे जायचे नाही अशी सक्त ताकीद किल्लेदाराने दोघांनाही दिली होती.
काही वेळ गेला आणि पहाऱ्यावरील एकाने शेकोटी पेटवली. थंडीचा कडाका वाढतच होता त्यामुळे एकेक करून पहाऱ्यावरील शिपाई शेकोटीभोवती जमू लागला. तसेही इतकी मोठी फौज असताना कोणताही प्राणी जवळ येईल याची सुतराम शक्यता नव्हती.

हळूहळू शेकोटीने चांगलाच पेट घेतला आणि प्रत्येक शिपाई हात शेकून घेऊ लागला. हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरु झाले. प्रत्येक शब्द दोघाही हेरांना स्पष्टपणे ऐकू येत होता.

“काय रे… सरदार कामून चिडले व्हते?” एका शिपायाने विषय काढला.

“अरे… लय मोठा किस्सा हाय त्यो…” दुसऱ्याने तोंड उघडले.

“किस्सा?”

“हां मंग…! आपला सरदार हाय नव्हं, त्याला बादशाचा हुकुम आला. परत बोलीवला हाय… आन निस्ता बोलीवला न्हाई तर लय श्या दिल्यात म्हने बादशाने खलीत्यात. सरदारानं त्यो काय कुणाला दावला बी नाई. आन आता चार सा दिवसात फतेखान येनार हाय.” त्या शिपायाने जितके माहित होते तितके सांगण्याचा प्रयत्न केला.

“ह्ये येक लैच चांगलं झालं बग…” पहिला शिपाई उद्गारला.

“काय चांगलं झालं?” तिसऱ्या शिपायाने मध्येच तोंड उघडले.

“आरं ह्यो सरदार… लय हरामी… आपल्या देखत आपल्या देवाचे मंदिर फोडले. माह्या मागं बायका पोरं नसती ना, त्याला तितंच आडवा केला असता…” पहिल्या शिपायाच्या बोलण्यात खानाबद्दलचा राग चांगलाच दिसून येत होता.

“ह्या ह्या ह्या… कायबी बोलून ऱ्हायला… तू कुटं, त्यो खान कुटं..!!! तुज्यासारखे उजूक धा गेलेना चालून त्याच्या अंगावर तर त्या समद्यांना पानी पाजन त्यो…” तिसऱ्या शिपायाने पहिल्या शिपायाची पूर्णतः खिल्ली उडवली.

“हां… त्ये बी खरं हाय म्हना… साला राक्षस हाय पुरता…” पहिल्या शिपायाने माघार घेतली.

“आरं… बाकी त्ये काय बी असू दे… पुढचे चार सा दिस आपल्याला आराम हाय… जवर नवीन सरदार येत नाई तवर काय घोर नाई बग…” चौथा शिपाई म्हणाला आणि सगळ्यांनी त्यावर होकारार्थी माना हलवल्या.

“म्या काय म्हनतो… देवानच सरदाराला अद्दल घडीवली असनार… तुमी देवाची मूर्ती फोडनार आन त्यो तुमाला यवस्थित ठिवनार व्हंय? आतापोतूर आपन सरदारासंग काय कमी लढायात भाग घ्येतला? कोनच्याच लढाईत हार झाली नाई. पन आज दोन वर्स झालं, येक पाऊल सुदिक पुढं पडून नाई ऱ्हायलं.” पाचव्या शिपायाने पहिल्यांदाच तोंड उघडले.

गडावरील दोघाही हेरांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलला. त्यांना किल्लेदाराने दिलेली कामगिरी अगदी सहजपणे पार पडली होती. अजून काही वेळ थांबून परतण्याचा दोघांनीही निर्णय घेतला.

पहाटेच्या वेळेला किल्ल्याच्या दरवाज्यावर खुणेचा आवाज आला आणि दरवाज्याची लहानशी झडप उघडून तिथे एक चेहरा दिसू लागला. खुणेचा आवाज म्हणून त्याने एक शिळ घातली आणि त्याला लगेचच प्रत्युत्तर मिळाले. क्षणाचाही विलंब न करता झडप बंद झाली आणि पुढच्याच क्षणाला किल्ल्याचा लहान दरवाजा उघडला गेला. कामगिरीवर गेलेले दोघेही जण त्यातून आत शिरले. काही पायऱ्या चढून ते वर आले तो त्यांच्या पुढे स्वतः किल्लेदार उभा होता.

“काय रे माह्या वाघांनो… काय खबर हाय?” त्याने अगदी बारकाईने दोघांच्याही चेहऱ्याकडे निरखून पाहत प्रश्न केला.

“किल्लेदार… देव आपल्याच बाजून हाय…” दोघांपैकी एकाने अगदी खुशीत उत्तर दिले आणि किल्लेदार खुश झाला. नंतर एकेक करत दोघांनीही पूर्ण बातमी किल्लेदाराला दिली आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

“वा रं माह्या पठ्ठ्यांनो… लैच मोठं काम केलं हाये तुमी… जा आता उल्शिक आराम करा…” त्याने दोघांच्याही पाठीवर शाब्बासकीची थाप देत त्यांना आराम करायला पाठवले.

“किल्लेदार… आता तुमीबी आराम करा… दोन दिस झालं, तुमीबी काईच आराम केला नाई…” तात्या उत्तरला आणि ते खरेही होते. दोन दिवसांपासून रात्रीची झोप अशी किल्लेदाराला माहितीच नव्हती. त्यामुळे त्यानेही तात्याच्या बोलण्याला मान देत आपली पावले वाड्याकडे वळवली.

क्रमशः