झुंज : भाग १३
मराठा सैन्याने ज्या प्रकारे हल्ला केला अगदी त्याच प्रकारे माघारही घेतली. जवळपास एक हजारावर मोगल सैनिक गारद झाले. जवळपास दीड ते दोन हजार जायबंदी झाले आणि बाकीचे मात्र स्वतःला वाचविण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळून गेले. या वेळात संपूर्ण रसद गडावर पोहोचली होती. पण त्र्यंबकगड असो वा अहिवंत किल्ला दोन्ही ठिकाणी सुरक्षा देणे तितकेच महत्वाचे असल्यामुळे दोन्हीकडून आलेले मराठा सैन्य मागे फिरले. मराठा सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवला. तशी मराठा सैन्याची देखील हानी झालीच पण ती मोगलांच्या मानाने अगदीच नगण्य होती.
जवळपास ८ दिवसांनी फत्तेखान तीस हजाराची फौज घेऊन गडाखाली पोहोचला. त्याच्या बरोबर यावेळेस लांब पल्ल्याच्या तोफा, दारुगोळा, बंदूक दस्ता तसेच जवळपास तीन हजार घोडदळही होते. आधीची जवळपास दहा हजाराची फौज देखील त्याला मिळणार होती. त्यामुळेच हा किल्ला काही दिवसातच आपल्या ताब्यात येईल याबद्दल तो आश्वस्त होता. पण तिथे पोहोचल्यानंतर मात्र त्याचा पूर्णतः हिरमोड झाला. शहाबुद्दीन खानाने दिलेल्या वेढ्याचा पूर्ण बिमोड झालेला होता. सगळीकडे उध्वस्त छावण्या, मुगल सैन्याची प्रेते आणि जळके तंबू एवढेच काय ते दिसत होते. कित्येक जण तर फक्त जखमी झाल्यावर व्यवस्थित औषधोपचार न मिळाल्याने काळाच्या घशात गेले होते. शिकार न करता आयतेच खाद्य मिळाल्याने आजूबाजूच्या हिंस्र प्राण्याचा संचारही त्या ठिकाणी वाढलेला दिसून येत होता. बराचसा दारुगोळा नष्ट झाला होता. कित्येक दगडी तोफा निकामी करण्यात आल्या होत्या. मुगल सैन्याच्या अन्नधान्याच्या छावण्यांना आग लावण्यात आली होती आणि सगळीकडे एक प्रकारची प्रेतकळा पसरली होती.
१० हजार मुगल सैन्याची अशी अवस्था पाहून फत्तेखानाचा पारा चढला.
“सैय्यदशा… जल्दी जाव… यहां आसपास जितनेभी गांव है उसको जला दो. औरतोंको कैद करके यहां लेके आव. अगर कोई बच्चा, बुढा है तो उसका वहीपर सर कलम कर दो… अगर काई जवान हो तो उसको कैद कर लो… इन मरहट्टोको पता चलने दो… फत्तेखान क्या चीज है…” हुकुम देताना फत्तेखान रागाने थरथरत होता.
“जो हुकुम हुजूर…” म्हणत खानाला कुर्निसात करत सैय्यदशा बाहेर पडला. त्याने बरोबर तीनशे लोक घेतले आणि तो आशेवाडी गावाच्या दिशेने निघाला. तो जेव्हा गावात पोहोचला तेंव्हा संपूर्ण गांव ओस पडले होते. सगळ्या घराची दारे बंद होती. छोट्याशा गल्ली बोळात फक्त काही तरस आणि लांडगे फिरताना दिसत होते. मनुष्यप्राणी औषधालाही सापडत नव्हता. हे पाहून सैय्यदशा देखील चवताळला. त्या रागातच त्याने दिसेल ती झोपडी जाळायला सुरुवात केली. तो जेव्हा तिथून निघाला तेंव्हा तिथे फक्त राखेचे ढीग तेवढे उरले होते. हीच काहीशी अवस्था जवळपासच्या इतर पाड्यांचीही होती.
हे सगळेच किल्लेदाराला गडावरून दिसत होते पण त्याला फक्त बघ्याची भूमिका घेण्याखेरीज काहीही करता येणार नव्हते. तसे अशा गोष्टींनी विचलित होणे किल्लेदाराला शोभणार देखील नव्हते. त्याच्यापुढे आता वेगळाच प्रश्न उभा ठाकला होता. अन्नधान्य तर मुबलक मिळाले होते पण यावेळेस आलेला बादशहाचा फौजफाटा तिप्पट होता. त्याच बरोबर त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफाही होत्या. दोन वर्ष किल्लेदाराने मोठ्या हिमतीने लढा दिला होता पण तीच हिंमत आपल्या सैन्यातही टिकवून ठेवण्याची कामगिरी त्याला करावी लागणार होती.
परत एकदा गडाला वेढा पडला. यावेळेसचा वेढा जरा जास्तच कडक होता. आधी दोन छावण्यांमधील अंतर दोन फर्लांगाचे होते. यावेळेस ते फक्त एक फर्लांग इतकेच ठेवले होते. थोडक्यात वेढा भेदणे आता जवळपास अशक्यच झाले होते. खानाने आक्रमण करण्याआधी सगळ्या मनसबदार, जहागीरदार, फौजदार यांची सभा बोलाविली. आधीच्या सैन्यातील जितके जण स्वतःचा जीव वाचवून पळाले होते त्यातील बरेच जण परत आले होते. आणि अशा लोकांची संख्या देखील काही कमी नव्हती. आधीच तीस हजारांची नव्या दमाची फौज आणि त्यात त्यांना मिळालेले जवळपास तीन ते चार हजार अपमानाने पोळलेले मुगल सैनिक.
एकेक करून सगळे अधिकारी फत्तेखानाच्या शामियान्यात जमू लागले. सगळे जमले आहेत याची खात्री केल्यावर खानाने सुरुवात केली.
“महान शहंशहा आलमगीर औरंगजेब और मुगल सल्तनत के वफादारों… दो साल से हम एक छोटेसे किलेपर अपना चांदसितारा लेहेरानेकी कोशिश कर रहे है, पर वो मरहट्टे, बुजदिलोकी तरह हमपर पथ्थर फेंक रहे है… ये मुगल फौजके लिए बेहद शर्म की बात है… अगर हम इस किलेपर फतेह नही करते तो हमे मुगल फौजके सिपाही केहेलानेका कोई हक नही है… क्या तुम सब भूल गये, तुमने कितनी जंगे जीती है? तो फिर इस बार क्या हुवा? तुट पडो उन चुहोपर… आलमगीर शहंशाहने ऐलान किया है, जो भी मुगल सिपाही उस काफर किलेदारका सर काटकर बादशहाको पेश करेगा उसे तुरंत पाच हजारकी मनसब और बादशहाकी खिलतसे नवाजा जायेगा. उसके साथ ही उसे दसहजार सोनेकी मोहरे बादशाहकी तरफसे भेंट की जायेगी…”
खानाचे बोल ऐकून नवीन सैनिकात उत्साह संचारला. जो तो मनसब मिळण्याची स्वप्ने पाहू लागला. अपवाद फक्त जुन्या सैनिकांचा होता. काहीसे असेच बोल शहाबुद्दीन खान बोलला होता आणि त्याची १० हजाराची फौज फक्त चार हजारांवर आली होती. तसेच त्याला अपमानास्पद रीतीने परत फिरावे लागले होते.
“गुस्ताखी माफ हुजूर…” उपस्थित अधिकाऱ्यांमधून आवाज आला. खानाने आवाजाच्या रोखाने पाहिले. शहाबुद्दीनच्या सैन्यातील एक अधिकारी मान खाली घालून उभा होता.
“बोलो… क्या बोलना है?” काहीसा तिरस्कारयुक्त दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकत खानाने विचारले.
“हुजूर… हमारी तोपोंके गोले वहां तक जातेही नही… इसीलिये अभीतक हमारी फतेह नही हुई…” त्याने खाली मानेनेच उत्तर दिले.
“तो?” खानाला त्याच्या बोलण्यातील आशय नीटसा समजला नाही.
“हुजूर अगर हम शुरुवात बडी तोपोंसे करेंगे तो जरूर फतेह हमारी होगी…”
“ठीक है…” खानाचा स्वर मवाळ बनला.
“दलेरखान… कल हम बडी तोपे दागेंगे… उसकी तय्यारी करो…” खानाने हुकुम सोडला आणि इतर काही गोष्टीची चर्चा करून सभा संपली.
किल्लेदार मात्र काहीसा चिंतीत बनला होता. त्याला गडावरून खानाने आणलेल्या नवीन लांब पल्ल्याच्या तोफा दिसत होत्या. याचाच अर्थ आलेला नवीन खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. एक गोष्ट मात्र किल्लेदाराला समाधानकारक वाटत होती. ती म्हणजे त्याच्या माणसांनी बनविलेल्या लाकडी तोफा. आता खानाच्या तोफांना गडावरूनही काही प्रमाणात प्रत्युत्तर मिळणार होते. उरलेला प्रश्न होता तो फक्त मुगल फौजफाटा गडावरील सैन्यापेक्षा कैक पटीने जास्त होता या गोष्टीचा. आणि या प्रश्नांचे उत्तर फक्त एकच होते आणि ते म्हणजे एकेकाने दहा जणांना पुरून उरणे.
क्रमशः