झुंज : भाग २३
बराच वेळ गेल्यावरही किल्लेदार काही बोलत नाही हे पाहून अब्दुल करीमच्या मनातील चलबिचल वाढू लागली. नेकनामखानामार्फत बादशाहने त्यालाही खिलत, पाचशेची मनसब तसेच दहा हजार नगद स्वरुपात देण्याची तयारी दाखवली होती. आणि हे साध्य होणार होते ते किल्लेदाराच्या एका निर्णयावर.
“आप और अच्छी तरह सोच लिजिए…” अब्दुल करीमचे शब्द किल्लेदाराच्या कानावर पडले आणि किल्लेदार भानावर आला.
“ठरलं…” किल्लेदार उद्गारला.
“बहोत खूब… लेकीन?” अब्दुल करीम गोंधळला.
“तुमी म्हनताय त्ये बरोबर हाये. खानाला आमचा निरोप द्या… त्यांना सांगा… गड त्यांच्या ताब्यात द्यायला आमची तयारी हाये… पर त्ये… आमच्या लोकास्नी तुमी तुमच्या रायतेवानी वागवाया पायजेल…” किल्लेदाराने किल्ला ताब्यात देण्याची तयारी दाखवली आणि अब्दुल करीमच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.
“माशा अल्लाह… बहोत सही फैसला किया है आपने… आपका संदेसा खांसाबतक पहुंच जायेगा…” असे म्हणत अब्दुल करीम उठला. त्याला ही गोष्ट लवकरात लवकर खानाच्या कानावर घालायची होती. त्याच्या डोळ्यापुढे आता पाचशेची मंसब आणि दहा हजार नगद तेवढी दिसत होती.
दोनच दिवसात किल्लेदाराने गडाच्या किल्ल्या नेकनामखानाच्या हवाली केल्या. खाननेही तत्काळ पन्नास हजार नगद देऊन बादशहाकडून आलेली खिलत किल्लेदाराच्या स्वाधीन केली आणि किल्ल्यावर अनेक वर्षांनी मुगलांचा चांदसितारा फडकला.
या काळात संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. आणि त्यामुळेच बादशहा खूपच संतापला होता. तेवढ्यात नेकनामखानाचा जासूद आला.
“बोलो…” अगदी रुक्ष स्वरात बादशहा पुटपुटला.
“हुजूर… बहोत अच्छी खबर है…”
“बहोत अच्छी खबर? क्या रामसेज पे अपना चांदसितारा फडका?”
“जी हुजूर…” जासुदाने होकार दिला आणि बादशहाचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना.
“तुम सच बोल रहे हो?” बादशहाने त्याच्या संशयी वृत्तीने परत विचारले.
“जी हुजूर… नेकनामखानने किलेपर फतेह हासील कर ली…” जासुदाने सांगितले…
“और बताव…” खुशीत येऊन बादशहाने विचारले.
“हुजूर… हमे जंग की जरुरत ही नही पडी… ये काम पेठ के जमिदार अब्दुल करीमने किया… उसने रामशेजके किलेदार को पाचहजार की मनसब और पचास हजार नगद का लालच दिया. उसी के साथ बादशहा की उनपर इनायत होगी ये भी कहां… और फिर खून की एक बुंद गिरेबिना रामशेज अपने कब्जे मे आ गया…” त्याने उत्साहात सांगितले आणि बादशहाचा चेहरा पडला. आपल्या वडिलांनी जसा हा किल्ला लढून जिंकला तसाच तो आपणही जिंकावा हीच त्याची इच्छा होती आणि या एका गोष्टीमुळे जरी गड त्याच्या ताब्यात आला होता तरी तो फितुरीमुळे. पराक्रमामुळे नाही.
“पता नही ये मरहट्टे कीस मिट्टीसे बने है? एक आदमी जितना इमानदार है, दुसरा आदमी उतनाही बेईमान…” बादशहा तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
“तुम जाव…” त्याने फर्मान सोडले आणि जासूद माघारी वळला.
आज संभाजी महाराजांचे चित्त खूपच विचलित होते. एकाच वेळेस चार पाच मोहिमांवर त्यांना लक्ष ठेवावे लागत होते. कुठे मराठी सैन्य कमी पडू लागले तर त्यांच्यासाठी ज्यादा कुमक पाठवणे, कुठे रसद पाठवणे तर कुठे स्वतः हातात तलवार घेऊन मराठा शिलेदारांच्या मदतीला जाणे. एक क्षणही त्यांना निवांतपणा तो काय मिळत नव्हता. त्यांच्या मनात गोव्यातील मोहिमेबद्दल विचार चालू होते आणि हुजऱ्या काहीसा धावतच आत आला. आल्या आल्या त्याने राजांना मुजरा केला.
“काय खबर आहे?” छत्रपतींनी विचारले.
“म्हाराज, घात झाला… सरनौबत हंबीरराव कामास आले…” त्याने बातमी दिली आणि छत्रपतींच्या पायातील त्राणच गेल्यासारखे त्यांना झाले.
“काय?” महाराजांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.
“जी म्हाराज… त्यांनी पराक्रमाची शर्थ केली पन त्यास्नी गोळा लागला अन…” जासूद बोलायचे थांबला.
“जगदंब…” काहीशा हताश वाणीने छत्रपती उद्गारले. या धक्क्यातून ते स्वतःला सावरतात न सावरतात तोच नाशिकहून खबऱ्या नवीन खबर घेऊन आला. पाच वर्षे अगदी शौर्याने लढलेला रामशेज फितुरीने मोगलांच्या हाती गेला होता. छत्रपतींचे रक्त तापले पण घटना घडून गेली होती.
रामशेज मुगलांच्या हाती जाऊन १५ दिवस झाले असतील तोच रामशेजचा किल्लेदार पन्नास हजाराची थैली घेऊन राजांपुढे हजर झाला.
क्रमशः