झुंज भाग 9

झुंज : भाग ९

खान आज खूपच खुशीत होता. लाकडी बुरुजाचे काम पूर्ण झाले होते. या बुरुजाची मजबुती कशी आहे हे खान जातीने लक्ष घालून पहात होता. इतक्या दिवसांच्या परिश्रमाचे त्याला मिळालेले हे फळ नक्कीच गोड होते. आता फक्त बुरुजावर तोफा चढवायच्या आणि जास्तीत जास्त चार दिवसात रामशेजवर चांदसितारा फडकवायचा याची त्याने मनाशी खुणगाठच जणू बांधली होती.

किल्लेदार मात्र मोठ्या काळजीत पडला होता. जो माणूस किल्ल्याच्या उंचीचा बुरुज आपल्या सैन्याकडून उभारून घेऊ शकतो तो किती चिवट असणार याची चांगलीच खात्री किल्लेदाराला आली होती. त्यामुळेच गडावर सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले होते. गडावरील लोकं जरी उघड उघड बोलून दाखवीत नव्हते तरी ते मनातून काहीसे हादरले होते. त्यातल्या त्यात एकच गोष्ट किमान अजून तरी समाधानकारक होती. ती म्हणजे इतके होऊनही किल्लेदार नाउमेद झालेला नव्हता. त्याच्या प्रत्येक सभेत, चर्चांमध्ये तो पहिल्या इतकाच उत्साही होता.

“आवो…! दोन घास खाऊन घ्या…!” किल्लेदाराला चिंतेत पाहून त्याच्या बायकोने म्हटले.

“आं… काई म्हनालीस?” किल्लेदार बायकोच्या आवाजाने काहीसे भानावर आला.

“म्हनलं… आदी दोन घास खाऊन घ्या…!!!”

“नाई… खान्यावरची वासनाच उडलीय बगं… येकदा का तोपा चढल्या बुरजावर मंग काय खरं नाई…!!!” किल्लेदाराच्या स्वरात काहीसा हताशपणा दिसून येत होता. जवळपास दोन वर्षांपासून कुणालाही गड उतरता आला नव्हता. खानाने दिलेला वेढा जराही ढिल्ला पडला नव्हता. किल्ल्यावर जमविलेली रसदही हळूहळू संपत होती. जास्तीत जास्त महिना दोन महिने पुरेल इतके धान्य अजूनही किल्ल्यावर होते पण खानाने बनविलेला हा लाकडाचा बुरुज किल्लेदारासाठी राक्षस बनला होता. त्याच वेळेस संभाजी महाराजांच्या पाच पाच मोहिमा चालू असल्यामुळे त्यांच्याकडूनही मदत आलेली नव्हती.

“तुमास्नी काय वाटलं… मला काय ह्ये ठावं नाय? पर आपल्याकडं समदे बघू ऱ्हायलेत. काय झालं तरी खानाला ह्यो किल्ला आसाच द्यायचा नाई.” शेवटचं वाक्य तिने त्वेषात उद्गारले. किल्लेदाराला पुन्हा एकदा आपल्या बायकोचा अभिमान वाटला.

पुन्हा एकदा किल्लेदाराने सगळ्या लोकांना बोलावले. आजची रणनीती नेहमीच्या रणनीती पेक्षा खूपच वेगळी होती. आज किल्लेदाराने तोफेच्या हल्ल्यात तटबंदीला खिंडार पडले तर कुणी कुठे थांबायचे आणि खानाच्या सैन्याला कापून काढायचे याची अगदी बारकाईने आखणी केली होती. आता प्रत्यक्ष लढाई होणार यात काही संशय उरला नव्हता. प्रत्येकाने आपले शीर हातावरच घेतले होते.

खानाने देखील सभा बोलावली. प्रत्येकाला त्यांची कामे आखून दिली. दोन दिवस तोफा बुरुजावर नेण्यास लागणार होते. त्यानंतरचे दोन दिवस फक्त त्या तोफांचा किल्ल्यावर मारा करून किल्ल्याचे आणि तेथील लोकांचे जितके शक्य होईल तितके नुकसान करायचे आणि नंतर एकदम हल्ला चढवायचा असा बेत नक्की करण्यात आला. ही आखणी चालू असतानाच एक दूत घाईघाईत तिथे येऊन हजर झाला.

“हुजूर… बादशा आलमगीर का आपके नाम संदेश आया है…” त्याने खानाला सांगितले.

“हां… उसे अंदर लेके आव…!” खानाने फर्मावले.

काही वेळातच बादशहाचा दूत खानासमोर हजर झाला. त्याने खानाला लवून कुर्निसात केला आणि आपल्या जवळील खलिता खानाच्या हाती दिला. खानाने तो आपल्या हाती घेत त्याला खुणेनेच जाण्याची आज्ञा दिली. सगळे जण बादशहाचा काय निरोप आहे हे ऐकायला उत्सुक झाले होते.

खानाने मनातल्या मनात खलिता वाचायला सुरुवात केली. सगळे जण अगदी टक लावून त्याच्याकडे पहात होते. खान जसजसा खलिता वाचत होता तसतसे त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. अगदी काही वेळापूर्वी अगदी खुशीत असलेला खान आता चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याचा तो चेहरा पाहून सभेला उपस्थित असलेल्यांपैकी एकाचीही खानाला काही विचारण्याची हिंमत झाली नाही. खानही काही बोलत नव्हता आणि इतर कुणी काही विचारण्याची हिम्मत करत नव्हते. नक्कीच बादशहाकडून असा काहीतरी हुकुम आला होता ज्याने खानाचा अभिमान डिवचला गेला होता. शेवटी खानाचा आवाज शांततेचा भंग करीत वातावरणात घुमला.

“तुम सब जाव…!!!” काहीशा घुश्यात खानाचा आदेश आला आणि काहीही न बोलता प्रत्येकजण शामियान्यातून बाहेर पडला. आता मात्र खान चिडलेल्या वाघासारखा येरझाऱ्या घालत होता. आतापर्यंत कितीतरी वेळा त्याने खलिता वाचला होता आणि प्रत्येक वेळेस त्याचा संताप वाढतच होता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी संतापाची भर ओसरली. तसेही चिडून संतापून घडणाऱ्या घटनेत काहीही फरक पडणार नव्हता. पुन्हा एकदा त्याने पहारेकऱ्याला आवाज दिला आणि परत सभा बोलावली.

काही वेळातच सर्वजण खानाच्या शामियान्यात हजर होते. एव्हाना खानाचा चेहरा बराच शांत झाला होता. आवश्यक ते सर्वजण जमल्याची खात्री झाल्यावर खानाने बोलायला सुरुवात केली.

“शहंशहा आलमगीरका फर्मान आया है… मुझे वापस आने का हुकुम मिला है पर अभी जंग खतम नही हुई. मेरी जगह फतेह खान लेगा…” खान बोलायचा थांबला. खलित्यातील सगळ्या गोष्टी सांगणे मात्र त्याने टाळले. त्याचे हे बोलणे चालू असतानाच बाहेर गलका वाढला. तेवढ्यात दारावरील पहारेकरी आत आला.

“क्या है? इतना शोर कैसा?” खानाने संतापून पहारेकऱ्याला विचारले.

“हुजूर… बाहर हवालदार आये है, आपसे मिलना चाहते है…” त्याने मान खाली घालून उत्तर दिले.

“ठीक है, भेजो अंदर…” खानाने फर्मावले. काही क्षणातच हवालदार खानापुढे हजर झाला.

“बोलो हवालदार…”

“हुजूर… एक बुरी खबर है…” त्याने काहीसे घाबरत सांगितले. आता आणखीन कोणती वाईट बातमी आली याचा खानाला विचार पडला. हवालदार मात्र मान खाली घालून फक्त उभा होता.

“रुक क्यो गये? बोलो…” खानाचा आवाज वातावरणात घुमला.

“हुजूर… हमने जो दमदमा बनाया है, उसे आग लग गयी… और वो पुरी तरहसे बरबाद हो गया है…” त्याने बिचकत बिचकत सांगितले.

“क्या? कैसे हुवा ये सब?” खान ओरडलाच.

“हुजूर… किलेपरसे एक गोला आया और…” त्याला पुढचे बोलण्याची गरजच पडली नाही. खान धावतच बाहेर आला. त्याच्या डोळ्यासमोर त्याची वर्षभराची मेहनत राख होताना दिसत होती. मुघल सैन्यात हाहाकार मजला. आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. जवळपासचे कित्येक सैनिक आपला जीव वाचवीत दूर पळाले. कित्येक जण आगीत भाजून निघाले. दमदम्यापासून खानाचा शामियाना बराच दूर असून देखील त्यालाही त्या आगीची धग स्पष्ट जाणवत होती. खानाच्या डोळ्यात अंगार फुलला. खानाचा बराचसा दारुगोळा आगीत स्वाहा झाला. आणि त्याच वेळेस किल्लेदार मात्र तुका, सदू आणि त्याच्या साथीदारांना शाब्बासकी देत होता. आज खऱ्या अर्थाने किल्ल्यावर दिवाळी साजरी होत होती.

क्रमशः