शिवचरित्रमाला भाग १३१
======================
महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.
======================
‘ शिवाजी महाराज ‘ हे दोन शब्द तुमच्या आमच्या मनाचे आणि तनाचे अविभाज्य घटक आहेत. अगदी जन्मापासून मरणापर्यंत या आपल्या राजाची साक्षात आठवण म्हणून त्याच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अशा , त्याच्या स्वत:च्या वस्तू , वस्त्रे , शस्त्रे , चित्रे , हस्ताक्षरे , पत्रे आणखी काही आज आपल्याला उपलब्ध आहे का ? असेल तर ते कोठेकोठे आहे ? ते सर्वसामान्य नागरिकाला विशेषत: तुमच्या आमच्या मुलांना पाहावयास मिळेल का ? निदान त्याची प्रकाशचित्रे तरी मिळतील का ? महाराजांची विश्वसनीय अस्सल नाणी कोणती ? त्यातील समकालीन अस्सल कोणती ? उत्तरकालीन पेशवाईतील शिवनाणी कशी ओळखायची ? इत्यादी कितीतरी कुतुहली प्रश्न आपल्याला पडतात. त्या सर्वांचीच उत्तरे चोख देता येत नाहीत. कारण त्याचे पुरावे उपलब्ध नसतात. पण जे काही आहे , ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा सगळ्या वस्तू वास्तूंना ‘ शिवस्पर्श ‘ असे नाव देता येईल. असे शिवस्पर्श आज किती उपलब्ध आहेत ?
महाराजांनी स्वत: जे काही हाताळले अन् वापरले असे आज नक्की काय काय आहे ? पहिली वस्तू म्हणजे त्यांची भवानी तलवार. या तलवारीबद्दल प्रचंड कुतुहल अन् तेवढेच प्रेम सतत व्यक्त होत असते. ही तलवार साताऱ्याच्या जलमंदिर राजवाड्यात श्रीमंत छत्रपती राजे उदयनमहाराज भोसले यांच्या खास व्यवस्थेखाली , अत्यंत सुरक्षित बंदोबस्तात ठेवलेली आहे. ही तलवार भवानी तलवारच आहे , हे सिद्ध करावयास पुरावे आहेत. ते पुरावे वेळोवेळी प्रसिद्धही करण्यात आले आहेत. येथे माझ्या मते या क्षणापर्यंत ही तलवार भवानीच आहे एवढेच निश्चित सांगतो. अन्य विश्वसनीय पुरावे येथून पुढे उपलब्ध झाल्यास विचार करता येईलच. निर्णयही घेता येईलच.
लंडन येथील बंकींगहॅम पॅलेसमध्ये छत्रपती महाराजांच्या खास शस्त्रालयातील एक तलवार राणी एलिझाबेथ यांच्या राजसंग्रहालयात आहे. प्रिन्स ऑफ वेल्स पदावर असताना इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड हे इ. १८७५ मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांना कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांनी भेटीदाखल ज्या मौल्यवान वस्तू दिल्या , त्यांत एक अत्यंत मौल्यवान आणि सुंदर अशी तलवारही दिली. या तलवारीचे नाव कोल्हापूर दरबाराच्या दप्तरखान्यांत ‘ जगदंबा ‘ म्हणून नमूद आहे. ही तलवार रत्नजडीत मुठीची आहे. त्यावर बहात्तर माणके आणि अगणित हिरे जडविलेले आहेत. या तलवारीची जी घडण आहे , त्याला फिरंग किंवा पट्टापान किंवा सडक किंवा सॅबर असे नावे आहे. ही तलवार शिवकालीन नक्कीच आहे. पण ती भवानी नाही. पण ती छत्रपती महाराजांच्या खास शिलेखानातील आहे. म्हणून असे वाटते की , हीही जगदंबा तलवार शककर्ते शिवाजी महाराज छत्रपती (इ. १६३० ते ८० ) यांनीही स्वत: वापरली असेल की काय ? तशी शक्यता असू शकते. म्हणूनच साताऱ्यातील असलेल्या भवानी तलवारीप्रमाणे करवीर छत्रपती महाराजांच्या शिलेखान्यात असलेल्या आणि सध्या बंकींगहॅम पॅलेस , लंडनमध्ये असलेल्या या जगदंबा तलवारीबद्दल तेवढेच प्रेम आणि भक्ती वाटणे हा आमचा सर्वांचा स्वभावधर्मच आहे. ही तलवार (जगदंबा) कोल्हापूर महाराजांची आहे. ती पुन्हा छत्रपती महाराज कोल्हापूर यांच्या राजवाड्यात परत यावी अशी सर्व जनतेचीच इच्छा आहे. ही जगदंबा तलवार बंकींगहॅम पॅलेसमध्ये अतिशय शानदार दिमाखात ठेवलेली आहे. (मी स्वत: ती पाहिली आहे) तशी आस्था आणि व्यवस्था ठेवण्याची थोडीफार सवय आम्हाला लागली तरीही खूप झाले.
शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले ? त्याचा वेध आणि शोध घेतला , तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते २४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हित पाहत असे , ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणि ती पूर्ण केली. त्याने लिहिलेला ‘ हिस्टरी ऑफ मराठाज ‘ हा ग्रंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला , कालक्रमानुसार असलेला पहिलाच ग्रंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो. तो अत्यंत सावध लेखक आहे. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजीमहाराजांची वाघनखे मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेले होते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.
महाराजांची जी समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्ध आहेत , त्यातील काही चित्रांत महाराजांचे हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. तसेच पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे , दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.
याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुल यात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाचा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना ‘गोडे हत्यार ‘ असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यास हत्यारांना ‘उडते हत्यार ‘ असे म्हणत. एकूण शिवस्पर्शित हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.
… क्रमश…