शिवचरित्रमाला भाग १३२

शिवचरित्रमाला भाग १३२

======================

शिवस्पर्श

======================

महाराजांची चित्रकारांनी हातांनी काढलेली चित्रे काही उपलब्ध आहेत. त्यातील काही अगदी समकालीन आहेत. काही इ. १६८० नंतर पण नक्कीच पण नजिकच्याच काळात कॉपी केलेली असावीत. पण समकालीन चित्रे उपलब्ध आहेत आणि त्यावरून महाराजांचे रूप आपण पाहू शकतो , हाच आपला आनंद मोठा आहे. आता चित्रकार ज्या योग्यतेचा असेल , त्या त्याच्या योग्यतेप्रमाणेच चित्र तयार होणार. त्याची तुलना किंवा अपेक्षा आपण आजच्या कॅमेऱ्याशी करू शकत नाही. येथे मुद्दा असा , की महाराजांच्या अंगावर मस्तकापासून पावलांपर्यंत जी वस्त्रे दाखविलेली आहेत , ( याला सिरपाव म्हणतात) त्याचा आपल्याला थोडाफार परिचय होऊ शकतो.

 

पहिली व्यथा ही सांगितली पाहिजे की , या त्यांच्या वस्त्रांपैकी एकही वस्त्र विशेष आज उपलब्ध नाही. त्यांच्या मस्तकावरील पगडी किंवा पागोटे किंवा जिरेटोप जो चित्रात दिसतो , तो उत्तरेकडील आणि दक्षिणेकडीलही सुलतानी अंमलात दरबारी व्यक्ती जशा तऱ्हेचा वापरत असत , तसाच आहे. आज दिल्ली , राजपूत , कांगडा , लखनौ , गोवळकोंडा , तंजावर , विजापूर इत्यादी चित्रकलेच्या शैलीतील (स्कूल) अगणित चित्रे (मिनिएचर्स आणि म्युरल्स) उपलब्ध आहेत. त्यातील व्यक्तींची शिरोभूषणे आणि शिवाजी महाराजांचे शिरोभूषण यांत खूपच साम्य आहे. क्षत्रिय आणि विनक्षत्रिय शिरोभूषणांत थोडाफार फरक दिसतो. थोडक्यात सांगावयाचे झाले , तर महाराजांच्या शिरोभूषणाचे बादशाही शिरोभूषणाशी साम्य आढळते. तो त्या काळाचा परिणाम किंवा प्रभाव आहे.

 

महाराजांचा अंगरखा , जामा (कमरेचा छोटा शेला) चुस्त पायजमा (सुरवार) हा अशाच प्रकारचा बादशाही दरबारी पद्धतीचा दिसून येतो. रुमाल हाही पण त्यातीलच. अंगावरील शेला म्हणजेच उत्तरीय किंवा उपवस्त्र हे हिंदूपणाचे एक लक्षण होते. पण काही बादशाह आणि त्यांचे अहिंदू सरदारसुद्धा शेला किंवा उपरणे वापरीत असल्याचे जुन्या पेन्टिंग्जवरून सिद्ध होते. या बाबतीतही पालुपद हेच की महाराजांच्या वापरण्यातील एकही वस्त्रविशेष आज उपलब्ध नाही. हीच गोष्ट महाराजांच्या अंगावरील अलंकारांच्या बाबतीत म्हणता येते. कलगी , मोत्याचा तुरा , कानातील चौकडे , गळ्यातील मोजकेच पण मौल्यवान कंठे , दंडावरील बाजूबंद , बोटातील अंगठ्या , हातातील आणि पायातील सोन्याचा तोडा , हातातील सोन्याचे कडे , कंबरेचा नवरत्नजडीत कमरपट्टा पुरुषांच्या अशा कमरपट्ट्याला ‘ दाब ‘ असे म्हणत असत. शिवाजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे महाराजसाहेब ते तंजावराकडे दक्षिणेत असत. वेळोवेळी तेही शिवाजीमहाराजांकडे आणि जिजाऊसाहेबांकडे काही मौल्यवान वस्त्रे , वस्तू इत्यादी पाठवीत असत. अशी कृष्णाजी अनंत मजालसी याने नोंद केलेली आहे. आज या शिवकालीन वस्त्रालंकारांपैकी आणि अन्य आलेल्या नजराण्यांपैकी काही उपलब्ध नाही.

 

महाराज कवड्याची माळ श्रीभवानी देवीच्या पूजेच्या आणि आरतीच्या वेळी गळ्यात रिवाजाप्रमाणे , परंपरेप्रमाणे घालीत असत.

 

असेच अलंकार राणीवशाकडेही होते. त्याचप्रमाणे प्रतापगडच्या भवानीदेवीच्या आणि शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या अंगावरही होते. राजाभिषेक करून छत्रपती म्हणून मस्तकावर छत्र धरण्यापुर्वी महाराजांनी स्वत: दि. २० मे १६७४ या दिवशी प्रतापगडावर जाऊन श्रीभवानीदेवीची षोड्षोपचारे यथासांग पूजा केली. त्यावेळी वेदमूर्ती विश्वनाथ भट्ट हडप हे पुजारी होते. श्रीभवानी देवीस महाराजांनी सोन्याचे आणि नवरत्नजडावाचे सर्व प्रकारचे अलंकार घातले. त्यात देवीच्या मस्तकावर सोन्याचे मौल्यवान झालरदार असे छत्र अर्पण केले. या छत्राचे वजन सव्वा मण होते. त्यावेळचे वजनाचे कोष्टक असे २४ तोळे म्हणजे १ शेर. १६ शेर म्हणजे १ मण. जुना तोळा सध्याच्या पावणेबारा ग्रॅमचा होता. श्रीच्या अंगावरील सर्व अलंकार आजच्या किंमतीने कोट्यवधी रुपयाचे भरतील. पण हे सर्व अलंकार इ. १९२९ मध्ये प्रतापगडावर झालेल्या पठाणी चोरीत चोरीस गेले. पुढे चोर सापडले पण चोरी संपलेली होती. महाराजांनी अर्पण केलेल्या श्रींच्या अलंकारांपैकी श्रींच्या पायातील , माणके जडविलेली दोन पैंजणे फक्त सध्या शिल्लक आहेत , असे समजते. ही चोरांची कृपाच म्हणायला हवी.

 

अशा चोऱ्या महाराष्ट्रात कितीतरी देवदेवस्थानात झालेल्या आहेत , हे आपण पाहतो आहोत. प्रतापगड , नरसिंगपूर , जेजुरी , कराड , औंध , पर्वती इत्यादी ठिकाणी चोऱ्या झाल्या. काय म्हणावे याला ? पूर्वी आमचे देव आणि देवता शूरवीरांना आणि वीरांगनांना पावत होत्या. विजय मिळत होते , वैभव वाढत होते. पण आता मात्र त्या चोरदरोडेखोरांनाच पावाव्यात का ? भक्त दुबळे बनले. देवांनी तरी काय करावे ? शिवस्पर्श एवढाच आज आपल्यापुढे ज्ञात आणि थोडासा उपलब्ध आहे.

 

नेहमी मनात विचार येतो , की शिवाजी महाराज ज्या ज्या गडांवर आणि गावाशहरांत फिरले आणि राहिले , अशा गावाशहरांची आणि गडांची आणि महाराजांच्या तेथील वास्तव्याची कागदोपत्रांच्या आधाराने तारीखवार यादी करता येईल. अवघड काहीच नाही. अशी यादी आपण करावी आणि अमुकअमुक ठिकाणी महाराज कोणत्या तिथीमितीस तेथे राहिले हे प्रसिद्ध करावे. म्हणजे त्या त्या ठिकाणच्या रहिवाशांना आणि विशेषत: तरुण विद्यार्थी, विद्याथिर्नींना त्या शिवभेटीचा स्पर्शानंद घडेल. इतिहास जागता ठेवण्याकरिता या शिवस्पर्शाचा असा उपयोग झाला पाहिजे.

 

… क्रमश…