शिवचरित्रमाला भाग १३३
======================
महाराजांची विश्वासू संपत्ती
======================
हिंदवी स्वराज्याची सुरुवात शून्यातून झाली. अगदी गरीब अशा मावळी शेतकऱ्यांच्या , गावकामगारांच्या आणि कोणतीतरी मजुरी करणाऱ्या ‘ बिगाऱ्यां ‘ च्या संघटनेतूनच महाराजांनी आणि विलक्षण संघटन कौशल्य असलेल्या जिजाऊसाहेबांनी हा धाडसी डाव मांडला. माणसं म्हटली की , स्वभावाचे आणि गुणदोषांचे असंख्य प्रकार आलेच. या सर्वांना एका ओळंब्यात आणून , धाडसी आणि अति अवघड विश्वासाची कामे करवून घेणे , म्हणजे आवळ्याभोपळ्याची एकत्र मोट बांधण्याइतकेच अवघड काम होते. त्यात पुन्हा स्वार्थी आणि गुन्हेगार प्रकृतीची माणसे थोडीफार तरी असणारच. आंबेमोहोर तांदळात खडे निघतातच की , ते शिजत नाहीत. आधीच वेचून काढावे लागतात. माणसांचेही तसेच. म्हणूनच या मायलेकरांनी या सर्व माणसांची निवडपाखड करून , जिवावरची कामंसुद्धा करवून घेण्यासाठी केवढं कौशल्य दाखवलं असेल ?
पण त्यात ही मायलेकरे यशस्वी ठरली. ती इतकी , की स्वराज्याची सर्वात मोठी धनदौलत म्हणजे ही माणसेच होती. ती सामान्य होती. पण त्यांनी असामान्य इतिहास घडविला. महाराजांची ही माणसं म्हणजे स्वराज्याची हुकमी शक्ती. एकवेळ बंदुकीची गोळी उडायला उशीर होईल , पण ही माणसं आपापल्या कामात निमिषभरही उडी घ्यायला उशीर करीत नव्हती. सबबी सांगत नव्हती. अखेर मोठी कामे , मोठ्या संस्था , मोठ्या राष्ट्रीय जबाबदारीच्या संघटना , गुप्त प्रयोगशाळा , गुप्त शस्त्रास्त्रांचे संशोधन आणि निमिर्ती… राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे गुप्त खलबतखाने अशा सर्व ठिकाणी अशी हुकमी , विश्वासाची माणसेच लागतात. महाराजांनी अनेकांना पदव्या दिलेल्या आढळून येतात. त्यातील ‘ विश्वासराव ‘ ही पदवी किती मोलाची बघा! गायकवाड घराण्यातील कृष्णराव नावाच्या एका जिवलगाला महाराजांनी विश्वासराव ही पदवी दिलेली होती. युवराज संभाजीराजांना आग्रा प्रसंगात मथुरेमध्ये ज्यांच्या घरी महाराजांनी ठेवले होते , त्या मथुरे कुटुंबालाच त्यांनी ‘ विश्वासराव ‘ ही पदवी दिली होती. अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार अशा काही सरदारांना आणि मंत्र्यांना त्यांनी ‘ सकलराज्य कार्य धुरंधर ‘ आणि ‘ विश्वासनिधी ‘ या पदव्या दिल्या होत्या. अनेक कोहिनूर हिऱ्यांचा कंठा गळ्यात पडण्यापेक्षाही महाराजांच्या हातून अशा मोलाच्या पदवीची बक्षिसी भाळी मिरवताना या सगळ्या विश्वासू जिवलगांना केवढा अभिमान वाटत असेल! पदवी स्वीकारून नंतर सवडीनुसार , संधी साधून ती परत केल्याचे एकही उदाहरण नाही! महाराजांनीही पदव्यांची स्वस्ताई खैरात केली नाही.
महाराजांनी कौतुकाकरिता कर्तबगारांना मानाच्या सार्थ पदव्या दिल्या. बक्षिसे , पारितोषिके दिली नाहीत. वंशपरंपरा कोणालाही , कोणतेही पद दिले नाही. या चुका स्वराज्याला म्हणजेच राष्ट्राला किती बाधतात , याची आधीच्या इतिहासावरून महाराजांना पुरेपूर जाणीव झालेली होती. पैसे किंवा अधिकारपदे देऊन माणसांची खरेदी विक्री महाराजांनी कधीही केली नाही. ऐन अफझलखान प्रसंगी विजापूरच्या बादशाहाने अफझलखानाच्या मार्फत महाराजांचे सरदार फोडून आपल्या शाही पक्षात आणण्याचे कितीतरी प्रयत्न केले. पण फक्त एकच सरदार अफझलखानास सामील झाला. बाकी झाडून सगळे ‘ विश्वासराव ‘ ठरले. हुकमी जिवलग ठरले. त्यात कान्होजी जेधे , झुंजारराव मरळ , हैबतराव शिळमकर , दिनकरराव काकडे , विश्वासराव गायकवाड , हंबीरराव मोहिते , यशवंतराव पासलकर अशी ‘ पदवीधर ‘ बहाद्दरांची त्यांच्या पदव्यांनिशी किती नावे सांगू ? असे दाभाडे , मारणे , शितोळे , जगताप , पांगेरे , कंक , सकपाळ , महाले , प्रभूदेशपांडे अणि किती किती किती सांगू ? महाराजांचे हे सारे हुकमी विश्वासराव होते. यातील अनेक जिवलगांच्या अगदी तरुण मुलानातवंडांना अफझलखानाने अन् पुढे इतरही शाही सरदारांनी पत्रे पाठवून बक्षिसी , इनामे , जहागिऱ्या देण्याचे आमीष दाखविले. पण त्यातील एकाही बापाचा एकही पोरगा शत्रूला सामील झाला नाही. सगळ्या विश्वासरावांच्या पोटी विश्वासरावच जन्मले. वास्तविक त्या पोरांनी आपल्या बापाला म्हणायला हवं होतं की , ‘ बाबा , तुम्ही महाराजांच्याकडेच ऱ्हावा. म्या खानाकडं जातो. पुढं कुणाचं तरी ‘ गव्हन्मेर्ंट ‘ येईलच ना! आपलं काम झालं , म्हणजे झालं! ‘ असा अविश्वासू आणि बदफैली विचार कोणाही मावळी पोरानं केला नाही.
तरीही संपूर्ण शिवचरित्रात अन् नंतर छत्रपती शंभू चरित्रात आपल्याला अगदी तुरळक असे चारदोन काटेसराटे सापडतातच. पण लक्षात ठेवायचे , ते बाजी पासलकर , तानाजी , येसाजी , बहिर्जी , हिरोजी यांच्यासारख्या हिऱ्यामाणकांनाच.
आपल्या इतिहासात चंदन खूप आहे. कोळसाही आहे. यातील काय उगाळायचं ? चंदन की कोळसा ? पारखून सारंच घेऊ. अभ्यासपूर्वक. पण उगाळायचं चंदनच. कोळसा नाही. चंदनाचा कोळसा करून उगाळत बसण्याचा उद्योग तर कृतघ्नपणाचाच ठरेल. नकली दागिने जास्त चमकतात. अस्सल मंगळसूत्र पदराखाली झाकूनच असते.
… क्रमश…