शिवचरित्रमाला भाग – १४७

शिवचरित्रमाला भाग – १४७

 

रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा

 

राजाभिषेकाच्या दरबारात इंग्रज वकील हजर होता. त्याने महाराजांस नम्रतेने नजराणा अर्पण केला. त्याने एक सुंदर खुर्ची गडावर आणली होती. ती त्याने दुसऱ्या दिवशी (दि. ७ जून) राजवाड्यात नेऊन महाराजांस नजर केली. सारा सोहळा अत्यंत आनंदात आणि वैभवात साजरा झाला. आलेल्या प्रत्येक पाहुण्यास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महाराजांनी प्रतिआहेर म्हणून काही ना काही देण्याची योजना केली होती. कडेवरील लहान मुलांच्या हातातही काही ना काही (बहुदा पैसे) देण्यात आले.

 

देवराई होन , प्रतापराई होन आणि शिवराई होन ही नाणी सोन्यात पाडण्यात आली होती. सर्वच नाण्यावर एका बाजूस श्रीराजा शिव आणि दुसऱ्या बाजूस छत्रपती अशी अक्षरे होती. शिवराई नाणे तांब्याचे होते. याशिवाय फलम आणि चक्र या नावाची दोन नाणी होती. या दोन नाण्यांचे कागदोपत्री उल्लेख वा हिशेब सापडतात. पण प्रत्यक्षात एकही फलम आणि चक्र नाणे अद्याप सापडलेले नाही. या नाण्यांचे एकमेकांशी कोष्टकात नेमके काय नाते होते तेही लक्षात येत नाही.

 

राजाभिषेक सोहाळ्यात प्रत्यक्ष वापरलेली सुवर्ण सिंहासनापासून गळ्यातील कवड्याच्या माळेपर्यंत प्रत्येक वस्तूला केवढे ऐतिहासिक मोल आणि महत्त्व आहे! हे महान राष्ट्रीय धन आजपर्यंत प्राणापलिकडे जपले जावयास हवे होते. महाराजांच्या कमरेचा रत्नजडित दाब म्हणजे कमरपट्टा आजच्या किंमतीने कल्पनेपलिकडचाच ठरावा. इ. १८९० पर्यंत तो अस्तित्त्वातही होता. पण पुढे काय झाले ते इतिहासास माहीत नाही. पण ही सारी राष्ट्रीय संपत्ती आज असती , तर त्यातील प्रेरणा ही अनमोल ठरली असती.

 

आज श्रीमंत महाराज छत्रपती उदयनमहाराज यांनी मात्र अतिशय दक्षतेने शिवछत्रपती महाराजांची तलवार , सोन्याचा एक होन , महाराजांचे रोजच्या पूजेतील शिवलिंग (बाण) आणि श्री समर्थ रामदासस्वामींच्या लहान आकाराच्या पादुका राजवाड्यात सांभाळल्या आहेत. तसेच लंडनमध्ये बकींग हॅम पॅलेसमध्ये एक अतिशय मौल्यवान रत्नजडित मुठीची तलवार फारच चांगल्यारितीने ठेवलेली आहे. ती तलवार भवानी तलवार नाही. तिचे नाव जगदंबा असे आहे. पण तीही तलवार थोरल्या शिवाजी महाराजांचीच आहे , यात शंका नाही. तसेच महाराजांचे पोलादी. वाघनख लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे.

 

राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तू आणि वास्तू केवढ्या दिमाखात जपल्या जातात हे युरोपिय देशात पाहावे. विशेषत: रशिया आणि इंग्लंडमध्ये हा दिमाख आपल्याला विस्मित करणारा आहे. लंडनच्या टॉवर ऑफ लंडन या भुईकोट किल्ल्यात इंग्लिश राजा राण्यांचे जडावाचे दागिने आणि वस्त्रे फार फार दिमाखाने ठेवलेली आहेत. आपला कोहिनूर हिरा तिथेच आहे. इंग्लंडच्या राजाराणीला राजाभिषेक जेथे केला जातो , तेथे सिंहासनाच्या पुढे ठेवलेले एक फरशीचा म्हणजे पाषाणाचा , जरा तुटलेला , पायरीसारखा तुकडा काही वर्षांपूर्वी अचानक नाहिसा झाला.

 

सारे इंग्लिश राष्ट्र कळवळले. अस्वस्थ झाले. एकच शोधाशोध युद्धपातळीवरून चालू झाली. पण चारदोन दिवसातच ती तुटकी फरशी सापडली. अन् मग आनंदीआनंद! आमच्याकडे कवींद रविंदनाथ टागोरांचे नोबेल पारितोषिक हरविले. आपणही यथाशक्ती हळहळले. पण चहाच्या कपातील चहासुद्धा हलला नाही. मग त्यात त्सुनामी लाटा कुठून उठणार ? रशियात साम्यवादी क्रांती झाली. झार राजाराणी संपले. कम्युनिस्ट राज्य आले. पण रशियाच्या राजघराण्याचे राजमुकुट , राजदंड आणि अन्य जडजवाहिरांचे अलंकार रशियाच्या राष्ट्रीय म्युझियममध्ये गुपितासारखे सांभाळून जपून ठेवले आहेत. ते फक्त रशियन नागरिकांनाच पाहण्याचा मान आहे. इतरांना ते पाहता येत नाहीत.

 

आता निदान या सर्व राजचिन्हांच्या प्रतिकृती करून त्या म्युझियममध्ये ठेवल्या पाहिजेत. महाराजांच्या उजव्या हाताचा , चंदनाच्या गंधात हात (पंजा) बुडवून कागदावर उमटवलेला ठसा सापडला आहे. म्हसवडचे राजे माने यांना महाराजांनी त्याकाळी पंजाच्या डौलाचे जे अभयपत्र पाठविले , त्या पत्राच्या माथ्यावर हा चंदनातील पंजा उमटवलेला आहे. तो साताऱ्याच्या म्युझियममध्ये आहे.

 

राजाभिषेकाचा सोहळा पूर्ण झाला. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरलेले असायचे. गडावरील हवा ही अशी पावसाळी. म्हणून महाराज जिजाऊसाहेबांना गडावरून खाली पाचाड गावात असलेल्या वाड्यात घेऊन आले. त्या अतिशय थकलेल्या होत्या. त्यांचं अंत:करण तृप्त होतं. महाराजांनी आपल्या दोन्ही मातांची सर्वस्व ओतून सेवा केली होती. थोरली माता ही जन्मभूमी , स्वराज्यभूमी आणि धाकटी माता प्रत्यक्ष जन्मदायी पुण्यश्लोक जिजाऊसाहेब. तिनेच या मातृभूमीला छत्रचामरांकीत गजराज राजचिन्हांकित सुवर्णसिंहासनाधिष्टीत क्षत्रिय कुलावतांस छत्रपती राजा दिला. सारे सारे मातृऋण फेडिले. आता अखेरच्या दिवसांतही राजा मातृसेवेत मग्न होता.

 

दिवसादिवसाने आऊसाहेबांची प्रकृती क्षीण होत होती.

 

रायगडावरील बाकीची कामेधामे कारभारी मंडळी पाहात होती. पाहुणे परतत होते. रायगड नकळत सुन्न झाला होता. ऐन पावसातही राजाभिषेकाच्या मांडवझळा दाहत होत्या. राजाभिषेकाचा आनंद कमी होत नव्हता. पण गंभीर होत होता.

 

अखेरच्या प्रवासासाठी जिजाऊसाहेबांनी प्रस्थान ठेविले होते. जणू रायगडाचे बुरुज मुक्या शब्दात आऊसाहेबांना विचारीत होते , आऊसाहेब , आपण निघालात! पुन्हा परत कधी येणार ?

 

… क्रमश….