शिवचरित्रमाला भाग ४९

शिवचरित्रमाला भाग ४९

 

वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

 

कारवार किनाऱ्यावरील बसनूर उर्फ बसिर्लोखर महाराजांचा आरमारी छापा पडला. पण या मोहिमेमागे किती पद्धतशीर योजना त्यांनी केली असेल याचा अभ्यासकांनी विचार करावा. आधी हेर पाठवून तेथील लष्करी आणि राजकीय स्थितीची पूर्ण माहिती मिळवून नंतरच ही सागरी मोहिम त्यांनी केली. त्यात यश चांगले मिळाले. पण अपेक्षेप्रमाणे पुरेपूर मिळाले नाही. जेथे यश मिळाले नाही त्याचाही त्यांनी नंतर पुरेपूर अभ्यास केलेला दिसतो. प्रत्येक विषयात ते अभ्यासाला आणि योजनाबद्ध आराखड्याला महत्त्व देत असत. आमचे आजचे थोर समाजसेवक बाबा आमटे तरुणांना उद्देशून एक गोष्ट निक्षून सांगतात , मलाही त्यांनी ती सांगितली. ती अशी – *‘भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा’* किती महत्त्वाचा इशारा आहे हा नाही ? अगदी हेच सूत्र महाराजांच्या कार्यपद्धतीत आढळते.

पण भान ठेवून केलेल्या योजनेत जर कुणी कार्यकर्ता अनुयायी चुकला किंवा त्याने जाणूनबुजून कुचराई केली , तर बेभान होऊन केलेले काम अपेक्षेनुसार होत नाही. थोडाफार असाच प्रकार कारवार मोहिमेत कोणा तरी हेरगिरी करणाऱ्या गुप्तचराकडून घडला. आपला मराठी माणूस अचूक वागावा , अचूक चालावा आणि अचूक बोलावा ही महाराजांची अपेक्षा नेहमीच असे. पण त्यातूनही असा क्वचितच का होईना , पण चुकार गडी निघत असे. कारवार मोहिमेत अशी चुकीची वा अपुरी गुप्त बातमी आपल्याच हेरांनी दिल्यामुळे आपणांस थोडे अपयश आले हे महाराजांनी हेरले. पण त्यांनी कानाडोळा केला नाही. त्यांनी त्या संबंधित हेराला शासनही केले. करायलाच हवे होते. नाहीतर चुका करायची चटक लागते. कोणाची तरी चिठ्ठी आणली की , मोठमोठ्या गुन्ह्यातील प्रतिष्ठित आरोपी अलगद सुटतात , नंतर मानाने मिरवतातही. हे बरे नव्हे.

या कारवार मोहिमेच्या काळातच महाराजांचा वाढदिवस (फाल्गुन वद्य तृतीया) येऊन गेला. हा त्यांचा पस्तीसावा वाढदिवस. पण तो साजरा केल्याची नोंद नाही. इतकंच नव्हे त्यांनी आपला कोणताही वाढदिवस साजरा केला नाही.

आज मात्र आमच्या ‘तरुण , तडफदार , तेजस्वी ‘ हिरोंना विसाव्या वर्षांपासून ‘ प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस जाहिरातबाजीने साजरा करण्याची चटक लागली आहे. *सिद्धीच्या मागे लागावे, प्रसिद्धीच्या नव्हे.* *शिवरायांस आठवावे. जीवित तृणवत मानावे.* महाराजांनी स्वराज्य साधनाची लगबग कैसी केली , ते स्मरावे. स्वत:चा आरोग्यसंपन्न शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची जरुर महत्त्वाकांक्षा ठेवावी. त्यासाठी निर्व्यसनी असावे. असो. बहुत काय लिहिणे ?

मोहिम संपवून महाराज भूमार्गाने परतले. मोहिमेवर येत असलेले मिर्झाराजे पुण्याच्या दिशेने सरकत होते. ते आणि दिलेरखान पुढच्या मोहिमांची चर्चा करीत असावीत असे दिसून येते. दोघांचेही हेतू एकच होते. शिवनाश! पण पद्धती वा मार्ग जरा भिन्नभिन्न होते. दिलेरचे म्हणणे असे की , ‘ या शिवाजीराजाचे किल्ले एकूण आहेत तरी किती ? फार फार तर चाळीस. ते सर्वच किल्ले आपण युद्धाने जिंकून घेऊ. हा विचार आपल्या प्रचंड सैन्यबळावर दिलेर मांडीत होता. हा विचार केवळ शिपाईगिरीचा होता. त्यात सरदारी नव्हती. डोके कमीच होते. मिर्झाराजांचा विचार वेगळा होता. त्यात अभ्यास दिसून येतो. मिर्झाराजांचे म्हणणे थोडक्यात असे शिवाजीराजाचे किल्ले घेणे वाटते तितके सोपे नाही. कारण त्या किल्ल्यातील मराठी माणसं अजिंक्य आहेत. ती फितवा फितुरीने विकत घेणे वा लढूनही जिंकून घेणे जवळजवळ अशक्य आहे. या माणसांचे म्हणजे लढाऊ सैनिकांचे घरसंसारच जर आपण तुडवून काढले आणि त्यांची बायकापोरे , शेतीवाडी आणि त्यांची खेडीपाडी पार मुरगाळून काढली तर गडागडांवर असलेले हे मराठी आपोआप भुईवर गुडघे आणि डोकं टेकतील. त्यामुळेच शिवाजीराजा हा आपोआप शरण येईल.

असा विचार आणि पुढे प्रत्यक्ष तो विचार कृतीत आणू पाहणारा मिर्झाराजा जयसिंग हा एकमेव शत्रू वा सेनापती ठरला. बाकीचे सगळे हाणामारी आणि जाळपोळ करणारे केवळ दंगेखोर. दिलेर आणि मिर्झा हे दोन सेनापती आपापले विचार घेऊन पुण्यात दाखल झाले.

महाराजांनी एक तिसराच प्रयत्न करून पाहिला. मोगलांचे बळ अफाट आहे आणि मिर्झाराजा हा सेनापतीही शहाण्या डोक्याचा आहे. जर हे प्रचंड मोगली वादळ आपल्या अंगावर न येऊ देता परस्पर विजापुरच्या आदिलशाहकडेच वळविता आले तर स्वराज्याला मोगली धक्का लागणार नाही, या हेतूने महाराजांनी मिर्झाराजाकडे अशी बोलणी वकिलामार्फत केली की , हा विजापूरचा बादशाह आदिलशाह दिल्लीचा शत्रू आहे. त्याचा तुम्ही पुरा मोड करा. आम्ही तुम्हांस मदत करू.
म्हणजे विजापूर खलास करून टाकायचं अन् त्यात आपणही चार ओंजळी कमवायच्या असा हा महाराजांचा डाव होता. तो डाव मिर्झाराजांनी अचूक ओळखला. आणि त्यांना दादच दिली नाही. मोगली फौज त्यांनी थेट पुण्यावर आणली. पुणे ही त्यांची केंद्र छावणी झाली. शाहिस्तेखानापासून पुणे मोगलांच्याच ताब्यात होते. आता आपण टाळू पाहात असलेले मोगली आक्रमण टळत नाही , हे महाराजांना कळून चुकले. संकट कितीही मोठे अंगावर आले तरीही आपला आब न सोडता ताठ उभे राहायचे हा महाराजांचा नेहमीचा स्वभाव.

मिर्झाराजा आणि दिलेरखान यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांविरुद्ध डाव खेळायचं ठरविलं. मराठी स्वराज्याची जाळपोळ , लूट जनतेवर अत्याचार ही मराठ्यांना शरण आणण्याकरिता मिर्झाराजाने ठरविलेली खेळी त्याने सुरू केली. पुण्यात कुबाहतखानास , कार्ला , मळवली , वडगांव या मावळ भागात कुतुबुद्दीनखान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमणबुंदेला , रायसिंग सिसोदिया इत्यादी सरदारांना ही धूमाकूळ घालण्याची कामगिरी सांगून धामधुमीस प्रारंभही केला. (मार्च. १६६५ ) ब्रिटीश भूमीवर सतत बॉम्बवर्षाव करून ब्रिटीश सैन्याचे धैर्य खचविण्याचा हिटलरने असाच प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात केला होता हे आपल्याला आठवतंय ना ? अशाच घनघोर प्रसंगी राष्ट्राचे चारित्र्य दिसून येते. ते खचते तरी किंवा धगधगते तरी.

परीक्षा होती स्वराज्यातील जनतेची. मराठी सैनिकांना हा मोगलाई वणवा दिसत होता. आपली घरेदारे आणि बायकापोरे पार चिरडून निघत आहेत, हे मराठ्यांना उघडउघड दिसत होते. समोरासमोर मोगलांशी झुंजायला मराठी माणूसबळ कमी पडत होते. तरीही प्रतिकार चालूच होता.
जरा कंदहार विमान अपहरण प्रकरण आठवा,दूरचित्रवाहीन्यांवरील धुमाकूळ आठवा आणि मग राजावर आलेल प्रेशर आठवा.
पण ईकडे बघा, मावळे लढताहेत, गड राखताहेत, स्वराज्य सांभाळताहेत, आणि हे करताहेत आपला परिवार सुरक्षित नाही हे माहित असुनही.

स्वराज्यास आरंभ झाल्यापासून आत्तापर्यंत (१६४६ ते १६६५ ) मराठी सैनिक सतत लढतोच आहे. विश्रांती नाहीच अन् आता तर ढगफुटीसारखे मोगली हत्ती आपल्यावर तुटून पडले आहेत. हे मराठ्यांना दिसत होतं. महाराजांनाही दिसत होतं. नकाशा पाहिला तर हा मोगली धूमाकूळ मुख्यत: पुणे जिल्ह्याच्या मध्य आणि पश्चिम भागावर मिर्झाराजांनी केंदित केला होता.

*पण इथेच शिवशाहीचा मावळा सैनिक आपलं प्रखर धैर्य , शौर्य , सहनशीलता , त्याग , निष्ठा आणि नेतृत्त्वावरील विश्वास अन् प्रेम अगदी नकळत , अगदी सहज , अगदी उत्स्फूर्त अन् अगदी हसतहसत जगून वागून दाखवित होता. यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणतात.* या काळातील या आक्रमक आगीच्या वर्षावात कोणत्याही किल्ल्यावरचा वा दऱ्याकपारातल्या ठाण्याछावणीतला मराठा सैनिक हताश , निराश , गर्भगळीत वा अगतिक झालेला दिसत नाही. हे कशावरून ? फितुरी नाही. आपापल्या कामात कसूर नाही अन् महाराजांकडे केविलवाण्या विनविण्याही नाहीत की महाराज आमचे संसार मातीला मिळताहेत. महाराज हे युद्ध थांबवा. शरण जा. तह करा. आम्हाला वाचवा.

मराठी स्वराज्याच्या पाठीचा कणा वज्रासारखा आणि गर्दन शेषासारखी ताठ दिसून आली ती या मिर्झा-दिलेर यांच्या आक्रमणाच्या काळातच. असा हा कणा होता की , वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

… क्रमश.