शिवचरित्रमाला भाग ५०

शिवचरित्रमाला भाग ५०

असे हे कोकण, असे हे मावळ

दिलेरखानाने आपली किल्ले घेण्याची मोहिम सुरू करण्याचे ठरविले. प्रथम पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले ‘ लक्ष्य ‘ म्हणून निश्चित केले. मोगली सर्जाखानाने सिंहगडास मोर्चे लावले. यावेळी सिंहगडावर जिजाऊसाहेब आणि महाराजांच्या एक राणीसाहेब होत्या. या नेमक्या कोणत्या राणीसाहेब होत्या , त्यांचे नाव सापडत नाही. पण जिजाऊसाहेब सिंहगडात असल्यामुळे आधीच बलाढ्य असलेला सिंहगड अतिबलाढ्य बनला. सिंहगडचा किल्लेदार यावेळी कोण होता त्याचेही नाव समजत नाही. पण गेल्याच वर्षी (दि. २८ मे १६६४ ) जसवंतसिंह राठोड आणि भावसिंह हाडा या दोघांवर जबरदस्त हल्ला करून त्यांचे मोर्चे पार उधळून लावून अन् त्यांना पिटाळून लावणारा जो मराठा किल्लेदार होता , तोच हा आताही असावा.

पुरंदर किल्ल्याला एकजोड किल्ला आहे. त्याचं नाव वज्रगड. म्हणजे दिलेरखानाने पुरंदर वज्रगड आणि सिंहगड हे किल्ले प्रथम घेण्याचे निश्चित केले. दिलेरखान आणि त्याच्याबरोबर मिर्झाराजेही पुरंदरच्या दिशेने निघाले. त्यांचा मार्ग पुणे ते हडपसर-लोणी-फुरसुंगी-चोराची आळंदी- सोनोरी-सासवड ते पुरंदर असा होता. दिलेरखानाचा कामाचा झपाटा विलक्षण गतीमान होता. आळस आणि चैनबाजी त्याच्या स्वभावातच नव्हती. मोगलांकडील एकूण सेनानायकांत या शंभर वर्षात हा दिलेरखान म्हणजे एकमेव वेगळा अपवाद ठरावा असा इस्लामी सेनानायक होता. एखादे काम अंगावर घेतले की ते पुरे करण्याकरिता तो अहोरात्र बेचैन असायचा.

दिलेरखान म्हणजे मूतिर्मंत निष्ठा , मूतिर्मंत तळमळ , मूतिर्मंत तडफड. खान आणि मिर्झाराजे पुण्याहून निघाले आणि ३० मार्च १६६५ या दिवशी सोनोरीच्या डोंगराच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात पोहोचले. त्यांच्याबरोबर अफाट युद्धसाहित्य आणि लवाजमा होता. तरीही अवघ्या १५ – १६ दिवसांत पुण्याहून ते सोनोरीस पोहोचले. सैन्य निदान पाऊणलाख तरी होतेच. येथे एक आठवण देतो. हेच अंतर फक्त ३० हजार सैन्यानीशी चालून जायला पूर्वी शाहिस्तेखानास पूर्ण नऊ दिवस लागले होते. दि. १ मे ते ९ मे १६६० अर्थात दिलेरखानसारख्या सतत भडकत राहणाऱ्या बारुदगोळ्याची शाहिस्तेखानसारख्या गचाळ सेनानीशीच काय पण कोणत्याही इतर इस्लामी सेनानीशी तुलना करता येणार नाही.

मोगलांनी तोफखाना मोठाच आणला होता. त्यात तीन तोफा प्रचंड होत्या. दि. ३१ मार्च १६६५ रोजी मध्यरात्री अचानक मराठ्यांच्या शेपाचशे स्वारांच्या टोळीने खानाच्या या सोनोरीजवळच्या छावणीवर एकदम वळवाच्या पावसासारखा हल्ला चढविला. छावणी झोपलेली होती. त्या प्रचंड छावणीवर हा हल्ला तसा लहानसाच होता. पण इतका भयंकर होता की , मोगलांची क्षणात तारांबळ उडाली. मराठे सुसाट वादळासारखे आले. अचाट वेगाने तुटून पडले. त्यांनी भन्नाट कापाकापी केली अन् सुसाट पसार झाले. कसे आले , कोठून आले , कोठे गेले पत्ताच नाही. आले गेले मनोगती. दिलेरला मराठ्यांचा पहिला परिचय असा झाला.
दि. १ एप्रिल रोजी खान तशाच वेगाने १५ कि. मी.वर असलेल्या पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला. खानाने लगेच मोर्चेबंदि सुरू केली. स्वत: खान जातीने नेतृत्त्व करीत होता. मिर्झाराजे या वेढ्यापासून दीड कि. मी. असलेल्या नारायणगावापाशी आपली छावणी ठोकून राहिले.

एक दिवस दिलेरच्या वेढ्यात भयंकर भडका उडाला. खानाचा दारुगोळ्याचा साठा अचानक पेटला. सगळी दारू प्रचंड स्फोटाने एकाक्षणात खाक झाली. भयानक नुकसान झाले. हा अपघात ? की मराठ्यांनी केलेला आघात ? नक्की माहित नाही. पण बहुदा मराठ्यांच्या गुप्तचरांनीच ही ठिणगी टाकली असावी.
पुरंदरच्या भोवती अक्षरश: तोफा बंदुकातून आग गडावर फेकली जात होती। मराठी इतिहासातील एक रौद्र संग्राम म्हणून या युद्धाचा अध्याय दाखवावा लागेल.
यावेळी मराठी सैन्याची पथके जागोजाग मोगलांना सतावीत होतीच. पण मनुष्यबळ कमी पडत होते. महाराज निश्चयाने उभे होते. त्यांची मनोभूमिका त्यांच्याच शब्दात अशी , *‘पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. माझ्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य. ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही.’*

मोगलांचा धूमाकूळ पुणे जिल्ह्यात चालू होता. तो त्यांनी केंद्रीत केला होता. त्यामुळे आग भयंकर होती. याचवेळी कोकण भक्कम आणि निर्धास्त होते. महाराजांचे आगरी , भंडारी , कोळी , प्रभू , कोकणी मराठे कोकणची अन् विशेषत: किनारपट्टीची राखण करीत होते. मिर्झाराजाने यावेळी औरंगजेबास डाक पाठवून विनंती केली की , गुजराथेतून मराठी कोकणावर तुम्ही मोगली फौजा पाठवा. हे कोकण झोडपले पाहिजे. औरंगजेबाने हे केले नाही का ? माहित नाही. पण पूवीर् शाहिस्तेखानाने कोकणावर पाठविलेल्या एकूण एक सरदारांचा कोकणी मराठ्यांनी पार धुव्वा उडवून दिलेला होता. पूर्ण फजिती. हे औरंगजेबाच्या लक्षात असावे. म्हणूनच बहुदा त्याने कोकणातील आगरी, कोळी , भंडाऱ्यांची कलागत काढली नाही. दिलेर आणि मिर्झाराजा यांनीही पुण्याहून कोकणावर आपल्या फौजा पाठविण्याचे धाडस केले नाही. कोकणच्या माणसांची इथे ओळख पटते. असे हे कोकण , असे हे मावळ , चिवट , चपळ , चमत्कारिक.

… क्रमश.