शिवचरित्रमाला भाग ५६

शिवचरित्रमाला भाग ५६

 

राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच

 

मिर्झा राजांना उदयराज मुन्शीने आपली ही तीन पदरी राजकीय कल्पना समजावून सांगितली होतीच. आता ती औरंगजेबाला आणि शिवाजीराजांना त्यांच्यापुरती समजावून सांगून कृतीत आणण्याची अवघड कामगिरी मिर्झाराजांनी हाती घेतली. त्यांनी आपल्याच छावणीत शिवाजीराजांना मुद्दाम बोलावून घेऊन आग्रा इथं बादशहांच्या भेटीस चलाच , त्यात तुमचा म्हणजेच मराठी राज्याचाही कसा फायदा होणार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रथम तर महाराजांनी राजांची ही आग्ऱ्यास दरबारात जाण्याची कल्पना स्पष्ट नाकारली. कारण औरंगजेब हे काय हलाहल आहे हे त्यांना माहिती होते ना! पण मिर्झाराजांनी परोपरीने पटवीत महाराजांना असे स्पष्ट वचन दिले की , ‘ महाराज , आपण आग्ऱ्यास चलाच. झाला तर तुमचा फायदाच. तोटा नाहीच. तुमच्या प्राणाच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. हा राजपुताचा शब्द आहे. तुळशीबेल हातात घेऊन तुम्हाला वचन देतो की , तुम्ही सुखरूप जाल आणि सुखरूप परत याल. माझा मुलगा रामसिंग तेथे आहे. तो माझ्याइतकीच तुमची जोखीम घेईल आणि सांभाळील. खात्री ठेवा. चलाच. ‘

 

तरीही महाराजांनी एकदम हो म्हटले नाही. ते राजगडास परतले. आपल्या सर्व सहकाऱ्यांशी बोलले. ही आग्ऱ्याची कल्पना गोंडस होती. पण तितकीच भयंकर धोक्याची होती. गाठ औरंगजेबाशी होती. ज्याने आपल्या बापापासून प्रत्यक्ष पोटच्या थोरल्या पोरापर्यंत अनेक आप्तइष्टमित्रांचाही कायमचाच निकाल लावला , तो औरंगजेब शिवाजीराजांच्या बाबतीत कसा वागेल याची कल्पनाच दाहक होती. ती कुणालाच राजगडावर पटणारी आणि पचणारी नव्हती. हा धोका भयंकर आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी प्रतिकूल मत दिले , महाराजांनी आग्ऱ्यास जाऊ नये.

 

महाराज मात्र मनात धाडसी खेळ खेळण्याचा विचार करीत होते. आग्ऱ्यास जावेच. एकदा ही मोगलाई आणि राजपुती माणसं जवळून न्याहाळावीत. हा विचार त्यांच्या मनात निश्चित डोकावला. पाचपाचशे वर्ष हा उत्तर हिंदुस्थान गुलामगिरीत राहतो तरी कसा अन् सुलतानी सत्ता ठेवते तरी कसे हे एक कोडेच होते. महाराजांना ते निरखायचे होते. पाचशे वर्षांत स्वातंत्र्यासाठी एकही बंड नाही ? एका आरवलीतील सिंहाने आपले राज्य सार्वभौमत्वाने टिकवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. त्याला कोणाचीही साथ नाही ? का नाही ? असं काय अलौकिकत्त्व या सुलतानी दंडसत्तेत आहे ? पाहू तरी.

 

या आशयाचेच विचार महाराजांच्या मनात उकळत असतील नाही ? त्यांचा विश्वास मिर्झाराजांच्या शब्दांवर नक्कीच होता. हा राजपूत फसवणार नाही , वचन पाळील आणि आपण सुखरूप जाऊ अन् सुखरूप येऊ एवढी तर खात्रीच महाराजांना होती. ती तुळशीची अन् बेलाची पाने त्यांना खुणवीत असावीत.

 

महाराजांनी आपल्या सौंगड्यांना याच मुद्द्यावर पटवून दिले की , आपण सुखरूप जाऊ , सुखरूप परत येऊ. मानाने सार्वभौम प्रतिष्ठेने. नवीन काही शिकून. नवीन काही स्वप्ने पाहून.

 

पण औरंगजेबाचे काय ठरले ? मिर्झाराजाने औरंगजेबासही लिहिले की , आपण शिवाजीराजांस दरबारात येण्याचे आमंत्रणपत्र पाठवावे. मीही राजांना आग्रह करीत आहे. आपले पत्र आणि माझा आग्रह निश्चित सफल होतील. राजे दरबारच्या भेटीस जरूर येतील. त्यात बादशाहांचा खूप मोठा फायदाच होईल. मिर्झाराजे बादशहांस लिहून पटवीत होते. पण बादशहास मनातून पटत नव्हते. बहुदा त्याला शिवाजीराजांची प्रतापगडची वाघनखे आणि लालमहालात कडाडून पडलेला मामांच्या बोटांवरचा भवानीचा घाव दिसत असावा. राजांनी आग्ऱ्याला यावे ही गरजच औरंगजेबास वाटत नव्हती. पण नंतर त्याच्या मनातील ज्वालामुखी जागा होत गेला.

 

इथे एक फार पुढे औरंगजेबानेच नमूद करून ठेवलेली गोष्ट सांगता येते. औरंगजेबाच्या डायऱ्या ( शाही रोजनामे) सापडल्या आहेत. डॉ. जदुनाथ सरकार , डॉ. महाराजकुमार रघुवीरसिंग आणि श्रेष्ठ इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी या शाही डायऱ्यांतील बराच मोठा भाग अभ्यासून प्रसिद्ध केला आहे. त्यात अगदी अखेरच्या म्हणजे इ. १७०५ ते १७०७ या काळातील नोंदी फार बोलक्या आहेत. त्यातील एक नोंद अनेकदा केली गेली आहे. औरंगजेब म्हणतो , ‘ मी एक फार मोठी चूक केली. त्या सीवाला मी आग्ऱ्यात वेळच्यावेळी (म्हणजे लवकरात लवकर) ठार मारले नाही. ही माझी भयंकर चूक झाली.

 

म्हणजे याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की , महाराजांना आग्ऱ्यातच खतम करून टाकण्याचा विचार औरंगजेबाच्या मनात निश्चित होता.

 

आताही औरंगजेबाने हाच विचार आपल्या डोक्यातल्या खास कप्प्यात ठेवून मिर्झाराजांस कळविले की , सीवाला आग्ऱ्यास जरूर पाठवा.

 

आणि महाराजांच्या नावानेही एक खास पत्र त्याने पाठविले. हे पत्र उपलब्ध आहे. पत्र छोटेसेच आहे. ‘……… तुम्ही आग्ऱ्यास दरबारी यावे. तुमचा योग्य तो मान करून तुम्हांस निरोप दिला जाईल. ‘ हा या पत्राचा आशय आहे. हे पत्र महाराजांस मिळाले. मिर्झाराजांनीही तुळशीबेल हाती घेऊन महाराजांस वचन दिले की , तुम्ही सुखरूप जाल , सुखरूप याल. माझा मुलगा कुँवर रामसिंग आग्ऱ्यास आहे. तो सर्व सुरक्षिततेची दक्षता घेईल. हा राजपुताचा शब्द आहे.

 

महाराजांचा आग्ऱ्यास जाण्याचा बेत ठरला. स्वराज्याच्या संपूर्ण जबाबदारीची आणि अधिकाराची शिक्के कट्यार जिजाऊसाहेबांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. यातच जिजाऊसाहेबांची थोर योग्यता स्पष्ट होते. त्यांच्या दिमतीस तीन मंत्र्यांचे मंत्रीमंडळ देण्यात आले. पंतप्रधान , अर्थमंत्री आणि सरसेनापती. मंत्रीमंडळात हे तीनच मंत्री होते. महाराष्ट्र राज्याचे सर्वात लहान असे हे पहिले आणि शेवटचे मंत्रीमंडळ.

 

इथेच एक गोष्ट नमूद करतो. पुढे महाराजांना औरंगजेबाने आग्ऱ्यात कैदेत ठेवले. मिर्झाराजे तेव्हा दक्षिणेत धारूर उर्फ फताहाबाद येथे होते. त्यांनी औरंगजेबास लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. त्यांनी मराठी राज्याच्या स्थितीबद्दल लिहिलेले पत्र तर फारच मोलाचे आहे. मिर्झाराजे म्हणतात. ‘ इकडे ( मराठी राज्याचा म्हणजेच जिजाऊसाहेबांचा) राज्यकारभार अतिशय चोख आणि दक्ष आहे. त्यात सुई शिरकवावयासही जागा नाही. ‘

 

फार लक्षात घेण्यासारखी ही मिर्झाराजांची साक्ष आहे. त्यातून जिजाऊसाहेब , मंत्रीमंडळ आणि एकूणच मराठी राज्यकारभारात असलेली एकूण एक माणसे केवढ्या जबाबदारीने आणि निष्ठेने राज्य सांभाळत होती ते दिसून येते.

 

मी यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे नॅशनल कॅरेक्टर म्हणतो.

… क्रमश.