शिवचरित्रमाला भाग ५७

शिवचरित्रमाला भाग ५७

======================

एक फसलेला डाव

======================

शिवाजी महाराजांच्या अनेक योजना आणि त्यानुसार केलेल्या कृती या विस्मित करणाऱ्या आहेत. काळ , काम आणि वेग याचं जसं भान त्यांनी काटेकोरपणे राखलेलं दिसतं , तसेच त्या योजनेत संभाव्य धोके आणि घातपात टाळण्यासाठी त्यांनी केलेली बुद्धिची आणि प्रतिभेची कसरत ही विस्मित करणारी आहे. या सर्व योजना मग त्या अफझलप्रकरणीची असो , लाल महाल छाप्याची असो , पन्हाळगड सुटकेची असो वा सुरत स्वारीची असो, त्या सर्वच सामूहिक निर्णय, कामविभागणी व जबाबदारी ने असायच्या.

त्यात सहभागी होणारा प्रत्येक सैनिक आणि अधिकारी हाही तेवढाच प्रमुख सहभागी घटक होता. त्यामुळे त्या योजना यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येक घटकावर सारखीच पडत होती. घटकांची संख्या मोठी होती. त्यामुळेच योजना फसण्याचीही शक्यताही कधी कधी मोठी असायची. योजना , डोंबाऱ्याच्या तारेवरून झपझप चालण्याइतकीच अवघड असायची. शेवटपर्यंत यशस्वीरित्या पोहोचला तर जग कौतुकानं टाळ्या वाजवील. म्हणेल , ‘ वा! काय विलक्षण करामत केली! ‘ पण जर थोडीसुद्धा चूक झाली तर सर्वस्वाचा नाश. मग जग म्हणेल , ‘ वेडा! काहीतरीच करायला गेला अन् धगधगत्या खाईत गेला. ‘

 

अशीच एक योजना महाराजांनी पन्हाळगड काबीज करण्यासाठी योजली. पूर्ण पूर्वतयारीने महाराज दि. १५ जाने. १६६६ या दिवशी कोल्हापूरपासून सुमारे ५० कि. मी. अंतरावरील गंधर्व गडाच्या परिसरात ( तालुका चंदगड) अंदाजे चार हजार सैन्यानिशी पोहोचले. रात्रीचा अंधार होता. मोहिम मोठी होती. गुप्तता राखायची म्हटलं तरी हजारो सैन्याच्या हालचालीत ती कशी राखता येणार! म्हणून जे काही करायचं ते कमीतकमी वेळात आणि अत्यंत वेगाने (म्हणजेच शत्रूला पत्ताही लागणार नाही अशी दक्षता घेऊन) करायचं हे निश्चित होतं. महाराज गंधर्व गडाच्या परिसरात आले. त्यापूर्वी त्यांनी नेताजी पालकर सरसेनापती यांना सूचना (म्हणजेच हुकुम) देऊन बजावले की , या अमुकअमुक वेळेला , अमुक ठिकाणी सैन्यानिशी आम्हाला सामील व्हा.

 

महाराज स्वत: अगदी काटेकोर ठरल्याप्रमाणे तयार राहिले.

 

पण नेताजी पालकर ‘समयांस पावले नाहीत.’ त्याची वाटही जास्तवेळ पाहता येत नव्हती. मध्यरात्र उलटली. म्हणजेच इंग्लिश तारीख १६ जानेवारी सुरू झाली. महाराज आधीरतेने वाट पाहात होते. जर आत्ताच हल्ला केला नाही , तर अशी संधी पुन्हा येणार नाही. या जाणिवेने ते अस्वस्थ होते. अखेर नेताजी पालकर आलेच नाहीत. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. एक तर मोहिम रद्द करा किंवा आहे त्या बळानिशी आत्ताच हल्ला करा. असा तो प्रसंग काटेकोर तारेवरचा होता. अखेर महाराजांनी पन्हाळगडावर चालून जाण्याचा निर्णय केला.

 

सैन्य पन्हाळगडाच्या कुशीत शिरले. गडाच्या पूर्वेच्या दरवाजावर म्हणजेच ‘ चार दरवाजावर ‘ महाराजांनी एकदम हल्ला चढविला. किल्लेदार आपल्या आदिलशाही सैन्यानिशी महाराजांच्यावर अपेक्षेपेक्षाही तडफेने चालून आला.

 

भयंकर लढाई पेटली. कल्लोळ उसळला आणि तपशील सांगायलाच हवा का ? पराभव झाला. त्यांनी माघार घेतली. त्यांचे एक हजार सैनिक मारले गेले. महाराज विशाळगडाकडे निघते झाले.

 

हा पराभव का झाला ? नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे हा पराभव झाला. हजार माणसे मेली. अतिशय नुकसान झाले. शिवाय पन्हाळ्याचा दुरावा आणखीच वाढला. महाराज संतप्त झाले. काटेकोर योजना सर्वांनी मिळून काटेकोरपणे पार पाडली तरच इतिहासात कौतुकाची ठरते. नाहीतर फजिती. फटफजिती. अपार नुकसान.महाराज विशाळगडावर पोेहोचले , हेच नशीब.

 

नेताजी पालकर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १७ जानेवारीस विशाळगडावर परस्पर आला. आता महाराजांच्या समोर जाणं म्हणजे भडकलेल्या आगीत प्रवेश करणंच होतं. नेताजीला तरीही जाणं भाग होतं. तो गेला आणि महाराजांनी त्याला तलवारीसारखाच सपकन सवाल केला.

 

‘समयांस कैसे पावला नाहीत ?’

 

महाराजांनी नेताजीला ताबडतोब सेनापतीपदावरून बडतर्फ केले. क्षणापूर्वीच्या स्वराज्याचा सरसेनापती एका क्षणात बडतर्फ झाला. पुढं घडलं ते फारच दु:खद. नेताजी पालकर विशाळगडावरून निघाला आणि विजापुरास आदिलशाही फौजेत दाखल झाला. स्वराज्याचे नाते संपले. खरं म्हणजे नेताजीच्या दु:खद आयुष्यास सुरुवात झाली. नंतर तो दिलेरखानास मिळाला. म्हणजेच औरंगजेबाचा तो नोकर बनला आणि दिल्ली दरबारात रुजु झाला.

 

मराठी इतिहासातील हा केवढा दु:खद प्रसंग. यात महाराजांची चूक होती का ? नेताजीला का उशीर झाला ? एवढी मोठी चूक नेताजीसारख्या सरसेनापतीने केल्यावरही महाराजांनी त्याला क्षमा करावयास हवी होती का ? पुढे पन्हाळा जिंकून घ्यावयास आठ वर्षांचा उशीर झाला. त्याला जबाबदार कोण ? या सगळ्याच प्रश्नांच्या गांधील माश्या आपल्याला सतावतात. समाधान करणारं उत्तर सापडत नाही.

 

यातून भयंकर वेदना देणारी गोष्ट म्हणजे नेताजीने औरंगजेबास सामील व्हावे ही. महाराजांनी यापूर्वी पंतप्रधानपदावरून तीन वेळा माणसे काढून टाकली. इतरही अनेक पदांवरून महाराजांनी माणसे काढली , नवी नेमली. पण नेताजी पालकरच्या सारखा अनुभव आला नाही. संशोधनाने अधिक माहिती उपलब्ध होईल तेव्हाच या प्रकरणावर प्रकाश पडेल.

काही अभ्यासकांच्या मते औरंगजेबाच्या गोटात या निमित्ताने महाराजांनी नेताजी सारख्या आपल्या विश्वासु व्यक्तीची पेरणी केली.

पण संशोधनाने अधिक माहिती उपलब्ध होईल तेव्हाच या प्रकरणावरही प्रकाश पडेल.

… क्रमश.