शिवचरित्रमाला भाग ७६
======================
आता लक्ष पोर्तुगीजांवर
======================
आग्र्याहून सुटल्यानंतर महाराज नार्व्याच्या जंगलात विश्रांतीसाठी म्हणून , दक्षिण कोकणातील हणमंत्या घाटाजवळच्या मनोहर गडावर सुमारे महिनाभर राहिले. म्हणायला विश्रांती, पण कार्यविस्ताराच्या योजना सुरुच होत्या. हा मुक्काम इतक्या आडवाटेवर आणि अवघड असलेल्या या गडावर करण्याचं कारण काय ? गोवा येथून थोड्या अंतरावरच होता. पोर्तुगीजांची गोव्याची सत्ता पूर्ण उखडून टाकून पूर्ण गोमंतक स्वराज्यात समाविष्ट करावा ही त्यांची इच्छा होती. पोर्तुगीज आणि सिद्दी वा इंग्रज वा मोगल हे सारे परकीय होते. उघडउघड शत्रू होते. आक्रमण करून त्यांनी या देशाचे लचके तोडले होते. या सर्वांची कायमची हकालपट्टी करावी हीच महाराजांची महत्त्वाकांक्षा होती. *आमच्या देशाची , आमच्या हक्कांची संपूर्ण भूमी आमच्याच ताब्यात असली पाहिजे ही महाराजांची भूमिका होती. आपली देवालये, तीर्थक्षेत्रे सुखरुप सुरक्षित रहावीत, आपल्या हिंदु बंधु भगिनींची आबाळ होऊ नये यासाठी शिवप्रभु सतत ठामपणे भुमिका घेऊन होते, अन् त्यात वावगं काय होतं ? जगातही असाच न्याय आहे ना ? महाराजांनीही हीच महत्त्वाकांक्षा ठेवली होती.*
वेळोवेळी संधी साधून फिरंग्यांच्या ताब्यात असलेला बारदेश-गोवा जिंकून घेण्याकरिता त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केेलेही होते. ते थोडेसे यशस्वीही झाले होते. पण फिरंग्यांना पूर्णपणे उखडून काढण्याची इच्छा अजून अपुरीच राहिली होती.
महाराज मनोहरगडावर मुक्कामास आहेत याची खबर गोव्याचा गव्हर्नर द विसेंदी याला समजली होती. औरंगजेबासारख्या कर्दनकाळाच्या दाढेतून हा मराठा राजा सुटलाच कसा याचा त्याला विलक्षण अचंबा वाटत होता. त्याने आपल्या बादशाहाला , लिस्बनला हा अचंबा पत्र लिहून व्यक्तही केला. वास्तविक विसेंतीची मनातून अपेक्षा अशीच होती की , हा शिवाजी आग्ऱ्याहून सुटूच नये. तो कैदेतच मरावा किंवा आलमगिराने त्याला मारावे. पण काय करणार ? राजा तर सुटला. आला. थोडा आजारीही पडला अन् त्यातून बरा होऊन हवापालट करण्यासाठी मनोहरगडावर येऊन राहिला आहे , आता त्याच शिवाजीला सुटकेबद्दल शुभेच्छा आणि सद्भावनेचा आहेर ( नजराणा) पाठविणे त्याला अगत्याचे वाटले. रामाजी कोठारी या नावाच्या आपल्या एका वकीलाबरोबर त्याने हे पत्र आणि नजराणा मनोहरगडाकडे रवानाही केला. परंतु या रामाजी वकीलाला मनोहरगडाचा अवघड रस्ता गवसलाच नाही. तो परत गेला.
महाराज लगेच मोगलांच्या विरुद्ध उठाव करणार नव्हते. स्वराज्याची सर्व व्यवस्था अधिक बळकट करून नंतर संधीची वाट पाहात महाराज काही काळ थांबणार होते. किती काळ ? योग्य संधी मिळेपर्यंत.! परंतु खूप दमल्यानंतरही हातपाय पसरून जांभया देत बसणं हे महाराजांच्या प्रकृतीतच नव्हतं. ते मनोहर गडावरून राजगडाकडे (बहुदा राजापूर , अणस्कुरा , विशाळगड , वासोटा , प्रतापगड या मार्गाने) परतले. त्यांच्या मनात घोळत होते गोमांतकाच्या पूर्ण मुक्ततेचे विचार.
या ठिकाणी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे , स्वराज्यातून पुरंदरच्या तहाने औरंगजेबाने जे २३ किल्ले आणि मुलुख कब्जात घेतले होते त्यातील कोणत्याही किल्ल्यावर वा ठाण्यावर बादशाहाने मराठी माणूस अधिकारी पदावर नेमलेला दिसत नाही. उलट असे म्हणावेसे वाटते की , महाराजांच्या आग्रा कैदेच्या कालखंडातसुद्धा कोणीही मराठी माणूस औरंगजेबाकडे चाकरीची भीक मागायला गेलेला दिसत नाही. .
लोहगडावर राजा गोपाळदास गौड , माहुली गडावर राजा मनोहरदास गौड , सिंहगडावर उदयभान , पुरंदरावर शेख रझीउद्दीन अशी काही मोगली अधिकाऱ्यांची नावे सांगता येतात.
या बाबतीत असेही म्हणता येईल की , शिवाजीराजाकडून घेतलेल्या गडांवर आणि मुलुखांवर मराठी माणसे न नेमण्याची खबरदारी औरंगजेबाने घेतली. ते दूरदर्शीपणाचे श्रेय औरंगजेबास द्यावयास हरकत नाही.
आग्ऱ्यात अडकलेली सर्व माणसे अगदी परमानंद कवी , डबीर , कोरडे वकील आणि शेवट पलंगावर झोपलेला हिरोजी फर्जंदसुद्धा स्वराज्यात सुखरूप परत पावले. हे आग्रा प्रकरण म्हणजे स्वराज्य उभारणीच्या मार्गावर निर्माण झालेले केवढे भयानक संकट होते. या काळात अडकलेली माणसे सुटून आली. पण स्वराज्याच्या नित्यनैमित्तिक कामात अडकलेली माणसं जिजाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली अधिक कणखररितीने कामात अडकली.
महाराजांनी आपली नजर राजगडावरून पोर्तुगीजांच्या सरहद्दीवरती वळविली. त्यांच्या मनात एक अफलातून राजकारण आकार घेत होतं. या फिरंग्यांना उखडून काढण्यासाठी एक विलक्षण उत्तपटांग डाव महाराजांच्या मनात आला. महाराज मोठी फौज घेऊन ( कदाचित दहा हजार असावी) कुडाळवर आले आणि त्यांनी थेट सप्तकोटीश्वराचे नावेर् गाव गाठले. म्हणजे महाराज जुन्या गोव्यापासून अवघ्या ३० कि. मी.वर येऊन पोहोचले. गव्हर्नर विसेंतीची छातीच दडपली. पण भयाने नाही , तर जबाबदारीने. कारण हा भयंकर शत्रू अलेक्झांडरसारखा , ज्युलियस सीझरसारखा समोरच ठेपला होता.
महाराजांनी एकदम जुन्या गोव्यावर किंवा सेंट एस्टोवा किल्ल्यावर झडप न टाकता ते नार्व्याच्या जंगलात फक्त तळ ठोकून बसले. पण नुस्तं बसणं हा हेतू नव्हता. त्यांनी एका बाजूने सप्तकोटीश्वराची पूजाअर्चा चालू केली आणि संधी साधून आपल्या फौजेतील लोक वेगवेगळ्या संख्येनं आणि वेषांनी गोव्याच्या मुलुखांत घुसवावयास सुरुवात केली. घुसखोरी!
याच वेळी सागरी मार्गाने आणि देशावरच्या भीमगड किल्ल्याच्या मार्गाने , तसेच सरळसरळ कुडाळ ओरसच्या मार्गानेही मराठी कुमक गोळा करीत करीत गोव्याच्या गव्हर्नरचा गळा आवळण्याचा महाराजांचा हा अफलातून डाव होता. मग काय झालं ?
यावेळी गोव्याचा फिरंगी गव्हर्नर आजारी होता. तबियत सुधारत नव्हती. तरीही तो दक्ष होता. इ. स. १६६७ ऑक्टोबर.
… क्रमश.