शिवचरित्रमाला भाग ७५

शिवचरित्रमाला भाग ७५

======================

कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड

======================

अशी आपली समजूत आहे की कोंढाण्याचे नांव सिंहगड असे ठेवले गेले ते तानाजी मालुसरे यांनी गड घेतला पण स्वत: तानाजी वीरगतीस गेले म्हणून. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की , शिवाजीराजांनी कोंढाणा गडाचे नांव सिंहगड असे ठेवले ते त्याही पूर्वीच. इ.स १६६४ च्या आधीपासूनच. म्हणून आपण त्याचा उल्लेख ‘ सिंहगड ‘ यांच नावाने करीत आहोत.

 

उदयभान राठोड हा सिंहगडावर किल्लेदार म्हणून दाखल झाला. त्याचा करडा , कठोर अंमल सुरू झाला. तो मुळचाच क्रूर किंवा संतापी स्वभावाचा असेल की नसेल हे माहीत नाही. पण सिंहगडाच्या राखणदारीची जोखीम शिरावर आल्यावर तो भयंकर कठोरपणे वागत राहिला यात शंका नाही. त्यातलीच ही एक हकिकत पहा.

 

सिंहगडाच्या उत्तर पायथ्याशी घनदाट झाडी होती.अतकरवाडी , थोपटवाडी , डोणजे , खानापूर इत्यादी लहान-लहान खेडी विखुरलेली आहेत. एके दिवशी हा उदयभान किल्लेदार गडाच्या उत्तर तटावरून कठोर नजरेने पाहणी करीत फिरत होता. त्याचेच मोगल पहारेकरी ठिकठिकाणी तटावर गस्त घालीत होते. उदयभानचे लक्ष तटावरून गडाच्या पायथ्याकडे गेले. तो टवकारून बहिरी ससाण्यासारखा पाहू लागला. अन् त्याचे लक्ष गेले एका कोणा मराठी खेडुताकडे. तो खेडूत घरच्या चुलीसाठी जळण म्हणून काट्याकुट्या गोळा करीत होता. तो कुणी मराठा सैनिक नव्हता. हत्यारबंद शिपाईही नव्हता. एक गरीब संसारी मराठा खेडूत. उदयभानचे लक्ष त्याच्यावर गेले. गडावरून तो ठिपक्याएवढा दिसला असेल. पण उदयभानने एकदम आपल्या पहारेकरी मोगल शिपायांना फर्मावले , ‘ पकडो ! गिरफ्तार करो! ‘

 

मोगली पहारेकरी गडावरून पुणे दरवाजाने गडाबाहेर धावले. त्यांनी पायथा गाठला. झाडी-झुडपात घुसून त्यांनी त्या मराठी खेडुताला पकडले. तो खेडुत व्याकुळतेने सांगत होता , की मी गनीम नाही. मी गरीब आहे. घरासाठी सरपण वेचतोय. पण त्याचं ऐकतो कोण ? मोगलांनी त्याला धरून गडावर चालविलेच. त्याला उदयभानापुढे आणले. काट्याचा नायटा करतात तो असा. तू हेरगिरीच करीत आहेस असा गहजब उदयभानाने चालू ठेवला. हा हा म्हणता ही हेरगिरीची खबर गडाच्या पायथ्याशी आणि सभोवार मराठी खेड्यापाडयांत पसरली. खरं म्हणजे तेवढ्याचसाठी हा खटाटोप उदयभानाने केला. काट्याचा नायटा केला. त्या गरीबाची चौकशी मांडली आणि शेवटी निकाल दिला , ‘ याचा गडावरून कडेलोट करा! ‘

 

त्याच्या आरोळ्या किंकाळ्या फुटल्या. साऱ्या मावळ मुलुखाचं काळीज भीतीनं दणाणल. उदयभानचा दरारा असा ढाण्यावाघासारखा गडाच्या घेऱ्यास पसरला.

 

सिंहगडाला तटावर पहारे होतेच. पण शिवाय गडाच्या चहुअंगास ठिकठिकाणी ‘ मेटे ‘ होती. मेटं म्हणजे त्या भागात सतत जागता पहारा ठेवणारी सैनिकांची चौकी. अशी एकूण आठ मेटे होती. या सर्व मेटांवरती एक मुख्य नाईक असायचा. त्याला म्हणायचे घेरेसरनाईक. याची जबाबदारी किल्लेदाराइतकीच मोठी समजली जायची. हे घेरेसरनाईकाचे मुख्य मेटं गडाच्या पश्चिमेच्या अंगास होते. आणि आजही तेथे मराठी वस्ती आहे.

 

अवघा गड कळकी , आवळी , बेहेडा , पिंपळ आणि कार्वीच्या घनदाटीत घेरला गेला होता. अशा या सिंहगडावर अंमल होता आलमगीराचा.

 

एखादी गोड आठवण औक्षात घडली तर अत्तराच्या फायासारखी आपण कानामनांत जपतो. त्याहून गोड घडली तर काळजाच्या कोंदणात जपतो. या गडाच्याच काळजात एक आठवण ताजी होती. ती म्हणजे मिर्झाराजा जयसिंह आणि दिलेरखान पठाण यांनी स्वारी केली तेव्हाची. या दोन मोंगल सेनापतींच्या हुकुमाने सर्फराजखान नावाच्या मोंगल सरदाराला सिंहगडास वेढा घालण्याचा हुकुम झाला. सर्फराजचा वेढा सिंहगडाला पडला. यावेळी पुरंदरालाही दिलेरखानाने वेढा घातला होता. झुंजी सुरू झाल्या होत्या. कोंढण्याचा वेढा आधाशी वाघाच्या भुकेनं रेड्यावर झडप पडावी तसा चालू होता. यावेळी प्रत्यक्ष जिजाऊ साहेब गडावर होत्या आणि त्यांच्या सांगाती शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेबही होत्या. म्हणजे या सासू् – सुना गडात असल्यामुळे गडावरच्या मावळ्यांना गेंड्यांच बळ आलं होतं. महाराजांच्या कोणत्या राणीसाहेब यावेळी इथे होत्या , त्यांचे नाव मात्र समजू शकलेले नाही. जिजाऊसाहेब स्वत: गडावरून मोगलांशी प्रत्यक्ष लढाई करत होत्या अशीही नोंद नाही. पण त्यांचे नुसते अस्तित्वही गडावरच्या मावळ्यांना देवघरातल्या कुलदैवतासारखे जाणवत होते.

 

सर्फराजखानाचा हा वेढा सतत सव्वातीन महिने चालू होता. शेवटी ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात मिर्झाराजांना व दिलेरखानला हा गड द्यावा लागला. देणं भागच होतं. जिजाऊसाहेबांना गडावरच्या सर्वांनीशी झेंड्याडंक्यासह गडावरून उतरावे लागले. ही ती काट्यासारखी काळजात कुरूप करून बसलेली आठवण आऊसाहेबांच्या , महाराजांच्या अन् तानाजी मालुसऱ्यासकट अवघ्या मावळ्यांच्या मनात खुपत होती.गड होता उदयभान किल्लेदाराच्या कब्जात.

 

… क्रमश.