शिवचरित्रमाला भाग ८१

शिवचरित्रमाला भाग ८१

======================

मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला

======================

महाराजांनी यावर्षी (इ. १६६९ ) मुरुड-जजिंऱ्यावर अगदी नेट धरून मोहिम सुरू केली. ही मोहिम दुहेरी होती. किनाऱ्यावरून आणि ऐन समुदातूनही. स्वराज्याचे आरमार समुदाकडून तोफा बंदुकांचा भडीमार करीत होते. स्वत: महाराज काही आठवडे पेणपाशी तळ ठोकून बसले होते. पेणच्या जवळचे किल्ले कर्नाळा आणि रोह्याच्या जवळचे किल्ले अवचितगड , त्याचप्रमाणे तळेगड आणि किल्ले भोसाळगड हे महाराजांच्याच स्वराज्यात होते. त्यामुळे असे वाटत होते की , दिघीच्या खाडीत समुदात असलेला हबश्यांचा जंजिरा किल्ला हा मराठी किल्ल्यांनी पूर्वदिशेने आणि मराठी आरमारामुळे समुदात पश्चिमदिशेने अगदी कोंडल्यासारखा झाला आहे. फक्त नेट धरून सतत जंजिऱ्यावर मारा केला तर जंजिऱ्याला अन्नधान्य पुरवठा आणि युद्धसाहित्याचा पुरवठा कुठूनही होणार नाही. त्याची पूर्ण नाकेबंदी होईल. अन् तशी मराठ्यांनी केलीच. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी , सरपाटील , दर्यासारंग आणि दौलतखान ही मराठी सरदार मंडळी आणि आरमारी मंडळी अगदी असाच सर्व बाजूंनी जंजिऱ्याला गळफास टाकून बसली. महाराज अन्य राजकीय मनसुब्यांसाठी रायगडास गेले. ही मोहिम प्रत्यक्ष महाराज चालवीत नव्हतेच. ती चालवीत होते हे सगळे मराठी सरदार आणि खरोखर या सैन्याने जंजिऱ्यास जेरीस आणले. जंजिऱ्याची अवस्था व्याकूळ झाली.

 

रायगडावर या खबरा महाराजांना पोहोचत होत्या. असे वाटत होतं की , एक दिवस ही लंका आपल्याला मिळाली आणि जंजिऱ्यावर भगवा झेंडा लागला , अशी खबर गडावर येणार. इतकंच नव्हे तर जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी खैरतखान हा मराठी आरमारी सरदारांशी तहाची बोलणी करू लागला.

 

पण तेवढ्यात किल्ल्यातील इतर दोन सिद्दी सरदारांनी या मराठ्यांना शरण जाऊ पाहणाऱ्या सिद्दीला अचानक कैद केले आणि युद्ध चालूच ठेवले. काही हरकत नाही , तरीही जंजिरा मराठ्यांच्या हाती पडणार हे अगदी अटळ होते. जंजिरेकर सिद्दींचे ही कौतुक वाटते. त्यांचे धाडस , शौर्य आणि स्वतंत्र राहण्याची जिद्द अतुलनीय आहे.

 

याचवेळी एक वेगळेच राजकारण महाराजांच्या कानांवर आले. दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाने सिंध आणि गुजरातच्या किनाऱ्यावर असलेले आपले आरमार जंजिऱ्याच्या सिद्दीला मदत करण्यासाठी जंजिऱ्याकडे पाठविण्याचा डाव मांडला. हुकुम गेले आणि मोगलांचे थोडेफार आरमारी दल शिडे फुगवून दक्षिणेकडे जंजिऱ्याच्या दिशेने निघाले. या बातम्या ऐकून महाराज चपापलेच. हे औरंगजेबी आक्रमण सागरी मार्गावर अनपेक्षित नव्हतं. पण मोगल मराठे असा तह झाला असताना आणि गेली तीन वर्षे ( इ. १६६७ ते १६६९ ) हा तह महाराजांनी विनाविक्षेप पाळला असताना , औरंगजेब असा अचानक वाकडा चालेल अशी अपेक्षा नव्हती. आता जंजिऱ्याचे युद्ध हे अवघड जाणार आणि हातातोंडाशी आलेला जंजिरा निसटणार हे स्पष्ट झाले. जंजिऱ्याशी आणि उत्तरेकडून येणाऱ्या औरंगजेबी आरमाराशी युद्ध चालू ठेवायचे की नाही असा प्रश्न महाराजांपुढे आला.

 

तेवढ्यात महाराजांना औरंगाबादेहून एक खबर मिळाली की , औरंगजेबाचे मनसुबे घातपाताचे ठरत आहेत. म्हणजेच बादशाह शांततेचा तह मोडून आपल्याविरुद्ध काहीतरी लष्करी वादळे उठविण्याच्या बेतात आहे. अन् तसे घडलेच.

 

त्याचं असं झालं , औरंगाबादमध्ये सेनापती प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी नासिककर यांच्याबरोबर पाच हजार मराठी घोडेस्वार गेली तीन वर्षे मोगल सुभेदाराच्या दिमतीस होते. हे कसे काय ? आग्ऱ्यास जाण्यापूवीर् जो पुरंदरचा तह झाला , त्यात एक कलम असे होते की , शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसले ( त्यावेळी वय वर्षे आठ) यांच्या नावाने बादशाहाने पाच हजाराची मनसब द्यावी. त्या कलमाप्रमाणे हे पाच हजार मराठी स्वार औरंगाबादेस होते. युवराज संभाजीराजे हे ‘ नातनाव ‘ म्हणजे वयाने लहान असल्यामुळे ते प्रत्यक्ष स्वत: या सैन्यानिशी औरंगाबादेत राहू शकणार नव्हते. म्हणून सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबर कारभारी म्हणून निराजी रावजी या दोघांनी तेथे राहावे असे ठरले.

 

यावेळी औरंगाबादला सुभेदारीवर होता औरंगजेबाचा प्रत्यक्ष एक शाहजादा. त्याचे नाव अजीम. तो गेली तीन वषेर् कोणत्याही लढाया बिढायांच्या भानगडीत पडलाच नाही. खानापिना और मजा कराना हेच त्याचे यावेळी तत्त्वज्ञान होते. तो महाराजांशी स्नेहानेच राहत वागत होता. वाकड्यांत शिरत नव्हता. त्याचे खरे कारण सांगायचे तर असे पुढे मागे आपल्याला आपल्या तीर्थरूप आलमगीर बादशाहांच्या विरुद्ध बंड करायची संधी मिळाली , तर शिवाजीराजांशी मैत्री असलेली बरी!

 

याच शाहजादा अजीमला दिल्लीवरून बापाने एक गुप्त हसबल हुक्म (म्हणजे अत्यंत तातडीचा हुकुम) पाठविला. पण हा हसबल हुक्म काय आहे हे अजीमला एकदोन दिवस आधीच समजले! तो हुकुम भयंकर होता. जणू ज्वालामुखी त्यातून भडकणार होता. पृथ्वी हादरणार होती.

 

… क्रमश.