शिवचरित्रमाला भाग १००
======================
एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.
======================
छत्रसाल बुंदेला शिवाजीराजांना भेटाव
यास आला त्यावेळी महाराजांची छावणी कृष्णा नदीच्या काठावर नजिक होती , असा गोरेलाल तिवारीने उल्लेख केला आहे. एकूण अभ्यास करता असे वाटते की , ही छावणी कुरुंदवाड , मिरज , सांगली अशा परिसरात असावी. गोरेलाल तिवारीने नेमक्या ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही.
छत्रसाल बुंदेला आपल्याला भेटावयास येत आहे हे महाराजांना समजताच त्यांना आनंदच झाला. छत्रसालाचे त्यांनी अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले. आपल्या तंबूत त्याला महाराजांनी आपल्या शेजारी बसविले. त्यावेळी गोरेलाल तिवारी हा छत्रसालाचा सहकारी प्रत्यक्ष हजर होता. यानेच नंतर ‘ छत्रप्रकाश ‘ नावाचा गंथ लिहिला. (हा ग्रंथ दिल्ली विद्यापीठाने प्रकाशित केला आहे.) त्यात गोरेलालने छत्रसालाच्या या भेटीचा तपशील दिला आहे.
महाराजांनी आगत स्वागतानंतर छत्रसालाला ‘ आपण कोणती अपेक्षा धरून आमच्याकडे येणे केले आहे ?’ असे विचारले. तेव्हा छत्रसालाने दिलेले उत्तर फारच उत्कृष्ट आहे ते मुळातच वाचले पाहिजे. पण सारांश असा की , ‘ महाराज , मला औरंगजेबाची चाकरी करण्याची इच्छाच नाही. या गुलामगिरीची मला शिसारी येते. महाराज , मला आपण आपल्या राज्यात सैनिक म्हणून नोकरी करण्याची इच्छा आहे. ‘
त्यावर महाराज म्हणाले , ‘ छत्रसालजी , तुमच्यासारखा सिंहाचा छावा आम्हाला सेवक म्हणून लाभला , तर ती आनंदाची आणि सन्मानाचीच गोष्ट ठरेल. पण आपण नोकरी कशाकरता करता ? आपण स्वतंत्र राज्य स्थापन करावे. जे मी इथं केलं , तेच आपण बुंदेलखंडत करा सारा मोगली मुलुख काबीज करा. ‘
छत्रसालाच्या मनात या स्वातंत्र्याच्या विचाराने गोड कल्लोळ उसळला. आजपर्यंत असा विचार सांगायला त्याला कुणी भेटलाच नव्हता. सर्वात विशेष गोष्ट इथं लक्षात येते की , त्यांनी छत्रसालाला पूर्ण स्वावलंबनाने व पूर्ण स्वत:च्या हिमतीवर हे नवे बुंदेली स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. महाराज त्याच्याशी जे विचार बोलले , त्याचा सारांश असा , ‘ छत्रसालजी , आपण मनात आणा. आपण स्वराज्य निर्माण करू शकाल. सैन्य आणि युद्धसाहित्य नक्कीच उभे करू शकाल. आत्मविश्वासाने काम करा. आपली कुलदेवता विंध्यवासिनी भवानी आणि आपले आराध्य दैवत तो ब्रजनाथ श्रीकृष्ण आपल्या पाठीशी आर्शिवादस उभे आहेत ‘
केवढा विलक्षण मंत्र हा ? याचे सार्मथ्य संजीवनी मंत्राहूनही मोठे नाही काय!
महाराजांनी छत्रसालास त्याच्या सर्व सहकाऱ्यांसह एक महिनाभर ठेवून घेतले. छावणीतून महाराज राजगडी परतले. गडावर महाराजांच्या सहवासात छत्रसालास खूपच बघायला , ऐकायला अन् शिकायला मिळाले. छत्रसाल यावेळी अगदी तरुण होता. एका कर्तबगार तरुणाशी नेता कसा वागतो किंवा कसे वागावे हे महाराजांच्या या छत्रसाल भेटीच्या महिनाभरात दिसून येते. एक तेजस्वी अन् उत्तुंग महत्त्वाकांक्षा अंत:करणात घेऊन छत्रसाल निघाला. महाराजांनी त्याला अतिशय प्रेमादराने वागविले. व तेवढ्याच प्रेमादराने त्याला प्रेरणा देऊन निरोप दिला.
औरंगजेबाविरुद्ध बुंदेलखंडात एका नव्या स्वातंत्र्याचे बंड महाराजांनी शिलगावले. एक नवी युवा शक्ती हिरीरीने स्वार झाली.
आता आमची विचार करण्याची पद्धत बघा.
या छत्रसाल भेटीतून शिवाजीराजांनी छत्रसालाला ‘ डिस्करेज ‘ केले आणि त्याला परत पाठवून दिले , असा अर्थ एका थोर इतिहासकाराने आपल्या इंग्रजी गंथात लावला आहे.
महाराजांनी छत्रसालाला राजगडावरून निरोप देताना त्याच्या आदरसत्कार केला. महाराजांनी त्याला एक उत्कृष्ट दर्जाची तलवार अर्पण केली. ही तलवार , छत्रसालचे आजचे वंशज पन्ना येथे असतात त्यांनी त्यांच्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे.
छत्रसालाने परत आल्यावर बुंदेलखंड आणि विंध्याचल या प्रदेशात मोगलांच्या विरुद्ध अगदी शिवाजीमहाराजांच्या सारखेच स्वातंत्र्ययुद्ध पुकारले. लढत लढत काही वर्षांत त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केला. एक नवे हिंदवी स्वराज्य मध्यप्रदेशात जन्मास आले. छत्रसालाची असंख्य पत्रे व अन्य ऐतिहासिक साहित्य उपलब्ध आहे. त्याने आपल्या हिरदेसा नावाच्या मुलाला लिहिलेेले एक पत्र फार सुंदर आहे. आपण तरुणपणी शिवाजीराजांना कसे भेटलो , त्यांच्या सहवासात कसे शिकलो आणि कसे हे बुंदेलीराज्य निर्माण केले हे त्याने हिरदेसाला लिहिले आहे.
छत्रसालास तीन पुत्र होते. हिरदेसा , जगतराय आणि हिंदुपत ही त्यांची नावे. छत्रसाल सुमारे ऐंशी वर्षे जगला. त्याने एक आदर्श स्वराज्य निर्माण केले. त्याच्या अखेरच्या काळात ( इ. स. १७ 3 ०चा सुमार) मोहम्मदखान बंगश याने बुंदेलखंडावर स्वारी केली. त्यावेळी छत्रसाल वयाने थकलेला होता. मुले शूर होती. पण तरीही त्यांनी मोठ्या विश्वासाने व आशेने थोरल्या बाजीराव पेशव्यांस मदतीस बोलाविले. बाजीराव पेशव्यांनीही मदतीसाठी धाव घेतली आणि बंगशाचा पराभव केला. बुंदेलखंडी स्वराज्य संकटातून वाचले.
छत्रसाल बुंदेल्यावर गोरेलाल तिवारी उर्फ लालजी पुरोहित या त्याच्या सहकाऱ्याने ‘ छत्रप्रकाश ‘ हा गंथ लिहिला. शिवकालीन व छत्रसालकालीनही प्रख्यात कवी भूषण यानेही छत्रसालावर काही काव्य लिहिले आहे. अलिकडे डॉ. घनश्यामदास गुप्ता यांनी छत्रसालाचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. डॉ. गुप्ता हे झांसी येथे असतात.
… क्रमश.