शिवचरित्रमाला भाग ११०
======================
पठाणी फौज पन्हाळ्याकडे.
======================
पन्हाळगड म्हणजे दख्खनचा दरवाजा. या दरवाज्यावर तेरा वर्षानंतर पुन्हा स्वराज्याचा झेंडा लागला. पन्हाळगड आणि गडाच्या पूर्वेकडचा कागलपट्टा स्वराज्यात मराठ्यांनी घेतला याच्या खबरा विजापुरास वाऱ्याच्या वेगाने पोहोचल्याच. यावेळी विजापुरात बादशाह होता सिकंदर बिन अलिआदिलशाह. या सिकंदरचे वय होते चार वर्षाचे. अंगठा चोखण्याचे हे वय. सारा राज्यकारभार पठाणी सरदारांच्या वर्चस्वाखाली गेला होता. वजीरी मात्र खवासखानाकडे होती. विजापूरची अवस्था खंगलेल्या क्षयरोग्यासारखी झाली होती. अशी अवस्था झाली असूनही दरबारात पठाणी पक्ष आणि दक्षिणीपक्ष असे दोन पक्ष निर्माण झाले होते. या पक्षांतील स्पर्धा महाराजांनी अचूक टिपली होती. स्वराज्याच्या विस्ताराला ही भांडणे पथ्यावर पडत होती.
वजीर खवासखानाने कोल्हापूर प्रांत आणि पन्हाळगड पुन्हा जिंकून घेण्याकरता दरबारातील सरदारांस एकत्र बोलावून आवाहन केले. या सरदारांना वजीराने मोठ्या कळकळीने म्हटले , ‘ यह नातवान बादशाह खुदाने आपके सुपूर्द किया है। पहले जिस तरह आपने सल्तनत जिंदा रखी थी , उसी तरह आगे भी रखो! ‘
या आवाहनाने सारे सरदार गंभीर झाले. या सरदारांतील एक सरदार तर खरोखरच बेचैन झाला. तेवढाच तो मराठ्यांवर संतप्तही झाला. हा सरदार उत्तम योद्धा होता. उत्कृष्ट सेनापती होता. तो थोडाफार मुत्सद्दीही होता. पण या परिस्थितीने तो भावनाविवश झाला. कारण तो जरी मूळचा अफगाणी पठाण होता तरीही त्याची सिकंदर आदिलशाहासारख्या दख्खनी बादशाहावर अपार निष्ठा होती. या पठाण सरदाराचे नाव होते , अब्दुल करीम बहलोलखान. पन्हाळगड आणि कोल्हापूर प्रांताचा बराचसा भाग बहलोलखानच्या जहागिरीतच समाविष्ट होता. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष फार मोठे नुकसान झाले होते. त्याने ही पन्हाळगडची मोहीम आपल्या शिरावर घेतली. बाकीच्या सरदारांनीही बहलोलची मनापासून तारीफ केली.
बहलोलनेही स्वारीवर निघण्याकरता अगदी तातडीने तयारी सुरू केली. निघण्यापूर्वी त्या छोट्या बादशाह सिकंदर आदिलशाहच्या हस्ते बहलोलला मानाचे विडे आणि दोन हत्ती अन् चार घोडे गौरवार्थ बहाल करण्यात आले. फार मोठी फौज घेऊन बहलोल निघाला. त्याची फौज नक्की किती होती , ते समजत नाही. पण अंदाजे ती वीस हजारांपर्यंत असावी. त्यात सहा हत्ती आणि घोडदळ , पायदळ होते. तोफखाना त्याच्या सांगाती नसावा असे दिसते. असल्याची नोंदही नाही.
बहलोल विजापुराहून तिकोटा ते जत या मार्गाने निघाला. तो बहुदा दि. १३ मार्च १६७३ या दिवशी निघालेला असावा. त्याची ही मोहीम मोठ्या इर्षेची होती. जणू काही दुसरा अफझलखानच मराठी मुलुखावर निघाला होता. तो जतच्या जवळील डफळापूर , उमराणीच्या रोखाने जल्दीने कूच करीत होता. तो दि. १६ मार्च १६७३ च्या मध्यरात्री उमराणीजवळच्या परिसरात येऊन पोहोचला. शुद्ध सप्तमीचा चंद आभाळात कललेला होता. बहलोलने आपल्या दमलेल्या सैन्याला थोडी विश्रांती मिळावी या हेतूने उमराणीच्या त्या उंचसखल मैदानावर मुक्काम करण्याचा हुकुम दिला. हे मैदान खुरट्या झुडपांचे आणि लहानसहान टेकडांचे होते. याच मैदानावर त्याचे सैन्य उतरले. अन् आराम करण्याकरता पहुडले. फार तर तीन-चार तास मुक्काम करून पुढे कोल्हापूरच्या दिशेने निघण्याचा त्याचा इरादा होता.
बहलोलखान पठाण उमराणीच्या रोखाने येत असल्याची खबर प्रतापराव सरनौबत यांना त्यांच्या बातमीदारांनी कळविली. कायमचेच ताजेतवाने असलेले मराठी सैन्य आणि प्रतापराव बहलोलच्या रोखाने उमराणीकडे धावले. प्रतापरावांनी अचूक डाव साधला. बहलोलचे सैन्य आराम करीत होते. त्या सैन्याच्या तळाभोवती आपल्या मराठी सैन्याचा गराडा टाकून त्यांनी बहलोलला कोंडीत गाठले. बहलोलला याची कल्पनाही नव्हती की आपण मराठ्यांच्या जाळ्यात अचूक अडकलो आहोत. प्रतापरावांनी या शाही सैन्यावर यावेळी (दि. १६ मार्चची पहाट) अजिबात हल्ला चढविला नाही. शिकार खेळावी , तसाच डाव रावांनी टाकला. कारण एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट इथे घडली होती की , बहलोलखान बिनपाण्याच्या रखरखीत प्रदेशात ऐन मार्चच्या उन्हाळ्यात अडकला गेला होता. जवळच एक लहानशी नदी होती , आजही आहे , तिचे नाव डोण. या नदीला कसंबसं झुरुमुरु पाणी होते. पण ही नदी प्रतापरावांनी ओलांडून पैलतीरावर आपला गराडा टाकला होता. त्यामुळे या नदीचाही बहलोलशी संपर्क रावांनी तोडला होता.
जरा पहाट झाली. छावणी अजून बहलोलभोवती विश्रांती घेतच होती. शाही सैन्यातले सहा हत्ती या पहाटे डोण नदीच्या पाण्यावर नेण्याकरिता माहुतांनी चालविले. खरं म्हणजे हे माहुतही पेंगुळलेले होते. हत्ती घेऊन माहूत डोणच्या रोखाने येत होते. थोड्याच वेळात त्यातील कोणा माहुताला अंधुकशा उजेडात समोर पसरलेल्या मराठी स्वारांची चाहूल दिसली. त्याचे धाबेच दणाणले. मराठे! शत्रू समोर दिसताच तो माहूत अन् लगेच बाकीचेही माहूत सावध होऊन मोठमोठ्याने ओरडू लागले.
‘ गनीम , गनीम! ‘ हत्ती पुन्हा तळाकडे वळवीत ते माहूत ओरडतच होते , ‘ गनीम , गनीम! ‘ हत्तीही चीत्कारत होते. पळत होते. हा कल्लोळ खानाच्या बेसावध तळावर काही क्षणातच पोहोचला. सारं शाही सैन्य खडबडून उठलं. बहलोल उठला. अन् बघतात तो त्या उजाडत्या प्रकाशात त्यांना दिसलं की , आपण मराठ्यांच्या गराड्यात सर्वबाजूंनी वेढले गेलेेलो आहोत.
बहलोलचे डोळे खाडकन उघडले गेेले. त्याला त्याची चूक आणि मराठ्यांनी साधलेला डाव क्षणात लक्षात आला. आता ? ही मराठी कोंडी फोडून बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण हा सारा रखरखीत बिनपाण्याचा उन्हाळा आणि ती इवलीशी नदीसुद्धा मराठ्यांच्या कब्जात. आता ?
आता निकराचे युद्धच. नाहीतर पाण्यावाचून मृत्यु. त्या परिसरात खोल गेलेल्या चिमूटभर विहिरींना पाणी कितीसे असणार ?
एक लहानशी चूक , बहलोलला किती महागात पडत होती पाहा. रात्री तळ टाकताना त्याने फक्त दमलेल्यांच्या विश्रांतीचा विचार केला. पण त्याचवेळी तळाभोवती आपल्या गस्तवाल्या सैनिकांची गस्त ठेवली नाही. गाढ झोपले आणि हे सगळे मासे आता पाण्यावाचून तडफडायला लागले. जेवढी माणसे तेवढीच जनावरे अन् पाणी नाही अशी अवस्था.
खानाने ताबडतोब बेधुंद अवस्थेत आपल्या साऱ्या सैन्याला ही कोंडी फोडून बाहेर पडण्याचा इशारा दिला.
एल्गार , एल्गार , एल्गार!
… क्रमश.