शिवचरित्रमाला भाग १०९
======================
नव्या विजयाचा गुढीपाडवा.
======================
कोंडाजी फर्जंद याने पन्हाळ्यासारखा अती अती अवघड गड अवघ्या एकाच हल्ल्यात फक्त साठ सैनिकांच्यानिशी काबीज केला. पन्हाळगडावरच्या या कोंडाजी फर्जंदाच्या झडपेला नाव द्यावेसे वाटते ‘ऑपरेशन पन्हाळगड ‘! चिमूटभर मराठी फौजेनिशी , परातभर शत्रूचा , कमीतकमी वेळेत पराभव करून कोंडाजीने पन्हाळ्यासारखा महाजबरदस्त डोंगरी किल्ला काबीज केला , हा केवळ लष्करी चमत्कार आहे. पुढच्या शतकातील एका इंग्रजी सेनापतीने फार मोठा पराक्रम गाजवून त्रिचनापल्लीचा किल्ला टिपू सुलतानाच्या हातून जिंकून घेतला.
लॉर्ड कॉर्नवॉलीसने अवघ्या शंभर इंग्रजांच्यानिशी हा महाबळकट त्रिचनापल्लीचा गड जिंकला. (इ. १७९२ ) खरोखर ही लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या कौतुकाचीच गोष्ट होती. त्याचे कौतुकही इस्ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानातील छावण्या-छावण्यांत तर झालेच , पण इंग्लंडमध्येही वृत्तपत्रांत , पार्लमेंटातही त्याचे अपार कौतुक झाले. ते योग्यच होते. अवघ्या शंभरांनी हा अचाट चमत्कार करून दाखवला होता. *पण अवघ्या साठांच्यानिशी पन्हाळ्यासारखा बुलंद आणि महाअवघड गड आमच्या कोंडाजी फर्जंद मावळ्याने तासा- दीडतासांत जिंकला , हे आजच्या आम्हा मराठी माणसांनाही माहीत नसावं हा आमचा विस्मरणाचा केवढा महापराक्रम! किती करावे आमचेच आम्ही कौतुक!*
*पन्हाळगडावर आम्ही आज जातो , तेव्हा हा इतिहास सांगायला कुणी अभ्यासू गाईडही सापडत नाही. जो गाईड सापडतो , त्याच्याकडून कोणच्या पिक्चरचे शूटिंग कुठे झाले अन् कोणच्या नट-नट्या कसकसा रोमान्स करीत होत्या , हेच ऐकायला मिळते. अन् जिकडेतिकडे कोणत्या तरी नामवंत सिगारेटच्या जाहिराती!*
महाराजांच्या , कोंडाजी फर्जंदाच्या, छत्रपती ताराराणीसाहेबांच्या आणि राजर्षी शाहू छत्रपतींच्या हरविलेल्या ‘पन्हाळगडा’ चा आम्हाला पन्हाळगडावर हिंडूनही पत्ता लागत नाही.
एक आमचे मुरलीधर गुळवणी मास्तर होते. ते छातीतला खोकला अन् दम्याची धाप सावरीत सावरीत पोराबाळांना पन्हाळा समजावून सांगत होते.
कधीकधी तर पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंत महाराज आणि बाजीप्रभू आपल्या मावळ्यांच्यानिशी धोधो पावसातून , रात्री , कसे निसटले हे आमचे गुळवणीमास्तर स्वत: पोरांच्याबरोबर त्या बिकटवाटेने चालत जाऊन समजावून सांगत असत. आता गुळवणीमास्तर नाहीत. दम लागेपर्यंत मास्तरांनी पन्हाळ्यावर लोकांना इतिहास सांगितला. जमविलेली ऐतिहासिक कागदपत्रे आणि गंजलेल्या तलवारी अन् गवसलेल्या बंदुकीच्या शिशाच्या गोळ्या आमच्या पोराबाळांना जडजवाहिऱ्याच्या थाटात वर्णन करून दाखवल्या.
आज आमचे मास्तर नाहीत. पन्हाळ्याचा जणू हा शेवटचा किल्लेदार स्वर्गी निघून गेलाय. खरोखर असं वाटतं की , महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत असे एकेक तरी गुळवणीमास्तर असावेत. आमची पोरंबाळं शहाणी होतील हो! *पन्हाळगडाचा पिकनिक स्पॉट होता कामा नये.* कोंडाजी फर्जंदाने महाराष्ट्राच्या लष्करी इतिहासात एक सोन्याचं पान दाखल केलं , यात शंका नाही. खरोखर जगाच्या इतिहासात या कोंडाजीच्या लढाईची खास नोंद करावी लागेल.
पन्हाळगड कोंडाजीने काबीज केल्याची खबर शिवाजीमहाराजांना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडावर समजली. (दि. ९ मार्च १६७३ ) ज्या घोडेस्वाराने दौडत येऊन रायगडावर महाराजांना ही खबर दिली , त्या घोडे स्वाराच्या तोंडात महाराजांनी स्वत:च्या हाताने साखरेची चिमूट कौतुकाने घातली. ही कौतुकाची चिमूट कोंडाजीच्या आणि त्याच्या साठ मर्दांच्या मुखातच महाराज घालीत होते. महाराज ताबडतोब रायगडावरून पन्हाळगडाकडे निघालेच. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना घेऊन निघाले. बरोबर फौज घेतली सुमारे पंधरा हजार. नक्की आकडा माहीत नाही. पण अंदाज चुकीचा न ठरावा. म्हणजे बघा. पन्हाळगड जिंकला साठ मावळ्यांनी अन् महाराज कोंडाजीचं कौतुक करायला निघाले होते , सरसेनापतीसह काही हजार मावळ्यांच्यानिशी. महाराज जणू कोंडाजीला ही लष्करी सलामीच द्यायला चालले होते.
महाराजांनी रायगडावरून निघताना मातोश्री जिजाऊसाहेबांना दंडवत करायला पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी आलेला होता. त्याने ही नोंद करून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर पन्हाळगड कसा काबीज केला आहे हे त्याने सविस्तर लिहून ठेविले आहे. *या प्रकरणाचे नाव ‘पर्णाल पर्वतग्रहणाख्यान’. म्हणजे पन्हाळागड कसा जिंकला याची हकीकत.*
महाराज दि. १२ मार्च १६७३ रोजी पन्हाळगडावर पोहोचले. दक्षिणेच्या ‘तीन दरवाजा’ नावाच्या भव्य दरवाजाने गडात प्रवेशले. कोंडाजीचे आणि त्याच्या मर्दांचे हे साक्षात सोनेरी कौतुक तीन दरवाज्यांत झळाळत होते. तेरा वर्षांनंतर पुन्हा पन्हाळा स्वराज्यात दाखल झाला होता. केवढा आनंद! रणवाद्यांच्या आणि रणघोषणांच्या दणदणाटात महाराजांनी पन्हाळा पाहिला. त्यांनी सोमेश्वर महादेवाची स्वत: पूजा केली. त्यावेळी सैनिकांनी गडावरील सोनचाफ्याची फुले पूजेसाठी महाराजांपुढे आणून ठेवली. महाराजांनी सोमेश्वराला सोनचाफ्याचा लक्ष वाहिला.
हा झाला इतिहास. गनिमी काव्याचे युद्धतंत्र महाराजांप्रमाणेच त्यांच्या सरदारांनीही किती अचूक आत्मसात केले होते , ते येथे प्रत्ययास आले. आणखी एक गोष्ट. ऐन फाल्गुनी अमावस्येच्या अगदी तोंडावर म्हणजे वद्य त्रयोदशीच्या मध्यरात्री कोंडाजीने काळोख्या मुहुर्तावर ही जबर लढाई दिली.
अवसेच्या अंधाराची वा अशुभ दिवसाची त्याला भीती वाटली नाही. आठवणही झाली नाही. स्वराज्याच्या पवित्र कामाला काळोखी रात्रच काय आमावस्या असली तरीही ती पौर्णिमेहूनही मंगलच. *त्या वर्षीच्या फाल्गुनी अवसेच्या गर्भात चैत्राचा गुढीपाडवा दडलेला होता.* अंधश्रद्धा उधळून लावता येते खऱ्या श्रद्धेनेच.
महाराजांनी पन्हाळ्यावर सरसेनापती प्रतापराव गुजर यांना एक अत्यंत महत्त्वाची लष्करी कामगिरी सांगितली. ‘ सरनौबत , एक करा. पन्हाळगड आपण घेतल्याची खबर विजापुरास आदिलशाही दरबारास नक्कीच समजली असणार. हा पन्हाळगड आणि भोवतीचा आपल्या ताब्यात आलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याकरिता विजापुराहून नक्कीच कुणीतरी महत्त्वाचा सरदार किंवा शाही सेनापती लौकरच चाल करून येणार. जो कुणी येईल , त्याला तुम्ही आपल्या फौजेनिशी सरहद्दीवरच अडवा. बुडवा. तुडवा. पुन्हा करवीरच्या मुलुखात बादशाही फौजेची टाप पडता कामा नये. ‘
सरनौबत प्रतापराव गुजर सुमारे (नक्की आकडा माहीत नाही) १५ हजार फौज घेऊन पूर्वेच्या दिशेने सरहद्दीकडे निघाले.
… क्रमश.