झुंज भाग 1

२४ भागांची एक शिवकालीन ऐतिहासिक रोमांचकारी मालिका सुरु करित आहे..

अन्य ग्रूप वरुन साभार फ़ॉर्वर्ड करीत आहे.

झुंज : भाग १

दुपारच्या वेळेस रावजी गडाच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला. तो खूप दूर वरून रपेट करत आला असणार हे त्याच्या एकूणच अवतारावरून समजू शकत होते. काहीशा गडबडीतच त्याने घोड्यावरून खाली उडी टाकली. एकदा घोड्याच्या मानेवर थोपटले आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. त्याचा घोडाही धन्याच्या या अशा थोपटण्याने काहीसा शांत झाला. १५/२० पावलातच रावजीने दरवाज्यावर थाप मारली आणि परत काही पावले मागे येऊन उभा राहिला.

जास्तीत जास्त अर्धा मिनिट झाला असेल आणि दरवाज्याच्या वरच्या बाजूला असलेली छोटीशी झडप उघडली गेली. त्यातून एका व्यक्तीने डोकावून बाहेर पाहिले. त्याच्या नजरेच्या समोरच रावजी उभा असल्याने त्याने तिथूनच विचारले.

“कोन हाये?”

“म्या रावजी, किल्लेदारास्नी भेटायचंय.” रावजीने उत्तर दिले.

“काय काम हाये?” पुढचा प्रश्न विचारला गेला.

“त्ये किल्लेदारास्नीच सांगायचा हुकुम हाये.” रावजी उत्तरला आणि झडप बंद झाली. काही क्षणात परत ती उघडली गेली आणि पुढचा प्रश्न आला.

“कुन्कून आलायसा?”

“गडावरनं आलोय… राजांचा सांगावा घिवून.” रावजीने उत्तर दिले आणि परत झडप बंद झाली. काही वेळ गेला आणि साखळ्यांचे आवाज ऐकू आले. त्याच बरोबर मोठा लाकडी ओंडका सरकावल्याचा आवाज झाला. हळूहळू काहीसा आवाज करत दार उघडले गेले. तो पर्यंत रावजीने परत घोड्यावर बैठक मारली आणि तो दरवाजा पूर्ण उघडण्याची वाट पाहू लागला.

दरवाजा पूर्ण उघडला जाताच आतून चार पहारेकरी बाहेर येवून उभे राहिले. त्यांच्या मागून अजून एक जण बाहेर आला. कपड्यांवरून तो पहारेकऱ्यांचा अधिकारी वाटत होता.

“निशानी?” आल्या आल्या अधिकाऱ्याने काहीशा चढ्या आवाजात रावजीला विचारले. रावजीने आपल्या शेल्याला खोचलेली राजमोहोर बाहेर काढून अधिकाऱ्याच्या हातावर ठेवली. तिच्याकडे एकदा उलटसुलट निरखून पाहून त्याने ती निशाणी परत रावजीच्या हातात दिली आणि हातानेच दरवाजातून आत जाण्याची परवानगी दिली.

किल्लेदार त्याच्या निवडक अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करत मुख्य वाड्याच्या बैठकीत बसला होता. तेवढ्यात एक शिपाई त्यांच्या समोर आला आणि त्याने सगळ्यांना लवून मुजरा केला. किल्लेदाराचे लक्ष त्याच्याकडे जाताच त्याने इतर अधिकाऱ्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला.

“बोल रे..”

“माफी असावी सरकार, पन गडावरनं राजांचा सांगावा आलाय…” शिपाई किल्लेदाराच्या पायाकडे पाहत म्हणाला.

“आऽऽऽ राजांचा हुकुम? आरं मंग हुबा का? जा त्याला आत घीवून ये…”
घाईघाईतच किल्लेदाराने शिपायाला आज्ञा दिली आणि शिपाई माघारी वळला.

काही वेळातच रावजी किल्लेदारासमोर हजर झाला. आल्या आल्या त्याने किल्लेदाराला लवून मुजरा केला आणि मान खाली घालून उभा राहिला.

“काय हुकुम आहे राजांचा?” किल्लेदाराने रावजीकडे पहात प्रश्न केला.

“राजानं खलिता धाडलाय…” कमरेचा खलिता आदबीने काढून किल्लादारच्या हाती देत रावजी उत्तरला.

“अस्सं… गडावर समदं ठीक हाय नव्हं?” रावजीच्या हातून खलिता घेत किल्लेदाराने विचारले.

“व्हय जी…”

किल्लेदाराने खलिता वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी प्रत्येक जण वाचू शकत होता.

रामशेज किल्ला हा तसा जिंकायला अगदी सोपा वाटणारा. कुठल्याही दऱ्या किंवा सुळके आजूबाजूला नाहीत. फक्त एकच डोंगर. ज्यावर हा किल्ला बांधला गेला. त्याच्या चहुबाजूने पूर्ण पठार. वेढा द्यायचा म्हटला तर ५००० सैन्य देखील पुरेसे पडू शकेल असा किल्ला. सह्याद्रीच्या इतर किल्ल्यांप्रमाणे याला ना भव्यता, ना सौंदर्य. ना नैसर्गिक सुरक्षितता. काहीसा एकाकी. आणि अशा या एकाकी किल्ल्याकडे बादशहाची वाकडी नजर वळली होती. किल्ला लहान असल्याने त्यावर पुरेसा दारुगोळाही नव्हता. फौजफाटा आणि हत्यारे देखील अगदीच जेमतेम. आणि हेच मुख्य कारण होते किल्लेदाराच्या काळजीचे. संभाजी राजांनी जितके शक्य होईल तितकी कुमक पाठवली होती पण तरीही ती साठवायला जागाही पाहिजे ना? गडावर इनमिन ६०० लढवैये. काही स्त्रिया, वृद्ध आणि मुले.

“कोन रे तिकडे?” किल्लेदाराने आवाज दिला आणि एक शिपाई आत आला.

“याच्या राहन्याची, शिदोरीची यवस्था करा…” किल्लेदाराने हुकुम सोडला आणि रावजी मुजरा करून माघारी वळला.

किल्लेदाराने राजांचा निरोप सगळ्यांना सांगितला आणि यावर काय उपाय करावा याचे खलबत सुरु झाले.

क्रमशः