शिवचरित्रमाला भाग १५
कठीण नाही ते व्रत कसलं?
अगदी प्रारंभापासून जिजाऊसाहेब , शिवाजीराजे आणि राज्यकारभारी यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली। प्रधानमंडळांपासून ते अगदी साध्या हुज – यापर्यंत प्रत्येक स्वराज्य- नोकराला रोख पगार , वेतन. हे वेतनही प्रत्येकाला अगदी नियमितपणे मिळावे , अशी व्यवस्था कोणालाही नोकरीच्या मोबदल्यात वतन किंवा मिरासदारी दिली जात नसे. संपूर्ण राज्यकारभाराची आथिर्क व्यवस्था वेतनावरच योजिली होती. सरंजामशाही आणि वतनशाही याला इथेच प्रतिबंध घातला गेला.
कोणत्याही बादशाहीत हा असा वेतनबद्ध राज्यकारभार दिसत नाही। सामान्य नोकरांना पगार असतील. पण बाकीच्या मोठ्यांना नेमणुका सरंजाम , जहागिऱ्या आणि वतनदाऱ्या होत्या. यामुळे अनुशासन राहतच नव्हते. शिवाजीराजांपाशी हुकमी शक्ती सतत सुसज्ज होती , यातील हे एक प्रबळ कारण होते. पगारी पद्धतीवरती राज्यकारभार करणारा शिवाजीराजा हा अर्वाचीन युगातला एकमेव राज्यकर्ता. त्यामुळे सरंजामशाहीतील दुर्गुण राजांनी अस्तित्त्वातच येऊ दिले नाहीत. आत्तापर्यंत बुडालेल्या बादशाह्या आणि विजयनगरचे राज्य का बुडाले याचा अचूक वेध शिवाजीराजांनी निश्चित घेतला होता. यात शंका नाही. त्या चुका आपल्या स्वराज्यात होता कामा नयेत. याकरिता ते अखंड सावधान होते.
माणसांची परीक्षा होते ती कठोर संकटाच्या आणि भरघोस स्वार्थाच्या वेळी। ती वेळ सामोरी आलीच. कमालीच्या अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या आदिलशाही दरबारने एक प्रचंड निर्णायक मोहीम राजांच्या विरुद्ध योजिली. इ. स. १६४७ पासून ते आत्ता इ. स. १६५९ प्रारभापर्यंत आदिलशाहीला शिवाजीराजे सतत पराभवाचे फटके देत होते. स्वराज्याचा मुलूख वाढत होता. कोकणातील फार मोठा प्रदेश , बंदरे आणि किल्ले राजांनी काबीज केले होते. स्वराज्याचं आरमार दर्यावर स्वार झालं होतं. आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे यापूर्वी वाकाटक राजांपासून ते यादव राजांपर्यंत अगदी शिलाहार आणि कदंब राजांपर्यंतही कोणी महत्त्व ओळखून लक्षच दिले नव्हते. कुणाकुणाचे थोडीशीच गलबते दर्यावर तरंगत होती. पण ती लुटुपुटीच्या पोरखेळासारखीच. पोर्तुगीज आणि अरबांसारख्या महामहत्त्वाकांक्षी शत्रूला अन् चाचेगिरी करणाऱ्या कायमच्या शत्रूला धडक देण्याइतकी ताकद आपल्यात असली पाहिजे हे शिवाजीराजांनी अचूक ओळखलं. त्यांनी आरमार उभे करण्यास गतीने सुरुवात केली.
खरं म्हणजे ही आरमाराची परंपरा शालिवाहनांपासूनच चालू राहिली असती , तर पुढे शिवाजीराजांनी आपले आरमार असे जबर बनवले असते की , खरोखरच मराठ्यांचे लष्करी आणि व्यापारी जहाजे थेट इराणी , अरबी , युरोपी आणि आफ्रिकी किनाऱ्यांपर्यंत जाऊन धडकली असती। खऱ्या अर्थाने रुमशाम पावेतो आमचे आथिर्क आणि लष्करी साम्राज्य निर्माण झाले असते. पण ‘ सागरी पंचक्रोशी ओलांडली तर आपला धर्म बुडतो ‘ अशी खुळचट कल्पना आमच्या धर्मपंडितांनी इथे रुजविली अन् वाढविली. आता शिवाजीराजांना आरमाराच्या श्रीगणेशापासून सुरुवात करावी लागत होती. स्वराज्याचे भाग्य असे की , कोकणातील साऱ्या दर्यावर्दी जमातींनी राजांना काळजापासून मदत केली. हाहा म्हणता दर्यावर दरारा बसला. आरमार हा एक स्वतंत्र लष्करी विभाग झाला. आरमारी सेनापती म्हणजे सरखेल म्हणजे सागराध्यक्ष हे पद राजांनी निर्माण केले.
आता विजापुराहून निघाला होता अफझलखान। आदिलशाहीने आणि राजमाता बड्या बेगमेने या खानाला अगदी स्पष्ट शब्दात हुकूम दिला की , ‘ हम लढाई करना चाहते नही। ‘, ‘ ऐसा बहाना बनाकर सिवाको धोका देना। ‘ स्वराज्यासकट शिवाजीमहाराजांचा आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा ‘ निर्मूळ फडशा ‘ पाडण्याकरिता ही प्रचंड मोहीम खानासारख्या सर्वार्थाने प्रचंड सेनापतीच्या नेतृत्त्वाखाली निघाली. (इ. स. १६५९ मार्च) एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडदळ , पायदळ , तोफखाना आणि अपार युद्धसाहित्य विजापुराहून निघाले. सार्वभौम मराठी राष्ट्र उभी करण्याची महाराजांची कल्पना आणि महत्त्वाकांक्षा मुळासकट पार पार चिरडून टाकण्याकरता आदिलशाहने मांडलेला हा डाव होता.
जास्तीतजास्त दक्षतापूर्वक आणि योजनापूर्वक खानाने आराखडा आखला। शिवाजीला डोंगरी किल्ल्यांच्या गराड्यातून बाहेर , पूर्वेकडील सपाटीच्या प्रदेशावर यायला भाग पाडावे असा त्याचा पहिला प्रयत्न होता. म्हणूनच त्याने आदिलशाही हद्दीतील देवदेवस्थानांत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. तेथे त्याला कोण अडविणार ? त्याच्या स्वत:च्या सैन्यातही आमचीच माणसे मोठ्या संख्येने होती. जणू त्यांच्याच अध्यक्षतेखाली खान या देवस्थानांचे धिंडवडे काढत होता. यात त्याचा हेतू एकच होता. शिवाजीराजांना चिडविणे. त्यांच्या धार्मिक भावना कमालीच्या दुखविणे. हे केले की , राजा चिडेल. भावनाविवश होईल आणि आपल्या विरुद्ध तो चाल करून येईल , मोकळ्या मैदानी मुलुखात!
यातच शिवाजीराजांच्या राजकीय विवेकाला आणि लष्करी मुत्सद्देगिरीला आव्हान होते। खबरा मिळत होत्या. यावेळी महाराज कुडाळहून राजगडास आले. खान म्हणजे मूतिर्मंत मृत्यूदूतच. राजगडावर साक्षात यमाचे दूत घिरट्या घालीत होते. राजांची अतिशय लाडकी राणी सईबाई क्षयाने अत्यवस्थ होती. खानाच्या बातम्यांनी स्वराज्य अस्वस्थ होते.
अन् मग शिवाजीराजांची मन:स्थिती कशी असेल ? स्वराज्याचं व्रत म्हणजे अग्निदिव्यच कठीण! कठीण नाही , ते व्रत कसलं ?
…. क्रमश.