शिवचरित्रमाला भाग २७
शब्दांविना गर्जे आमुचा दरारा!
उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि। मी. लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती. त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते. या भयंकर चित्तेहल्ल्याची खबर धडपडत , धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलबखान साहेबांना दिली. बातमी देणारे व्याकूळ झाले होते. हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता. हे सगळेच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्यसंख्येवर आणि युद्धसाहित्यावर भाळलेले असायचे. त्यांना वाटायचं , मराठे मूठभर आहेत. मारून काढू. पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती.
कारतलबखान सुन्नच झाला। कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या. यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ‘ रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं ? क्या हालत हो गयी अपनी ?’
त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ‘ पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का ? आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का ?
‘ खानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग ? तो म्हणत होता , ‘ अब मैं क्या करूं ?’
यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ‘ हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश!
‘ खरंच होतं। खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं ? अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ‘ आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात.
‘ महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ‘ एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा , कबूल ?’ ‘ जी , कबूल ‘
खजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.
खान परत निघाला। मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.
शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.
एक गोष्ट आपल्या लक्षात आली ना ? कारतलबखान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीत आला. पण महाराज आधीच (बहुदा एक फेब्रुवारी १६६१ ) पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडविली. त्याचं सगळं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं. अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले हे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं नशीबच.
महाराज दि. 3 फेब्रुवारी १६६१ रोजी पाली , जांभूळपाडा , नागोठणे या मार्गाने महाडकडे निघाले. पण त्यांची सावधता केवढी! त्यांनी नेताजी पालकराला सुमारे दोन-एक हजार फौजेनिशी उंबरखिंडीतच ठेवले. न जागो , फजित पावलेला कारतलब पुन्हा युद्धसाहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला , तर त्याच्या दुसऱ्या फजितीची व्यवस्था महाराजांनी नेताजीवर सोपविली.
महाराज आता चिपळूणजवळ श्री परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले. महाराज धामिर्क होते. पण त्यांच्या कामाच्या आड ते देवधर्म , व्रतवैकल्य येऊ देत नव्हते. ते उरकूनच आता श्रीदर्शनास जात होते.
…. क्रमश.