शिवचरित्रमाला भाग ३४

शिवचरित्रमाला भाग ३४

लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.

राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले. (दि। ५ एप्रिल १६६ 3, चैत्र , शुद्ध अष्टमी , रात्री) ते कात्रजचे घाटात आले. कात्रज घाट ऐन पुण्याच्या दक्षिणेला तेरा-चौदा किलोमीटरवर आहे. महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या. सुमारे पाचशे मावळे घेऊन ते पुण्याच्या रोखाने निघाले.

 

इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ती अशी. शाहिस्तेखानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक रोजी ठेवले होते. यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते. मोगलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानाने मुद्दाम गस्तीकरता छावणीच्या दक्षिणअंगास रात्रीची फिरती ठेवली होती. हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा असे वाटते. या सैनिकांचे काम वास्तविक सकाळी उजाडेपर्यंत अपेक्षित असे. पण पुढेपुढे यात ढिलाई होत गेलेली आढळून येते. हे गस्तवाले साधारणत: मध्यरात्री दिडदोन वाजपर्यंतच गस्त घालीत. नंतर हळूच छावणीत परतून येत. ही गोष्टी महाराजांच्या हेरांच्या लक्षात आली. महाराजांनी या संबंध गस्तीचाच अचूक फायदा टिपला.

 

गस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहित झालेले होते. महाराजांनी याचा फायदा घेतला. आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना , ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविली. हे बिलंदर सैनिक , जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले. चौकीदारांनी त्यांना हटकलेही. पण ‘ आम्ही रोजचेच गस्त घालणारे. आम्हाला ओळखलं नाही ? गस्तीहून परत आलो! ‘ असा जवाब धिटाईनं करून आत प्रवेशले. चौकीदारांना वाटलं की होय , ही रोजचीच गस्तीची मंडळी. परत आली आहेत. चौकीदारांची अशी बेमालूम गंमत करून हे सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूवेर्च्या बाजूस पोहोचले. येथे लाल महालाला किल्ल्यासारखा तट नव्हता. उंच भिंत होती. त्या भिंतीत जाण्यायेण्याचा एक दरवाजा होता. पण खानानं तो दगडामातीत बांधकाम करून बंद करून टाकला होता.

 

या आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या बांधकामास भगदाड पाडावयास सुरुवात केली. माणूस आत जाईल एवढं भगदाड. हा उद्योग करीत असताना किती सावधपणे त्यांनी केला असेल याची कल्पना येते. भगदाड हळूहळू पुरेसे पडले. महाराज येईपर्यंत मावळे तेथेच रेंगाळत राहिले. अर्थात सभोवती सामसूमच होती.

 

ज्या पद्धतीने हे मावळे सैनिक इथपर्यंत आले , त्याच पद्धतीने मागोमाग महाराजही आपल्या टोळीनिशी आले. महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता. खानाने केलेले बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते. या भगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला.

 

इथे महाराजांचा एक अंदाज चुकला. भगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते. तेथे काही पाण्याचे बांधीव हौद होते. लाल महालाची ही पूवेर्कडील बाजू होती. या बाजूने लाल महालातून परसांगणात यावयास दोन दारे होती. दोहीत अंतर होते. यातील एक दार असेच दगडामातीने चिणून बंद केलेले होते आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खासा मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा , तयार केली होती. तेथील आचारी पाणके इत्यादी सुमारे तेरा-चौदा नोकर तेथेच मुदपाकखान्यात रात्री झोपत असत. ते सध्या रोजा असल्यामुळे पहाटे बरेच लवकर उठत आणि कामाला लागत. हे नोकरचाकर अजून उठलेले नसावेत , असा महाराजांचा अंदाज होता. पण तो चुकला आज ते लवकर उठून कामाला लागत होते. आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आले. आता ? आता ते लोक आपली चाहूल लागली तर आरडाओरडा करतील अन् साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली. आता ? आता फक्त एकच करणं शक्य होतं. एकदम मुदपाकखान्यात मावळ्यांनी गुपचूप घुसायचं अन् साऱ्या नोकरांना कापून काढायचं. निरुपाय होता. हे करणं भाग होतं. महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि सर् सर् सर् सर् जाऊन मावळ्यांनी या साऱ्या नोकरांना कापून काढलं.

 

चिणलेल्या त्या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले. मिणमिणत्या दिव्यांच्या पुसट उजेडात फारसं दिसत नव्हतं. मुदपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला. तो ठार झाला. आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्तेखान एकदम खडबडून उठला. तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला. आणि नेमका महाराजांच्या समोरच तो आला. त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याचा एक मुलगा , अबुल फतहखान जवळच्याच दालनांत झोपलेला होता. तो खडबडून बाहेर आला. अंगणात , आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो वडिलांना वाचविण्यासाठी पुढं आडवा आला अन् महाराजांच्या तलवारीखाली ठार झाला. खान घाईघाईनं परत माडीकडे पळत सुटला.

… क्रमश.