शिवचरित्रमाला भाग १२३

शिवचरित्रमाला भाग १२३

======================

शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .

======================

इतिहासाच्या साधनांपैकी ‘ बखर ‘ हा

एक ऐतिहासिक साक्षीपुराव्याचा विषय अभ्यासकांत मानला जातो. पण त्याचा लेखनांत उपयोग करताना अतिशय चिकित्सेनेच करणे आवश्यक असते. शिवाजी महाराजांच्या जीवनासंबंधातील अनेक बखरी आज उपलब्ध आहेत. महाराजांच्या ऐन समकालातील एकही मराठी बखर उपलब्ध नाही. ‘ सभासदाची बखर ‘ मात्र त्यातल्या त्यात सर्वात जवळची आहे. महाराजांच्या मृत्युनंतर सुमारे १६ वर्षांनी कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासद या गृहस्थाने ती जिंजी येथे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून लिहिली.

 

कृष्णाजी अनंत सभासद हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवारातील होता. तो ‘ मजालसी ‘ म्हणजे एक प्रकारच्या सल्लागार मंडळातील सभासद आहे. त्यामुळे अनेक शिवकालीन घटनांचा तो प्रत्यक्ष समकालीन साक्षीदार ठरतो. त्यामुळे त्याच्या लेखनावर ‘ समकालीन आधारग्रंथ ‘ म्हणून अभ्यासक विश्वास ठेवतात. या बखरीतही घटनांचा आणि कलानुक्रमाचा तसेच राजकीय संदर्भांचा कुठे कुठे घोटाळा उडालेला दिसतो. अभ्यास करणाऱ्यांच्या तो लक्षातही येतो. पण तरीही सभासद बखरीचे दोष लक्षात घेऊनही महत्त्व कायम राहतेच.

 

इतर अनेक बखरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर वेगवेगळ्या काळात लिहिलेल्या आहेत. त्यांचा वापर अतिशय जपूनच करावा लागतोे. कारण त्यात ऐकीव , पारंपरिक आणि काल्पनिकही हकीकती सापडतात. म्हणून बखर वाङ्मय हे अतिशय जपून अभ्यासपूर्वक वापरण्याचे साधन आहे. ते निर्धास्तपणे एकदम स्वीकारताही येत नाही अन् एकदम केरातही टाकून देता येत नाही.

 

शिवकालावरील बखरींत काही लेखकांनी भाबड्या भक्तीने किंवा रागासंतापाने अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्याबद्दल भक्तीभावाने बखरकार विलक्षणच ‘ चमत्कार ‘ करताना दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे महाराजांना ते चक्क शिवशंकराचा साक्षात अवतारच मानतात. एक वेळ तेही समजू शकते. पण बुद्धिला अजिबात न पटणाऱ्या गोष्टी अंधश्रद्धेनेच लेखकांनी लिहून ठेवलेल्या आहेत.

 

महाराजांच्या अंगात श्रीभवानी देवीचा वेळोवळी , पण महाकठीण प्रसंगी संचार होत असे असा अनेक बखरकारांचा विश्वास आहे.

महाराजांना स्वप्नात किंवा एकांती चिंतनात अवघड प्रश्नांची सोडवणूक कशी करावी हे जर सूचित झाले असेल तर ते पूर्ण नैसगिर्क आणि संभाव्य ठरते.

 

मी योगी स्वामी कुवलयानंद यांना या ‘अंगात ‘ येण्याच्या मानसिक अवस्थेबद्दल योगशास्त्रात काही आधार किंवा शास्त्रीय स्थान आहे का , असे , विचारले होते. त्यांनी मला सांगितले की , समाधी साधनेच्या प्रक्रियेतील ज्या अनेक सूक्ष्म आणि मोठ्या अवस्था असतात त्यातील अंगात येणे ही एक अगदी प्राथमिक , शास्त्रीय आणि प्रामाणिक अशी भाववस्था आहे. *पतंजली योगदर्शनात पतंजली ऋषींनी या भावावस्थेचा फक्त एकाच सूत्रात उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ असा होऊ शकतो की , अत्यंत उदात्त आणि उत्कट अशा कामात जर माणूस तितक्याच उदात्त आणि उत्कट भावनेने कार्यरत असेल , तर त्याला ‘पुढे काय घडणार आहे’ याचा सूचक असा अंतर्मनातून विचार सुचतो. तो विचार त्याच्या तोंडूनही मोजक्या शब्दांत उमटलाही जाऊ शकतो.*

 

भारतीय मानसशास्त्राचे पतंजली हे महान योगी होते. आता यापेक्षा अधिक सांगणे अवघड आहे. योग आणि मानसशास्त्र याच्या अभ्यासकांनीच यावर अधिकारवाणीने भाष्य करावे. मी थांबावे.

 

पण याबाबतीत संबंध येतो तो बखरींशी आणि बखरकारांशी. शिवाजीमहाराजांपेक्षाही साधुसंतांच्या बाबतीत बखरकारांनी विलक्षण थक्क करणारे कथा प्रसंग रंगवून लिहिले आहेत. ते लिहिताना आपण आपल्या आराध्य संत सत्पुरुषाचा नकळत अवमानच करीत आहोत , याचे भान काही बखरकारांना राहिलेले नाही. बखरकारांनी भाबड्या भक्तीभावात लिहून ठेवलेल्या काही कथा इतक्या विक्षिप्त आणि चक्क मूर्खपणाच्या आहेत , की त्या येथे सांगायचेही धारिष्ट्य होत नाही. त्यात या संतसजन्नांची केवळ अप्रतिष्टाच होत नाही , तर त्यांचे चारित्र्याहनन होते आहे याचे भान या बखरकारांना आणि भगत मंडळींना राहिलेले नाही. हे कार्य केवळ बखरकारच करतात असे नाही , तर समाजातील काही धूर्त मंडळीही करतात.

 

हे सर्व सांगण्याचा एकच हेतू आहे की , सर्वच बाबतीत पण विशेषत: ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत आपण अंधश्रद्ध आणि भाबडे असता कामा नये. शिवाजीमहाराजांनाही संकटे आणि भावभावनांना तोंड द्यावे लागत होते. ते त्यांनी कसे दिले आणि परकीय सुलतानी आक्रमणाने गलितगात्र झालेल्या आपल्या समाजाला कसे जागे केले, संघटीत केले, लढवय्या बनवले, विजयी बनवले याचा अभ्यास झाला पाहिजे आणि अनुकरण ही झाले पाहिजे असे वाटते.

 

… क्रमश..