शिवचरित्रमाला भाग- १४५

शिवचरित्रमाला भाग- १४५

 

गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले!

 

राजाभिषेकासाठी रायगडावर आलेल्या आप्तइष्ट मित्र , सेवक , अधिकारी , कलावंत , पंडित आणि पाहुणे यांची संख्या किती होती ? त्या काळाच्या मानाने ती प्रचंड होती. कुणी म्हटलंय , ८० हजार कुणी म्हटलंय ५० हजार गृहीत धरली तरी ती प्रचंडच आहे. आपल्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींना वंदन करण्यास एवढे लोक आले होते. आजही आम्हाला ऊर भरून आनंद होतो , की १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी दिल्लीत लाल किल्ल्याच्या समोर अवघ्या भारतातून सहस्त्र लोकगंगांचे प्रवाह खळाळत , धावत येतात. शिवाजीमहाराजांच्या राजाभिषेक सोहळ्याचे आणि आमच्या आजच्या स्वातंत्र्यसोहोळ्यांचे महत्त्व एकच आहे. आम्ही पूर्णपणे सार्वभौम स्वतंत्र आहोत या भावनेची आणि जाणीवेची किंमत किती मोठी आहे हे कोणत्या शब्दात सांगावं!

 

अरे , इंदधनुष्याचा तराजू घ्या , तो कल्पवृक्षाच्या फांदीला टांगा , त्याला एक पारडे लावा इंद्रसभेचे अन् दुसरे पारडे लावा नंदनवनाचे. अन् मग त्यातल्या एका पारड्यात विश्वातील सर्व सुख आणि सर्व वैभव टाका. अन् दुसऱ्या पारड्यात स्वातंत्र्य टाका. ते स्वातंत्र्याचं पारडं इतकं जड होईल की , सुखवैभवांचं दुसरं पारड आकाशात भिरकावलं जाईल. जगातील सारी स्वतंत्र राष्ट्र आपापल्या स्वातंत्र्याचं लेणं केवढ्या दिमाखात मिरवतात आणि जपतात. ब्रिटीश पोरं नाचत गात म्हणतात , ‘ ब्रिटन नेव्हर बी एस्लेव्ह ब्रिटन रुल्स द वेव्हज् ‘ आम्हीही शिवाजीमहाराजांप्रमाणे जन्मजात स्वराज्यानिष्ठच असणारच.

 

या राजाभिषेक सोहाळ्यात एक विधी फार मार्मिक होता. तो म्हणजे शुभलक्षणी अश्वांच्या रथात धनुष्यबाण जोडून महाराज उभे राहिले , सरसेनापतीनी सारथ्य केलं आणि महाराज दिग्विजयास निघाले. म्हणजे नेमकं काय केलं ? या रथातून जनसमुदायाच्या उपस्थितीत महाराज रायगडावरच्या राजरस्त्याने सुमारे सातआठशे पावले गेले. हे दिग्विजयाकरता केलेले शिलंगण प्रतीकात्मक किंवा प्रातिनिधीक होते. या शिलंगणाचा आत्मा लक्षात घेतला पाहिजे. तो स्पष्ट आहे. स्वराज्याच्या विस्ताराकरीता साधर्माच्या रक्षणाकरीता प्रजाजनांच्या कल्याणाकरिता , पुरुषार्थ गाजविण्याकरिता राज्युधुरिणांनी सतत राष्ट्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सीमोल्लंघन केलेच पाहिजे. महत्त्वाकांक्षा धरलीच पाहिजे. त्या आकांक्षापुढे गगनांहूनही उत्तुंग असलीच पाहिजे. त्या आकांक्षेपुढे गगनही ठेंगणे ठरलेच पाहिजे. त्याकरिता हे प्रतीकात्मक प्रदर्शन आणि निदर्शन.

 

राज्यशास्त्राप्रमाणे आणि धर्माज्ञेप्रमाणे महाराजांनी भूमीपूजा , जलपूजा , ध्वजपूजा , शास्त्रपूजा , अश्वपूजा , गजपूजा , सवत्सधेनुपूजा , धनपूजा इत्यादी या सर्व देवतांच्या पूजा केल्या. सर्वात मोठी पूजा त्यांच्या हृदयाच्या गाभाऱ्यात चालू होती. अन् ती होती मातृपूजा.

 

किल्ले कोटांवरील , सुभे परगण्यांवरील आणि आरमारावरील ज्येष्ठ पदाधिकारी गडावर आले होते. राजदुंदुभी त्रिकाळ झडत होत्या. सारा रायगड आनंदाने दुधासारखा ऊतू जात होता. पण स्वराज्यात गावोगाव राहणाऱ्या अशा असंख्य विधवा स्त्रिया नक्कीच होत्या , की ज्याच्या पतींनी स्वराज्यासाठी रणांगणात प्राण अर्पण केले होते. त्या सकल सौभाग्यसंपन्न अखंडित लक्ष्मीअलंकृत विधवांना काय वाटत असेल या राजाभिषेकाच्या वार्ता आणि वर्णन ऐकून ? आनंदच. मनातून त्या म्हणत असतील का , हे जगदंबे , ‘ क्षण एकच कर मजला सधवा ‘ एकच क्षण मळवट भरते , रायगडावर जाते , राजाला ओवाळते. घरी आल्यावर पदराने मळवट पुसते.

 

दिवस असे पावसाचे. मोठ्या मुश्किलीने पर्जनराजा वरुणाने आपले आनंदाश्रू रोखून धरले होते. सोहोळ्याचा विरस होऊ नये म्हणून पाऊस पडला नाही.

 

बांधकाम खात्याचे सुभेदार हिराजी इंदुरकर यांनी गडावर केलेली सर्व बांधकामे अतिशय भव्य सुबक पण साधी केली होती. राजसभेच्या प्रवेशद्वारावर दोन मोठी कमळे दगडावर कोरली होती. कमळ हे शांततेचे आणि लक्ष्मीचे प्रतीक. त्या कमळांच्याच जवळ दोन सिंह कोरले होते. त्या शिल्पातील सिंह आपल्या एकेका पायाखाली एकेक हत्ती दाबून रगडीत होता. अन् शेपटीतही एक हत्ती धरून तो भिरकावणार होता! हे कशाचे प्रतीक ? हे शक्तीचे प्रतीक. चार पादशाह्या अन् चार वैरी पायाखाली चिरडून शेपटीत जणू मुंबईकर इंग्रजांना पकडून हे स्वराज्याचे सिंह आपलं शक्तीप्रदर्शन करत आहेत असाच भास होतो.

 

राजसभेचे बांधकाम हिराजीने अतिशय कौशल्याने केले होते. त्या विशाल सभेत सिंहासनापाशी उभे राहून अगदी साध्या आवाजात काही बोलले , तरी साऱ्या दहा हजारांच्या राजसभेला स्पष्ट ऐकू जावे असे अॅक्सॉस्टीक्स हिराजीने साधले होते *(आजही आपण रायगडावर गेलात, तर राजदरबारातील ह्या वैशिष्ट्याचा अनुभव घेऊ शकाल)*. या निमित्ताने हिराजीने केलेल्या बांधकामांचा तपशील सांगणारा एक सुंदर संस्कृत श्लोकबद्ध शिलालेख श्रीजगदीश्वराच्या मंदिराच्या नगारखान्याशेजारी भिंतीवर कोरला. त्यात त्याने शेवटची ओळ कोरलीय ,

 

*‘यावच्चंददिवाक रौ विलसत तावत् समुद्यजृंभते’*

*म्हणजे आसमंतात जोपर्यंत सुर्य चंद्र तळपताहेत , तोपर्यंत हे रायगडचे वैभव टिकेल.*

 

मंदिराच्या प्रवेशपायरीवर त्याने पाचच शब्द शिलालेखात कोरले आहेत.

*‘ सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर ‘*

राजाच्या आणि प्रजेच्या पायीचे धूलीकण आपल्या नावावर पडावेत हाच यातील हेतू.

 

आता राजाभिषेक अगदी उद्याच्या पहाटेवर येऊन ठेपला. जिजाऊसाहेबांचे पहाटेचे स्वप्न पूर्ण होणार होते , खरे ठरणार होते.

 

… क्रमश….

  1. tekken 3 game download for pc