शिवचरित्रमाला भाग १४४

शिवचरित्रमाला भाग १४४

 

सुवर्णतुळा

 

दि. २९ मे १६७४ यादिवशी सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ‘ बटु ‘ स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचा होता! महाराजांची यापूर्वीच आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली , दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता.

 

फक्त मुंज राहिली होती. साडेतीनशे वर्षांपूर्वीपासुन स्वातंत्र्य हरपल्यामुळे महाराष्ट्रातील क्षत्रिय घराण्यांचेही अनेक मोलाचे पवित्र धार्मिक संस्कार लुप्त झाले होते. वास्तविक महाराजांचे भोसले घराणे अशाच थोर राजघराण्यांपैकीच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांच्या घराण्याला ‘ राजा ‘ ही क्षत्रिय पदवी परंपरेनी चालूच होती. महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांनाही कागदोपत्रीसुद्धा राजे हीच पदवी वापरली जात होती. भोसले नातेसंबंध फलटणच्या पवार कुलोत्पन्न नाईक निंबाळकर या ज्येष्ठ राजघराण्याशी आणि जाधवराव आदि उच्चकुलीन क्षत्रिय घराण्यांशीही होते.

 

मुद्दा असा , की शिवाजीमहाराज हे कुलपरंपरेनेच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांना धर्मशास्त्राप्रमाणेही वैदिक पद्धतीने राजाभिषेक करण्याचा अधिकार होता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर असाच ठरावा की , आयुष्यभर हातात तलवार घेऊन ज्याने रयतेचे रक्षण , पालनपोषण आणि स्वातंत्र्य हेच व्रत आचरिले , धर्म , संस्कृती आणि अस्मिता यांच्याकरिता रक्त आणि स्वेद सतत गाळले असा महापुरुष कोणत्याही जातीधर्मात जन्माला आला , तरीही तो क्षत्रिय कुलावंतांसच की! नाही का ?

 

मुंजीनंतर लग्न! शास्त्राप्रमाणे लग्नाचा विधी आता करणे आवश्यकच होते. मुंजीनंतर लग्न झालेच पाहिजे हे राजाभिषेकाकरिता आवश्यकच होते. पण मग आता ? महाराजांनी आणि शास्त्रीमंडळींनी यावर तोड काढली. ती म्हणजे राणी सोयराबाईसाहेब यांच्याशीच पुन्हा विवाह करावयाचा. म्हणजे विवाहसंस्कार करावयाचा. यावेळी सोयराबाईसाहेबांचा राजारामराजे हा पुत्र चार वर्षाचा झालेला होता!

 

सोयराबाईसाहेबांशी महाराजांचे दि. ३० मे रोजी लग्न करण्यात आले. पुतळाबाईसाहेब आणि सकवारबाईसाहेब या महाराजांच्या राण्यांशीही असेच विधीपूर्वक विवाह करण्यात आले. या एकूण मुंज आणि लग्न प्रकरणातून महाराजांचे जे विवेकी , सुसंस्कृत आणि सामाजिक मन दिसून येते , त्याचा आपण कधी विचार करतो का ? पुरोगामी सुधारणा तावातावाने मांडणारी मंडळीही बहुदा , निदान अनेकदा नेमके उलटे आचरण करताना आजच्या काळातही दिसतात. हे पाहिले की , शिवाजीमहाराजांच्या जोडीला विचाराप्रमाणेच सामाजिक आचरण करणारे म. फुले अन् अण्णासाहेब कर्वे यांच्यापुढे आपली मान आदराने लवते. ज्या काळात आपल्याच बांधवांची सावलीही आम्हाला आगीसारखी झोंबत होती , अशा काळात ज्योतीबांनी आपल्या स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा पाणवठा सर्वांनाच मुक्त केला हेाता. आजच्याकाळात ही गोष्ट तुम्हाआम्हाला किरकोळच वाटेल. पण त्या काळात ती प्रक्षोभक होती.

 

दि. ४ जून १६७४ या दिवशी महाराजांची सुवर्णतुळा करण्यात आली. यावेळी महाराजांचे वजन किती भरले हे हेन्री ऑक्झिंडेन या इंग्रज वकीलाने लिहून ठेवले आहे. १६० पौंड वजन भरले. हेन्रीने नक्कीच विचारणा करून ही नोंद केलेली आहे. आमच्यापैकी कोणीही अशी अन् अशाप्रकारची नोंद केलेली नाही येथेच त्यांच्या आमच्यातला फरक लक्षात येतो.

 

सोन्याप्रमाणेच इतर २३ पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली. याला ‘ तुलापुरुषदान ‘ असे म्हणतात. सोळा महा दानांपैकी हे तुलापुरुषदान आहे. हे सर्व नंतर सत्पात्र लोकांना दान म्हणून वाटून टाकावयाचे असते. तसे केले.

 

सुवर्णतुळेत महाराजांचे वजन १६० पैंड भरले , म्हणून हेन्रीने नोंदविले आहे. पण अभ्यासानंतर असे वाटते की , महाराजांचे वजन १६० पेक्षा कमी असावे. कारण महाराजांच्या अंगावर अलंकार आणि वस्त्रे होती. हातापायांत सोन्याचे तोडे होते. कमरेला शस्त्र म्हणजे तलवार आणि कट्यार असणारच. उजव्या हातात श्रीविष्णुची सोन्याची मूर्ती असणारच. या सर्वांचे वजन वजा करावे लागेल. असे वाटते की , ही वजाबाकी केली , तर महाराजांचे वजन सुमारे १४५ पौंड असावे. सोन्याच्या पारड्यात महाराजांचे शिवराई होन तुळेसाठी घातले होते. एका होनाचे वजन सामान्यत: अडीच ग्रॅम होते. त्यावरून हेन्रीने कॅल्क्युलेशन केले असावे. अन्य धार्मिक विधी चालूच होते. प्रत्यक्ष अभिषेक आणि नंतर राज्यारोहण होणार होते , दोन दिवसांनी दि. ६ जून १६७४ .

*सुवर्ण ओंजळ स्वातंत्र्याची*

*ऋदयाने केली ।*

*अतुलनीय शिवछत्रपतींची*

*सुवर्णतुला झाली ॥*

*सुवर्णलक्ष्मी तोलून धरिते*

*पराक्रमाचा भार ।*

*अगणित कंठातुन घुमतो*

*राजांचा जयजयकार ॥*

 

 

… क्रमश.