शिवचरित्रमाला भाग ७०

शिवचरित्रमाला भाग ७०

======================

राजाची आई ती प्रजेचीही आईच

======================

राजगड आनंदाच्या डोहात डुंबत होता. साऱ्या मावळांत आनंदाचे तरंग उमटत होते. याच काळात एक कथा घडली.

 

गुंजण मावळात (ता. वेल्हे जि. पुणे) तांभाड नावाचं एक गाव आहे. महाराजांचा एक शिलेदार विठोजी नाईक शिळमकर हा या गावचा. महाराज आग्ऱ्याला गेले त्यावेळी त्यांच्या मांदियाळीत हा विठुजीही होता. तोही आग्ऱ्यात अडकला. तसाच तो महाराजांच्या सांगाती सुटलाही. पण सगळे सुखरूप आले , तोही आला. राजगडावर जसा आनंद उफाळला तसा विठुजी आपल्या घरी सुखरूप आल्यानंतर त्याच्या घरीही आनंद उफाळला. महाराज बहुदा याच आठवड्यात प्रतापगडावर भवानीदेवीच्या दर्शनास गेले. त्यांच्याबरोबर विठुजी चार दिवसांनी सगळे परतले.

 

विठुजीही आपल्या घरी परतला आणि चकितच झाला. सगळं घर आनंदात हलतडुलत होतं. म्हाताऱ्यांपासून रांगत्यांपर्यंत सगळेच आनंदात होते. विठुजीला जाणवलं की , हा आनंद काहीतरी वेगळा आहे. अन् मग घरात वडिलधाऱ्यांकडून त्याला समजलं , की विठुजीच्याच धाकल्या लेकीचं लगीन वडिलधाऱ्यांनी गेल्या चार दिवसांत ठरवून टाकलं. नवरामुलगा चांगला तालेवार कुळातला. देखणा. नाव म्हादाजी नाईक पाणसंबळ. बापाचं नाव गोमाजी नाईक. महाराजांचा तो उजव्या हाताचा सरदार. अशा तालेवार घरांत विठुजी शिळमकराची लेक लक्ष्मी म्हणून , म्हादजी नाईकाचा हात धरून प्रवेशणार होती. दोन्हीकडच्या वडिलधाऱ्यांची लगीन बोलणी झाली होती. पण कुंकू लागायचं होतं , सुपारी फुटायची होती. विठुजी नाईक घरी येण्याची वाट होती.

 

विठुजी नाईक आला. त्याला हे सारं समजलं. तोही आनंदला. सुखावला. घरच्यांनी त्याला सांगितलं.

 

‘ विठुजी , मुलांकडची माणसं चारसहा दिवसांनी पोरीला कुंकू लावायला येणार. सुपारी फुटणार तवाच लगनाची तिथीमिती ठरवायची. मांडवाची मुहूर्तमेढ , हळदी , साखरपुडा आणि बाकीचे सोपस्कर हेही ठरवायचं. ‘

 

विठुजी सुखावला. तरीही त्याचा चेहरा चिंतावला.

 

आठ दिवसांनी नवरदेवाकडची बुजरूख माणसं अन् गुरुजी हे सारं ठरवायला विठुजी नाईकाच्या घरी येणार होते. पण दोन दिवस आधीच विठुजीनं पाहुण्यांना सांगावा धाडला की , ‘ जरा कामांची अडचण आहे , आपण लगीन सुपारीसाठी मागाहून आठ-दहा दिवसांनी यावा. ‘

 

पाणसंबळ पाहुण्यांनीही मानलं. अस्ती अडचण माणसांना. सुपारी दहा दिवसांनी फोडू.

 

दोन्ही घरी आनंद. सडा सारवणं , आया-बायांची आणि करवल्यांची गोड वर्दळ. पण विठुजी मात्र चिंतावलेला.

 

हे ही दहा दिवस सरत गेले. अन् विठुजीनं व्याह्यांच्या घरी पुन्हा हात जोडून सांगावा पाठविला की , ‘पाहुणे , जरा अडचणीनं खोळांबलोय. थोडं आठ दिस आणखीन थांबावं.’

 

पाहुणे सांगावा ऐकून जरा थबकलेच. खरं म्हंजी मुलीच्या बाजूनं बापानं जातीनं येऊन बोलायला हवं. लग्नाची तिथं धरायचा आग्रव करायला हवा. पण मुलीचा बाप नुस्ते सांगावे पाठवतोय. अन् लगीन तिथं पुढं पुढं ढकलतोय का ? ही काय रीत झाली ?

 

असं आणखीन एकदा झालं. मग मात्र चारचौघात कुजबुज सुरू झाली की , असं का करतायंत विठुजी नाईक ? गोमाजी नाईक पाणसंबळसुद्धा कसंनुसे झाले. पण त्यांचं मन खानदानी. गप्प राहिले. पण एकदा भैरोबाच्या पारावर अन् चावडीच्या सदरेवर माणसं कुजबुज लागली की , ती काय थांबती व्हय ? पाण्यात पडलेला तेलाचा थेंब जसा सईकन पसरतो , तसं झालं.

 

अन् विठुजी नाईकांची ही वाकडी चाल राजगडावर जिजाऊसाहेबांच्या कानावर गेली. कुणीतरी कुजबुजलंच. आऊसाहेबांचं डोकं पांढऱ्या केसाखाली जरा काळजावलं. त्यांनी गुपचुप विठुजीला बोलावू पाठवलं.

 

आऊसाहेबाचा निरोप आला. विठुजीचं मन जरा धसकावलंच. कशापायी हुकुमावलं असल आऊसाहेबानं ?

 

गडावर विठुजी दोन्ही हातानी मुजरे घालीत आऊसाहेबांच्या पुढं गेला. आऊसाहेबांनी म्हटलं , यावं यावं नाईक आणि आऊसाहेबांनी जरा काळजीच्या खालच्या आवाजातच विठुजीला पोरीच्या लग्नाचं पुसलं , का लग्नाची तीथी धरत न्हाईस ? लग्नासारखी गोष्ट. चारचौघात त्याचा चारतोंडी कालवा होऊ नये. बाळा. लौकीकाला बरं नाई. विठुजी चिंतावलेल्या आदबीनं. ‘ जी ‘ म्हणाला. नक्की तीथी धरतो म्हणाला.

 

पण हेही चार दिवस गेले. त्यामुळे आता मात्र पाहुणे पाणसंबळ जरा मनातनं बिघडलेच. विठुजी नाईक शिळमकर देशमुखांना आपली लेक आमच्या पाणसंबळ घरात द्यायची नाही का ? लगीन मोडायचंय का ?

 

अन् आऊसाहेबांनाही हे पुन्हा समजलं. त्यांनी तातडीचा हुकुम फेकला अन् विठुजीला राजगडावर बोलावू पाठवलं. विठुजी आला. आऊसाहेबांच्या पुढं अपराध्यासारखा आला. आऊसाहेबांनी त्याला रागे रागे कारण पुसलं. विठुजी कसाबसा कसनुसा बोलत आऊसाहेबांना म्हणाला , ‘ आऊसाहेब , कसं सांगू ? लग्नासारखी गोष्ट केवढी भाग्याची. पाणसंबळांसारख्या तालेवाराच्या घरात सून म्हणून माझी लेक जाणार ही केवढी भाग्याची गोष्ट. पण कसं लगीन करू ? घरी काय काय बी न्हाई. आग्ऱ्याला जाण्याच्या आधी दिलेरखान मोगलाची स्वारी गुंजण मावळापर्यंत आली. सारं मावळ तुडवून काढलं त्यानी. सत्यानाश केला. आता घरी कायबी न्हाई. लग्नात पोरीच्या अंगावर खणचोळी तरी घालायला हवी. चार पाहुणी येणार काय करू ? सावकारबी गवसेना. त्यांचंही मोगलांनी तळपट केलं. कसं करू आऊसाहेब ? पोरीच्या बाशींगला दोरा अपुरा पडतोय.’

 

अन् मग आऊसाहेब आणखीनच रागावल्या. अरे विठोबा, हे मला सांगता येऊ नये का तुला ? मी इथं गडावर कशासाठी बसलीय ? का नाही बोललास ? अरे तू या घरातला ना ?

 

विठुजीनं घरची रिकामी भांडी आऊसाहेबांच्या पुढं कधी वाजवली नाहीत हे ही खरंच. कारण आपल्या महाराजांच्या आई ला किती त्रास द्यायचा ?

 

आऊसाहेबांनी कारभारी कारकुनाला हाक मारली. कारकुनाचं नाव नारोजी त्र्यंबक आणि म्हटलं ‘ नारोजी , आपल्या विठुजीच्या घरी लेकीचं लगीन निघालंय. लग्नाला जेवण जेवढं जेवढं लागतं , ते ताबडतोब तांभाडच्या शिळमकर वाड्यात गडावरून पोहोचतं करा. ‘

 

अशी होती राजाची आई. असा होता राजा आणि अशी होती प्रजा. लगीन वाजत गाजत सारं झालं.

 

या विठुजी नाईक शिळमकराला एका पत्रात स्वत: शिवाजीमहाराजांनी लिहिलंय , ‘विठुजी नाईक , तुम्ही तर आमच्या कुटुंबातल्यासारखेच.’

 

मराठी माणसांची अशी राजाशी नातीगोती होती.

 

*न केलेल्या कामाबद्दलही मोबदला मिळावा, छोट्या छोट्या गोष्टीतही क्रेडिट मिळाव म्हणून चाललेली अनाठायी धडपड पाहत असतांना, विठोबा सारखे अनुयायी/कार्यकर्ते कशे झिजले, स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करुन तिळमात्र ही अपेक्षा ठेवत नव्हते हे ध्यानात येत आणि मग स्वाभाविक पणे या अनेकानेक मावळ्यांच्या समोर आपण नतमस्तक होत जातो*

 

… क्रमश.