शिवचरित्रमाला भाग ७१

शिवचरित्रमाला भाग ७१

======================

आग्र्यानंतरचे राजकारण

======================

महाराज आग्र्याच्या कैदेत आजारी पडले होते. ते आजारपण खोटं होतं. पण आग्ऱ्याहून परत आल्यानंतर मात्र महाराज खरंच आजारी पडले. अतिश्रमामुळे हे आजारपण महाराजांच्या वाट्याला आलं. पुढे जवळजवळ तीन आठवडे (सप्टेंबर १६६६ उत्तरार्ध) महाराज पडून होते. आजारी पडलेल्या महाराजांना पाहणं म्हणजे दुमिर्ळच दर्शन.

 

महाराजांच्या अंगात ज्वर होता. पण त्याच्याबरोबर डोक्यात चिंता होती की , माझा लेक अजून मथुरेहून परतलेला नाही. दुसरी चिंता त्याहून भयंकर होती. माझे दोन भाऊ औरंगजेबाच्या दाढेखाली अडकले आहेत. हाल सोसताहेत ते कसे सुटतील ? केव्हा सुटतील ?

 

त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे हे महाराजांचे दोन वकील २० ऑगस्ट , सोमवार १६६६ या दिवशी आग्रा शहरात फुलादखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले. कैद झाले. या दिवशी अमावस्या होती. हे दोन्ही वकील जणू यमदुतांच्या हाती जिवंत गवसले गेले. मग त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील.

 

हा तेव्हा त्यातील हालाचा एक औरंगजेबी प्रकार. या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजीमहाराज कसे गेले , कुठे गेले , कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल , छळवणूक.

 

या दोघांची सुटका कशी करता येईल , याची चिंता महाराज करीत होते. महाराजांचे स्वत:चे आजारपण हळूहळू ओसरत गेले.

 

याच काळात महाराज राजगडावर येऊन पोहोचल्याच्या म्हणजेच त्यांच्या आग्ऱ्याहून सुटकेच्याही खबरा साऱ्या देशभर पसरल्या. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर होता जुआव नूनिस द कुंज कोंदि द साव्हिर्सेंति. याने पूवीर् महाराज आग्ऱ्यात कैदेत अडकल्याचे कळल्यानंतर लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला एक पत्र लिहून कळविले होते की , ‘ तो शिवाजी आग्ऱ्यास गेला असता औरंगजेबाने त्याला कैदेत डांबले आहे. (दि. २५ मे १६६६ ) तो आता कधीही सुटण्याची शक्यता नाही. औरंगजेब शिवाजीला मरेपर्यंत कैदेत ठेवील किंवा ठारच मारून टाकील. ‘ ही गोष्ट पोर्तुगीजांना आनंदाचीच वाटत होती. कारण त्यांचा सर्वांत मोठा शत्रू होता शिवाजी राजा.

 

पण हे पत्र लिस्बनला पोहोचायच्या आतच महाराज १७ ऑगस्ट १६६६ ला सुटले. ही गोष्ट या पोर्तुगीज गव्हर्नरलाही कळली. तेव्हा तो थक्कच झाला. (दु:खीही झाला) त्याने लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला यावेळी एक पत्र पाठविले आहे. त्या पत्रात साव्हिर्सेंति गव्हर्नरने लिहिले आहे की , ‘ तो शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून मरेपर्यंत सुटण्याची शक्यता नाही , असे मी पूर्वी आपणास लिहिले. परंतु तो शिवाजी अशा काही चमत्कारीकरितीने कैदेतून सुटला (आणि स्वत:च्या गडावर येऊन पोहोचलादेखील) आहे की , इकडचे सारे जग आश्चर्याने थक्क झाले आहे. खरोखर हा शिवाजी म्हणजे एक विलक्षण माणूस आहे. त्याची तुलना जर करायचीच असेल तर ती अलेक्झांडर दि ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांच्याशीच करावी लागेल. ‘ हा पोर्तुगीज शत्रूचा शिवाजी महाराजांच्याबद्दलचा अभिप्राय आहे.

 

महाराज याचवेळी म्हणजे ऑक्टोबर १६६६ मध्ये हवापालट करण्याकरिता म्हणून म्हणजेच विश्रांतीकरिता म्हणून सावंतवाडी आणि पणजी यांच्या पुर्वेला ऐन सह्यादीच्या रांगेत , एक अतिअवघड किल्ला आहे , त्या किल्ल्यावर गेले. ते म्हणताना विश्रांतीकरिता जात आहेत , असे म्हटले. पण प्रत्यक्षात पोर्तुगीजांची सत्ता गोव्यातून उखडून काढण्याची योजना आखण्यासाठीच या मनोहर गडावर आले होते. यांत शंका नाही.

 

हा गड पोर्तुगीजांच्या उत्तर सरहद्दीवरती घनघोर जंगलात आहे. महाराजांची तुलना सिकंदर आणि सीझर यांच्याशी करणारा साव्हिर्सेंति हाच यावेळी पणजीस गव्हर्नर होता. या गव्हर्नरने महाराजांकडे रामाजी कोठारी याच्याबरोबर आग्ऱ्याहून (कैदेतून सुटून) सुखरूप परत आल्याबद्दल सदिच्छेचे पत्र आणि नजराणाही पाठविला. परंतु महाराज मनोहर गडावर येऊन राहिल्याचे रामाजीला समजले. त्याने मनोहर गडावर जाण्याचा प्रयत्नही केला. पण अवघड वाटा आणि घनदाट अरण्य यांमुळे त्याला या डोंगरी किल्ल्याचा मार्ग सापडला नाही. म्हणून तो पणजीस परत गेला.

 

महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा.

 

त्यातील मुख्य विषय असा की , ‘ मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पुर्वीप्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ‘

 

औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.

 

सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल ? येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता , ना सांगता , ना दाविता , अनुभव चित्ता चित्त जाणे!

 

… क्रमश.