शिवचरित्रमाला भाग ८५

शिवचरित्रमाला भाग ८५

======================

माघ वद्य नवमीची रात्र

======================

यावेळी प्रतापगडच्या मावळतीला असलेल्य डोंगर-वेढ्यातील ‘ उमरठ ‘ या गावात लग्नाचा मांडव पडला होता म्हणे! हे लग्न प्रत्यक्ष उमरठकर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या मुलाचं होतं म्हणे. रायबा हा त्यांचा लहानसा मुलगा.

 

या सगळ्या कथा मराठी प्रत्येक कानामनाला गेली 3 ०० वर्ष ठाऊक आहेत. त्यावर तुळशीदार शाहीर या नावाच्या शाहिराने चौकबंद मोठा पोवाडाही रचलेला सापडला आहे. बखरीतून थोडीफार माहिती लिहिलेली आहे. पण यात अभ्यासकांच्या मते मतभेदाचे मुद्देही अनेक आहेत. एवढे निश्चित की , सिंहगड काबीज करण्याची कामगिरी महाराजांनी तानाजी मालुसरे या जबऱ्या मर्दावर सोपविली. तानाजी हा स्वराज्याच्या लष्करात एक हजार पाइकांचा सुभेदार आहे. त्याला एक सख्खा भाऊ आहे. त्याचे नाव सूर्याजी.

 

मोंगलांच्या विरूद्ध तडजोडीनंतर आपले किल्ले परत होण्यासाठी महाराजांनी जी मोहीम उघडली. त्या मोहिमेचा पहिला नारळ तानाजीच्याच हातात त्यांनी दिला या विषयी मतभेद नाही. मुहूर्त होता माघ वद्य नवमी , शुक्रवार दि. चार फेब्रुवारी १६७० मध्यरात्रीचा.

 

ही मोहीम करण्यासाठी तानाजी सुमारे ५०० मावळे घेऊन राजगडावरुन निघाला , हे ही पूर्ण सत्य. आता थोडा अभ्यास करू या. मोहीम प्रत्यक्ष हाती घेण्यापूर्वी गडाची अवघड सवघड बाजू तानाजीने लक्षात घेतली असले की नाही ? गुप्त हेरगिरीने गडाच्या घेऱ्यात आपल्याला गुपचूप पोहोचता येईल , बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का ? प्रत्यक्ष अस्सल समकालीन कागदपत्रात हे काहीच सापडत नाही. कागदच नाहीत. पण तुळशीदार शाहिराच्या पोवाड्यातील ऐन मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवले , तरी गडाच्या भोवती असलेल्या उतरणीवरील जंगलातील मेटकऱ्यांशी तानाजीने संधान बांधले व घेरे सरनाईकाला त्याने आपलेसे केले , हे पूर्ण संभाव्य वाटते. गडावर एकूण मोगली सैन्य दीड हजार असून तटावर ठिकठिकाणी जबर तोफा खड्या आहेत अन् गडाच्या विशेषत: पश्चिमेच्या कड्यावर उत्तरार्धात तटबंदी बांधीव नाही , अन् त्या बाजूस पहारेही जरा कमी आहेत. असे तानाजीच्या लक्षात आहे. व त्या दृष्टीनेच तो या कड्याखाली नेमका आला. नाहीतर तो तसा आला नसता. ही सर्व माहिती घेरेसरनाईक मेटकऱ्याकडून तानाजीला मिळाली हा जो पोवाड्यात व उत्तरकालीन आख्यायिकांत सूर दिसतो तो सत्य असण्याची शक्यता आहे.

 

एक तर तानाजीचे (म्हणजे महाराजांचेही पण) निश्चित ठरलेले दिसते की , नेहमीच्या ढोबळपद्धतीने गडावर चाल करावयाची नाही. गडाला वेढा घालून माहिनोन् महिने झुंजत बसावयाचे नाही. तर अचानक झडप घालून (सरप्राइज अॅटॅक) गड कब्जात घ्यावयाचा. गडावर अशी झडप घातली व प्रवेश मिळविला तर त्यांच्या तोफखान्याचा काहीही उपयोग त्यांना होणार नाही. त्या निरूपयोगी ठरतील. जी काही झुंज द्यावी लागेल ती समोरासमोर द्यायची. त्यात अवघड भाग फारफार मोठा होता. एकतर गडात प्रवेश मिळवणे अत्यंत अवघड अन् मिळाला तर गडावरचे सैन्य आपल्या तिप्पट आहे याची जाणीव मराठ्यांना निश्चित आहे.

 

म्हणूनच तानाजीने मेटावरच्या कोळी मेटकऱ्यांशी आधीपासून संधान बांधून अचानक छाप्याची तयारी चोख केलेली होती , असे दिसते.

 

तानाजी चार फेब्रुवारी १६७० च्या मध्यरात्री म्हणजे बहुदा दोन अडीच वाजता निबिड अरण्यात अन् गडाच्या उतरणीवर आपल्या लोकांनिशी येऊन पोहोचला.

 

गडवरचं वातावरण शांत सुन्न होतं. गस्तीची पाळी असलेले मोंगल सैनिक आपापल्या जागी गस्त घालीत होते. किल्याची दोन प्रवेशदारे पुण्याच्या दिशेला म्हणजे उत्तरेला एका पाठोपाठ एक असे तीन मोठे दरवाजे आणि दक्षिणेच्या बाजुल असे दोन दरवाजे. या बाजूने किल्याच्या खाली कल्याण नावाचे खेडेगाव आहे. म्हणून या दरवाज्यास कल्याण दरवाजा हे नाव होते. आणि उत्तरेच्या बाजूच्या दरवाजांना पुणे दरवाजा असे नाव होते. वास्तविक उदयभान राठोड हा मोंगली किल्लेदार अतिशय निष्ठावंत आणि दक्ष होता. त्याचं काम किल्लेदार या नात्यानं तो ठीक करीत होता. पण तानाजीने किल्ल्याच्या आणि किल्लेदाराच्या दुबळ्या दुव्यांचा अचूक शोध आणि वेध आधीच गुप्त रितीने किल्याच्या सरघेरेनाईकांकडून मिळविला होता. खरं म्हणजे स्वराज्य आणि मोंगलाई यातील तह उघडउघड मोडल्यानंतरचे हे दिवस आहेत. उदयभानने अधिक जागरुक दक्षता घ्यायला हवी होती. पण एकूण किल्याच्या अवघड खांदाबांधा , आपली गडावरील माणसेही उत्तम , तोफा आणि बारूदगोळा अगदी सुसज्ज , दरवाजे अगदी भक्कम अशा या जमेच्या भांडवलवर उदयभान निचिंत होता. नेमका अशाच माघ वद्य नवमीच्या मध्यरात्रीच्या काळोखातला मुहूर्त तानाजीने पकडला आणि चित्यांच्या चोरपावलांनी पाचशे मावळ्यांनिशी तो गडाच्या पश्चिमांगास भिंतीसारख्या ताठ उभ्या असलेल्या कड्याच्या कपारीशी येऊन पोहोचला ही नेमकी जागा गडाच्या माथ्यावर दुबळी होती. पहारे नसावेतच किंवा अगदी विरळ होते. या बाजूला तटबंदीही अगदी अपुरी आहे. या जागेचं नाव किंवा या कड्याचं नाव डोणगिरीची कडा.

 

स्वत: तानाजी आणि असेच आणखी तीन-चार गडी कड्याशी आले. प्रत्येकाच्या खांद्याला एकेक लोखंडी मेख आणि वाखाची बळकट दोरखंडाची वेटोळी होती. तानाजीसह हे दोरखंडवाले मावळे कडा चढू लागले. हे काम फार फार अवघड आणि धोक्याचंही असतं कड्याला खडकांत असलेल्या खाचीकपारीत पावलं आणि हाताची बोटं घालून चाचपत चाचपत वर चढायचं. त्यात अंधार दाट. कुठे कपारीत जर सापानागीणीनं वेटोळं घातलेलं असलं अन् त्याला धक्का लागला तर ? तर मृत्यूच. कुठे मधमाश्यांचं किंवा गांधील माश्यांचं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबविण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरी कठीणंच. आजच्या काळात कडे चढणाऱ्या गिर्यारोहकांस याची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच , की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सट्कन निसटलं , तर भयाण मृत्युशिवाय दुसरं कोणं आपल्याला झेलील ? अशा या डोणागिरी कड्याची उंची किती होती ? होती आणि आजही आहे सुमारे बावीस , चोवीस पुरूष ?

 

अशा या कड्याच्या माथ्यावर पक्या तटबंजीचीही जरूर नाही अन् या बाजूने कोणताही शत्रू कधीच येणं शक्य नाही अशा पूर्ण विश्वासानं किल्लेदारानं येथील बंदोबस्त अगदी ठिसूळ ठेवलेाल असावा.

 

नेमकी हीच जागा वानरांसारखी चढून जाण्याकरीता तानाजीनं ठरविली होती. तो चढत होता. आणखी एक गोष्ट लक्षात येेते की , सिंहगड यापूर्वी मराठी स्वराज्यातच होता. तानाजी सुर्याजी आणि असंख्य मावळ्यांनी सिंहगडावर राहून , हिंडून अन् फिरून गडाची माहिती प्रत्यक्ष अनुभविली होती.

 

मावळे अन् तानाजी वर पोहोचले. त्यांनी खांद्यावर अडकविलेले दोरखंड वर मेखा अडकवून कड्याखाली सोडले. अन् मग भराभरा सर्वच मावळे वर आले. मोठ्या प्रमाणात वस्ती गस्ती आणि राबता गडाच्या दक्षिण पूर्व व उत्तर बाजूला होता. तानाजी हत्यारे सरसावून त्या दिशेला पुढे सरकू लागला. मावळेही. अन् एका क्षणी मोंगली सैनिकांचा आणि शांततेचा एकदमच भडका उडाला. युध्द पेटले.

 

… क्रमश.