शिवचरित्रमाला भाग १२०

शिवचरित्रमाला भाग १२०

======================

मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.

======================

*राष्ट्राच्या जीवनाच्या दृष्टीने आणि त्याच्या प्रगतीच्या दृष्टीने कर्तबगार माणसे घडवावी लागतात. विशेषत: राजकीय क्षेत्रात तर अशी माणसे तयार करावीच लागतात.* अशा कर्तृत्त्ववान जबरदस्त धुरिणांची ‘शाळा‘ शिवाजीमहाराजांनी तयार केली. त्यात योद्धे तयार झाले , राज्यकारभारी तयार झाले. त्यातूनच हिंदवी स्वराज्य तयार झाले. पुढे एकदा (इ. १६७७ फेब्रुवारी) गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह मराठ्यांंच्या मांदियाळीतील येसाजी कंकाचं विलक्षण धैर्य , शौर्य आणि कौशल्य पाहून शिवाजी महाराजांना म्हणाला , ‘महाराज , हा येवढा येसाजी कंक आपण आमच्या पदरी द्या ‘

 

बादशाह येसाजीवर बेहद्द खूश झाला होता. म्हणून तो म्हणतोय , हा माणूस आमच्या पदरी द्या , तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिले , ते एका बखरीत नमूद आहे. ते म्हणाले , *‘आम्ही मोतियांची माळ गुंफली. त्यातील मोती आपण मागता. कैसा द्यावा ?’* याचा अर्थ स्पष्ट आहे. अशी मोतियांची माळ तयार करणारे आपल्या इतिहासात तीन नेते डोळ्यासमोर राजकीय क्षेत्रात दिसतात. त्यातील पहिले नेते छत्रपती शिवाजी महाराज. दुसरे नेते बाजीराव (पहिले) पेशवे आणि तिसरे महात्मा गांधी. या तिघांनीही हुकमी शक्ती निर्माण केली.

 

पण हीच परंपरा खुंटली. आपल्याला राष्ट्र उभे करावयाचे आहे. हाच विचार खुंटला. म्हणूनच आपल्याकडे ‘ मॉब ‘ गोळा झाला आणि होतोय. सिलेक्टेड आणि इंटलेक्च्युअल असे नवीन पिढीत , एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही , युवानेते आज नजरेत येतात का ?

 

महाराजांनी आरमार अगदी नव्याने सुरू केले. हे काम केवढे कठीण होते! शून्यातून अथांग सागरात लढवय्ये आणि लढाऊ योद्धे आणि युद्धनौका निर्माण करावयाच्या होत्या. समोर शत्रू होता , युरोपीयन. सागरी सैनिक तर ‘श्रीगणेशा ‘ पासून तयार करावयाचे होते. अवघ्या तीन वर्षात महाराजांनी या बाळ आरमाराला ऐरावताचे बळ आणले. आरमारी सैनिकांच्या तरबेज हत्यारबाजीच्या आणि तोफा बर्कंदाजीच्या उत्कृष्ट शिपाईगिरीच्या जोडीला , सागरी किल्ल्यांची आणि लढाऊ गलबतांची बांधणी करणारे कामगारही महाराजांनी उभे केले. जेम्स डग्लस याने आपल्या ‘ अराऊंड बॉम्बे ‘ या गंथात इ. स. १८८५ मध्ये लिहून ठेवले आहे , की ‘ अरे! तो शिवाजी महाराष्ट्राच्या भूभागात जन्माला आला. जर तो आणि त्याचे वाडवडील सागरी जीवनात जन्माला आले असते , तर तुम्हा युरोपीय लोकांना त्याने आफ्रिकेच्या अलिकडे पूर्वेला (म्हणजेच कोकण किनाऱ्याकडे) फिरकूही दिले नसते. ‘

 

हे सारे महाराजांनी शून्यातून निर्माण केले. सैनिकी , आरमारी , डोंगरी वा राजकारभारी क्षेत्रात महाराजांनी जबर आणि तरबेज म्हणजेच जाणत्या युवकांची हुकमी शक्ती उभी केली. या हुकमी शक्तीला अतिशय महत्त्व आहे. त्याकरिता सर्व माणसांचीच मानसिकता आगळीवेगळी घडवावी लागते. त्याची ताकद यंत्रापेक्षा जास्त असते. कारण यंत्रच माणसांनी निर्माण केलेले असते. महाराजांनी ही सजीव आणि सुबुद्ध , तत्पर आणि विवेकी माणसांची शाळाच निर्माण केली.

 

रायगडावरच्या टकमक टोकाकडे आमचे नेहमीच विस्फारून लक्ष जाते. तो भयंकर कडा जणू आपल्याला बजावीत असतो , की ‘ पोरांनो , इथून चढायची हिम्मत होईल फक्त वाऱ्याच्या झोताला आणि उतरायची हिम्मत होईल फक्त पाण्याच्या धोधो धारेला. मी अजिंक्य आहे. माझ्या या कड्यावरून चढून येणं शत्रूला अशक्यच. कारण मी महाराजांचा कडा आहे आणि माझ्या खांद्यावर उभे आहेत तरबेज बलाढ्य , बुद्धिमान आणि इमानदार मराठी युवक.

 

हा टकमक्या कडा स्वराज्याशी द्रोह करणाऱ्या हरामखोरांचा कडेलोट करण्याकरिता महाराजांनी खास ठेवला होता म्हणे! पण शिवकाळात या कड्यावरून कोणाचाही कडेलोट केल्याची नोंद नाही. कारण स्वराज्याशी कोणी हरामखोरी केलीच नाही ना!

 

…. क्रमश.