झुंज : भाग १४

झुंज : भाग १४

 

दिवस उजाडला. खानाचा तोफखाना सिद्ध झाला. इकडे गडावर देखील किल्लेदाराने सगळ्यांना जमवून योग्य त्या सूचना दिल्या.

परत एकदा तोफा धडाडल्या. यावेळेस त्यांचा आवाज आधीच्या तोफांपेक्षा जास्त होता. तोफेच्या तोंडून बाहेर पडलेला गोळा बुरुजाच्या पायथ्याशी पडला आणि किल्लेदाराचे धाबे दणाणले. यावेळीही तोफगोळे बुरुजापर्यंत पोहोचणार नाही असेच किल्लेदार समजून होता पण या पहिल्याच तोफगोळ्याने त्याला वास्तवात आणले. त्याला काही समजायच्या आतच दुसरा गोळा बुरुजाला येऊन धडकला. जबरदस्त मोठा आवाज झाला आणि किल्लेदाराने सावधगिरी म्हणून किल्ल्याच्या तटाजवळ असलेल्या बायकामुलांना सुरक्षितजागी नेण्याचा हुकुम केला.

वेळ खरंचच आणीबाणीची होती. तटाजवळ थांबणे धोकादायक होते. पण तिथून बाजूला होणे त्यापेक्षाही धोकादायक ठरणार होते. काहीही करून खानाच्या तोफखान्याला निर्बंधित करणे गरजेचे होते. पण कसे? उत्तर एकच… प्रतिहल्ला…

“तुका…” किल्लेदारानं आवाज दिला.

“जी किल्लेदार…” तुका काहीसा पळतच किल्लेदाराजवळ हजर झाला.

“पुन्यांदा तुजी तोप वापरायची हाय आपल्याला…” किल्लेदाराने सांगितले आणि गडावर लगबग सुरु झाली. तुकाने बनविलेल्या दोन्ही तोफा दोन बाजूला ठेवण्यात आल्या. त्यातील एका तोफेच्या चामडी भागात तोफगोळा ठेवण्यात आला आणि काही वेळातच तो तोफेतून सुटला. हा गोळा खानाच्या तोफखान्याच्या काही अंतर समोर पडला आणि त्याचा स्फोट झाला. गोळ्याचे तुकडे इतस्ततः विखुरले गेले. कित्येक तुकड्यांनी बंदुकीच्या गोळीप्रमाणे आपले काम चोख बजावले. समोर असलेले अनेक जण जखमी झाले. काही वेळासाठी खानाची तोफ थंडावली. हा किल्लेदारासाठी शुभशकून होता.

“भले शाब्बास…” किल्लेदाराचा उत्साह दुणावला. किल्लेदाराच्या शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे गडावरील सैन्यात देखील उत्साह आला.

इकडे मात्र तोफखान्याच्या समोरच तोफगोळा पडल्याचे पाहून खान पूर्णतः संतापला.

“या अल्ला… इन मरहट्टोके पास तोपे कहांसे आयी? मैने तो सुना था, इस किलेपर एक भी तोप नही है?” त्याने त्याच्या अधिकाऱ्याला विचारले.

“हुजूर… जितना पता चला है… उपर एक भी तोप नही है…” त्याने घाबरत घाबरत उत्तर दिले.

“तो? ये जो गोला किलेपरसे आया है वो क्या किसीने हाथसे फेका है?” खानाने संतापून विचारले.

“-“ काय बोलावे हे न समजल्याने तो अधिकारी मान खाली घालून उभा राहिला.

“बोलो…” खान परत गरजला…

“गुस्ताखी माफ हुजूर…”

खरे तर जी अवस्था अधिकाऱ्याची होती तशीच काहीशी अवस्था खानाचीही होती. काय होते आहे ते त्याला तरी कुठे समजत होते? तेवढ्यात एका घोडेस्वाराने खानाजवळ येवून मुजरा केला.

“हुजूर… अल्ला कि मेहेर हुई है… पीछे की तरफ से किलेकी तटबंदी तुट गयी है…” त्याने खानाला माहिती दिली आणि खानाचा राग कुठल्या कुठे पळाला.

“बहोत बढीया…” म्हणत खानाने घोड्याला टाच मारली आणि तो गडाच्या मागील बाजूस निघाला.

खान आला त्यावेळेस तोफखान्याचा गडावर जोरदार मारा चालू होता. काही वेळापूर्वी गडावरून येणारे तोफगोळे काहीसे थांबले होते. खानाने वर पाहिले त्यावेळेस गडाच्या तटबंदीला खिंडार पडले होते. सैय्यदशा तिखट मारा करत होता.

“सय्यदशा… किलेपर हमला करो…” त्याने उत्साहात सांगितले…

“जी हुजूर…” म्हणत सय्यदशाने जवळपास २ हजार पायदळ बरोबर घेतले आणि गड चढायला सुरुवात केली. गडावरून काहीही प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे त्याचा उत्साह वाढत होता. जवळपास अर्धा गड चढून झाला आणि परत अघटीत घडले. किल्ल्यावरून हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणला. कुणाला काही समजण्यापूर्वीच मोठमोठे दगड खाली घरंगळत आले आणि त्यांनी त्यांचे काय चोखपणे बजावले. हा अनुभव जुन्या सैन्याला असला तरी खानाच्या नवीन सैन्यासाठी पूर्णतः नवा होता. त्यामुळे त्यांच्यात हाहाकार माजला. एकेक जण जायबंदी होऊ लागला आणि मुगल सैन्याला पुढे पाऊल टाकणे दुरापास्त झाले. शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. स्वतः सैय्यदशा देखील अगदी थोडक्यात बचावला होता.

माघारी परतणारे सैन्य पाहून मात्र खानाचा पारा चढला. पण वरून होणारा दगडांचा मारा इतका तिखट होता की स्वतः खानाला देखील माघार घ्यावीच लागली असती.

आतापर्यंत सूर्य अस्ताला गेला होता. थंडीचा कडाका वाढला होता. सैन्य देखील थकले होते त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच गडावर पुन्हा तोफांचा मारा करण्याचे त्याने ठरवले. या वेळेस देखील जवळपास हजार जण निकामी झाले होते.

सकाळ उजाडली तसा तोफखाना तोफगोळ्यांचा मारा करण्यासाठी सज्ज झाला. सैय्यदशा तोफखान्याजवळ पोहोचला. त्याने वर पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. डोके गरगरले. आपण काय पाहतो आहोत त्यावर त्याचा विश्वासच बसेना. तेवढ्यात खानही तिथे आला. त्याचीही गत सैय्यदशा सारखीच होती. ज्या ठिकाणी तटबंदीला खिंडार पडले होते ते रात्रीतून बुजवण्यात आले होते. किल्ल्याची तटबंदी पुन्हा पहिल्या सारखीच दिमाखात उभी होती. त्याला ती आपल्यावर हसते आहे असा भास झाला. आणि त्याच्या मनात आता फक्त एकच विचार घोळत होता… तो म्हणजे… “किल्ल्यावर माणसेच आहेत की भुते???”

क्रमशः

झुंज : भाग १३

झुंज : भाग १३

 

मराठा सैन्याने ज्या प्रकारे हल्ला केला अगदी त्याच प्रकारे माघारही घेतली. जवळपास एक हजारावर मोगल सैनिक गारद झाले. जवळपास दीड ते दोन हजार जायबंदी झाले आणि बाकीचे मात्र स्वतःला वाचविण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळून गेले. या वेळात संपूर्ण रसद गडावर पोहोचली होती. पण त्र्यंबकगड असो वा अहिवंत किल्ला दोन्ही ठिकाणी सुरक्षा देणे तितकेच महत्वाचे असल्यामुळे दोन्हीकडून आलेले मराठा सैन्य मागे फिरले. मराठा सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवला. तशी मराठा सैन्याची देखील हानी झालीच पण ती मोगलांच्या मानाने अगदीच नगण्य होती.

जवळपास ८ दिवसांनी फत्तेखान तीस हजाराची फौज घेऊन गडाखाली पोहोचला. त्याच्या बरोबर यावेळेस लांब पल्ल्याच्या तोफा, दारुगोळा, बंदूक दस्ता तसेच जवळपास तीन हजार घोडदळही होते. आधीची जवळपास दहा हजाराची फौज देखील त्याला मिळणार होती. त्यामुळेच हा किल्ला काही दिवसातच आपल्या ताब्यात येईल याबद्दल तो आश्वस्त होता. पण तिथे पोहोचल्यानंतर मात्र त्याचा पूर्णतः हिरमोड झाला. शहाबुद्दीन खानाने दिलेल्या वेढ्याचा पूर्ण बिमोड झालेला होता. सगळीकडे उध्वस्त छावण्या, मुगल सैन्याची प्रेते आणि जळके तंबू एवढेच काय ते दिसत होते. कित्येक जण तर फक्त जखमी झाल्यावर व्यवस्थित औषधोपचार न मिळाल्याने काळाच्या घशात गेले होते. शिकार न करता आयतेच खाद्य मिळाल्याने आजूबाजूच्या हिंस्र प्राण्याचा संचारही त्या ठिकाणी वाढलेला दिसून येत होता. बराचसा दारुगोळा नष्ट झाला होता. कित्येक दगडी तोफा निकामी करण्यात आल्या होत्या. मुगल सैन्याच्या अन्नधान्याच्या छावण्यांना आग लावण्यात आली होती आणि सगळीकडे एक प्रकारची प्रेतकळा पसरली होती.

१० हजार मुगल सैन्याची अशी अवस्था पाहून फत्तेखानाचा पारा चढला.

“सैय्यदशा… जल्दी जाव… यहां आसपास जितनेभी गांव है उसको जला दो. औरतोंको कैद करके यहां लेके आव. अगर कोई बच्चा, बुढा है तो उसका वहीपर सर कलम कर दो… अगर काई जवान हो तो उसको कैद कर लो… इन मरहट्टोको पता चलने दो… फत्तेखान क्या चीज है…” हुकुम देताना फत्तेखान रागाने थरथरत होता.

“जो हुकुम हुजूर…” म्हणत खानाला कुर्निसात करत सैय्यदशा बाहेर पडला. त्याने बरोबर तीनशे लोक घेतले आणि तो आशेवाडी गावाच्या दिशेने निघाला. तो जेव्हा गावात पोहोचला तेंव्हा संपूर्ण गांव ओस पडले होते. सगळ्या घराची दारे बंद होती. छोट्याशा गल्ली बोळात फक्त काही तरस आणि लांडगे फिरताना दिसत होते. मनुष्यप्राणी औषधालाही सापडत नव्हता. हे पाहून सैय्यदशा देखील चवताळला. त्या रागातच त्याने दिसेल ती झोपडी जाळायला सुरुवात केली. तो जेव्हा तिथून निघाला तेंव्हा तिथे फक्त राखेचे ढीग तेवढे उरले होते. हीच काहीशी अवस्था जवळपासच्या इतर पाड्यांचीही होती.

हे सगळेच किल्लेदाराला गडावरून दिसत होते पण त्याला फक्त बघ्याची भूमिका घेण्याखेरीज काहीही करता येणार नव्हते. तसे अशा गोष्टींनी विचलित होणे किल्लेदाराला शोभणार देखील नव्हते. त्याच्यापुढे आता वेगळाच प्रश्न उभा ठाकला होता. अन्नधान्य तर मुबलक मिळाले होते पण यावेळेस आलेला बादशहाचा फौजफाटा तिप्पट होता. त्याच बरोबर त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफाही होत्या. दोन वर्ष किल्लेदाराने मोठ्या हिमतीने लढा दिला होता पण तीच हिंमत आपल्या सैन्यातही टिकवून ठेवण्याची कामगिरी त्याला करावी लागणार होती.

परत एकदा गडाला वेढा पडला. यावेळेसचा वेढा जरा जास्तच कडक होता. आधी दोन छावण्यांमधील अंतर दोन फर्लांगाचे होते. यावेळेस ते फक्त एक फर्लांग इतकेच ठेवले होते. थोडक्यात वेढा भेदणे आता जवळपास अशक्यच झाले होते. खानाने आक्रमण करण्याआधी सगळ्या मनसबदार, जहागीरदार, फौजदार यांची सभा बोलाविली. आधीच्या सैन्यातील जितके जण स्वतःचा जीव वाचवून पळाले होते त्यातील बरेच जण परत आले होते. आणि अशा लोकांची संख्या देखील काही कमी नव्हती. आधीच तीस हजारांची नव्या दमाची फौज आणि त्यात त्यांना मिळालेले जवळपास तीन ते चार हजार अपमानाने पोळलेले मुगल सैनिक.
एकेक करून सगळे अधिकारी फत्तेखानाच्या शामियान्यात जमू लागले. सगळे जमले आहेत याची खात्री केल्यावर खानाने सुरुवात केली.

“महान शहंशहा आलमगीर औरंगजेब और मुगल सल्तनत के वफादारों… दो साल से हम एक छोटेसे किलेपर अपना चांदसितारा लेहेरानेकी कोशिश कर रहे है, पर वो मरहट्टे, बुजदिलोकी तरह हमपर पथ्थर फेंक रहे है… ये मुगल फौजके लिए बेहद शर्म की बात है… अगर हम इस किलेपर फतेह नही करते तो हमे मुगल फौजके सिपाही केहेलानेका कोई हक नही है… क्या तुम सब भूल गये, तुमने कितनी जंगे जीती है? तो फिर इस बार क्या हुवा? तुट पडो उन चुहोपर… आलमगीर शहंशाहने ऐलान किया है, जो भी मुगल सिपाही उस काफर किलेदारका सर काटकर बादशहाको पेश करेगा उसे तुरंत पाच हजारकी मनसब और बादशहाकी खिलतसे नवाजा जायेगा. उसके साथ ही उसे दसहजार सोनेकी मोहरे बादशाहकी तरफसे भेंट की जायेगी…”

खानाचे बोल ऐकून नवीन सैनिकात उत्साह संचारला. जो तो मनसब मिळण्याची स्वप्ने पाहू लागला. अपवाद फक्त जुन्या सैनिकांचा होता. काहीसे असेच बोल शहाबुद्दीन खान बोलला होता आणि त्याची १० हजाराची फौज फक्त चार हजारांवर आली होती. तसेच त्याला अपमानास्पद रीतीने परत फिरावे लागले होते.

“गुस्ताखी माफ हुजूर…” उपस्थित अधिकाऱ्यांमधून आवाज आला. खानाने आवाजाच्या रोखाने पाहिले. शहाबुद्दीनच्या सैन्यातील एक अधिकारी मान खाली घालून उभा होता.

“बोलो… क्या बोलना है?” काहीसा तिरस्कारयुक्त दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकत खानाने विचारले.

“हुजूर… हमारी तोपोंके गोले वहां तक जातेही नही… इसीलिये अभीतक हमारी फतेह नही हुई…” त्याने खाली मानेनेच उत्तर दिले.

“तो?” खानाला त्याच्या बोलण्यातील आशय नीटसा समजला नाही.

“हुजूर अगर हम शुरुवात बडी तोपोंसे करेंगे तो जरूर फतेह हमारी होगी…”

“ठीक है…” खानाचा स्वर मवाळ बनला.

“दलेरखान… कल हम बडी तोपे दागेंगे… उसकी तय्यारी करो…” खानाने हुकुम सोडला आणि इतर काही गोष्टीची चर्चा करून सभा संपली.

किल्लेदार मात्र काहीसा चिंतीत बनला होता. त्याला गडावरून खानाने आणलेल्या नवीन लांब पल्ल्याच्या तोफा दिसत होत्या. याचाच अर्थ आलेला नवीन खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. एक गोष्ट मात्र किल्लेदाराला समाधानकारक वाटत होती. ती म्हणजे त्याच्या माणसांनी बनविलेल्या लाकडी तोफा. आता खानाच्या तोफांना गडावरूनही काही प्रमाणात प्रत्युत्तर मिळणार होते. उरलेला प्रश्न होता तो फक्त मुगल फौजफाटा गडावरील सैन्यापेक्षा कैक पटीने जास्त होता या गोष्टीचा. आणि या प्रश्नांचे उत्तर फक्त एकच होते आणि ते म्हणजे एकेकाने दहा जणांना पुरून उरणे.

क्रमशः

झुंज : भाग १२

झुंज : भाग १२

 

पहाटे पक्षांचा किलबिलाट सुरु झाला तसा अलीला जाग आली. पहाटेची थंडी अंगाला बोचत होती तरीही तो उठला. कपडे आवरले आणि पुजाऱ्याचा निरोप घेऊन तो बाहेर पडला.

त्र्यंबकगडावर पोहोचला त्यावेळेस पूर्ण उजाडले होते. गडाचा किल्लेदार दिवाणखान्यात हजर झाला होता. सर्वात प्रथम अली किल्लेदारासमोर हजर झाला.

“नाव काय तुजं?” किल्लेदाराने प्रश्न केला.

“अली… अली हसन…”

“गडावर समदं ठीक हाय नव्हं?”

“जी हुजूर… आजूक तरी समदं आलबेलं हाय… पर…” अलीने वाक्य अर्धेच तोडले.

“पर काय?” किल्लेदाराने विचारले.

“आमच्या किल्लेदारानं सांगावा धाडलाय. ह्यो खलिता…” खाली मानेन त्याने किल्लेदारासमोर रामशेजच्या किल्लेदाराचा खलिता पुढे केला. किल्लेदाराने त्याच्या चिटणीसाला मानेनंच खुण केली आणि चिटणीसाने पुढे होत खलिता स्वतःच्या हाती घेतला.

“तू वाईज आराम कर…” किल्लेदाराने अलीला हुकुम केला. तसेच दारावर असलेल्या पहारेकऱ्याला आवाज दिला.

“आज्ञा किल्लेदार…” पहारेकरी आत येत मुजरा करीत म्हणाला.

“याच्या न्याहारीची आन जेवनाची यवस्था करा…”

“जी किल्लेदार…” म्हणत पहारेकरी अलीला घेऊन बाहेर पडला.

“दिवाणजी… काय लिवलंय किल्लेदारानं?” त्र्यंबक किल्लेदाराने विचारणा केली.

“सरदार… रामशेज किल्लेदार मदत मागून ऱ्हायले… गडावरची रसद संपायला आली आन मुगल सैन्याचा येढा निघायचं नांव नाई. आता बादशानं शहाबुद्दीन खानाला माघारी बोलीवला. तो रवाना झाला आहे पन नवा सरदार यायला चार सा दिस लागतीन. तवर काई मदत पोचीवता येईल का म्हनून इचारलं हाये त्यांनी.”

“अस्सं… दोन वर्स झाली, पठ्ठ्यानं गड लढीवला… मानायला पायजे… असं करा आपला येक दूत अहिवंत गडाकडे रवाना करा. त्याच्यासंग येक खलिता धाडा. आन आपल्या लोकास्नी गोळा करा…” किल्लेदाराने हुकुम सोडला आणि चिटणीस मुजरा करून बाहेर पडला.

दुपारच्या वेळेला त्र्यंबकगडावर सैन्य अधिकारी जमले होते. जवळपास सगळ्यांनाच सभा कशासाठी बोलविली याची कुणकुण लागली होती. रामशेजवरून माणूस आला म्हटल्यावर त्याचे कारण काय असणार हे वेगळे सांगण्याची गरजच नव्हती. सभा सुरु झाली. किल्लेदाराने कोणताही वेळ न दवडता विषयाला हात घातला.

“समद्यांना ठावं हाय, दोन वर्सापासनं रामशेजचा किल्लेदार मुगल सैन्याशी लढून ऱ्हायला. पन आता गडावरली रसद संपाया लागली. त्यानं मदत मागितली हाये. गडाचा येढा आजूकबी उठलेला नाई. तवा आता आपन दोन गोष्टी करायच्या. येक म्हंजी आपल्यातले काई लोकं मुगल सैन्यावर हल्ला करनार आनी एकदा का घमासान चालू झाली की मंग बाकीच्यांनी रामशेजवर रसद पुरवायची. तसा सांगावा अहिवंत गडाच्या किल्लेदारालाबी पाठवला हाय. पन आपल्याला आताच त्याबद्दल कायबी ठरीवता येनार नाई. संबाजी राजानंबी पयलेच रामशेजच्या किल्लेदाराला मदत कराया सांगितली हाये. मंग आता घ्या महादेवाचं नांव. पन येक गोष्ट करायची. येकदा का रसद गडावर यवस्थित पोचली की मंग लगोलग माघारी फिरायचं. समजलं?” त्र्यंबकच्या किल्लेदाराने फर्मान सोडले आणि हर हर महादेवचा जयघोष झाला.

क्षणाचाही विलंब न करता दोन हजार माणसे कामगिरीवर निघाली. रामशेज किल्ला जसा जवळ आला तसा दोन हजाराची फौज दोन भागात विभागली गेली. त्यातील एका भागात दीड हजार माणसे होती. ज्यांचे काम अचानक मुगल फौजेवर हल्ला करण्याचे होते आणि उरलेले पाचशे जण हे या वेळात गडावर रसद पोहोचवणार होते. अली देखील याच पाचशे जणांबरोबर होता.

अलीला जाऊन दोन दिवस झाले होते. त्याच्याकडील काहीही हाकहवाल किल्लेदाराला समजली नव्हती. तो वेढा भेदून बाहेर पडला किंवा पकडला गेला याबद्दल काहीही सांगता येण्यासारखे नव्हते. पण नक्कीच तो वेढा भेदण्यात यशस्वी झाला असणार असे त्याची मनोदेवता त्याला सांगत होती. तसे या काळात देखील जिवाशिवा परत एकदा हेरगिरी करून आले होते आणि कुणी पकडला गेला आहे अशी कोणतीही कुणकुण त्यांना लागली नव्हती.

तिसरा दिवस उजाडला. किल्लेदार नेहमीप्रमाणे तटावर जाऊन दूरवर नजर टिकवून होता. काही वेळात त्याला दोन दिशांनी धुळीचे लोट दिसू लागले. सैन्याची एक तुकडी नाशिकच्या बाजूने पुढे सरकत होती आणि दुसरी तुकडी दिंडोरीच्या बाजूने गडाकडे येत होती. येणारे सैन्य आपल्या बाजूचे की विरुद्ध बाजूचे हेच त्याला नीट उमजेना. पण जसजसे सैन्य पुढे येऊ लागले तसतसा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. दोन्ही कडील सैन्याबरोबर घोडागाड्या, बैलगाड्या दिसून येत होत्या. तसेच त्यांचे पेहेराव देखील मुगल सैन्यासारखे नव्हते. म्हणजेच अलीने त्याचे काम चोख बजावल्याची ती खुण होती.

मुगल सैन्य मात्र काहीसे बेसावध होते. एकतर अनेक दिवसांचा पहारा असल्यामुळे त्यांना थकवा जाणवत होता. दोन दिवसांपासून जरा कुठे त्यांना सवड मिळाली होती. एकदा का फत्तेखान आला की परत आराम असा मिळणारच नव्हता. काही वेळ होतो न होतो तोच त्यांना मराठा सैन्य दोन बाजूने येते आहे असे समजले. तसे इतर मनसबदार, जहागीरदार आणि सैन्य अधिकारी त्यांच्याबरोबर होतेच पण तरीही त्यांच्यात एकवाक्यता म्हणावी अशी नव्हती. त्यांनी इतर तयारी करेपर्यंत मराठा सैन्याने दोन बाजूंनी आक्रमण केले. दीड हजाराची कुमक त्रंबकगडावरून आली होती आणि जवळपास हजार माणसांची कुमक अहिवंत गडावरून आली होती.

समोरासमोर युद्धाला सुरुवात झाली. मुगल सैन्य तसे सहा सात हजाराचे होते पण थकलेले. त्यामानाने मराठा सैन्य जरी कमी होते तरी पूर्ण ताजेतवाने. तसेच असा गनिमी हल्ला करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नव्हता. तलवारींना तलवारी भिडल्या. सगळीकडे खणखनाट सुरु झाला. रक्ताचे पाट वाहू लागले. हर हर महादेव आणि अल्ला हु अकबरच्या घोषणांनी आसमान दणाणले. मुगल सैन्य हळूहळू माघार घेऊ लागले. आणि त्यातच त्रंबक गडावरून रसद घेऊन निघालेली तुकडी पुढे झाली. सगळ्यात पुढे अली स्वतः होता. त्या तुकडीला गडाचा वेढा भेदण्यास काहीही वेळ लागला नाही. किल्लेदार गडावरून हे सगळे पहात होता. त्याचे मन आनंदाने उजळले होते. अली जसा किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचला तसे किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले. धान्याच्या पोत्यांनी भरलेल्या गाड्या दरवाज्यातून आत जाऊ लागल्या. काही वेळातच अहिवंत गडावरून आलेली कुमकही किल्ल्यावर पोहोचली. गडावरील लोकांमध्ये नवचैतन्य संचारले आणि मुगल सैन्य मात्र वाट फुटेल तिकडे पळत सुटले.

क्रमशः

झुंज : भाग ११

झुंज : भाग ११

सकाळ झाली तशी किल्लेदाराने परत सभा बोलावली.

“गड्यांनो… आपला देव आपल्यासंग हाये. बादशानं खानाला परत बोलीवलं अशी बातमी कालच्याला जीवाशिवानं आनली. जवर नवीन सरदार येत नाई तवर किल्ला सुरक्षित ऱ्हाईल. त्यो यायला चार सा दिस लागतीन. तवर त्रंबकगडावर जाऊन आपल्याला मदत मागावी लागनं. पन त्यासाठी मुगल फौजेचा येढा तोडून ह्ये काम करावं लागनार. ही कामगिरी कोन घ्येनार अंगावर?” परत एकदा अनेकजण समोर आले. पण तेवढ्यात त्याच्यातील एकाचा आवाज आला.

“किल्लेदार… मै लेता है…” अली हसन पुढे येत म्हणाला.

किल्लेदाराने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक २०/२२ वर्षाचा युवक त्याच्यासमोर उभा होता. किल्लेदार बाकी काही बोलणार तेवढ्यात त्या युवकाने सुरुवात केली.

“ह्ये कुनी गेले आन फौजेच्या हाती गावले तर काम ऱ्हाईल… म्या मुसलमान हाये. कुनीच संशय घेनार नाई… काम फत्ते हुनारच…” किल्लेदाराला त्याच्या आश्वासक शब्दांचे कौतुक वाटले तसेच ही गोष्टही त्याला मनोमन पटली.

काहीवेळातच त्र्यंबकगडाच्या किल्लेदारासाठी एक खलिता बनविण्यात आला. त्यावर किल्लेदाराने आपली मोहोर उठवली आणि तो अलीच्या ताब्यात देण्यात आला.

अली अगदी सावधगिरीने गड उतरत होता. त्याने जरी आश्वासकपणे कामगिरी फत्ते करण्याबद्दल किल्लेदाराला सांगितले होते तरीही त्याच्या मनात याबद्दल पूर्णतः खात्री नव्हती. तशी ती कुणाच्याही मनात नव्हतीच. इतर वेळेस गोष्ट वेगळी होती. पण यावेळेस मुघल सैन्याचा वेढा पडलेला होता. आणि अशा वेळेस कुणीही त्याची झडती घेतली असती आणि त्याच्याकडील खलिता त्यांच्या हाती लागला असता तर तो जीवानिशी गेला असताच, पण कामगिरीही अर्धवट राहिली असती. यासाठीच त्याला शक्य तितकी काळजी घ्यावी लागत होती.

काही वेळातच त्याला मुघल सैन्याच्या छावण्या दिसू लागल्या. दोन छावण्यांमधील अंतर हे जास्तीत जास्त दोन फर्लांगाचे. पण दैव अलीच्या बाजूने होते. छावणीत सैनिक तर दिसत होते पण काहीसे सुस्त. एका क्षणासाठी त्याचे मन कचरले. पण त्याला थांबून चालणार नव्हते. त्याची एका क्षणाची भीती ही अनेकांना उपासमारीने तडफडून मरण्यास कारणीभूत ठरणार होती. ज्या माणसांबरोबर आपण लहानाचे मोठे झालो, ज्यांच्या घासातला घास त्यांनी आपल्या बरोबर खाल्ला त्या लोकांशी दगा करायचा? शक्यच नाही. स्वराज्यासाठी मरण आले तर जन्नत मिळणारच. अलीचे मनाने उभारी घेतली आणि त्याची पावले पुढे पडू लागली. दोन छावण्यामधून गेलो तर लोकांचे लक्ष जाणारच हे त्याच्या लगेचच लक्षात आले आणि त्याने एका छावणीच्या बाजूने पुढे सरकायला सुरुवात केली. लवकरच तो एका तंबूच्या जवळ पोहोचला. सैनिकांचे आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होते. अर्थात त्याला त्याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते. कसेही करून त्याला ती छावणी पार करून वेढ्यातून बाहेर पडायचे होते. एका ठिकाणी त्याला पहाऱ्यावरील सैनिक बाजूला झाल्याचे दिसले आणि त्याने त्याबाजूला आपली पावले वळवली. अगदी सावधगिरीने तो पुढे चालला होता. काही क्षणातच त्याने छावणी पार केली आणि तो सुटल्याचा श्वास घेतो न घेतो तोच त्याला आवाज आला.

“ए… कोन है? ठहेरो…!!!” आवाज आला तसा तो आहे त्या ठिकाणीच थांबला. पुढे पळाला असता तर नक्कीच तो सैन्याच्या हाती सापडला असता. त्याने एकदा अल्लाचे नाव घेतले आणि तो मागे वळला.

“ए… इधर आव…” पहाऱ्यावरील अधिकाऱ्याचा आवाज आला.

“जी हुजूर…” अली त्या अधिकाऱ्यासमोर उभा होता.

“कोन हो तुम… इधर कायको आया?” अधिकाऱ्याने दरडावून विचारले.

“हुजूर… इधर मै नही आया… मेरी भैसका बछडा आया…” अलीने बावळटपणाचा आव आणत सांगितले.

“भैस का बछडा?”

“जी हुजूर…”

“और तुम उसके पीछे आया?”

“जी हुजूर…”

“तुमको पता नही है क्या… यहां से आगे जाना मना है?”

“हुजूर… मेरेको पता है पर उसको पता नही है…” अली अधिकाऱ्याच्या नजरेला नजर देत उत्तरला.

“नाम क्या है?” अधिकाऱ्याने पुढचा प्रश्न केला.

“छोटू हुजूर…” अलीच्या चेहऱ्यावर बावळटपणाचे भाव पुरेपूर दिसून येत होते.

“छोटू? ये कैसा नाम है?”

“हुजूर… अभी छोटा है ना… इसलिये सब छोटू बोलते है…”

“अबे चूप… तुम तो छोटा नही दिखता…” अधिकारी काहीसा वैतागला.

“हुजूर… ये मेरा नही, उस बछडेका नाम है…”

“क्या पागल हो? मैने तुम्हारा नाम पुछां है…” अधिकारी पूर्णच वैतागला.

“हुजूर… मेरा नाम अली है… अली हसन…”

“तुम मुसलमान हो? रहेते कहां हो?” अधिकारी काहीसा नरम पडला.

“हुजूर… वो झोपडे है ना? वहीच…” दूरवर विरुद्ध बाजूला बोट दाखवत अलीने सांगितले.

“चलो जाव इधरसे… नही तो अल्ला को प्यारे हो जावोगे… भागो…” अधिकाऱ्याने फर्मावले आणि अलीने मनोमन अल्लाचे आभार मानले. किल्लेदाराने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी जवळपास अर्धी फत्ते झाली होती.

वेढ्यातून बाहेर पडल्यावर मात्र अलीने एक क्षण देखील वाया घालवला नाही. त्र्यंबकगडाखाली तो पोहोचला त्यावेळेस जवळपास अंधार पडला होता. रात्रीच्या वेळेस गडाचे दरवाजे काही केल्या उघडले जाणार नाहीत हे तो पक्के जाणून होता. त्यामुळे मग त्याने गडाच्या पायथ्याशी महादेवाच्या मंदिराजवळ आराम करण्याचा निर्णय घेतला.

एकतर थंडीचे दिवस. त्यात अंगावरील कपडे देखील बेताचेच आणि रात्रीचा अंधार. बरे या भागात रात्रीचा बिबटे, तरस अशा जनावरांचा वावर. शेवटी अल्लाचे नाव घेत त्याने महादेव मंदिराचा दरवाजा ठोठावला. काही वेळ शांततेच गेला आणि नंतर मुख्य दरवाज्याजवळ त्याला हालचाल ऐकू आली.

“कोन ए?” आतून आवाज आला.

“मै अली…, रामशेजवरनं किल्लेदाराचा खलिता आनलाय. त्रंबकगडावर देन्यासाठी. पन रातच्याला किल्ल्याचे दरवाजे बंद ऱ्हातेत…” अलीने सगळे खरे सांगून टाकले. काही वेळ परत शांततेत गेला आणि परत आवाज आला.

“किती लोकं हायेत?”

“येकलाच हाये…” अलीने उत्तर दिले आणि दरवाजा उघडला गेला.
मंदिराचा पुजारी हातात मशाल घेऊन उभा होता.

“रामराम…” अलीने मुद्दाम सलामच्या ऐवजी रामराम म्हटले होते.

“रामराम… पन.., रामशेजला तर बादशाच्या फौजेचा वेढा हाये?” पुजारी काहीसा साशंक झाला.

“हा… म्हनून तर किल्लेदाराने मदत मागितली… ही पहा संबाजी राजाची खून…” अलीने पुजाऱ्याला किल्लेदाराने त्रंबकच्या किल्लेदारासाठी दिलेली खुणेची मुद्रा दाखवली आणि पुजाऱ्याचा संशय मिटला.

“वाईज धीर धर… तुज्या राहन्याची व्यवस्था करतो…” अलीला दारातून आत घेत आणि मंदिराचा दरवाजा बंद करत पुजारी त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी निघून गेला. काही वेळाने पथारी आणि घोंगडी घेऊन तो परत आला.

“ह्ये घे… आन त्या कोपऱ्यात मांड पथारी. पहाटेला कोंबडा आरवला की गडावर जा… आता आराम करून घे…”

“लई उपकार झालं…” अलीने त्याचे आभार मानले.

“अरे… संबाजी राजाचा शिपाई तू… येवढं तर करूच शकतो ना…” असे म्हणत पुजारी निघून गेला आणि अलीने पथारीवर अंग टाकले.

क्रमशः

झुंज भाग १०

झुंज भाग १०

जवळपास दोन दिवस दमदमा जळत होता. हळूहळू त्याची आग विझत होती तसाच खानाचा चढलेला पाराही ओसरत होता. त्याच्या मनातील संतापाची जागा असूयेने घेतली. बादशहाने केलेला त्याचा अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. त्याने घेतलेल्या संपूर्ण मेहनतीवर बादशहाच्या एका खलित्याने पाणी फिरवले. आता जो कुणी नवीन सरदार त्याची जागा घेणार होता त्याला परत पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागणार होती. आणि हीच गोष्ट त्याच्या मनातील राग शांत करण्यास कारणीभूत ठरली.

नवीन येणाऱ्या सरदाराची वाटही न पाहता खानाने परतण्याची तयारी सुरु केली. या कालावधीत किल्ल्याचा वेढा काहीसा ढिल्ला पडला. खानाने आपले पूर्ण लक्ष काढून घेतले होते.

किल्ल्यावरून सैन्यात धावपळ दिसत होती पण त्यात कुठेही चैतन्याचा लवलेशही नव्हता. ही गोष्ट किल्लेदारासाठी काहीशी आश्चर्यकारक आणि काहीसी न उमजणारी होती. तो सैन्याच्या हालचालींकडे निरखून पाहू लागला आणि त्याच्या मनात एक विचार चमकला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने सभा बोलावली.

“गड्यांनो… दोन दिसापासून खानाच्या सैन्यात लगबग दिसून ऱ्हायली. त्याचा मनसुबा तुमी समद्यांनी हानून पाडला. या दोन दिसांमधी त्याच्याकून कायबी उत्तर आलं नाई. त्याच्या तोपाबी थंडच हुत्या. पन आपल्याला बेसावध राहून चालायचं नाई. कारन अजूक त्यानं गडाचा वेढा उठीवला नाई. तवा दोन जनांनी रातच्याला जाऊन सैन्याची बातमी घिवून यायची हाये. काम लई जोखमीचं हाय… सैन्याच्या हाती गावले त जीत्ते परत यायचे नाईत. तुमच्या पैकी कोन ह्ये काम अंगावर घ्यायला तयार हायेत त्यांनी पुढं या…” किल्लेदार बोलायचे थांबला तसा जवळपास सगळीच माणसे पुढे सरकली. आपल्या लोकांच्या या कृतीचा किल्लेदाराला अभिमान वाटला.

“आरं समदेच गेलेतर मंग हितं कोन ऱ्हाईल?” किल्लेदार हसत म्हणाला आणि मग त्याने दोघांची निवड केली. दोघेही अगदीच किरकोळ शरीरयष्टीचे होते.

रात्रीच्या अंधारात दोन सावल्या गडावरून खाली उतरत होत्या. प्रत्येकाने अंगावर घोंगडी पांघरली होती. त्यामुळे रात्रीच्या कुट्ट अंधारात दोघेही हरवले होते. दोघांचेही डोळे जरी अंधाराला सरावले होते तरी त्यांना सावधगिरी बाळगावी लागत होती. एक चुकीचे पाऊल आणि समोर मृत्यू हे अधोरेखित होते. तसे दोघांपैकी कुणीही मृत्यूला घाबरणारा नव्हता पण त्यांचा मृत्यू हा किल्लेदारासाठी नुकसानदायक ठरणार होता. आणि याच एका कारणाने दोघेही अगदी काळजीपूर्वक हालचाल करत होते. एरवी एकदीड तासात पूर्ण गड उतरणारे ते शूर शिपाई आज मात्र प्रत्येक पाऊल आधी कानोसा घेऊन टाकत होते.

काही वेळातच त्यांना खानाच्या वेढ्यातील एक छावणी दिसू लागली. छावणीत एकूण सहा तंबू उभारण्यात आले होते. त्यातील फक्त एक तंबू काहीसा लहान आणि बाकी जरासे मोठे होते. लहान तंबूसमोर दोनजण पहारा देत होते. म्हणजेच तो एखाद्या अधिकाऱ्याचा असणार यात शंका नव्हती. मोठ्या तंबूसमोर मात्र एकेक जण दिसून येत होता. बहुतेक ते सैनिकांना आराम करण्यासाठी उभारण्यात आले होते. इतर पहारा देखील दिसत होता पण त्यांच्यात कोणतीही सावधगिरी दिसून येत नव्हती. तसेही यावेळेस गडावरील दोघांनाही देण्यात आलेले काम हे फक्त बातमी मिळविण्याचे होते. त्यामुळे पहारेकऱ्यांचा जिथपर्यंत आवाज येईल त्यापेक्षा पुढे जायचे नाही अशी सक्त ताकीद किल्लेदाराने दोघांनाही दिली होती.
काही वेळ गेला आणि पहाऱ्यावरील एकाने शेकोटी पेटवली. थंडीचा कडाका वाढतच होता त्यामुळे एकेक करून पहाऱ्यावरील शिपाई शेकोटीभोवती जमू लागला. तसेही इतकी मोठी फौज असताना कोणताही प्राणी जवळ येईल याची सुतराम शक्यता नव्हती.

हळूहळू शेकोटीने चांगलाच पेट घेतला आणि प्रत्येक शिपाई हात शेकून घेऊ लागला. हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरु झाले. प्रत्येक शब्द दोघाही हेरांना स्पष्टपणे ऐकू येत होता.

“काय रे… सरदार कामून चिडले व्हते?” एका शिपायाने विषय काढला.

“अरे… लय मोठा किस्सा हाय त्यो…” दुसऱ्याने तोंड उघडले.

“किस्सा?”

“हां मंग…! आपला सरदार हाय नव्हं, त्याला बादशाचा हुकुम आला. परत बोलीवला हाय… आन निस्ता बोलीवला न्हाई तर लय श्या दिल्यात म्हने बादशाने खलीत्यात. सरदारानं त्यो काय कुणाला दावला बी नाई. आन आता चार सा दिवसात फतेखान येनार हाय.” त्या शिपायाने जितके माहित होते तितके सांगण्याचा प्रयत्न केला.

“ह्ये येक लैच चांगलं झालं बग…” पहिला शिपाई उद्गारला.

“काय चांगलं झालं?” तिसऱ्या शिपायाने मध्येच तोंड उघडले.

“आरं ह्यो सरदार… लय हरामी… आपल्या देखत आपल्या देवाचे मंदिर फोडले. माह्या मागं बायका पोरं नसती ना, त्याला तितंच आडवा केला असता…” पहिल्या शिपायाच्या बोलण्यात खानाबद्दलचा राग चांगलाच दिसून येत होता.

“ह्या ह्या ह्या… कायबी बोलून ऱ्हायला… तू कुटं, त्यो खान कुटं..!!! तुज्यासारखे उजूक धा गेलेना चालून त्याच्या अंगावर तर त्या समद्यांना पानी पाजन त्यो…” तिसऱ्या शिपायाने पहिल्या शिपायाची पूर्णतः खिल्ली उडवली.

“हां… त्ये बी खरं हाय म्हना… साला राक्षस हाय पुरता…” पहिल्या शिपायाने माघार घेतली.

“आरं… बाकी त्ये काय बी असू दे… पुढचे चार सा दिस आपल्याला आराम हाय… जवर नवीन सरदार येत नाई तवर काय घोर नाई बग…” चौथा शिपाई म्हणाला आणि सगळ्यांनी त्यावर होकारार्थी माना हलवल्या.

“म्या काय म्हनतो… देवानच सरदाराला अद्दल घडीवली असनार… तुमी देवाची मूर्ती फोडनार आन त्यो तुमाला यवस्थित ठिवनार व्हंय? आतापोतूर आपन सरदारासंग काय कमी लढायात भाग घ्येतला? कोनच्याच लढाईत हार झाली नाई. पन आज दोन वर्स झालं, येक पाऊल सुदिक पुढं पडून नाई ऱ्हायलं.” पाचव्या शिपायाने पहिल्यांदाच तोंड उघडले.

गडावरील दोघाही हेरांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलला. त्यांना किल्लेदाराने दिलेली कामगिरी अगदी सहजपणे पार पडली होती. अजून काही वेळ थांबून परतण्याचा दोघांनीही निर्णय घेतला.

पहाटेच्या वेळेला किल्ल्याच्या दरवाज्यावर खुणेचा आवाज आला आणि दरवाज्याची लहानशी झडप उघडून तिथे एक चेहरा दिसू लागला. खुणेचा आवाज म्हणून त्याने एक शिळ घातली आणि त्याला लगेचच प्रत्युत्तर मिळाले. क्षणाचाही विलंब न करता झडप बंद झाली आणि पुढच्याच क्षणाला किल्ल्याचा लहान दरवाजा उघडला गेला. कामगिरीवर गेलेले दोघेही जण त्यातून आत शिरले. काही पायऱ्या चढून ते वर आले तो त्यांच्या पुढे स्वतः किल्लेदार उभा होता.

“काय रे माह्या वाघांनो… काय खबर हाय?” त्याने अगदी बारकाईने दोघांच्याही चेहऱ्याकडे निरखून पाहत प्रश्न केला.

“किल्लेदार… देव आपल्याच बाजून हाय…” दोघांपैकी एकाने अगदी खुशीत उत्तर दिले आणि किल्लेदार खुश झाला. नंतर एकेक करत दोघांनीही पूर्ण बातमी किल्लेदाराला दिली आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

“वा रं माह्या पठ्ठ्यांनो… लैच मोठं काम केलं हाये तुमी… जा आता उल्शिक आराम करा…” त्याने दोघांच्याही पाठीवर शाब्बासकीची थाप देत त्यांना आराम करायला पाठवले.

“किल्लेदार… आता तुमीबी आराम करा… दोन दिस झालं, तुमीबी काईच आराम केला नाई…” तात्या उत्तरला आणि ते खरेही होते. दोन दिवसांपासून रात्रीची झोप अशी किल्लेदाराला माहितीच नव्हती. त्यामुळे त्यानेही तात्याच्या बोलण्याला मान देत आपली पावले वाड्याकडे वळवली.

क्रमशः

झुंज भाग 9

झुंज : भाग ९

खान आज खूपच खुशीत होता. लाकडी बुरुजाचे काम पूर्ण झाले होते. या बुरुजाची मजबुती कशी आहे हे खान जातीने लक्ष घालून पहात होता. इतक्या दिवसांच्या परिश्रमाचे त्याला मिळालेले हे फळ नक्कीच गोड होते. आता फक्त बुरुजावर तोफा चढवायच्या आणि जास्तीत जास्त चार दिवसात रामशेजवर चांदसितारा फडकवायचा याची त्याने मनाशी खुणगाठच जणू बांधली होती.

किल्लेदार मात्र मोठ्या काळजीत पडला होता. जो माणूस किल्ल्याच्या उंचीचा बुरुज आपल्या सैन्याकडून उभारून घेऊ शकतो तो किती चिवट असणार याची चांगलीच खात्री किल्लेदाराला आली होती. त्यामुळेच गडावर सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले होते. गडावरील लोकं जरी उघड उघड बोलून दाखवीत नव्हते तरी ते मनातून काहीसे हादरले होते. त्यातल्या त्यात एकच गोष्ट किमान अजून तरी समाधानकारक होती. ती म्हणजे इतके होऊनही किल्लेदार नाउमेद झालेला नव्हता. त्याच्या प्रत्येक सभेत, चर्चांमध्ये तो पहिल्या इतकाच उत्साही होता.

“आवो…! दोन घास खाऊन घ्या…!” किल्लेदाराला चिंतेत पाहून त्याच्या बायकोने म्हटले.

“आं… काई म्हनालीस?” किल्लेदार बायकोच्या आवाजाने काहीसे भानावर आला.

“म्हनलं… आदी दोन घास खाऊन घ्या…!!!”

“नाई… खान्यावरची वासनाच उडलीय बगं… येकदा का तोपा चढल्या बुरजावर मंग काय खरं नाई…!!!” किल्लेदाराच्या स्वरात काहीसा हताशपणा दिसून येत होता. जवळपास दोन वर्षांपासून कुणालाही गड उतरता आला नव्हता. खानाने दिलेला वेढा जराही ढिल्ला पडला नव्हता. किल्ल्यावर जमविलेली रसदही हळूहळू संपत होती. जास्तीत जास्त महिना दोन महिने पुरेल इतके धान्य अजूनही किल्ल्यावर होते पण खानाने बनविलेला हा लाकडाचा बुरुज किल्लेदारासाठी राक्षस बनला होता. त्याच वेळेस संभाजी महाराजांच्या पाच पाच मोहिमा चालू असल्यामुळे त्यांच्याकडूनही मदत आलेली नव्हती.

“तुमास्नी काय वाटलं… मला काय ह्ये ठावं नाय? पर आपल्याकडं समदे बघू ऱ्हायलेत. काय झालं तरी खानाला ह्यो किल्ला आसाच द्यायचा नाई.” शेवटचं वाक्य तिने त्वेषात उद्गारले. किल्लेदाराला पुन्हा एकदा आपल्या बायकोचा अभिमान वाटला.

पुन्हा एकदा किल्लेदाराने सगळ्या लोकांना बोलावले. आजची रणनीती नेहमीच्या रणनीती पेक्षा खूपच वेगळी होती. आज किल्लेदाराने तोफेच्या हल्ल्यात तटबंदीला खिंडार पडले तर कुणी कुठे थांबायचे आणि खानाच्या सैन्याला कापून काढायचे याची अगदी बारकाईने आखणी केली होती. आता प्रत्यक्ष लढाई होणार यात काही संशय उरला नव्हता. प्रत्येकाने आपले शीर हातावरच घेतले होते.

खानाने देखील सभा बोलावली. प्रत्येकाला त्यांची कामे आखून दिली. दोन दिवस तोफा बुरुजावर नेण्यास लागणार होते. त्यानंतरचे दोन दिवस फक्त त्या तोफांचा किल्ल्यावर मारा करून किल्ल्याचे आणि तेथील लोकांचे जितके शक्य होईल तितके नुकसान करायचे आणि नंतर एकदम हल्ला चढवायचा असा बेत नक्की करण्यात आला. ही आखणी चालू असतानाच एक दूत घाईघाईत तिथे येऊन हजर झाला.

“हुजूर… बादशा आलमगीर का आपके नाम संदेश आया है…” त्याने खानाला सांगितले.

“हां… उसे अंदर लेके आव…!” खानाने फर्मावले.

काही वेळातच बादशहाचा दूत खानासमोर हजर झाला. त्याने खानाला लवून कुर्निसात केला आणि आपल्या जवळील खलिता खानाच्या हाती दिला. खानाने तो आपल्या हाती घेत त्याला खुणेनेच जाण्याची आज्ञा दिली. सगळे जण बादशहाचा काय निरोप आहे हे ऐकायला उत्सुक झाले होते.

खानाने मनातल्या मनात खलिता वाचायला सुरुवात केली. सगळे जण अगदी टक लावून त्याच्याकडे पहात होते. खान जसजसा खलिता वाचत होता तसतसे त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. अगदी काही वेळापूर्वी अगदी खुशीत असलेला खान आता चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याचा तो चेहरा पाहून सभेला उपस्थित असलेल्यांपैकी एकाचीही खानाला काही विचारण्याची हिंमत झाली नाही. खानही काही बोलत नव्हता आणि इतर कुणी काही विचारण्याची हिम्मत करत नव्हते. नक्कीच बादशहाकडून असा काहीतरी हुकुम आला होता ज्याने खानाचा अभिमान डिवचला गेला होता. शेवटी खानाचा आवाज शांततेचा भंग करीत वातावरणात घुमला.

“तुम सब जाव…!!!” काहीशा घुश्यात खानाचा आदेश आला आणि काहीही न बोलता प्रत्येकजण शामियान्यातून बाहेर पडला. आता मात्र खान चिडलेल्या वाघासारखा येरझाऱ्या घालत होता. आतापर्यंत कितीतरी वेळा त्याने खलिता वाचला होता आणि प्रत्येक वेळेस त्याचा संताप वाढतच होता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी संतापाची भर ओसरली. तसेही चिडून संतापून घडणाऱ्या घटनेत काहीही फरक पडणार नव्हता. पुन्हा एकदा त्याने पहारेकऱ्याला आवाज दिला आणि परत सभा बोलावली.

काही वेळातच सर्वजण खानाच्या शामियान्यात हजर होते. एव्हाना खानाचा चेहरा बराच शांत झाला होता. आवश्यक ते सर्वजण जमल्याची खात्री झाल्यावर खानाने बोलायला सुरुवात केली.

“शहंशहा आलमगीरका फर्मान आया है… मुझे वापस आने का हुकुम मिला है पर अभी जंग खतम नही हुई. मेरी जगह फतेह खान लेगा…” खान बोलायचा थांबला. खलित्यातील सगळ्या गोष्टी सांगणे मात्र त्याने टाळले. त्याचे हे बोलणे चालू असतानाच बाहेर गलका वाढला. तेवढ्यात दारावरील पहारेकरी आत आला.

“क्या है? इतना शोर कैसा?” खानाने संतापून पहारेकऱ्याला विचारले.

“हुजूर… बाहर हवालदार आये है, आपसे मिलना चाहते है…” त्याने मान खाली घालून उत्तर दिले.

“ठीक है, भेजो अंदर…” खानाने फर्मावले. काही क्षणातच हवालदार खानापुढे हजर झाला.

“बोलो हवालदार…”

“हुजूर… एक बुरी खबर है…” त्याने काहीसे घाबरत सांगितले. आता आणखीन कोणती वाईट बातमी आली याचा खानाला विचार पडला. हवालदार मात्र मान खाली घालून फक्त उभा होता.

“रुक क्यो गये? बोलो…” खानाचा आवाज वातावरणात घुमला.

“हुजूर… हमने जो दमदमा बनाया है, उसे आग लग गयी… और वो पुरी तरहसे बरबाद हो गया है…” त्याने बिचकत बिचकत सांगितले.

“क्या? कैसे हुवा ये सब?” खान ओरडलाच.

“हुजूर… किलेपरसे एक गोला आया और…” त्याला पुढचे बोलण्याची गरजच पडली नाही. खान धावतच बाहेर आला. त्याच्या डोळ्यासमोर त्याची वर्षभराची मेहनत राख होताना दिसत होती. मुघल सैन्यात हाहाकार मजला. आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. जवळपासचे कित्येक सैनिक आपला जीव वाचवीत दूर पळाले. कित्येक जण आगीत भाजून निघाले. दमदम्यापासून खानाचा शामियाना बराच दूर असून देखील त्यालाही त्या आगीची धग स्पष्ट जाणवत होती. खानाच्या डोळ्यात अंगार फुलला. खानाचा बराचसा दारुगोळा आगीत स्वाहा झाला. आणि त्याच वेळेस किल्लेदार मात्र तुका, सदू आणि त्याच्या साथीदारांना शाब्बासकी देत होता. आज खऱ्या अर्थाने किल्ल्यावर दिवाळी साजरी होत होती.

क्रमशः

झुंज भाग 8

झुंज : भाग ८

किल्लेदार नेहमीप्रमाणे जय्यत तयारीनिशी तटावर हजर होता. खानच्या सैन्यात वाढलेली हालचाल त्याला काहीसे व्यथित करत होती. कारण त्याचा अर्थ होता की नवीन तयारीनिशी खान परत किल्ल्यावर आक्रमण करणार. आता पर्यंत जरी त्याचे मनसुबे सफल झालेले नसले तरी युद्धामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नव्हते. त्यामुळेच जराही गाफील राहणे किल्लेदाराला मंजूर नव्हते. दोन घटका होऊनही अजून किल्ल्यावर चढाईचा प्रयत्न झालेला नव्हता. सैन्याची हालचाल तर दिसत होती. किल्लेदाराच्या चेहऱ्यावर चिंता पूर्णपणे दिसून येत होती. जर संपूर्ण सैन्याने आक्रमण केले तर किल्लेदाराची मुश्कील वाढणार होती.
चार घटका झाल्या आणि खानाचे सैन्य आजूबाजूला पांगू लागले. गडावर चढण्याऐवजी ते गडाच्या विरुद्ध दिशेला कूच करत होते. खानाने माघार घेतली म्हणावे तर वेढा कायम होता. त्यामुळे खानाची यामागे काय रणनीती असावी याचा किल्लेदाराला काहीच अंदाज येईना.

किल्लेदाराचा संपूर्ण दिवस फक्त वाट पाहण्यात गेला. या संपूर्ण दिवसात त्याने जेवणाचीही पर्वा केली नव्हती. थोड्या थोड्या वेळात किल्ल्याच्या संपूर्ण भागात जाऊन त्याची पाहणी चालूच होती आणि तरीही त्याला जे दिसत होते त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. खान आजूबाजूला जाऊन नवीन सैन्य घेऊन येतोय असे समजावे तर त्याच्याजवळ असलेले सैन्यही काही कमी नव्हते. बरे जादा कुमक मागवायची तर त्यासाठी संपूर्ण सैन्याची गरज ती काय? चार सहा घोडेस्वार देखील त्यासाठी पुरेसे होते. वेढा तर जराही ढिल्ला पडलेला दिसत नव्हता. शेवटी विचार करून किल्लेदाराचे डोके दुखू लागले पण खान काय करतो आहे याचा काहीही बोध त्याला होईना.

संध्याकाळ झाली. खानाचे पांगलेले सैनिक परत आपापल्या ठिकाणी गोळा झाले पण त्यांच्याकडून किल्ल्यावर आक्रमण होण्याचे कोणतेही चिन्ह दिसेना. सूर्य मावळला तसे गार वारे वाहू लागले. गारठा क्षणाक्षणाला वाढू लागला. पण किल्लेदाराला मात्र तो जाणवत नव्हता. त्याचे लक्ष फक्त आणि फक्त किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुगल सैन्यावर होते. रात्र झाली तसा त्याने त्याच्या सहकाऱ्याला आवाज दिला.

“तात्या…”

“जी किल्लेदार?” तात्या काहीसा धावतच त्याच्या पुढ्यात आला.

“आज काई म्या वाड्यावर जानार नाई… कुनाला तरी वाड्यावर धाडा. आन माह्यासाठी हितच भाकर बांधून आना… ह्यो खान येवढा सरळ मानुस नाई. त्यो काय ना कायतरी डाव टाकनार. आपन गाफील ऱ्हायलो तर मंग किल्ला त्याच्या ताब्यात जायला कायबी येळ लागायचा नाई…”

“व्हय जी… पर म्या काय म्हनतो, आमी हाय नव्हं त्याच्यावर पाळत ठिवायला?” तात्यानं चाचरत प्रश्न केला.

“आरं त्ये समदं ठीकच हाय पर म्या हितं ऱ्हायलो तर समदे लोकं डोळ्यात तेल घालून पहारा देतीन…” किल्लेदाराने तात्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसे किल्लेदाराचा हुकुम मोडणे तात्याला शक्यही नव्हते त्यामुळे काही न बोलता तो स्वतःच किल्लेदाराचे जेवण आणण्यासाठी वाड्याकडे रवाना झाला.

संपूर्ण रात्र किल्लेदार आणि त्याचे सहकारी अगदी डोळ्यात तेल घालून पहारा करत होते पण खानाच्या फौजेने कोणत्याही प्रकारची चढाई केली नाही. शेवटी पहाट झाली तशी किल्लेदार आपल्या सहकाऱ्यांवर टेहाळणीची जबाबदारी टाकून वाड्याकडे निघाला.

किल्लेदार घरी पोहोचला त्यावेळेस त्याची बायको वाटच पहात होती.

“काय मंडळी… आजूक वाट बघतायसा?” त्याने काहीशा थट्टेच्या सुरात विचारले.

“मंग… धनी जागे ऱ्हायल्यावर आमच्या डोळ्याला डोळा सुदिक लागनं व्हय?”

“आवो… पर आमची जिंदगी आमची नाई, या रयतेची हाये… त्यावर रयतेचा अधिकार…”

“ठावं हाय मला पन आमची जिंदगी तर तुमची हाये नव्हं…!!!” किलेदाराची बायको लाजत लाजत म्हणाली आणि किल्लेदाराचा पूर्ण शीण नाहीसा झाला. एकतर सध्याच्या काळात जी परिस्थिती उद्भवली होती त्यात स्वतःसाठी फक्त असे काहीसे क्षणच चोरावे लागत होते.

“बरं मंडळी… आम्हास्नी आमची हार कबूल हाय…” किल्लेदार बायकोकडे पहात मिश्किलपणे म्हणाला आणि त्याच्या खाली मान घातलेल्या बायकोने तोंड वर केले.

“नाई… काय बी झालं आन समोर कुनीबी असलं तरी तुमी हार मानायची नाई. तुमास्नी शिवाजी राजाची शपथ हाये…” तिच्या चेहऱ्यावर किल्लेदाराने वापरलेल्या ‘हार’ या शब्दाबद्दलची नापसंती ठळकपणे दिसून येत होती. यावर काय बोलावे हेच त्याला कळेना.

“हंग अस्सं… आता बादशा आला तरी हार माननार नाई… आता तू बी उल्शिक आराम करून घे.” सांगत किल्लेदार आराम करण्यासाठी निघून गेला आणि त्याची बायको मात्र उठून कामाला लागली.

दिवसांमागून दिवस जात होते. वेढा कायम होता. अधूनमधून तोफाही धडधडत होत्या पण त्याची त्रिव्रता नसल्यातच जमा होती.

खानाचा तळ अजूनही हललेला नव्हता. आणि एक दिवस किल्लेदाराला काही सैन्य परत येताना दिसले. जाताना खाली हाथ गेलेले खानाचे सैनिक येताना काहीतरी घेऊन येत होते. अनेक बैलगाड्या, घोडागाड्या यावर लाकडे आणली जात होती. किल्ल्याच्या आजूबाजूचा हिरवा परिसर काहीसा कमी होत होता. आजूबाजूला दिसणाऱ्या हिरव्या रंगाची जागा तपकिरी काळ्या रंगाने घेतली होती. याचा अर्थ साफ होता. लढाई अजूनही संपलेली नव्हती. उलट ती आता जास्त आक्रमकपणे लढली जाणार होती.

गडाच्या पायथ्याशी लाकडांचे ढीग पडू लागले. कित्येक जण त्या लाकडांपासून फळ्या / खांब तयार करू लागले. खान आता जास्तच सक्रीय होऊन लाकूडकाम करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवू लागला. या काळात त्याने किल्ल्यावर करण्यात येणारे आक्रमण पूर्णपणे थांबवले होते. जसजसे दिवस जाऊ लागले, किल्लेदाराला खान काय करतो आहे याचा अंदाज येऊ लागला. त्याने लगोलग तुका आणि सदूला बोलावले.

“गड्यांनो… वर्स होत आलंय पन खान अजूकबी हितंच हाये. त्यो काय करतोय ते तुमी बी बघितलं. त्यानं जर गडाच्या उंचीचा बुरुज बनविला मंग आपल्याला नमतं घ्यावं लागन. त्यापरीस आपन त्याचा ह्यो बेत हानून पाडायचा. आनी त्यासाठी आपल्याला लाकडाची तोप बनवावी लागन. तुका हाये ना तुज्या ध्यानात?”

“व्हय जी…” तुकाने सांगितले.

“मंग लागा कामाला…” किल्लेदाराने हुकुम सोडला आणि दोघही इतर काही जणांना मदतीला घेऊन कामाला लागले. जवळपास २५ दिवसात पहिली तोफ तयार झाली आणि किल्ल्यावरील लोकांमध्ये एकच चैतन्य संचारले. संभाजी महाराजांनी पाठविलेला दारुगोळा आता सगळ्यात जास्त उपयोगी पडणार होता. इकडे लाकडी बुरुजाचे कामही खूप जोरात चालू होते. खानाच्या सैन्याचे संपूर्ण लक्ष फक्त लाकडी बुरुज बनवण्यावर होते. बुरुज वर वर चढत होता आणि खान मनातून खुश होत होता.

नवीन बनविलेली लाकडी तोफ तटाजवळ आणली गेली. चामड्याच्या खळग्यात गोळा ठेवण्यात आला आणि किल्लेदाराचा हुकुम होण्याची सगळेजण वाट पाहू लागले. किल्लेदाराने हुकुम दिला. गोळा सुटला आणि आपले श्रम उपयोगी पडले याचे समाधान तुका आणि सदूच्या चेहऱ्यावर उमटले. पण त्यांचा हा उत्साह फक्त काही क्षणच टिकला. गोळा ज्या ठिकाणी पडला तिथपासून खानाचे सैन्य बरेच लांब होते. जी गत खानच्या तोफगोळ्यांची होत होती काहीसी तशीच गत या गोळ्याची देखील झाली. त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर नैराश्य दिसू लागले.

“भले शाब्बास !!!” किल्लेदाराची शाब्बासकीची थाप तुकाच्या आणि सदूच्या पाठीवर पडली. आपले श्रम वाया गेले असे त्यांना वाटत होते पण किल्लेदाराची शाब्बासकी मिळतात त्याच्या मनात आलेले नैराश्य कुठल्या कुठे पळाले.

“गड्यानो… मला तुमचा अभिमान हाये… जवर तुमच्यासारखी मानसं संबाजी राजासंग असतील, तवर स्वराज्यावर कुनी बी चालून आला तरी त्याला मागं फिरावं लागंन. आज गोळा हितं पडला हाये. आपन उल्षिक प्रयत्न केला त त्यो सैन्यापोतूर बी पोचन. या तोपेचा पल्ला कमी पडू ऱ्हायला पन त्यावर बी आपन कायतरी उपाय शोधू…” किल्लेदाराच्या शेवटच्या वाक्यात काहीशी चिंता दिसून येत होती. पण त्याचा त्याच्या माणसांवर पूर्ण विश्वास बसला होता. पण नवीन तोफ बनवायची म्हटली म्हणजे परत काही दिवस जाणार होते. शेवटी खानाकडून हल्ला होईस्तोवर शांत राहायचे धोरण किल्लेदाराने स्विकारले. दुसरीकडे मात्र लाकडी बुरुजाचे काम अव्याहतपणे चालूच होते.

खानाचा किल्ल्याला वेढा पडून जवळपास दोन वर्ष होत आले होते. लाकडी बुरुजाचे कामही जवळपास पूर्ण झाले होते. जवळपास पाचशे माणसे एकाच वेळेस बुरुजावर उभे राहू शकतील इतका मोठा बुरुज बनविण्यात आला होता. खान जरी शत्रू होता तरी त्याच्या या बुरुजाबद्दल किल्लेदाराने मनोमन त्याचे कौतुक केले. पण आता त्याची चिंता अनेक पटीने वाढली होती. किल्लेदार जरी मनातून खचला नव्हता तरी खानाच्या या बुरुजाची तोड त्याला अद्याप मिळाली नव्हती त्यामुळेच तो काळजीत होता.

पण नवीन तोफ बनवायची म्हटली म्हणजे परत काही दिवस जाणार होते. शेवटी खानाकडून हल्ला होईस्तोवर शांत राहायचे धोरण किल्लेदाराने स्विकारले. दुसरीकडे मात्र लाकडी बुरुजाचे काम अव्याहतपणे चालूच होते.

खानाचा किल्ल्याला वेढा पडून जवळपास दोन वर्ष होत आले होते. लाकडी बुरुजाचे कामही जवळपास पूर्ण झाले होते. जवळपास पाचशे माणसे एकाच वेळेस बुरुजावर उभे राहू शकतील इतका मोठा बुरुज बनविण्यात आला होता. खान जरी शत्रू होता तरी त्याच्या या बुरुजाबद्दल किल्लेदाराने मनोमन त्याचे कौतुक केले. पण आता त्याची चिंता अनेक पटीने वाढली होती. किल्लेदार जरी मनातून खचला नव्हता तरी खानाच्या या बुरुजाची तोड त्याला अद्याप मिळाली नव्हती त्यामुळेच तो काळजीत होता.

क्रमशः

झुंज भाग 7

झुंज : भाग ७

गनीम तर अगदी तयारीने पुढे येत होता. परत एकदा अल्लाहू अकबरचा स्वर गगन भेदत जवळजवळ येत होता. यावर काहीतरी उपाय लवकरात लवकर करणे किल्लेदाराला गरजेचे होते आणि त्याचे डोळे चमकले. त्याने लगेचच आपल्या लोकांना आवाज दिला. अनेक उमदे तरुण त्याच्यापुढे हजर झाले.

“जी किल्लेदार…!” त्यातील एकाने आदबीने विचारले.

“आपले पोरं हाय नव्हं, त्यास्नी बोलवा.” किल्लेदाराने आज्ञा केली आणि काही वेळातच सगळे पोरं किल्लेदारासमोर हजर झाले.

“काय रे पोरांनो… आपल्या राज्यासाठी लढनार ना?” काहीसे हसत त्याने विचारले आणि सगळ्यांनी एकमुखाने होकार दिला.

“मंग आता असं करायचं. तुमची ती पाखरं मारायची गलोरी हाय नव्हं. ती घ्यायची आन या येनाऱ्या गनिमावर तानायची. एकेकाला टिपायचा. जवर त्यो कोसळत नाई तवर त्याला सोडायचं नाई… काय?” किल्लेदाराने आज्ञा दिली आणि पोरांना आनंद झाला. आज खऱ्या अर्थाने ते स्वराज्यासाठी, आपल्या संभाजी राजांसाठी प्रत्यक्ष युद्धात भाग घेणार होते.

“आन हा… ज्या कुनाला गोफन चालविता येते त्यांनी बी या पोरास्नी मदत करायची. ध्यानात ठिवा… येक बी मानुस नाय सुटला पायजेल.” किल्लेदाराने हुकुम सोडला. मुलांच्या बरोबरीने बायकाही युद्धात सामील झाल्या. सगळेजण किल्ल्याच्या चहूबाजूंनी तटावर आले आणि गोफण फिरायला सुरुवात झाली.
गनीम बराच पुढे आला होता. आपल्या माराच्या टप्यात येताच गलोरीतून एक छोटा दगड सुटला. एक सैनिक वर पहात पुढे येत होता. तो बरोबर त्याच्या नाकावर बसला. त्या छोट्याश्या दगडाला इतका वेग आलेला होता की त्या सैनिकाचे नाक फुटले. वेदनेने विव्हळत तो खाली वाकला आणि त्याचा तोल गेला तसा तो खाली कोसळला. बाकी सगळे काम उताराने चोख बजावले. दगडांवर ठेचकाळत जो जेव्हा थांबला तेंव्हा त्याच्या शरीरातून प्राण कधीच निघून गेले होते.

“हंग अस्सं… भले शाब्बास…!!!” किल्लेदाराने त्या मुलाला शाब्बासकी दिली आणि त्या चिमुरड्याची छाती अभिमानाने फुगली. हळूहळू गोफणीतून एकेक दगड सुटू लागला आणि वर येणारा एकेक जण खाली कोसळू लागला.

खान आपल्या काही निवडक लोकांसह चहुबाजूने आपल्या फौजेवर नजर ठेवण्यासाठी फिरत होता. जसजशी त्याची माणसे एकेक करून कोसळू लागली, तो पुरता चवताळला. या वेळेस वरून एकही मोठा दगड गडगडला नव्हता. आणि तरीही एकेक जण टिपला जात होता. आता मात्र डोंगर चढणाऱ्या सैनिकांचा धीर हळूहळू सुटत चालला. आपल्या बरोबर असलेला माणूस फक्त ओरडतो आणि कोसळतो इतकेच त्यांना दिसत होते. ना त्यांच्यावर एखाद्या शस्त्राचा वार ना रक्ताचे पाट. आणि तरीही एकेक करून वर चढणारे सैन्य कमी कमी होत होते. या वेळीही कित्येक जण किल्ल्याच्या अर्ध्या डोंगरावरच जायबंदी झाले. आता मात्र जीव वाचवायचा तर माघार घेणेच जास्त गरजेचे होते. माघारी पळून जाण्याशिवाय त्यांना पर्याय होताच कुठे?

आपले सैन्य माघार घेते आहे हे काही वेळातच करीमखानाच्या लक्षात आले. परत फिरणे म्हणजे स्वतःचा मान कमी करून घेणे होते. त्याने आपल्या घोड्याला टाच दिली आणि तो सगळ्यात पुढे झाला. वरून होणारा दगडांचा मारा बिलकुल कमी होत नव्हता. पण करीमखानाला मात्र आता कशाचीच फिकीर नव्हती. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, आणि ती म्हणजे कसेही करून किल्ल्यावर विजय मिळवायचा. त्याच्या पाठोपाठ पन्नास एक जणांनी आपले घोडे भरधाव फेकले. किल्लेदार हे सगळेच ताटावरून पहात होता. काही वेळासाठी त्याचे मन कचरले. जर यातील एकही जण किल्ल्याजवळ पोहोचला तर मुगल सैन्याचे मनोबल वाढणार होते. किल्ल्यावरून होणारा दगडांचा मारा अंगावर झेलत खान पुढे झाला आणि इथेच त्याने चूक केली. परत एकदा किल्ल्यावरून एक मोठी शिळा त्याच्या रोखाने गडगडत आली. करीमखानाच्या घोड्याने वेग घेतला असल्यामुळे ती चुकवणे त्याला शक्य होऊ शकले नाही आणि त्याचा तोल गेला. तो खाली पडतो न पडतो तोच आणखी एक दगड गडगडत आला आणि त्याच्या खाली करीमखान चिरडला गेला. आपल्या डोळ्यादेखत आपला सेनानायक पडलेला पाहून खानाच्या मागे असलेल्या सैनिकांचे धैर्य संपले.

“या खुदा…” करत एकेकाने आपले घोडे मागे फिरविण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत अनेक दगड आपले काम चोख बजाऊन गेले होते. जी गत करीमखानाची झाली होती काहीशी तशीच गत इतर बाजूंनी चाल करण्यासाठी गेलेल्या मुगल सैन्याची झाली होती. नाईक जायबंदी झाला होता, देशमुख दगडाखाली चिरडला गेला होता आणि दौलतखानाने पूर्णतः माघार घेतली होती. किल्ल्यावर चढाईसाठी गेलेली दोन हजाराची फौज देखील कुचकामी ठरली होती.

खान आपल्या तंबूत फक्त येरझाऱ्या घालत होता. त्याला आजही कोणतीच बढत मिळाली नव्हती. जवळपास सहाशे सैनिक कामी आले होते. पाचएकशे सैनिक गंभीर जखमी झाले होते. करीमखानाबरोबर गेलेल्या घोडदलापैकी एकही जण जिंवत परत आला नाही. दौलतखानाने वेळीच माघार घेतल्यामुळे त्याच्या बरोबर गेलेल्या सैन्याची मात्र जास्त हानी झाली नव्हती. आणि आजही किल्ल्यावरील एकही इसम साधा जखमीही झालेला नव्हता. याआधीही खानाला हा किल्ला घेता आला नव्हता आणि याही वेळेस त्याची गत पूर्वीसारखीच होती. त्यावेळेस किल्लेदार वेगळा होता, या वेळेस वेगळा. पण परिणाम मात्र एकच होता. खान पूर्ण हट्टाला पेटला. रोज खानाचे लोक किल्ल्यावर चढाई करण्यासाठी जात आणि त्यातील बरेचसे कमी होऊन माघारी येत. जवळपास दोन महिने हेच चालू होते. आता तर किल्ल्यावर मोठमोठ्याने होणारा शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा जयजयकार खानाच्या सवयीचा एक भाग झाला होता. दोन महिने प्रयत्न करूनही जेव्हा किल्ला हाती येत नाही याची खानाला खात्री झाली त्यावेळेस त्याने शेवटचा पर्याय वापरण्याचा विचार केला. हा पर्याय होता तोफांचा वापर.

क्रमशः

झुंज भाग 6

झुंज : भाग ६

खान यावेळेस मात्र कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसेच तो कोणत्याही परिस्थितीत किल्लेदाराला हलक्यात घेणार नव्हता. तसेही जो किल्लेदार आपल्या माणसांना साधी जखमही होऊ न देता एक हजाराची फौज परतवून लावू शकतो त्याच्या कल्पकतेला दाद देणे खानाला क्रमप्राप्तच होते. हाच विचार करत गेल्या १५ दिवसांपासून खान नीट झोपू देखील शकला नव्हता.

“हुजूर…” द्वारपालाचा आवाज आला आणि खानाची तंद्री भंग पावली… त्याने एकवार हुजऱ्याकडे पाहिले. तो खाली मान घालून उभा होता.

“आ गये सब?” खानाने विचारले.

“जी हुजूर…”

“अंदर भेजो…” हुजऱ्याला आज्ञा देत खान आपल्या जागेवर जाऊन बसला. काही वेळातच ७/८ जण खानाच्या शामियान्यात शिरले.

“बैठो…!!!” खानाचा हुकुम होताच प्रत्येक जण आपापल्या मानाप्रमाणे आसनस्थ झाला.

“करीमखान… इससे पेहेले हमे शिकस्त क्यो झेलनी पडी?” खानाने एकदम मुद्द्यालाच हात घातला.

“सरदार… मुझे इसकी सिर्फ एक वजह दिखती है… हमारी फौज सिर्फ एक तरफ थी…” काहीसे बिचकत करीमखान उत्तरला.

“बराबर…! लेकीन आज हम वो गलती नही करेंगे… आज शामतक किलेपर अपना चांदसितारा फडकेगा…” खान आढ्यतेने म्हणाला आणि सगळ्यांनी त्याच्या सुरात सूर मिसळला.

“करीमखान… तुम चारसौ लोग लेकर सामनेसे जाओगे… दौलतखान… तुम पाचसौ लोग लेकर पिछेसे हमला करोगे… देशमुख… तुम जंगलकी तरफसे पाचसौ सिपाई लेकर हमला करोगे और नाईक पाचसौ सिपाई लेकर जंगलकी दुसरी तरफसे हमला करेगा… एक बात सबको याद रखनी है… हर एक सिपाई दो तीन गज की दुरी बनाकर ही आगे बढेंगे.” खानाने आपली योजना सांगितली.

“बहोत बढीया सरदार… आज शाम या तो किलेदार आपके सामने होगा या उसका सर…” करीमखान म्हणाला आणि बाहेर पडला. त्याच बरोबर इतर सर्वजण देखील बाहेर पडले.

किल्ल्याच्या तटावरून पाहणी करणाऱ्या किल्लेदाराला आज खानाच्या फौजेमध्ये जरा जास्तच हालचाल दिसत होती. त्याचाच अर्थ आजच पुन्हा आपल्यावर आक्रमण होणार हे त्याने ओळखले. पण एक गोष्ट मात्र त्याला विचार करायला भाग पाडत होती. आणि ती म्हणजे त्याला कोणत्याही बाजूला खानाची फौज एकवटलेली दिसत नव्हती. याचाच अर्थ खानाने यावेळेस आक्रमण करण्यासाठी नवीन योजना आखली होती. एकाएकी त्याच्या मनात विचार आला. नक्कीच आपल्या किल्ल्यावर चहुबाजूने हल्ला करण्याचा खानाचा विचार असणार. पाहता पाहता किल्लेदार गंभीर झाला. कारण मोठ्या संख्येने जर चहुबाजूने आक्रमण झाले तर मात्र आपला निभाव लागणे कठीण आहे हे त्याने जाणले.

काही वेळातच मुगल सैन्याने चारही बाजूंनी डोंगर चढायला सुरुवात केली. यावेळेस सैन्य जास्तच होते, तसेच ते विखुरलेले होते. प्रत्येक सैनिक हा एकमेकांपासून बरेच अंतर राखून वर चढत होता. आता जर किल्ल्यावरून दगड लोटले तरीही ते चुकवणे त्यांना शक्य होणार होते आणि हाच सगळ्यात मोठा धोका किल्लेदाराने ओळखला.
क्रमशः

झुंज भाग 5

झुंज : भाग ५

खानाच्या तंबूत त्याच्या सह एकूण ६ जण मसलत करत होते. किल्लेदाराकडून आलेला निरोप खानाच्या अगदी जिव्हारी लागला होता. युद्ध तर अटळ होते. पण इतक्या दिवसात खानाला मराठ्यांच्या युद्धकलेची चांगलीच ओळख झालेली होती. आणि त्यामुळेच तो प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करत होता. तसे पाहिले तर एका नजरेत भरणारा किल्ला घ्यायला कितीसा वेळ लागणार? त्यातून त्याच्या आजूबाजूला दऱ्याखोऱ्याही नाहीत. गडावर देखील काहीशे माणसे. शस्त्रसाठाही तिथे कितीसा असणार? आणि तरीही त्याचे मन काहीसे साशंक होते. म्हणूनच त्याने किल्ल्यावर चढाई करण्यापूर्वी आपल्या अधिकाऱ्यांशी मसलत करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक जण आपापले मत मांडत होता पण एकमत होत नव्हते. शेवटी बऱ्याच वेळाने एक हजाराच्या फौजेनिशी हजारीने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर हल्ला चढवावा. आणि किल्ला ताब्यात घेऊन किल्लेदाराला कैद करून खानापुढे हजर करावे असे ठरले. खानालाही ही योजना पसंत पडली. एकतर त्याने दोन गोष्टी साध्य होणार होत्या. जे नुकसान होणार होते ते युद्धाच्या मानाने खूपच कमी असणार होते. आणि दुसरे म्हणजे ज्या किल्लेदाराने आपला हुकुम मानण्यास नकार दिला, त्याला कैद करून खानाचा अभिमान सुखावणार होता.

सकाळ झाली तसे हजारीने आपले सैन्य गोळा केले. जवळपास अडीचशे घोडेस्वार आणि साडेसातशे पायदळ गडाच्या पायथ्याशी जमा झाले. प्रत्येक जण हा कसलेला योद्धा होता. आजपर्यंतच्या अनेक लढायांमध्ये त्यांनी आपले शौर्य गाजवलेले होते. राजपुतांना पाणी पाजून आलेली सेना या छोट्याशा गडावर चाल करून जाणार होती. समोरासमोर लढाई सुरु झाल्यावर जास्तीत जास्त दोन तीन घटकेतच गड काबीज करून किल्लेदाराला खानापुढे हजर करू अशी शेखी हजारी मिरवत होता. स्वराज्यातील इतर गडांच्या तुलनेत या गडाची चढाई म्हणजे अगदीच किरकोळ म्हणता येण्यासारखी होती. चढणीचा रस्ता जरी लहान होता तरी चढण अगदीच अंगावर येणारी नव्हती.

सगळे सैन्य जमले आहे याची खात्री झाल्याबरोबर हजारीने सुरुवात केली.

“महान शहंशाह आलमगीर के सिपाहियो… आजतक आप जिस जंगमे उतरे हो, सिर्फ फतेह हासील की है, खुद आलमगीर शहंशाह को भी आपपर विश्वास है… और इसी विश्वास को आपको फिरसे साबित करना है… ये किला तो बहुत ही छोटासा है. आपके सामने ये आधे दिन भी टिक नही पायेगा… तो चलो, लेलो उसको अपने कब्जेमे. फेहेरावो उसपर चांदसितारा… काफिर किलेदार को जहन्नूम का रास्ता जो भी दिखायेगा उसे बादशहा खुद इनाम देंगे… अल्ला हु अकबर…” हजारीने केलेल्या वीरश्रीयुक्त भाषणाने प्रत्येक शिपायाच्या अंगावर मुठभर मास चढले. प्रत्येकाचे मन युद्धासाठी तयार झाले. आसमंतात ‘अल्ला हु अकबर’ चा स्वर निनादू लागला. मुघल सेनेच्या तुकडीने गडाच्या दिशेने कूच केले. हजार शिपायांचा तांडा छोट्याश्या किल्ल्याची धूळधाण करण्यासाठी सज्ज झाला होता. ‘अल्लाहु अकबर’च्या घोषणा गगनाला भिडत होत्या.

इकडे किल्ल्यावर मात्र अगदी पूर्ण शांतता पसरली होती. ना कोणता आवाज येत होता ना कोणती हालचाल दिसून येत होती. मुघल सैन्याच्या प्रत्येक शिपाई वर पहात गड चढत होता. किल्ल्यावरून काहीच आवाज होत नसल्यामुळे किल्लेदार आणि किल्ल्यावरील सैन्य पुरते घाबरले असून लढाई न करताच किल्ला आपल्या ताब्यात येणार याची जवळपास खात्रीच प्रत्येक सैनिकाला झाली होती. आणि याच आनंदात त्यांचा गड चढण्याचा वेग वाढला. सगळीकडे अल्ला हु अकबरच्या घोषणेबरोबरच धुळीचे लोट आसमंत झाकोळून टाकत होते.

मुघल सैन्याच्या तुकडीने जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर चढला आणि एकाएकी ‘हर हर महादेव’ चा जयघोष आसमंतात घुमला. हा जयघोष इतका मोठा होता की एक हजार माणसांच्या अल्ला हु अकबरच्या घोषणा देखील त्यापुढे कमजोर वाटू लागल्या. एकाएकी किल्ल्याच्या तटबंदीवर अनेक लोकं दिसू लागले. किल्लेदार घाबरून किल्ला आपल्या सुपूर्द करेल ही त्यांच्या मनातला विचार क्षणार्धात मावळला. काही वेळ होतो न होतो तोच ढगांचा गडगडाट व्हावा तसा आवाज ऐकू येऊ लागला. सोबत वरून धुळीचे लोळ पायथ्याच्या दिशेने झेपावू लागले. काय होते आहे हे लवकर हजारीच्या लक्षात देखील आले नाही. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेंव्हा वेळ निघून गेली होती. अनेक मोठमोठ्या शिळ्या त्यांच्या रोखाने गडगडत येत होत्या. त्यांचाच गडगडाट आसमंत भेदून राहिला होता. खानाच्या सैन्याला आता माघार घेणेही शक्य नव्हते. पुढे जावे तर वरून दगड धोंड्यांचा पाऊस. मागे फिरावे तर जागेचा आभाव. आणि पहिला धोंडा सर्वात पुढे असलेल्या शिपायांवर आदळला. ५/६ जण तर त्याखालीच चिरडले गेले. त्यांच्या तोंडून आवाजही फुटू शकला नाही. तो धोंडा मात्र त्याच्या मार्गात येणाऱ्या जवळपास पंचवीस तीस सैनिकांना स्वर्गाचा रस्ता दाखवूनच थांबला.

एकामागोमाग एक शिळा वरून खाली झेपावत होत्या. एक धोंडा चुकवावा तर दुसरा धोंडा समोर येत होता. त्याला चुकवावे तर त्याच्या धक्क्याने कोसळणारा सैनिक अंगावर येत होता. खानाच्या सैन्यात आता मात्र हाहाकार माजला. ‘अल्लाहू अकबर’ घोषणेची जागा किंकाळ्यांनी घेतली. जो तो वाट फुटेल तिकडे पळत सुटला. त्यातही कित्येक जण फक्त तोल सावरता आला नाही म्हणूनही आपला जीव गमावून बसले. सैन्याच्या या तुकडीचे नेतृत्व ज्या हजारीकडे होते तो तर कधीचाच आडवा झाला होता. जिकडे पाहावे तिकडे प्रेतांचा खच पडला होता. अगदी काही वेळातच खानाच्या १००० फौजेची पूर्ण वासलात लागली. आसमंत मुघल सैन्याच्या किंकाळ्या आणि गडावरील मराठा सैन्यःच्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयकाराने दणाणून गेला.

खानाचे सैन्य मागे फिरले हे जेव्हा किल्लेदाराने पाहिले त्यावेळेस त्याने लगेचच आपल्या लोकांना इशारा केला. त्याबरोबर गडावरून टाकण्यात येणाऱ्या दगडांचा पाऊस देखील पूर्णतः थांबविण्यात आला. गडावर एकच उत्साह संचारला होता.
चढाईवर गेलेल्या सैन्याच्या तुकडी मधील अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोकं सुखरूप परतले. जवळपास साडेतीनशे लोक कायमचे जायबंदी झाले. चारएकशे लोकं प्राणास मुकले तर दोनशे लोकं किरकोळ जखमी होऊन परत फिरले. अडीचशे घोडेस्वारामधील एकही व्यक्ती सुखरूप नव्हता. बरेच जण तर त्यांच्याच घोड्यांच्या पायाखाली तुडवले गेले होते. जवळपास १०० घोडे कायमचे जायबंदी झाले होते. आणि उरलेल्या घोड्यांपैकी कित्येक वाट फुटेल तिकडे पळून गेले होते.

खानासाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. सगळ्यात जास्त संताप त्याला या गोष्टीचा होता की, आपली १००० लोकांची फौज जाऊनही किल्ल्यावरील एकाही माणसाला साधी जखमही करू शकली नव्हती. किल्ल्यावरील लोकांचे मनोधैर्य चौपट वाढले होते, तर खानाच्या फौजेचे मनोधैर्य निम्म्याने कमी झाले होते. त्यातही पोटार्थी सैनिक आणि स्वराज्याच्या ध्येयाने लढणारे सैनिक यात फरक होताच की. शेवटी पूर्ण पंधरा दिवसांचा आराम करून नंतर परत नव्या जोमाने किल्ल्यावर आक्रमण करण्याचे खानाने ठरवले. पण या दिवसात किल्ल्याला दिलेला वेढा मात्र अजूनच सक्त करण्यात आला.

इकडे गडावर मात्र आनंदी वातावरण होते. मुघल फौज कितीही संख्येत आली तरी आपण तिला तोलामोलाची टक्कर देऊ शकतो हे प्रत्येक व्यक्तीच्या मनावर पूर्ण ठसले होते. किल्लेदारही सगळ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत होता. त्याच बरोबर अगदी दिवस रात्र त्याचा किल्ल्यावर वावर होत होता. गेल्या पंधरा दिवसात खानाच्या फौजेने कोणत्याही प्रकारे आक्रमण केलेले नसले तरी त्याचा तळही हलला नव्हता. म्हणजेच आज ना उद्या परत आपल्यावर आक्रमण होणार हे किल्लेदाराला चांगलेच उमजले होते.

खानाच्या तंबूत रोजच खलबते होत होती. आक्रमणाच्या अनेक नवनवीन योजना समोर येत होत्या. पण त्यातील कोणतीच योजना खानाला भरवशाची वाटत नव्हती. आता तो चांगलाच सावध झाला होता. विचार करता करता त्याला एक योजना सुचली. १ हजाराची फौज एकाच बाजूने गेली आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. एकाच वेळी कमी लोकांसह जर किल्ल्याच्या सगळ्याच बाजूने चढाई सुरु केली तर? नुकसानही कमी होईल आणि किल्ला काही वेळातच ताब्यात येईल. त्याचा विचार त्यालाच पसंत पडला. आपण आधीच हा विचार का केला नाही म्हणून तो स्वतःवरच चरफडला.

काही वेळातच फौजेचे मुख्य सेनानायक त्याच्या तंबूत हजर झाले. त्याने आपली योजना सगळ्यांना बोलून दाखवली. परिस्थितीचा विचार करता सगळ्यात योग्य अशीच ती योजना होती. फौज विखुरलेली असल्यामुळे आता वरून गडगडत येणारे दगड चुकवणे त्याच्या सैनिकांना सोपे जाणार होते. नुकसानही अगदीच कमी होणार होते. खान चांगलाच खुश झाला. पाहिजे तितकी सावधगिरी न बाळगल्यामुळे आपली एक हजाराची फौज हकनाक कमी झाली याची त्याच्या मनात असलेली खंत आता कुठल्या कुठे पळाली.

१ हजाराची फौज एकाच बाजूने गेली आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. एकाच वेळी कमी लोकांसह जर किल्ल्याच्या सगळ्याच बाजूने चढाई सुरु केली तर? नुकसानही कमी होईल आणि किल्ला काही वेळातच ताब्यात येईल. त्याचा विचार त्यालाच पसंत पडला. आपण आधीच हा विचार का केला नाही म्हणून तो स्वतःवरच चरफडला.

काही वेळातच फौजेचे मुख्य सेनानायक त्याच्या तंबूत हजर झाले. त्याने आपली योजना सगळ्यांना बोलून दाखवली. परिस्थितीचा विचार करता सगळ्यात योग्य अशीच ती योजना होती. फौज विखुरलेली असल्यामुळे आता वरून गडगडत येणारे दगड चुकवणे त्याच्या सैनिकांना सोपे जाणार होते. नुकसानही अगदीच कमी होणार होते. खान चांगलाच खुश झाला. पाहिजे तितकी सावधगिरी न बाळगल्यामुळे आपली एक हजाराची फौज हकनाक कमी झाली याची त्याच्या मनात असलेली खंत आता कुठल्या कुठे पळाली.

क्रमशः