शिवचरित्रमाला भाग १९

शिवचरित्रमाला भाग १९

आकांक्षांना पंख विजेचे.

अफझलखानाशी कसा प्रसंग घडणार आहे , याची कल्पना कुणालाच करता येत नव्हती। पण जो काही ‘ प्रसंग ‘ होणार आहे त्यात काहीही घडो ; विजय , पराजय वा मृत्यू , तरीही कोणीही हाती घेतलेलं स्वराज्याचं काम थांबवू नये , हाच महाराजांचा आपल्या जिवलगांना कळकळीचा आदेश होता। त्याप्रमाणे ‘ प्रसंगा ‘ नंतरच्या साऱ्या योजना महाराजांनी आधीच निश्चित केलेल्या होत्या. महाराजांचेच शब्द आहेत , ‘ आम्हांस काही दगाफटका झाला तरी नेताजी पालकरांचे हाताखाली तुम्ही सर्व झुंजत राहा.

‘ गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला असंच सांगितलं आहे नाही ? कर्मण्ये वाधिकारस्ते!

दि. १० नोव्हेंबर १६५९ , गुरुवार या दिवशी तो ‘ प्रसंग ‘ घडणार होता। नेमका कसा ? ते विधात्यालाच माहीत. पण स्वराज्याचा राजा आणि प्रत्येक सैनिक ठरल्याप्रमाणे आपापल्या जबाबदारीत गर्क होता. या दिवशी पहाटेपर्यंत सर्व सरदार आणि मावळे आपापल्या ठरलेल्या मोर्चावरती टपून बसले होते.

महाराजांनी यथासांग श्रींची पूजा केली। कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राजोपाध्ये यांनी पूजामंत्र म्हटले. महाराजांनी पूजा केली ? होय. पण संपूर्ण योजना दक्षतापूर्वक आखूनरेखून सिद्ध केल्यानंतर ते पूजेस बसले होते. एखादा विद्यार्थी पूर्ण अभ्यास केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा नमस्कारपूर्वक आशीर्वाद घेतो तसे. म्हणजेच महाराज तपश्चर्या करणारे होते. नवस करणारे नव्हते. नवस करणारे लोक देवाशी ‘ कॉन्ट्रॅक्ट ‘ करतात. ‘ माझं अमुक काम होऊ दे , म्हणजे देवा मी तुझ्याकरता तमुक करीन.

‘ अन् अजूनपर्यंत तरी शिवाजी महाराजांबद्दलच्या ऐतिहासिक विश्वसनीय कागदपत्रांत कोणत्याही कामाकरता किंवा हेतूकरता महाराजांनी कोणत्याही देवदेवतेला नवस केल्याची एकही नोंद सापडलेली नाही. ते नवसबाज नव्हते.

दुपार झाली. महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले. जिवा महाला , सकपाळ , संभाजी कावजी कोंढाळकर , संभाजी करवर , सिद्धी इब्राहीम , येसाजी कंक वगैरे दहा जिवलग , महाराजांचे सांगाती होते. तेच ठरले होते. तेच येणार होते. पण बालेकिल्ल्यावरून उतरताना गडाच्या खालच्या परिसरात जे मावळी सैन्य ठेवले होते , त्यांनी महाराजांना बालेकिल्ल्याच्या पायऱ्या उतरून येताना पाहिलेच. या मावळ्यांचा किल्लेदार होता गोरखोजी काकडे. हे सारेच मावळे महाराजांना पाहून भारावले आणि त्यांना गराडा घालून म्हणू लागले , ‘ महाराज , तिथे (खानाचे भेटीचे जागी) धोका आहे. आम्हाला तुमच्या सांगाती घ्या.

‘ठरलेल्या योजना जशाच्या तशाच पार पाडल्या पाहिजेत हा महाराजांचा कटाक्ष होता. कोवळ्या मायेच्या पोटी डाव बिघडणं योग्य नव्हतं. महाराज तरीही न रागावता त्यांना मायेने म्हणाले,‘ दादांनो, जे ठरले तेच येतील.

‘आणि महाराज ठरल्याप्रमाणेच भेटीच्या जागी शामियान्यापाशी आले. सर्वबाबतीत महाराज अतिशय सावध होते, दक्ष होते.

शामियान्याच्या दाराशी महाराज पोहोचले. खानाने तंबूच्या बाहेर न येताच आतच महाराजांना म्हटले,‘ तू अपनी हिम्मत बहादुरीकी शेखी बधारता है! बेआदब से बुरी राहपर क्यूं चलता हैं ? मेरा मातहत बन जा! अपनी सारी शेखी छोडकर इस अफझलखानको गले लगाओ!‘ आणि खानाने महाराजांना मिठी मारली. अन् क्षणातच त्याने महाराजांचे मस्तक आपल्या डाव्या बगलेत जोरात डाव्या हाताने करकचले. अन् आपली कट्यार काढून महाराजांच्या कुशीवर तडाखून घाव घातला. तो घाव नुसताच खरखरला. कारीगार झाला नाही. कारण महाराजांच्या अंगात पोलादी चिलखत होते. त्याच्या हे लक्षात आले असावे. कारण त्याने लगेच दुसरा घाव घालण्याकरता कट्यार उगारली अन् तो घाव घालणार, एवढ्यात महाराजांनी आपल्या डाव्या बाहीतील बिचवा खानाच्या पोटात खुपसला. किंकाळी फुटली. दग्याने महाराजांचा घात करावयास आलेला खान स्वत:च गारद झाला.

जर महाराज प्रत्येक निमिषाला सावध राहिले नसते, तर तेच गारद झाले असते. हा साराच प्रसंग आता जगाला तपशीलवार माहीत आहे. या शामियान्यातील ती भेट म्हणजे या प्रतापगड प्रकरणाचा सूर्यबिंबाप्रमाणे केंदबिंदू आहे. पण सूर्यबिंबाचे ते किरण जसे दूरवर पसरलेले असतात, तसे या प्रकरणातील महाराजांच्या अलौकिक नेतृत्त्वाचे किरण दूरवर पसरलेले होते. त्याचा अभ्यास युवकांनी बारकाईने केला पाहिजे. महाराज गडावरून खानाच्या भेटीसाठी उतरले तेव्हा, देवाला नमस्कार करून आणि तीर्थ घेऊन निघाले. त्याचवेळी वडीलधाऱ्या, स्वराज्यसेवकांचा अतिशय आस्थापूर्वक सल्ला आणि निरोप घेऊन ते निघाले. कुलोपाध्यायाला त्यांनी आदरपूर्वक वंदन केले.

पण तंबूतील प्रत्यक्ष भेटीच्या त्या प्रसंगानंतर काही क्षणात खानाबरोबर आलेल्या त्याच्या वकिलाने, म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने खानाची तलवार उचलली आणि महाराजांच्यावर तो घाव घालण्यासाठी धावला. महाराज निमिषभरही बेसावध नव्हते. त्यांनी क्षणात त्या वकिलाचा घाव अडविला. महाराजांनी त्याला चांगल्या शब्दांत कळकळीने बोलून घाव घालण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. खूप सांगितले. तरीही त्याने महाराजांवर तीनवेळा लागोपाठ घाव घातले. ते त्यांनी अडविले, उडवले. इतके सांगूनही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वकील ऐकत नाही, असं पाहिल्यावर महाराजांच्या भवानीचा सपकन फटकारा फिरला. अन् कुलकर्णी वकील ठार झाला. पाहिलंत? गडावरून निघताना महाराजांनी कुलोपाध्याय प्रभाकरभट्ट राजोपाध्ये यांना सादर नमस्कार केला होता. कुलोपाध्यायांचा तो आशीर्वाद राजाला होता, स्वराज्याला होता. महाराजांचं मन आणि मस्तक नम्रतेनं वंदन करीत होतं. पण भेटीच्या जागी राजांवर म्हणजेच स्वराज्यावर घाव घालणाऱ्या कृष्णाजी भास्कराला ते ठार करीत होते.

खानाच्या बाजूने आलेल्या सरदारांत महाराजांचे एक चुलते, भोसले होते. म्हणजे महाराजांचे ते काकाच. किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात ते ठार झाले. महाराजांचा हुकूमच होता मावळ्यांना की,‘ जे झुंजतील त्यांना मारावे. जे शरण येतील त्यांस मारो नये.‘ भोसले काका त्यात ठार झाले. पाहिलंत ? महाराज आपल्या स्वत:च्या वकिलाला म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांना आदराने ‘काका‘ म्हणत असत. त्यांना प्रेमाने आपल्या कुटुंबातीलच मानीत असत. या प्रतापगड प्रकरणात महाराजांनी नंतर पंताजी काकांचा भरघोस सादर सप्रेम गौरव केला.

महाराज आपल्या रक्ताच्या काकाला ठार मारीत होते अन् मानलेल्या काकांचा आदर करीत होते. खानाच्या वकिलाला ठार मारीत होते अन् आपल्या कुलोपाध्यायाला नमस्कार करीत होते. महाराजांचा हाच स्वराज्यधर्म होता. यालाच म्हणतात महाराष्ट्रधर्म. ‘विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा, नावडे त्याला। तेथे पैजाऱ्याचे काम, अधमासी व्हावे अधम।।‘ हाच महाराजांचा धर्म होता.

…. क्रमश.