झुंज : भाग १८

झुंज : भाग १८

 

जरी खानाने वरवर दाखवले नाही तरी ही घटना त्याच्यावर खूपच नकारात्मक परिणाम करून गेली. त्यानंतरही त्याने काही दिवस वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण त्याला माघार घेणेही कमीपणाचे वाटत होते आणि त्यामुळेच आपले सैन्य हकनाक बळी पडत आहे हे माहित असूनही त्याला गड घेण्यासाठी प्रयत्न करत रहावे लागत होते. बरे कोणतीही शक्कल लढवली तरी त्याचा परिणाम फक्त एकच होता. आणि तो म्हणजे त्याची हार.

आजही खान आपल्या शामियान्यात नेहमीसारख्या फेऱ्या घालत होता, तेवढ्यात हुजऱ्या आत आला. त्याने खानाला कुर्निसात केला आणि बादशहाकडून जासूद आल्याची वर्दी दिली. क्षणाचाही विलंब न लावता खानाने त्याला आत बोलावले. बादशहाने कोणता हुकुम पाठवला असणार हे खानाने आधीच ओळखले. जासुदाने बादशहाचा खलिता खानाच्या स्वाधीन केला. जी गोष्ट घडू नये असे खानाला वाटत होते तीच गोष्ट त्याच्या नशिबी आली. बादशहाने त्याला रामशेजच्या स्वारीची सूत्रे कासम खानाच्या सुपूर्द करायला सांगितली आणि त्याची तळकोकण प्रांतात परस्पर रवानगीही केली होती. पण जो पर्यंत कासम खान मोहिमेची सूत्रे हातात घेत नाही तो पर्यंत मात्र फतेहखानाला तिथेच थांबण्याचा आदेशही देण्यात आला होता.

शहंशहाचा खलिता मिळाल्यापासून जवळपास ५ दिवसांनी कासम खान बरोबर १० हजाराची फौज घेऊन हजर झाला. ही फौज पूर्णतः नवीन दमाची होती. जवळपास १५ हजाराची फौज तिथेच ठेवून उरलेली फौज घेऊन फतेहखान तळकोकणाकडे रवाना झाला.

पुढील काही दिवस कासमखानाने देखील गड घेण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण सगळे विफल झाले. शेवटी त्याने गडाला वेढा देऊन वाट पाहण्याचे ठरवले.

गडावरील रसदही संपत आली होती. कासमखानाने गडावरील हमला पूर्णतः बंद केला आणि त्यामुळेच हळूहळू किल्ल्यावरील लोकांची बेचैनी वाढत होती. पण त्यांच्या हातात यावर उपाय करण्यासारखे काहीही नव्हते.

रायगडावर संभाजी महाराज चिंताग्रस्त वाटत होते. त्रंबक गडावरून रामशेज बद्दलची माहिती आठवडा / १५ दिवसांच्या अंतराने त्यांना मिळतच होती पण अगदी इच्छा असूनही त्यांना रामशेजच्या मदतीला जाणे शक्य होत नव्हते. स्वतः बादशहा औरंगजेब औरंगाबादला तळ ठोकून होता. जंजीऱ्याचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीस, औरंगजेब बादशहाने स्वतःकडे फितूर केलेले मराठे सरदार आणि पोर्तुगीजांनी फितूर केलेला मराठा सरदार सावंत यांच्याशी महाराजांच्या चकमकी उडत होत्या. आणि त्यामुळेच त्यांना रामशेजकडे लक्ष देणे जमत नव्हते. जवळपास तीन वर्षांपासून रामशेज एकटा झुंजत होता. आणि अजूनही त्याने हार मानली नव्हती. असा किल्ला मुगलांच्या हाती जाऊ द्यायला महाराजही तयार नव्हते. शेवटी त्यांनी मनाचा निश्चय केला आणि रामशेजच्या मदतीला कुमक पाठवायचे निश्चित केले. गडाला वेढा घालून बसलेल्या मुगल फौजेचे संख्याबळ जवळपास २५००० होते. तेवढे सैन्य पाठवणे महाराजांना शक्य नव्हते. शेवटी त्यांनी रुपाजी भोसले आणि मानोजी मोरे या दोन सरदारांना रायगडावर बोलावले.

दोन दिवसातच दोघेही सरदार महाराजांपुढे हजर झाले.

“आज्ञा महाराज…” महाराजांना मुजरा करून रुपाजी उभे राहिले.

“रुपाजी, मानोजी… बसा…” महाराजांनी त्यांना बसायला सांगितले. दोघेही स्थानापन्न होताच महाराजांनी सुरुवात केली.

“तुम्ही तर जानताच सध्या स्वराज्यासाठी आपणा सर्वांनाच जीवाचे रान करावे लागत आहे. एकही दिवस उसंत नाही. आणि याचाच फायदा मुगल बादशाह उचलतो आहे. त्याने नाशिकप्रांतात धुमाकूळ माजवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रामशेजचा किल्लेदार एकटा मुगल फौजेशी झुंज देतोय. तसे त्याला त्र्यंबक गडाचा किल्लेदार आणि अहिवंत किल्ल्याचा किल्लेदार यांनी रसद पुरवली पण ती कितीशी असणार? औरंगजेबाने या दरम्यान तीन सरदार बदलले आहेत. रामशेजचा किल्लेदार स्वतः शूर आहेच पण आपल्या रयतेचे काय? रसद संपली तर स्वतःच्या प्राणांचे बलिदान किंवा मुगलांचा अमल यापैकी एक गोष्ट त्यांच्या वाट्याला येईल. आणि असे झाले तर आम्हाला राजा म्हणवून घेण्यास काय अभिमान वाटणार? हे राज्य रयतेचे आहे. इथे आपण रयतेसाठी लढा देत आहोत. त्यामुळे तुम्ही दोघांनी तत्काळ रसद घेऊन रामशेजच्या मदतीला जा. पण एक लक्षात ठेवा… कोणताही आततायी निर्णय घेऊ नका. यावेळेस आपल्याला लढाई करायची नाही तर किल्लेदाराला रसद पुरवायची आहे.” महाराजांनी नेमकी गोष्ट दोघांना सांगितली.

“आपल्या मनाप्रमानंच हुईल महाराज… काळजी नसावी…” मानोजींनी त्यांना आश्वस्थ केले.

“आणि किल्लेदाराला आमचा निरोपही कळवा… तुमच्या सारखे मर्द मराठे स्वराज्याचे रक्षक असल्यामुळेच आम्ही निश्चिंत आहोत…”

“जी महाराज…” महाराजांना मुजरा करून दोघांनीही राजांच्या निरोप घेतला.
दोघेही सरदार बरोबर फक्त पाचशे घोडेस्वार घेऊन निघाले. खरे तर रुपाजी मनातून काहीसे हिरमुसले होते. महाराजांनी स्पष्ट शब्दात त्यांना शक्यतो लढाई न करण्यासाठी बजावले होते. एकावेळेस पाच पन्नास माणसांना अंगावर घेण्याची धमक असलेला शूर गडी खानाच्या सैन्यासमोर जाऊनही फक्त लपून बसून वाट पाहणार ही गोष्ट त्यांना काहीशी खटकत होती. पण स्वराज्यासाठी प्रसंगानुरूप वागण्याची कलाही दोघांनी चांगलीच साधली होती आणि याच गोष्टीमुळे महाराजांनी त्यांची निवड केली होती.

मराठा तुकडी जशी नाशिक प्रांतात शिरली तशी त्यांनी सगळ्यात पहिली भेट पट्टा किल्ल्याला दिली. तेथील किल्लेदाराकडून संपूर्ण रसद स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यांनी रामशेजकडे प्रयाण केले.

क्रमशः